कल्पना करा.. शहराच्या मध्यवर्ती भागात घर, तरीही मुबलक शुद्ध हवा, पाणी, अन्न आणि ७०,००० रुपये इतकी कमाई…
शीर्षक वाचून काहीतरी वेगळं वाटतय ना.. हो वेगळं आहे पण सत्य आहे.
तेही आजूबाजूला खच्चून प्रदूषण असलेल्या शहरातली ही गोष्ट आहे बरं का. अर्थात अशी अफलातून कामगिरी करणारे सामान्य कुटुंबातलेच हे लोक आहेत.
फक्त त्यांनी विज्ञानाची कास धरली. कुठेही निसर्गाचे नियम न मोडता पर्यावरणाला धक्का न लावता प्रदूषण मुक्त जीवन कसं जगता येईल याचा आदर्श त्यांनी ठेवला.
बंगळुरू… भारतातल्या महानगरांपैकी एक. देशातलं मोठं आय टी हब. आजूबाजूला कारखानदारी बजबजलेली.
याव्यतिरिक्त काही महत्त्वाच्या सरकारी संस्थांचं, शैक्षणिक संस्थांचं तिथे केंद्रीकरण झालेलं.
त्यामुळे हायफाय संस्कृती तिथे असणारच. एकंदर जीवनशैलीवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असणारच. इथल्या प्रदूषणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर देशात हे शहर आघाडीवर आहे.
अशा झगमगत्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी एक कुटुंब असही राहतं जिथल्या लोकांनी आपल्या घराचा परिसर निसर्गाच्या दृष्टीने अनुकूल ठेवला आहे.
घराच्या जागेचा पुरेपूर उपयोग करून भाज्या फळांची लागवड केली. या छोट्याशा घरगुती शेतीसाठी घरातच जैविक खत तयार केलं.
सूर्य प्रकाशाचा चांगला वापर करता यावा म्हणून संपूर्ण घरासाठी सौरऊर्जेपासून मिळवलेली वीज वापरली जाते.
इतकच नाही तर महावितरणला ही वीज पुरवली जाते. त्यातून त्यांना चक्क ७०,००० रुपये इतक वार्षिक उत्पन्न मिळतं. आहे ना कल्पनेपलिकडची कामगिरी.
मंजूनाथ आणि गीता हे बंगळुरू मध्ये राहणारं जोडपं. ज्यांनी इकोफ्रेंडली घर बनवायचा ध्यास घेतला.
काही वर्षांपूर्वी मंजूनाथ यांनी बंगळुरू मध्ये पाहिलेलं एक घर कायमच त्यांच्या मनात घर करून बसलं.
लाल विटांनी बांधलेलं हे घर मातीचा वापर करून बांधलेलं घर वाटत होतं. मंजूनाथ यांच्या मते हे घर जवळपास १०० वर्ष जुनं होतं.
त्यावरून त्यांना कल्पना सुचली की एक असं घर बांधायचं जे भक्कम तर असेलच पण निसर्गाच्या दृष्टीने अनुकूल असेल. काही वर्षांनी हे स्वप्नातलं घर त्यांनी सत्यात उतरवलं.
हे घर पूर्णपणे विटा आणि दगडांचा वापर करून बांधलेलं आहे. संपूर्ण घरासाठी वापरली जाणारी वीज ही सौरउर्जेपासून मिळवली जाते. पावसाच पाणी वाया जाऊ नये म्हणून पावसाळ्यात हजारो लिटर पाणी साठवून ते रोजच्या वापरासाठी घेतलं जातं.
घरी साठणारा कचरा गोळा करून त्यापासून जैविक खत तयार केलं जातं. अंगणातल्या भाजीपाला, फळांच्या झाडांसाठी ते खत वापरून भाजीपाल्याचा सकसपणा वाढवला जातो.
घराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी एसी अजिबात वापरला जात नाही. उलट घराची रचनाच अशी केली आहे ज्यामुळे घरात भरपूर हवा खेळती राहील.
पुरेसा उजेड घरभर असेल. तसेच आजूबाजूला केलेली झाडांची लागवड. यामुळे सहाजिकच इतरांपेक्षा या घराचं तापमान नियंत्रित राहतं.
घरावर १० किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल लावले आहेत. ज्यामुळे १००० युनिट इतकी सौरऊर्जा मिळते.
ज्यापैकी केवळ २५० युनिट इतकी ऊर्जा त्यांच्या घरासाठी पुरेशी असते. म्हणून बाकीची ऊर्जा ते महावितरणला विकत देतात. ज्यामुळे त्यांना वर्षाकाठी ७०,००० रुपये इतक उत्पन्न मिळतं.
प्रतियुनिट ९ रुपये या हिशेबाने ही ऊर्जा विकली जाते. सोलर पॅनल बसवताना त्यांना नऊ लाख रुपये इतका खर्च आला होता. सौर ऊर्जेच्या पुरेपूर वापरामुळे हा खर्च आता भरून निघाला आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निसर्गाचे नियम यांचा सुरेख संगम साधून हे घर मंजूनाथ आणि गीता यांनी उभं केलं. इतकच नाही तर इकोफ्रेंडली घराचा आदर्श त्यांनी तयार केला. आपल्या घराच्या बाबतीतही आपण असा विचार नक्कीच करू शकतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.