बर्ड फ्लू कसा पसरतो? माणसांना त्यापासून धोका आहे कि नाही?

गेले जवळजवळ वर्षभर आपण करोना व्हायरसच्या सावटाखाली जगतोय.

या व्हायरसने अख्या जगात धुमाकूळ घातला आहे. आता कुठे परिस्थिती जरा निवळायच्या मार्गावर आहे तोच आपल्या देशात बर्ड फ्लूच्या बातम्या यायला सुरुवात झालीये.

हिमाचल प्रदेशात, केरळमध्ये, राजस्थान, हरियाणा आणि मध्यप्रदेशात अनेक पोल्ट्रीच्या पक्षांना हा आजार होऊन त्यांचा जीव गेला आहे.

व्हायरस म्हटले की भीती वाटणे साहजिकच आहे. पण त्याचबरोबर त्या व्हायरस विषयी व त्यामुळे होणाऱ्या आजराविषयी माहिती मिळवणे गरजेचे आहे.

काही वेळा ऐकीव किंवा अर्धवट माहितीमुळे घाबरून जायला होते.

सत्य परिस्थिती माहीत नसताना केवळ ऐकीव माहितीवरून गोंधळ उडू शकतो.

काहीवेळा काही अफवा सुद्धा पसरवल्या जाऊ शकतात.

अशावेळेला, गोंधळ उडाल्यामुळे कोणती खबरदारी बाळगायची, कोणाला धोका जास्त आहे अशा गोष्टींकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते.

पण या आजारांविषयी माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे जबाबदारीने वागता येते. 

तुम्हाला सुद्धा या व्हायरस बद्दल, बर्ड फ्लू या आजाराबद्दल अनेक प्रश्न पडले असतीलच, हो ना? 

आज या लेखात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची, अगदी सोप्या भाषेत उत्तरे मिळणार आहेत.

या लेखात बर्ड फ्लू म्हणजे काय, तो कोणत्या व्हायरसमुळे होतो, त्याची लक्षणे काय आहेत, तो कसा पसरतो व त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी अत्यंत सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत. 

बर्ड फ्लू कशामुळे होतो? 

बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये होणारा एक व्हायरल रोग आहे.

इन्फ्लुएन्झा टाईप ‘ए’ या व्हायरसमुळे बर्ड फ्लू होतो. चिकन, टर्की, बदक या सारख्या पोल्ट्रीच्या पक्षांना हा रोग होण्याची शक्यता असते.

१९९७ मध्ये हॉंगकॉंगमध्ये पहिली बर्ड फ्लू ची केस सापडली होती.

याला एव्हीअन इनफ्लूएन्झा सुद्धा म्हणतात. गेले काही दिवस देशातील काही प्रांतामध्ये याच व्हायरसने पोल्ट्रीच्या प्राण्यांना इन्फेक्ट केले आहे.

त्यामुळेच या संबंधी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा रोग माणसांमध्ये पसरू शकतो का?

पसरत असेल तर त्याचा फैलाव कोणत्या प्रकारे होतो?

असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. त्यामध्ये सगळ्यात चिंता करण्यासारखा एक प्रश्न हमखास विचारला जातो, तो म्हणजे, या रोगाला घाबरून चिकन, अंडी खाणे बंद करावेत का? 

या प्रश्नाचे उत्तर या लेखातून तुम्हाला मिळणारच आहे. पण त्या पूर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे की माणसांमध्ये हा व्हायरस येऊ शकतो का? 

या प्रश्नाचे उत्तर आहे की, हो माणसांना सुद्धा बर्ड फ्लू होऊ शकतो.

पण तो कसा हे समजून घेणे महत्वाचे आहे. माणसांमध्ये बर्ड फ्लू हे इन्फेक्शन होण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१. बर्ड फ्लू झालेल्या एखाद्या पक्षाच्या संपर्कात कोणी माणूस आला तर त्याला बर्ड फ्लू होण्याची शक्यता असते. 

२. बर्ड फ्लू झालेल्या एखाद्या पक्षाला हात लावल्यास हे इन्फेक्शन पसरण्याची शक्यता असते. 

३. इन्फेक्डेड पक्षाच्या विश्ठेशी संबंध आल्यास इन्फेक्शन पसरते. 

४. जिथे जिवंत पक्षी विकले जातात अशा बाजारात इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. 

