तुमचा / तुमची जोडीदार तुम्हाला गृहीत धरत आहे का ?
जाणून घ्या नात्यामध्ये गृहीत न धरले जाण्याचे ७ स्मार्ट मार्ग
तुमच्या आयुष्यातले सर्वात जवळचे नाते असते ते अर्थातच तुमच्या जोडीदाराबरोबरचे.
ह्या नात्यात दोघांनीही एकमेकाना प्रेम, विश्वास आणि योग्य तो सन्मान देणे अपेक्षित असते.
परंतु जर ह्या नात्यातील एक व्यक्ति सतत दुसऱ्या व्यक्तीला गृहीत धरू लागली तर…
दुसऱ्या व्यक्तीच्या इच्छा, अपेक्षा ह्या कशाचाही विचार न करता त्या व्यक्तीला गृहीत धरून आपल्याला हवे तसे वागू लागली तर….
आज आपण ह्या विषयावर अधिक जाणून घेऊया.
बरेचदा आपण आपल्या जोडीदाराबरोबरच्या नात्यात खूपच जास्त गुंतत जातो.
हे साहजिकच आहे. आयुष्यातील सर्वात प्रेमाचे आणि महत्वाचे असणारे नाते असते ते…
पण हळूहळू आपण त्या नात्यात इतके गुंतत जातो की सतत येईल त्या परिस्थितीशी आणि आजूबाजूच्या लोकांशी जुळवून घ्यायला लागतो.
त्यासाठी प्रसंगी आपल्या स्वतःच्या इच्छा बाजूला टाकतो, स्वतःला हवे ते न करता इतराना हवे तसे, त्यांना आवडेल तसे वागू लागतो.
मग हळूहळू आपले हे वागणे, ही तडजोड नात्यात गृहीत धरली जाऊ लागते.
आपण कसे वागायचे हे नकळतपणे समोरची व्यक्ति ठरवू लागते.
तुम्ही काहीही केलं, तरी त्याबद्दल कृतज्ञ न राहता, ते करणं हे तुमचं कर्तव्यच आहे असे समोरची व्यक्ति गृहीत धरू लागते.
आणि अशावेळी मग तुमची घुसमट होऊ लागते.
ही परिस्थिति अर्थातच योग्य नाही. ह्या बाबतीत तुम्हाला कुठलाही आडपडदा न ठेवता, तुमच्या जोडीदाराशी बोलणे आवश्यक आहे.
आज आपण अशा गृहीत धरले जाण्याच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काय करता येईल ते पाहणार आहोत.
१. विचार करा
सर्वप्रथम आहे त्या परिस्थितीचा संपूर्णपणे विचार करा.
तुम्हाला तुमचा जोडीदार गृहीत धरत आहे असे का वाटते ह्याचा विचार करा.
तुमची कोणती कामे, कोणते वागणे गृहीत धरले जाते ते समजून घ्या.
तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हे नक्की करा.
त्यांनी तुम्हाला कोणत्या कामात आणि कशी मदत करावी, कोणत्या बाबतीत तुमचे मत घ्यावे असे तुम्हाला वाटते ह्याचा विचार करा.
तुमच्या मनाशी सर्व परिस्थिति क्लियर असली की तुम्हाला तुमची व तुमच्या जोडीदाराची समस्या समजावून घेणे सोपे जाईल.
तसेच त्याच्याशी/ तिच्याशी बोलणे सोपे होईल.
२. जोडीदाराशी बोला
एकदा का गृहीत धरले जाण्याबाबत तुमचे विचार पक्के झाले की त्याबाबतीत तुमच्या जोडीदाराशी सविस्तर बोला.
तुम्हाला असे का वाटते तसेच ही परिस्थिति सुधारण्यासाठी काय करता येईल, असे तुम्हाला वाटते हे सर्व सविस्तरपणे बोला.
कोणतेही दोषारोप करणे, भांडणे कटाक्षाने टाळा.
त्याऐवजी दोघांनी मिळून ही परिस्थिति सुधारण्यासाठी काय करायला हवे हे प्रेमळ शब्दात सांगा.
अतिशय चांगल्या प्रकारे संवाद साधायचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराला तुमचे म्हणणे नक्कीच कळेल. हा सकारात्मक विचार दाखवण्याचे पाहिले पाऊल तुम्ही उचला.
