अवतीभोवतीची माणसं खरी की खोटी… ओळखायचं कसं??? पाहुया या लेखात…
आपल्या अवतीभोवती कायमच कोणी ना कोणी माणसं असतात.
काही ओळखीची काही अनोळखी.
नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, जाता येता वाटेत तोंडओळख झालेली माणसं.
यातले काही जण अगदी आपल्या परिचयाचे असतात तर काही जणांची जुजबी ओळख असते.
काही ना काही कारणाने आपण एकमेकांच्या संपर्कात येतो.
कोणी कामासाठी गोड बोलतं, कोणी आपुलकीनं जवळ येतं, कोणी मदत करणारं, कोणी फायदा घेणारं अशी तऱ्हेतऱ्हेचा माणसं.
काही जण असे असतात की आपल्या पडत्या काळात सुद्धा खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे असतात.
तर काहीजण अशा वेळी पाठ फिरवून निघून जातात.
आपलं आयुष्य चांगलं चाललं असेल तर कोणाला बघवणार नाही हे सांगता येत नाही.
सहाजिकच प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपण नेमकं जाणून घेतलं पाहिजे.
मग अशा माणसांमधला फरक ओळखावा तरी कसा ??? जाणून घेऊ या लेखात…
१. निःस्वार्थी माणसं कोणताही हेतू न ठेवता मदत करतात तर मतलबी माणसं अटी शर्थी ठेवून वागतात :
निःस्वार्थी माणसाचं मनच मुळात शुद्ध असतं. अशी माणसं निर्मळ मनाने इतरांना मदत करतात.
आपल्यामुळे कोणाचं भलं झालं तर त्यातच त्यांना आनंद वाटतो.
सात्विक वृत्ती तर अशा व्यक्तींमध्ये असतेच. याउलट मतलबी माणसं मात्र स्वतःचा फायदा होणार असेल तरच दुसऱ्यांच्या संपर्कात येतात.
कोणावर तरी आपण उपकार करतोय ही गोष्ट ते सतत इतरांना दाखवून देतात.
२. निःस्वार्थी माणसं इतरांना सुखी कसं ठेवता येईल याचा विचार करतात तर दुष्ट माणसं इतरांमुळे आपण किती सुखी होऊ याचा विचार करतात :
निःस्वार्थी माणसं छोट्या छोट्या गोष्टीतून का होईना इतरांना सुखी कसं ठेवता येईल याचा विचार करतात.
याउलट दुष्ट माणसं मात्र इतरांकडून स्वतःच कौतुक कसं होईल, आपली प्रशंसा कोण करतंय इतकाच विचार करण्यात मग्न असतात.
३. निःस्वार्थी माणसं इतरांच्या यशात आपलं यश मानतात तर स्वार्थी माणसं इतरांचं यश पाहूनच त्यांचा द्वेष करतात :
निःस्वार्थी माणसं मोकळ्या मनाची असतात त्यामुळेच इतरांची प्रगती, यश पाहून त्यांना आनंदच होतो.
याउलट स्वार्थी माणसं मात्र इतरांचं यश पाहूनच जळायला लागतात.
इतरांच्या आनंदात सहभागी होण्यापेक्षा त्यांच्यातल्या उणीवा दाखवणं त्यांना महत्वाचं वाटत.
यश मिळालेल्या माणसाची प्रतिमा कशी डागाळली जाईल याकडे त्यांच लक्ष असतं.
४. चांगल्या लोकांकडे समजूतदारपणा आवर्जून असतो तर वाईट लोक दुसऱ्याचं दुःख ते स्वतःचं सुख मानतात :
चांगल्या लोकांकडे इतरांना समजून घेण्याची क्षमता जास्त असते.
एखाद्याकडे पाहूनच तो आनंदी आहे की दुःखी आहे ते लक्षात येतं.
अशा वेळी त्या व्यक्तीला योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता चांगल्या लोकांकडे असते.
वाईट लोक मात्र इतरांचा त्रास समजून न घेता त्याला आणखी कसं अडचणीत टाकता येईल हे पाहतात.
