स्कायलॅब कोसळणार!!!

“आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सुलभा देशपांडे बातम्या देत आहे. अमेरिकेची पहिली अवकाश संशोधन प्रयोगशाळा स्कायलॅबचं नियंत्रण सुटलं आहे. अमेरिकेची ही स्कायलॅब १४ मे १९७३ रोजी आकाशात सोडण्यात आली होती. ७७,१११ किलोग्राम वजनाच्या या स्कायलॅबने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला असून कुठल्याही क्षणी ती पृथ्वीवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.”

वाघ्या, बातम्या काय म्हणतात ऐकलं काय रे! .. नथमलशेठनं तकसपोसावर बसल्या बसल्या विचारलं.

नाही, भाऊ!

मी तर ढोरांचं चारा-पाणी करत होतो.

बहाळा बैल कालपासून काहीच खात नाही…..वाघा मारवाड्याला म्हणाला.

उन लागलं असेल त्याला. कीती उन तापते.

माणूस तरी सांगू शकते. मुक्या जनावराला काय बोलता येते?

आजचा दिवस त्याला गोठ्यातच बांधून ठेव.

त्याचं चारा-पाणी जागेवरच कर! दिवसभरात होईल बरा!

ये, बस थोडावेळ. सकाळपासून कामातच हायेस.

काय म्हणत होते तुम्ही बातम्याचं, भाऊ!

अरे काही नाही. अमेरिकेनं आकाशात सोडलेलं स्कायलॅब पडणार हाये. आपल्या गावाऐवढा आकार हाये त्याचा.

मग भाऊ, त्यानं काय होणारये.

काय होणार म्हणजे! सगळे लोक मरणार आता!

काय सांगता शेठ!

आताच तर रेडियोवर बातम्या सांगत होत्या. म्हणून तर मी तुला सांगतोय. एकतर आपल्या गावात रेडियो फक्त माझ्याच घरी आहे. त्यामुळे जगात काहीही घडलं तरी मला माहिती होते. मला जे माहित झालं, ते मी तुला सांगितलं. यात माझ्या मनाचं काहीही नाही.

आता काय करावं!! कधी पडणार आहे ते स्कायलॅब! …. वाघ्यानं विचारलं.

कधीही पडू शकते. आज रात्री झोपलो तर उद्याचा दिवस दिसेल की नाही माहीत नाही. त्याचं काय सांगता येते काय?

हे तर काहीही झालं बुवा! संकटामागून संकटं येतच राहतात माणसावर राजा! काहीच गरज नाही ना आकाशात असं काहीबाही सोडायची. लोकं काहीही करतात राजेहो! आता आली की नाही मरायची पाळी! ….वाघा म्हणाला.
तु काय ऐकटाच मरणार आहेस बावा! आपल्या सगळ्यानाच मरावं लागणार आहे आता. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस खाऊन पिऊन घे!

खरं हाये भाऊ तुमचं. मोठं संकट आलं लेकाचं हे! आता घरी जातो, बायकोला सांगतो सगळं!

वाघ्या घरी पोहोचतो…..

रुख्मे, एक गिलास पाणी दे बरं!

काय झालं आल्याबरोबर पाणी पिऊन रायले आज!

तुमच्या काय मागे लागलं होतं काय कोणी? ..रुख्माबाईनं पाणी देताना विचारलं.

काय सांगू तुला. आकाशातून एक स्कायलॅब पडणार आहे. आपल्या गावाएवढ्या आकाराचं आहे ते!…….म्हणून तर धापा टाकत आलो तुला सांगायला.

मायबाई….. काय हाये ते? मला तर तुम्ही काय बोलतंय ते काहीबी समजून नाही रायलं!

सकाळी मी गेलो होतो आपल्या नथमल शेठच्या गायवाड्यात ढोरांचं चारा-पाणी करायला. तेव्हा रेडियोवर बातम्या देत होते की, आभाळातून एक स्कायलॅब पडणार हाये…. त्याचा आकार खूप मोठा!! ते जमीनीवर पडलं तर सगळे माणसं मरणार हायेत. सरकारनं रेडियोवर खाऊन -पिऊन घ्यायला सांगितलं आहे. नथमलशेठनं मला सांगितलं. तेच मी तुला सांगत आहे.