५. इन्फेक्शन झालेल्या पक्षाचे मटण किंवा अंडी व्यवस्थित न शिजवता खाल्ल्याने सुद्धा हा रोग पसरतो. 

हा रोग माणसाला झाल्यास माणसामध्ये कोणती लक्षणे दिसून येतात? 

बर्ड फ्लू… या नावावरूनच समजते की हा एक फ्लूचा प्रकार आहे.

माणसाला जर बर्ड फ्लू झाला तर श्वसन संस्थेशी संबंधित त्रास सुरु होतात.

सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होणे ही बर्ड फ्लूची काही प्रमुख लक्षणे आहेत.

या व्यतिरिक्त सुद्धा बर्ड फ्लूची काही लक्षणे आहेत, ती खालीलप्रमाणे.

  •  घसा दुखणे. 
  • थकवा येणे. 
  • डोकेदुखी. 
  • अंगदुखी. 
  • जुलाब. 
  • मळमळने किंवा उलट्या 

रोगाची लागण झाल्यावर २ ते ७ दिवसांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. हा संसर्ग तोंडावाटे, नाकावाटे किंवा डोळ्यातून होण्याची शक्यता असते.

पोल्ट्रीच्या दुकानात काम करणारे, जिवंत पक्षी विकले जातात अशा बाजारात जाणाऱ्यांना जास्त प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता असते.

यामुळे अशा लोकांनी ही लक्षणे आढळ्यास वैद्यकीय मदत घेण्याची गरज असते.

या रोगाचे काही गंभीर लक्षणे म्हणजे ARDS, म्हणजे Acute Respiratory Distress Syndrome यामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते व त्यामध्ये पाणी साचते.

काही वेळा अशा गुंतागुंतीच्या समस्यांमुळे हा रोग जीवावर बेतण्याची सुद्धा शक्यता असते. या रोगाचे निदान व उपचार वेळेत न झाल्याने अशी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. 

पण याचबरोबर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा व्हायरस सहसा माणसांमध्ये पसरत नाही. फक्त रोग झालेल्या जिवंत किंवा मृत पक्षाच्या संपर्कात आल्यानेच याचा फैलाव होतो. 

आता एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया, हा रोग माणसाकडून माणसाला होण्याची शक्यता असते का? 

WHO ने दिलेल्या माहितीनुसार असे होण्याची शक्यता कमी आहे, निदान असे झाल्याचे अद्याप निदर्शनास आले नाही.

WHO ने ही सुद्धा माहिती दिली की व्यवस्थित शिजवलेल्या चिकन, अंडी  किंवा इतर पक्षाच्या मटणामुळे सुद्धा बर्ड फ्लू पसरू शकत नाही कारण इतक्या वरच्या तापमानाला व्हायरस जिवंत राहत नाही.

मात्र अर्धवट शिजवलेल्या किंवा कच्च्या चिकन, अंडी किवा अन्य पक्षाच्या मटणामुळे बर्ड फ्लूचा फैलाव होऊ शकतो.

त्यामुळे चिकन, अंडी खाताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. 

तुम्हाला बर्ड फ्लूची लागण होऊ नये यासाठी तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे?

१. ज्या देशात किंवा प्रदेशात या फ्लूच्या केसेस जास्त प्रमाणात आहेत, तिथे प्रवास टाळावा. 

२. पोल्ट्री शिजवताना काळजी घ्यावी, कच्या पोल्ट्रीला हात लावल्यावर हात व्यवस्थित साबण वापरून धुवून घ्यावेत. तसेच पोल्ट्री आणलेली पिशवी ताबडतोब फेकून द्यावी. 

३. शिजलेले चिकन, अंडी ठेवण्यासाठी व कच्चे चिकन, अंडी ठेवण्यासाठी वेगळी भांडी वापरावीत. वापरानंतर ही भांडी व्यवस्थित धुवून घ्यावीत. 

४. जिवंत पोल्ट्रीशी संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा बाजारात जाणे टाळावे व शक्यतो पॅकिंग असलेले चिकन आणावे. 

५. चिकन व अंडी खाताना ती व्यवस्थित शिजली आहेत न याची खात्री करून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत कच्चे अंडे किंवा अर्धवट शिजलेले अंडे, चिकन खाऊ नये. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।