आपल्या सर्वांनाच आयुष्यात कोणी ना कोणी आपल्याशी खोटं बोललं आहे असा अनुभव आलेला असतो. अशा वेळी बरेचदा प्रश्न पडतो कि, खोटं बोलणं ही काळाची गरज आहे का? लोक मुद्दाम खोटं बोलतात का?
याबाबत तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा…
काही वेळा खोटं किरकोळ असतं तर काहीवेळा गंभीर. परंतु काहीही झाले तरी खोटं बोलणं वाईटच.
लोक खोटं का बोलतात ह्याची असंख्य कारणे आहेत. इतकी कारणं आहेत की त्या सर्वांची नोंद करणे देखील अवघड ठरेल परंतु आपण त्यापैकी काही नेहेमीची कारणे पाहूया ज्यामुळे लोक खोटं बोलायला प्रवृत्त होतात.
सर्वात महत्वाचे कारण असते ते म्हणजे शिक्षेपासून बचाव. लहान मुले आणि मोठे ह्या सर्वांना खोटे बोलायला उद्युक्त करणारे हे प्रमुख कारण.
ह्याशिवाय इतरही कारणे आहेत ती म्हणजे आपला व इतरांचा कोणत्याही धोक्यापासून बचाव, एखाद्या गोष्टीबाबत गोपनीयता सांभाळणे, किंवा एखाद्या गोष्टीमुळे चारचौघांत लाज वाटणे टाळण्यासाठी.
आज आपण लोकांची खोटे बोलण्याची कारणे विस्ताराने पाहूया.
१. शिक्षेपासून बचाव
“मी तर ताशी ५५ किमीच्या स्पीडने चाललो होतो” भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे पकडला गेलेला ड्रायवर आर. टी. ओ. ऑफिसरला म्हणतो.
किंवा “माझं घडयाळ बंद पडलं त्यामुळे मला कळलंच नाही किती वाजले ते” घरी यायला उशीर झालेली एखादी मुलगी आई वडिलांना स्पष्टीकरण देते.
होणाऱ्या शिक्षेपासून स्वतःचा बचाव करणे हे लोकांना खोटं बोलायला प्रवृत्त करणारे प्रमुख कारण आहे.
कोणत्याही वयोगटातील लोक असे वागतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण केव्हा ना केव्हा असे वागतातच.
स्वतःचा बचाव करण्यासाठी जर किरकोळ खोटं बोललं तर ठीक, परंतु गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत बोललेलं खोटं उघडकीस आलं की त्याचे परिणाम मात्र वाईट होतात.
आधी झाली असती त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते. शिवाय खोटं बोलल्यामुळे नाचक्की होते ती वेगळीच.
२. स्वतःचा फायदा व्हावा म्हणून
हे खोटं, बोलणाऱ्याच्या दृष्टीने “चालता हैं” या कॅटेगरीतलं असतं.
रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहता यावे म्हणून, अभ्यास न करता परीक्षेत चांगले गुण मिळावे म्हणून किंवा ऑफिसात उशिरापर्यंत काम आहे असं सांगून बाहेर मित्रांबरोबर मजा करता यावी म्हणून वेगवेगळ्या वयोगटातले लोक खोटं बोलतात.
ह्यामध्ये खोटं बोलून स्वतःचा फायदा करून घेण्याचा हेतु असतो. अशा वेळी खोटं बोलणारे लोक हे ऐनवेळी खोटं न बोलता आधीपासून ठरवून खोटं बोलत असतात.
३. दुसऱ्या व्यक्तींचा बचाव करण्यासाठी
बरेचदा आपल्या प्रिय व्यक्तिचं वागणं आपल्याला पटलेलं नसतं परंतु आपण केवळ त्या व्यक्तीला काही त्रास होऊ नये म्हणून तिची बाजू घेऊन खोटं बोलतो.
जसे की आपले मित्र मैत्रिणी, भावंडं ह्यांची बाजू घेऊन घरातल्या इतरांशी खोटे बोलणे, ऑफिस मध्ये कलीगची बाजू घेऊन बॉसशी खोटे बोलणे.
अशा वेळी खोटे बोलण्याचा आपला खरं तर काहीच उद्देश नसतो पण आपल्या प्रिय व्यक्तीला वाचवण्यासाठी आपण खोटं बोलतो.
४. स्वतःचा बचाव करण्यासाठी
एखादे लहान मूल घरात एकटे असताना दाराबाहेर आलेल्या व्यक्तीला दार न उघडता ‘बाबा झोपलेत, नंतर या‘ असे खोटे सांगते किंवा एखादी मुलगी एकटी प्रवास करताना हातातील फोनवर कोणाशी तरी बोलण्याची ऍक्टिंग करते तेव्हा ते स्वतःचा बचाव करण्यासाठी बोललेलं खोटं असतं.
