आयुष्यात तुमची ध्येय गाठताना, महत्वाकांक्षा पूर्ण करताना बऱ्याचदा असे होते, की पुढे काय करावे ते समजत नसते…
तुमच्या कष्टांचे चीज होत नसते….
पराकोटीचे प्रयत्न करूनही तुम्हाला अपेक्षित असलेले यश तुमच्या पदरी पडत नसते.
याचा अर्थ तुम्ही अयशस्वी होता असाही नसतो कारण तुमचे प्रयत्न चालूच असतात फक्त त्यांचे फळ तुम्हाला मिळत नाही.
यामागे काही कारणे असू शकतात, कदाचित तुमच्या वाटेत अनेपक्षित अडथळे येत असतील.
त्याच्याशी सामना करण्यात तुमचा वेळ व शक्ती खर्ची पडत असेल.
किंवा तुमच्या आयुष्यातील इतर काही घटनांचा, माणसांचा तुमच्या कामावर परिणाम होत असेल.
अशामुळे साहजिकच ताणतणाव निर्माण होतो.
तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जर तणाव असतील तर निराशा येते.
अशावेळी इच्छा, स्वप्ने, ध्येय सगळे सोडून द्यावेसे वाटते.
पण हेच खरे परीक्षेचे क्षण असतात. तुम्ही किती कणखर आहात ते अशा प्रसंगातूनच सिद्ध होते.
हे नक्कीच सोपे नसते. अनेकजण या अशा प्रसंगांना सामोरे जात असतातच.
आपल्यापैकी सगळ्यांनीच अशी परिस्थिती अनुभवली असेलच.
अशा खडतर काळातून गेल्यावरच यश मिळते आणि अशाप्रकारे मिळालेल्या यशाचा आनंद काही वेगळाच असतो.
या अशा गोष्टी लिहायला वाचायला सोप्या वाटतात पण प्रत्यक्ष अशी वेळ आल्यावर मात्र हे सगळे लक्षात राहत नाही.
त्यावेळी सगळे मनोधैर्य गळून पडते.
कदाचित हा लेख वाचणाऱ्यांपैकी कित्येक जण अशा परिस्थितीचा सामना सुद्धा करत असतील, कदाचित तुम्ही सुद्धा.
या लेखाचे दोन मुख्य हेतू आहेत, एक म्हणजे अशा खडतर काळातून जाणाऱ्या सर्वांना समजावे की ते एकटे नाहीत, असे बरेच जन आहेत.
या लेखाचा दुसरा हेतू म्हणजे अशा खडतर काळाचा सामना करताना तुम्हाला ‘गिव्ह अप’ करावेसे वाटू नये किंवा जेव्हा तुम्हाला गिव्ह अप करावेसे वाटेल तेव्हा तुमच्याकडे तसे न करता तुमचे प्रयत्न चालू ठेवण्यासाठी काहीतरी प्रेरणादायी गोष्ट सांगणे.
मित्रांनो, अशा प्रेरणादायी गोष्टींचा सुद्धा तुमच्या खडतर काळात तुम्हाला फायदा होत असतो.
अशा गोष्टी वाचल्याने तुमचे मनोधैर्य वाढते.
तुम्हाला प्रयत्न करत राहायला कारण मिळते.
तुम्ही तुमचा खडतर काळ सहज पार पडून यशाची उत्तुंग शिखरे अशामुळे सर करू शकता.
मग आज या लेखात आपण वाचूया अशीच एक उत्साह वाढवणारी आणि गिव्ह अप का करायचे नाही याचे महत्व पटवून देणारी फ्लॉरेन्स चॅडविकची गोष्ट?
मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट १९५२ सालची आहे.
त्या वेळेस फ्लॉरेन्स चॅडविक ३४ वर्षांच्या होत्या.
वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी कॅटेलीना चॅनल पोहत जायचा निर्णय घेतला होता.
२१ मैलांचे हे अंतर पोहत जाण्याचा त्यांचा हा खूप मोठा व धाडसी निर्णय होताच पण हे अंतर पोहून पार करायचा एका महिलेचा सुद्धा हा पहिलाच प्रयत्न होता.
४ जुलै १९५२ रोजी त्यांनी प्रचंड आत्मविश्वासाने त्यांच्या या अनोख्या प्रवासाला सुरुवात केली.
समुद्रात इतके अंतर पोहून जायचे हेच मुळात अवघड होते पण त्या दिवशी वातावरण सुद्धा खूपच खराब होते.
एकतर समुद्राचे पाणी प्रचंड थंड होते आणि त्याचबरोबर खूप प्रमाणात धुके होते.
फ्लॉरेन्स चॅडविक यांच्या मागून त्यांना काही मदत लागली, काही त्रास झाला तर बघायला म्हणून एक सुरक्षा नाव होती.
त्या दिवशी इतके धुके होते की नावेतील लोकांना सुद्धा समोरचे व्यवस्थित दिसत नव्हते.
तरीही फ्लॉरेन्स चॅडविक पोहत राहिल्या.
असे ५ तास गेले. धुके संपत नव्हते.