३. आपले वागणे देखील तपासून पहा
आपल्या जोडीदारावर गृहीत धरण्याचे आरोप करण्यापूर्वी आपले स्वतःचे वागणे देखील तपासून पहा.
आपण देखील काही वेळा कळत नकळत पणे आपल्या जोडीदाराला गृहीत धरत नाही ना ह्याची खात्री करून घ्या.
जोडीदाराने तुमच्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल घ्या.
त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आपल्या स्वतःच्या वागणुकीतून त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करा.
तरच आपणही समोरच्याकडून तशा वागण्याची अपेक्षा करू शकतो.
४. स्वतःच स्वतःला शाबासकी द्या
काही वेळा आपण स्वतःचे कौतुक करायला विसरतो.
जेव्हा आपण आपल्या जोडीदारासाठी काही करतो तेव्हा स्वतःच स्वतःची पाठ थोपटा, स्वतःचे कौतुक करा.
त्यामुळे अधिक चांगले वागण्या साठी तुम्हाला उभारी मिळेल.
शिवाय ह्यामुळे तुमच्या जोडीदाराला देखील तुम्ही तुमचे कौतुक करण्यासाठी उद्युक्त करू शकाल.
५. स्वतःवर लक्ष केंद्रित करा
जवळच्या नात्यात आपण नेहेमी जोडीदारावर, त्याच्या किंवा तिच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित करतो.
सहसा आपल्या इच्छा, अपेक्षा आपण बाजूला टाकतो. पण तसे करू नका.
स्वतःकडे लक्ष द्या. तुमच्या इच्छा अपेक्षांना मुरड घालू नका.
त्या पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. स्वतःसाठी वेळ काढा, तुमचे छंद जोपासा. स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
६. नकार द्यायला शिका
जरा स्वार्थी वाटलं तरी हे सत्य आहे.
आपल्या जोडीदाराची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याची गरज नाही.
ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत किंवा करणे जमेल असे वाटत नाही त्या गोष्टींना नकार द्यायला शिका.
ह्यामुळे तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे काही नुकसान होणार नाही, उलट तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूने विचार करायला शिकेल, स्वतःच्या वागण्याचा पुनर्विचार करेल.
७. सतत पुढकार घेणे टाळा
काहीवेळा गृहीत धरले जाणे असेच सुरू होते.
सतत पुढाकार घेऊन जोडीदारासाठी काहीतरी करत राहणे टाळा.
समोरच्या व्यक्तीने मागितली तरच मदत करा. तुम्ही सतत आधीच त्याची/तिची कामे करत राहिलात तर त्यांना तशी सवय लागेल आणि मग तुम्हाला गृहीत धरणे सुरू होईल.
तुम्ही केलेल्या कामांची दखल घेतली जाण्यासाठी आधी मदतीची मागणी होणे आवश्यक आहे, गरज नसताना किंवा अपेक्षा नसताना केलेली मदत ही गृहीत धरली जाते.
त्याचे कोणाला विशेष काही वाटत नाही.
तर हे आहेत काही उपाय ज्याचा विचार करून तुम्ही तुमच्या नात्यात जोडीदाराकडून गृहीत धरले जाणे टाळू शकता.
लक्षात घ्या की असे वागण्यामुळे तुमचे जोडीदारावर प्रेम नाही असे होत नाही.
पण एक निकोप समृद्ध नाते असण्यासाठी एकमेकांना आदर देणे, एकमेकांच्या चांगल्या वागण्याची दखल घेणे आणि एकमेकांसाठी केलेल्या कामांची पावती देणे आवश्यक आहे.
तरच नात्यातील प्रेम आणि ओढ टिकून राहील.
कुणी एक स्वतःला हवे तसे वागत आहे आणि दूसरा मागे फरपटला जात आहे असे असेल तर ते नाते फार काळ टिकू शकणार नाही.
त्यामुळे तुमच्या नात्यात जर अशी समस्या असेल तर ती वेळीच ओळखा, त्यावर विचार करा.
तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणानी बोला आणि समस्येचे निवारण करा.
आणि हो सामंजस्याने समजून घेण्याच्या तुमच्या प्रयत्नांचा जर समोरच्या व्यक्तीकडून कडेलोट केला जात असेल, तर वेळीच समज देऊन योग्य तो निर्णय घ्या.
Image Credit: Spruha Joshi
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.