एक सामान्य शिपायाची नोकरी ते १० करोडचा टर्नओव्हर असणारी स्वतःची कंपनी- असा यांचा असामान्य प्रवास
आयुष्यात संघर्ष कोणाला करावा लागत नाही?
यात जो बळी पडतो तो आयुष्यात हरतो. पण जो नेटाने पुढे जात राहतो तो नक्कीच जिंकतो.
कोणीतरी असं म्हटलं आहे, ‘लहरोंसे डरकर नौका पार नही होती, कोशिश करनेवालों की हार नही होती’.
आज ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत त्यांनीही असाच संघर्षमय प्रवास केला.
पण कधीही हार न मानता जिंकून दाखवलं.
घरची गरीबी आणि सुरूवातीला सामान्य शिक्षण म्हणून शिपायाची नोकरी स्विकारली.
या काळात कितीतरी वेळा रात्री उपाशीपोटी सुद्धा झोपावं लागलं.
पण जिद्द न सोडता काम करून, चांगलं तांत्रिक शिक्षण घेऊन त्यांनी चंदिगढ येथे स्वतःची कंपनी उभी केली.
या कंपनीत आज जवळपास १५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
तर कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर जवळपास १० करोड इतका आहे.
चंदिगढ शहरात आज त्यांना ‘गुरू ऑफ मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी’ म्हणून ओळखतात.
हिमाचल प्रदेशातील कांगडा नावाच्या एका छोट्याशा गावात गरीब कुटुंबात छोटू शर्मा यांचा जन्म झाला.
त्यांचा आयुष्यातला संघर्षमय प्रवास नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.
१९९८ साली ढलियारा येथे बी ए ही पदवी घेतल्यावर ते नोकरीच्या शोधात चंदिगढ येथे आले.
पण कोणतही तांत्रिक शिक्षण नाही आणि एक सामान्य पदवी यामुळे नोकरी मिळणं अवघड झालं होतं.
त्यावेळी तेथील एप्टेक सेंटरमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी स्विकारली.
कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलेल्यांना शहरात सहज आणि चांगली नोकरी मिळायची. त्यामुळे छोटू शर्मा यांना कॉम्प्युटर शिकणं आवश्यक होतं.
पण या कोर्ससाठी पाच हजार रुपये फी भरणंसुद्धा त्यांच्यासाठी अवघड होतं.
त्यांनी कष्टाची तयारी ठेवली. ज्या संस्थेत शिपाई म्हणून नोकरी स्विकारली तिथेच कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली.
दिवसभर नोकरी करत असताना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कॉम्प्युटरची प्रॅक्टिस सुरू ठेवली.
रात्रभर जागून अभ्यास केला. वर्षभराच्या कोर्सची फी भरण्यासाठी शिपाई म्हणून मिळणारा पगार पुरेसा नव्हता.
घरची गरीबी असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागणं शक्य नव्हतं.
पैसे वाचवायचे म्हणून कित्येकदा ते रात्री उपाशीपोटी रहायचे.
याच काळात मिळणाऱ्या वेळात त्यांनी मुलांसाठी शिकवणी सुरू केली.
वर्षभराने दोन चांगल्या गोष्टी झाल्या. छोटू शर्मांना ‘मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सॉफ्टवेअर डेव्हलपर’ हे कोर्स पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट मिळालं आणि त्याच संस्थेत फॅकल्टी म्हणून नोकरी मिळाली.
मग त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. दिवसा मुलांच्या घरी जाऊन शिकवणी घ्यायची आणि संध्याकाळी ऍपटेकमध्ये कॉम्प्युटर क्लास घ्यायचा असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला.
बरी कमाई झाल्यावर त्यांनी स्वतःसाठी सायकल घेतली. २००० सालापर्यंत शिकवणीमुळे त्यांची बरी कमाई झाली.
२००२ ला त्यांनी स्वतःचं कॉम्प्युटर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
स्वतःच्या कमाईतून एक कॉम्प्युटर आणि एक बाईक घेतली.
दोन खोल्यांचं एक घर भाड्याने घेऊन कॉम्प्युटर सेंटर सुरू केलं.
सहा महिन्यात जवळपास शंभर विद्यार्थी मिळाले. बघता बघता चंदिगढमध्ये ते प्रसिद्ध झाले.
त्यांचे कित्येक विद्यार्थी सध्या बड्या सॉफ्टवेअर कंपनीत गलेलठ्ठ पगार घेऊन काम करत आहेत.
मायक्रोसॉफ्ट, ऍक्सेनचर, टीसीएस, इन्फोसिस यासारखा मोठ्या कंपनीत त्यांचे विद्यार्थी मोठं पॅकेज घेऊन काम करत आहेत.
२००७ ला छोटू शर्मा यांनी चंदिगढ येथे CS Infotech नावाने कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सुरू केलं.
एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सध्या या संस्थेत शिकत आहेत.
२००९ ला त्यांनी मोहाली येथे स्वतःची जागा घेऊन CS Soft Solutions ही सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली.
देश विदेशातील कंपन्यांना सॉफ्टवेअर बनवून देण्याचं काम ही कंपनी करते.
लुधियाना येथे एल एम ए ट्रायडंट फॉर यंग इनोव्हेशन आंत्रप्रेन्यूअर अवॉर्ड देऊन त्यांना गौरवण्यात आलं.
२००७ ला हिमाचलच प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांच्या हस्ते शर्मा यांना गौरवण्यात आलं.
आपल्या व्यवसायाव्यतिरीक्त छोटू शर्मा कायम समाजाप्रती जागरूक असतात.
गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं, गरीब कुटुंबाला सहाय्य करणं हा त्यांच्या कामाचा भाग झाला आहे.
कमी कालावधीत कठिण परिस्थितीतून मार्ग काढणं आणि कर्तृत्व उंचावणं हे इतकं सोपं नाही.
पण ते अशक्यही नाही हे छोटू शर्मांनी दाखवून दिलं. केवळ दशकभराच्या काळात त्यांनी तांत्रिक शिक्षण, सामान्य नोकरी ते स्वतःचा मोठा व्यवसाय अशी भरारी घेऊन दाखवली.
आपण कुठे जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं. पण जन्मभरात कसं जगावं हे आपल्याच हातात असतं.
छोटू शर्मांसारखे आदर्श जर आपल्यासमोर असतील तर आपण आपल्या जगण्याला नक्कीच चांगली दिशा देऊ शकतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.