त्यांच्या मागून येणाऱ्या नावेतील लोक, ज्यात त्यांची आई सुद्धा होती, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत होती.
अशाप्रकारे फ्लॉरेन्स चॅडविक १ तास पोहत राहिल्या. पण तरीही किनारा लागत नव्हता.
यामुळे हळूहळू त्यांचा आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला.
त्यांचा स्वतःवर विश्वास नव्हता. त्यांनी नावेत बसलेल्या त्यांच्या आईला सुद्धा हे सांगितले.
प्रचंड धुके होते त्यामुळे समुद्र किनारा दिसत नव्हता. यामुळे काही केल्या त्यांना अंदाज येत नव्हता की किनारा अजून किती दूर आहे.
१५ तास होऊन गेले होते, अजून किती तास पोहावे लागेल हे समजत नव्हते.
आणि अशा ऐन वेळी, जेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण १५ तास त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खर्च केले होते, अशा वेळी त्यांनी ‘गिव्ह अप’ केले.
अर्थातच त्यांना हा निर्णय घेणे कठीण गेले पण किनाऱ्याचा काहीच अंदाज येत नसल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला.
त्यांना सहाय्यक नावेतील लोकांनी पाण्यातून बाहेर यायला मदत केली.
मग त्या नावेत बसल्या आणि फक्त एका मैलाच्या अंतरावर त्यांना किनारा लागला!
मित्रमैत्रिणींनो, जिथे त्यांनी २० मैल सर केले होते आणि फक्त १ मैल बाकी होता अशावेळेस त्यांनी ‘गिव्ह अप’ केले.
त्यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना प्रचंड दु:ख झाले. त्या म्हटल्या की जर धुके नसते व त्यांना किनारा दिसला असता तर तेवढे अंतर, त्या किनाऱ्याकडे म्हणजेच त्यांच्या ध्येयाकडे पाहून त्या नक्कीच पोहू शकल्या असत्या.
पण त्यांचे ध्येय त्यांना दिसत नव्हते, त्या ध्येयापासून किती दूर आहेत याचा अंदाज त्यांना येत नव्हता. त्यामुळे अजून किती पोहायचे आहे हे त्यांना समजत नव्हते.
केवळ याच कारणामुळे त्यांनी ऐन वेळेला ‘गिव्ह अप’ केले.
त्या प्रयत्नानंतर दोन महिन्यानी त्यांनी परत प्रयत्न केला. त्यावेळेस पण धुके जास्त होतेच.
पण या वेळेला त्यांना मागच्या वेळेचा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी हे अंतर कापले.
या गोष्टीचा तुम्ही जर निट विचार केला तर तुम्हाला यातून काही गोष्टी समजतील.
बऱ्याच वेळेला तुमच्याही बाबतीत असे होत असेल की तुमचे ध्येय तुमच्या अगदी जवळ आहे पण काही कारणामुळे तुम्हाला ते दिसू शकत नाही.
पण ते दिसत नसले तरी ते तुमच्या जवळ आहे. अशावेळेला फक्त ध्येय दिसत नाही म्हणून हार मानने योग्य नाही.
ध्येयापर्यंत येण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले आहेत ते सुद्धा अशामुळे वाया जातात.
म्हणून ध्येय दिसत नसले तरी हारून, कंटाळून, घाबरून किंवा कोणत्याच कारणाने ‘गिव्ह अप’ करणे योग्य नाही.
कारण तुम्हाला ध्येय दिसत नसते पण ते तुमच्या अगदी, जवळ सुद्धा असू शकतेच ना?
असा सकारात्मक विचार करून न थांबता प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत.
तुम्हाला गरज असेल तर तुम्ही एक ब्रेक घेऊ शकता.
स्वतःला हवा तेवढा वेळ देऊन ताजेतवाने होण्याकरता काहीवेळा ब्रेक गरजेचा असतो. पण या ब्रेक नंतर दुप्पट जोमाने प्रयत्न करून तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची तयारी तुम्ही केलीच पाहिजे.
या गोष्टीतून दुसरी महत्वाची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे प्रयत्न सोडता कामा नयेत.
फ्लॉरेन्स चॅडविक पहिल्यांदा यशस्वी झाल्या नाहीत.
त्यांच्या ध्येयाच्या अगदी जवळ असून सुद्धा त्यांना ते गाठता आले नाही पण म्हणून त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.
आयुष्यात दर वेळी, प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेलच असे नाही पण म्हणून प्रयत्न करणे सोडायचे नाही.
एकदा, दोनदा, तीनदा कितीही वेळा प्रयत्न करावे लागले तरी चालतील पण तेवढा संयम बाळगून आणि आत्मविश्वास ठेऊन प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत. तुमच्या प्रयत्नांना अशामुळे नक्कीच यश येईल.
आयुष्य कठीण सामन्यांची मालिकाच असतो.
पण प्रत्येक कठीण समस्येनंतर एक सुंदर किनारा असतो.
फ्लॉरेन्स चॅडविक यांच्यासारखे तुम्ही सुद्धा तुमच्या किनाऱ्यावर पोहोचणार आहातच…
त्यासाठी फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायची गरज आहे!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mast 👍