५. चांगले लोक आपल्या लोकांचे कायमचे साथीदार होतात तर वाईट लोक नेमक्या अडचणीच्या वेळी आपल्या लोकांचा हात सोडून देतात :
काही जण त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना चांगल्या वाईट अशा कोणत्याही काळात कायम साथ देतात.
आनंद असेल तर द्विगुणित करणं आणि दुःख असेल तर वाटून घेणं एवढाच त्यांचा उद्देश असतो.
वाईट लोक मात्र जवळच्याच माणसांना त्यांच्या गरजेच्या वेळी एकटं सोडून देतात.
इतरांचं दुःख आपल्या अंगाशी येईल की काय ही त्यांना भीती असते.
६. चांगले लोक सगळ्यांशीच मायेनं वागतात मात्र वाईट लोक उपयोगी माणसांशी प्रेमानं वागतात :
चांगल्या लोकांच्या दृष्टीने सगळेच लोक सारखे असतात.
कोण उपयोगी कोण निरुपयोगी हा भेद नसतो.
त्यामुळे ते सगळ्यांशी मायेनं वागतात. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना आपुलकी दाखवतात.
वाईट माणसं मात्र स्वतःच्या सोयी आणि गरजेनुसार मोजक्या माणसांना आपलंस करतात. गरज संपल्यावर ती माणसंही त्यांना नकोशी होतात.
७. चांगली माणसं सत्याची साथ देतात मात्र वाईट माणसं खोटं वागणं पसंत करतात :
चांगल्या माणसांना नेहमी खरं बोलणं, वागणं योग्य वाटतं. तसंच ते आचरणात आणतात.
लपवाछपवी करणं त्यांना पटत नाही आणि जमतही नाही.
वाईट माणसांना मात्र लांडिलबाडी करणंच सोयीचं वाटतं.
इतकच नाही तर एक खोटं लपवायला ते शंभर खोटी बोलायलाही तयार असतात.
८. चांगली माणसं तुमच्यात असलेल्या चांगुलपणाचा नेहमीच आदर करतात तर वाईट माणसं तुमचा विश्वासघात करायला टपलेली असतात :
आपण जर सज्जनांच्या संपर्कात आलो तर सहाजिकच एकमेकांबद्दल आदरयुक्त भावना निर्माण होते.
एकमेकांवर दृढ विश्वास असतो. अशा लोकांशी मोकळेपणाने बोलता येतं.
याउलट वाईट माणसांची अजिबात खात्री नसते. एखाद्याशी गोड बोलत असले तरी त्याच्यामागे काय निंदानालस्ती करतील याचा भरवसा नसतो.
९. आपल्या चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची सज्जनांची तयारी असते, तर खोटारडे लोक मात्र स्वतःच्या चुकीसाठी दुसऱ्याला गृहीत धरतात :
स्वतःचा कमीपणा किंवा चूक स्वीकारणं यात सज्जन लोकांना काहीच गैर वाटत नाही.
जमलं तर त्यात सुधारणा करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतात.
दुर्जन लोक मात्र खोटेपणा करण्यात तर तरबेज असतात आणि स्वतःची काही चूक झालीच तर मात्र त्याचं खापर ते इतरांवर फोडायला पाहतात.
१०. नम्रता हा सज्जनांचा मुख्य गुण असतो तर घमेंडखोरपणा हा दुर्जनांचा मुख्य गुण असतो :
सज्जन लोक नेहमीच इतरांशी शांतपणे, नम्रतेने, समंजसपणे वागतात.
गोड बोलणं, सहनशीलता हे त्यांचे गुणच असतात.
याउलट दुर्जन लोक मात्र इतरांना तुच्छ लेखणं, अनादर करणं, एखाद्याच्या प्रगतीत अडथळा आणणं, एखाद्याला अपमानास्पद बोलणं हेच उद्योग सुरू ठेवतात.
११. चांगली माणसं सद् सद् विवेक बुद्धीने वागणारी असतात तर दुष्ट माणसं अविचाराने वागतात :
चांगली माणसं कोणत्याही परिस्थितीत तारतम्य बाळगून वागतात.
वाद टाळणं समजुतीनं वागणं त्यांना बरोबर जमतं. आपल्यामुळे कोणी दुखावलं जाणार नाही याची ते काळजी घेतात.