वाघा, काय सांगत आहेस एवढं वयनिला!….

आतामाय…. सदाभाऊजी आले काय? .. लाजून रुख्माबाई घरात गेली.

सदाशिव, गड्या तू असशिल माझा मोठा भाऊ, पण तुला भायेरच्या जगात काय घडते काहीच माहित नसते!

काय झालं आता बावा! तुझ्यासारखं काम नाही माझं! नथमलशेठचे ढोरं चारायला नेले की झालं…. दिवसभर जमीनीसोबत टक्कर द्यावी लागते माला…. नाला-बंधारे खोदून खोदून थकल्यानंतर दुनियेच्या कहाण्या ऐकाला वेळ कुठे मिळतो तुझ्यासारखा!…….रिकाम्या लोकांचे कामं आहेत चिलम्या गोष्टी करणं.

तुला तर कधीही माझ्या गोष्टी चिलम्याच वाटतात! पण आजची गोष्ट तुझ्याच कामाची आहे. मग म्हणशील सांगितलं नाही. खाऊन-पिऊन घे. आपल्याला सगळ्यानाच आता मरायचं आहे, जितके दिवस आहेत तितके दिवस जे खायचं प्यायचं आहे ते करुन घे! ……वाघा म्हणाला.

म्हणजे काय भूंकप होणार आहे की, जमीन सरकणार आहे! सांगून रायला मोठा!

तुला विश्वास बसत नसेल तर नथमल शेठला विचार. आभाळातून एक मोठी वस्तू पडणार आहे. अमेरिकेनं सोडली होती आकाशात. ती आता जमीनीवर पडणार आहे. त्यामुळे सगळे माणसं मरणार आहेत. सरकारनं सांगितलं आहे की, इच्छा पूर्ण करुन घ्या सगळ्या! ती वस्तू कधीही पडू शकते.

अरे बापरे, हे तर बेकारच कि!!! बरं सांगितलं, नाहीतर आम्ही तर बसलो असतो नाला-बंडिंग खोदत! अन् मेलो असतो तसेच उपाशी-तापाशी! आता मेलो, जगलो तरी खाण्यापिण्यावर लक्ष दिलं पहिजेत. पैसे-अधले तर नाहीत आपल्याकडे! पण आपल्या बापाच्या काळातले काशाचे भांडे आहेत माझ्या हिश्शावर आलेले. काशाचे भांडे घेतील का नथमलशेठ! एक गाय आणि दोन लहान गोर्‍हे आहेत. विकून टाकतो. थोडे पैसे येतील त्यातून मजा करुन घेतो. हे जीवन काय परत परत भेटते काय?

बरं झालं, तु गोर्‍हे विकायचा विषय काढला. शेठचा बहाळा बैल बिमार आहे. सकाळपासून पाणीसुद्धा पिला नाही तो! बघून येतो जरा, उन लागलं बिचार्‍याला!

गावकर्‍यांची गर्दी बघून वाघा मोठ्या मोठ्या ढेंगा टाकत नथमल शेठच्या दारात पोहोचला होता. सर्व जण स्कायलॅबबद्दलच विचारत होते. वाघा, बाजुलाच उभा राहून सगळ्यांचं बोलणं ऐकत होता.

हे बघा, जे रेडियोवर मला समजलं ते मी वाघ्याला सांगितलं. त्याच्याकडून तुम्हाला जी माहिती समजली ती अत्यंत खरी आहे. सकाळपासून बरेच लोक माझ्याकडे येऊन गेले. कोणी म्हणत होते, वावर विकत घ्या. कोणी म्हणत होतं सोन्याचे दाग-दागिणे, तर कोणी भांडी-कुंडी विकायची आहेत म्हणत होते. पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी काही अमरपट्टा घेऊन आलो नाही या धरतीवर! जर तुम्ही मरणार असाल तर मलाही मरण अटळ आहे. तुमची जमीन, दाग-दागिणे घेऊन मी काय करु? मी थोडीच ते सगळे सोबत घेऊन जाणार आहे?