ह्याचा कोणालाही काही उपद्रव होत नाही उलट खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचा हयात फायदाच असतो.
५. गुप्तता राखण्यासाठी
एखादी मुलगी फोनवर मित्राशी बोलत असून आईला कळू नये म्हणून मी मैत्रिणीशी बोलत होते असे सांगते किंवा दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी अप्लाय करून देखील एखादा एम्प्लॉईते लपवण्यासाठी खोटं बोलतो.
तेव्हा आपल्या बाबतीत गुप्तता राखण्यासाठी खोटे बोलले जाते. हे खोटे बोलणे काही वेळा महागात पडू शकते.
आपल्या जवळच्या व्यक्तींना काही कल्पना न देता खोटं बोलून एखादं पाऊल उचलणे आपल्याला संकटात टाकू शकते आणि कोणी मदतीला देखील येऊ शकत नाही. त्यामुळे असे खोटे बोलणे टाळले पाहिजे.
६. खोटे बोलण्याचे थ्रिल अनुभवण्यासाठी
काही वेळा लोक उगाचच गंमत म्हणून, थ्रिल म्हणून खोटं बोलून पाहतात. आपल्याला हे करणे जमते आहे का हे पाहण्यासाठी खोटे बोलतात.
बरेचदा लहान मुले ह्या गोष्टीची शिकार झालेली आढळतात. केवळ थ्रिल म्हणून ते पालकांशी खोटे बोलून पाहतात.
तसेच काही व्यक्ति केवळ आपल्या बोलण्याचे परिणाम अनुभवण्यासाठी खोटे बोलतात.
७. चारचौघात लाजिरवाणा प्रसंग टाळण्यासाठी
काही वेळा सर्वांसमोर आपली फजिती टाळण्यासाठी, पकडले न जाण्यासाठी लोक खोटे बोलतात.
जसे की एखादे लहान मूल आपली पॅन्ट पाणी सांडल्यामुळे ओली झाली असे खोटे सांगते किंवा एखादी मोठी व्यक्ति मी असे काही बोललोच नव्हतो असे म्हणते, तेव्हा ते चार चौघात आपली फजिती टाळण्यासाठी बोललेले खोटे असते.
८. दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून
तुमच्या एखाद्या मैत्रिणीने नवीन ड्रेस घेतला आणि तुम्हाला तो आवडला नसला तरी तिला बरे वाटावे म्हणून तो छान दिसतोय असे तुम्ही सांगता, किंवा तुमच्या मित्राने दिलेल्या पार्टीत तुम्हाला कितीही कंटाळा आला तरी पार्टी मस्त होती असे तुम्ही त्याला सांगता.
अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा समोरच्या व्यक्तीला बरे वाटावे म्हणून, त्यांचे मन दुखवू नये म्हणून खोटे बोलले जाते. हे खोटे बोलणे तसे काही फार धोकादायक नसते. फक्त अतिरेकी खोटे न बोलता तारतम्य बाळगून ते बोलले गेले पाहिजे.
तर ही आहेत लोकांची खोटे बोलण्याची काही कारणे. ह्यापेक्षा वेगळी देखील अनेक कारणे, अनेक प्रसंग असू शकतात जेव्हा लोक जाणून बुजून किंवा अजाणता खोटे बोलतात.
काही वेळा हे खोटे बोलणे गंभीर असते तर काही वेळा अगदी निरुपद्रवी असते.
आपण प्रत्येक वेळी समोरच्याचे खोटे बोलणे ओळखू शकू असे नसते. तसेच काही वेळा सत्य कटू असते आणि खोट्यावर विश्वास ठेवणेच फायद्याचे ठरते.
दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून किंवा स्वतःचा बचाव व्हावा म्हणून बोलले जाणारे खोटे योग्य, तर गंभीर गुन्हे करून त्यातून सुटण्यासाठी, कपट कारस्थानं करून खोटे बोलणे अयोग्य, इतकेच काय… अक्षम्य!
त्यामुळे ऐकणाऱ्यानेही समोरचा कोणत्या उद्दिष्टाने खोटे बोलत आहे ह्याचे तारतम्य बाळगणे फार आवश्यक ठरते. तसेच कोणालाही विशेषतः लहान मुलांना सतत खोटे बोलण्याचे व्यसन लागणार नाहि हयाकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे.
शिवाय खोटे बोलणाऱ्या लोकांना डोळे मिटून साथ देणे हे देखील अयोग्य. तर ह्या लेखात दिलेल्या कारणांचा जरूर विचार करा. स्वतः खोटे बोलू नका. इतरांनाही बोलू देऊ नका.
‘खोटारडे लोक’ ओळखण्याच्या पाच नामी युक्त्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.