दुष्ट माणसं मात्र कोणाचीही पर्वा न करता स्वतःच्या मनाला येईल तसं वागतात. आपला कोणाला त्रास होईल याचा ते विचार करत नाहीत.
१२. चांगली माणसं चांगल्या कृतीला महत्व देतात, तर ढोंगी माणसं नुसतीच आश्वासनं देतात :
प्रार्थनेच्या हातापेक्षा मदतीचा हात महत्वाचा असतो.
चांगल्या माणसांच्या बाबतीत तेच असतं. अशी लोकं केवळ शब्दातून नाही तर कृतीतून चांगुलपणा दाखवतात.
ढोंगी माणसं मात्र आश्वासनं देण्यात पटाईत असतात. आपण कोणाला शब्द दिला आहे, आपल्यावर कोणी अवलंबून आहे याचा विचार ते करत नाहीत.
१३ सज्जनांचा संग इतरांना सज्जन बनवतो तर दुर्जनांचा संग वाममार्गाला लावतो :
सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो म्हणतात ते काही खोटं नाही.
सज्जनांच्या सहवासात जाणारा सामान्य माणूस सज्जन होतो.
चांगल्या आचार विचारांचा त्याच्यावर प्रभाव पडतो. दुर्जनांच्या सहवासातल्या माणसाला मात्र चांगलं वाईट यातला फरक कळत नाही.
अशा माणसांचं आणखी कसं नुकसान होईल याचा विचार दुर्जन करतात.
१४. चांगल्या माणसांजवळ क्षमाशील भाव असतो तर वाईट माणसांमधे तो गुण नसतो :
चांगल्या माणसांच्या बाबतीत एखादा वाईट वागला तर त्याला माफ करणं, झालेल्या गोष्टी सोडून देणं हे चांगल्या लोकांना सहज जमतं.
पण वाईट लोक मात्र इतरांच्या चूका कधीच विसरत नाहीत.
माफ केलं असं म्हटलं तरी वेळ पाहून झालेल्या गोष्टींचा बदला कसा घ्यायचा याचा विचार करतात.
१५. चांगली लोकं आपल्यातला कमीपणा ओळखून तो सुधारायला मदत करतात तर वाईट लोक मात्र त्याच कमीपणावर हसत राहतात :
आयुष्यात प्रत्येकजण परिपूर्ण असतोच असं नाही. पण एखाद्याचा कमीपणा लक्षात आल्यावर तो घालवायला त्याला मदत करणं हे चांगल्या लोकांनाच जमतं.
दुष्ट लोकांना जर हा कमीपणा लक्षात आला तर तो सुधारण्यापेक्षा त्या गोष्टीवरून त्या माणसाची फजिती कशी होईल याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं.
१६. सज्जन लोक समोरच्या माणसावर विश्वास ठेवून त्याची मदत घेतात तर दुर्जन माणसं केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांची मदत घेतात :
गरजेच्या वेळी कोणाची मदत घेणं यात गैर काहीच नाही.
पण ते उपकार न विसरता त्यासाठी आभार मानणं हे चांगल्या लोकांनाच जमतं.
दुर्जन लोक मात्र केवळ स्वतःची गरज आणि वेळ भागवण्यासाठी इतरांची मदत घेतात. गरज भागल्यावर त्या व्यक्तीला ते विसरूनही जातात.
१७. सज्जन लोकांवर सात्विक गुणांचा तर ढोंगी लोकांवर भौतिक गोष्टींचा प्रभाव असतो :
शांत, निर्लोभी, निःस्वार्थी वृत्ती असणं हे सज्जन लोकांचे सात्विक गुण आहेत.
आयुष्यात कमीत कमी गरजा ठेवून सुखी राहणं त्यांना सहज जमतं.
ढोंगी माणसं मात्र केवळ भौतिक सुखासाठी धडपडत असतात.
असे गुण अवगुण अवतीभोवतीच्या माणसांमध्ये कसे आहेत याचा अंदाज नक्कीच येईल.
त्यावरून माणसं ओळखता येतील. मग आपलं नुकसान करणारी ढोंगी माणसं टाळून सज्जनांच्या संगतीत जाणं नक्कीच श्रेयस्कर होईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.