नथमलशेठ, तुम्हीच जर असं बोललात तर आमचं काही खरं नाही! माझी पण एक एकर शेती आहे, तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते द्या, पण आम्हाला सगळ्यांना मदत करा! ..वाघ्या सगळ्यांच्या पुढ्यात येऊन म्हणाला.
त्याच्या विनंतीला सर्वांनी जोरात ओरडून पाठिंबा दिला. शेठ संपूर्ण गावाला आज तुमच्या साथीची गरज आहे. काळ हा असा समोर येऊन थांबला आहे. त्यात तुम्ही जर आम्हाला पाठ दाखवली तर मग आम्ही कोणाकडे आशेने बघणार! वाघाच्या पाठीमागे गोंधळ वाढला होता.

शांत, राहा! वाघ्या म्हणतंय म्हणून मी एका अटीवर तुम्हाला मदत करायला तयार आहे. थोडे-थोडे पैसे मी सर्वांना देतो. कारण की आता काळच तसा आला आहे! तुमच्या वावराचे सगळे कागदपत्र तकसपोसावर ठेवा. एक-एक करुन पैसे घ्यायला पुढे या!

वाघ्या, ज्यांचे शेताचे कागदं असतील त्यांची या कोर्‍या कागदांवर सही घे!

घेतो शेठ सह्या!

एक गोष्ट लक्षात घ्या, मी हे सगळं तुमच्यासाठी करतोय. बुडीत खात्यात मी हे पैसे तुम्हाला देत आहे.
उद्या मला बदनाम करू नका रे बाबांनो!

नथमल शेठकडून पैसे मिळाल्यानंतर गावात दिवाळीसारखं वातावरण तयार झालं होतं. जिकडे-तिकडे गोडधोड पदार्थ बनवण्याचा सपाटा लोकांनी लावला होता. रोज नव-नवीन पदार्थ करुन लोक खात होते. सार्वजनिक ठिकाणी आज काय खाल्लं याच्या चर्चा झडायला लागल्या होत्या. कामधंद्याला जाण्याऐवजी लोक शहरात जाऊन बाजारहाट करत होते. जिलेबी, बालूशाही असे काहीबाही खायला आणत होते. बाजारातही कोणाची भेट झाली तरी घ्या खाऊन आता जगतो की मरतो? अशाच चर्चा होताना दिसत होत्या.

गावातील प्रत्येकाच्या चेहर्‍यावर मरणाची भीती दिसत होती. जवळचे पैसे दिवसेंदिवस संपत होते. काय होते या काळजीपोटी सकाळ संध्याकाळ रेडियो ऐकायला गाव नथमलशेठच्या घरी जमत होता.

बातम्या लागल्या की, टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता असायची.

“नमस्कार, आकाशवाणीची ही प्रादेशिक सेवा आहे. मृदूला जोशी आपल्याला बातम्या देत आहे. अमेरिकेच्या स्कायलॅबमुळे संपूर्ण जगावर एकप्रकारचं महासंकट आलं होते. मात्र ते संकट आता टळलं असून अमेरिकेच्या अवकाश संशोधनासाठी सोडण्यात आलेली स्कायलॅब आज ऑस्ट्रेलियाच्या पर्थ परिसरात कोसळली आहे. वातावरणाच्या घर्षणाने या स्कायलॅबचे अनेक भाग जळून गेले आहेत. या अवकाश संशोधन प्रयोगशाळेचे पृथ्वीवरील वातावरणामुळे २४ तुकडे होऊन जमीनीवर पडले आहेत. या घटनेमुळे जगभरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. आजचा दिवस म्हणजे ११ जुलै १९७९ हा दिवस जगभरातील लोकांच्या स्मरणात राहील, अशा भावना जगभरातून व्यक्त होत आहेत.”

३५ वर्षांनंतर चीनची स्कायलॅब मुंबईसह महाराष्ट्रावर पडणार अशा बातम्या टेलिव्हीजनवर बघून रुख्माबाईला स्कायलॅबचं रामायण आठवलं होतं. या स्कायलॅबनं काय कमावलं आणि काय गमावलं यांचा हिशेब रुख्माबाईच्या डोळ्यांनी चुकता केला होता.

वाचण्यासारखे आणखी काही…..

आमचा हरी
सिझरिंग
तिची ही होळी

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।