(गोष्टीत आपण जरा नव्वदच्या दशकातल्या गावाकडे जातोय बरंका!!)
आज रात्री ठीक आठ वाजता, आपल्या गावात सुपरहिट हिंदी चित्रपट ‘मुकद्दर का सिकंदर’ दाखवण्यात येणार आहे. मारधाड से भरपूर ‘मुकद्दर का सिकंदर’.
यातील कलाकार आहेत, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, रेखा आणि अमजद खान.
पहायला विसरु नका. तिकीट फक्त दहा रुपये. ठीक आठ वाजता.
लंगड्या सोन्याच्या चिरक्या आवाजातील दंवडीने विन्याची झोप उडाली.
विन्या अंथरुणातून तडक उठला तो थेट सोन्याच्या जवळ जावूनच थांबला. सोन्या आपला एक पाय फेकत ऐटीत चालत दंवडी देत होता. गावात बर्याच दिवसांपासून सोन्या पिक्चर आणतो. रगड पैसे कमवतो. आजूबाजूच्या गावातील लोक पिक्चरला गर्दी करतात. भारी कमाई होते यातून त्याला. त्यामुळेच तर तो महिन्यातून दोन-तीन वेळा शहरातून टीव्ही आणि व्हिसीआर डोक्यावर घेवून येतो. जर कमाई झाली नसती तर कशाला त्याने इतका त्रास घेतला असता.. दवंडी ऐकताऐकताच विन्याच्या मनात विचार फिरत होते.. जावू दे आपल्याला काय… तो पिक्चर आणतो म्हणून तर आपल्याला पाहायला मिळतात.
संध्याकाळच्या सिनेमाच्या पैशांसाठी काहीतरी जुगाड करायला हवा.. विन्याचे विचार सुरू होतात.
आई ओसरीत स्वयंपाकात गुंतलेली. तर वडील गोठ्यात बैलांच्या अंगावरील गोचीड, गोमाशा काढण्यात मग्न. त्याचा लहान भाऊ आईजवळ बसून जेवण करण्यात व्यस्त. विन्या कुणाशी काहीही न बोलता घरात जातो. इकडे-तिकडे बघत हळूच आईने लपवलेले देव्हार्यातील दोन रुपये चोरतो. इतक्यात पाठीमागून आईचा आवाज येतो. विन्या, काय करतोस रे. ये चहा घे! थंड होतोय केव्हाचा.
हो आलोच! विन्या चहाचा कप तोंडाला लावतो न लावतो तोच त्याचे वडील त्याला विचारतात. आज कामात लक्ष ठेव. नाहीतर सगळं लक्ष त्या पिचरात ठेवशील अन बैल आणशील उपाशीच घरी. चांगले फुगवून आण बैल. विन्या मान उडवत वडीलांना होकार देतच घरातून बाहेर पडतो.
बाहेर मित्रांची चौकडी उभी असतेच…. “काय अज्या आज कुठे न्यायचे बैल चारायला.” विन्याने अज्याकडे बघून विचारलं.
“नेवू की माळावर. तिकडे जास्त गवत आहे. लवकर फुगतील जनावरं म्हणजे आपल्याला लवकर घरी पण येता येईल पिच्चर बघायला”….. अज्या म्हणाला.
हो ठीक आहे मग. घरुन पण लवकर निघू आपण. विन्यानं सगळ्यांना सांगितलं. त्याला सगळ्यांनी माना हलवून संमती दिली.
विन्या, अरे जा लवकर कीती वाजले बघ! बैलांना भूक लागली असेल. दहा वाजून गेले अजून गेला नाहीस. त्याचे वडील त्याला म्हणाले.
हो निघालोच होतो आता. तो अज्या आला नाही अजून त्याची वाट पाहतोय.
तो गेला पुढे नदीवर म्हशी घेवून, तू बस घरीच. रागाच्या सुरातच त्याच्या वडीलांनी त्याला सांगितले. निमूट बैल सोडून विन्या नदीची वाट धरतो. अज्या भेटतोच. अरे मी तुझी घरीच वाट पाहतोय आणि तु पुढे आलास. असं असते का..विन्यानं तक्रारीच्या सुरातच बोलायला सुरूवात केली.
आता बोलण्यात वेळ घालवू नकोस बस म्हशीवर अन चल लवकर बाकीचे पुढे गेले. नाहीतर आपल्याला उशीर होईल.. अज्याने विषयाला बगल दिली….. काय रे अज्या तु तो शान पिच्चर बघितला होता का मागच्या आठवड्यात सोन्यानं आणला होता तेव्हा. हो यार मस्त होता. काय फाईट होती यार त्यात. पण मग हा ‘मुकद्दर का सिकंदर’ कसा असेल रे. फाईट असेल काय रे यात पण.
मग असेल ना यार.
कोण कोण आहे रे हिरो.
अमिताभ बच्चन आहे. विनोद खन्ना आहे.
अऩ गुंडा कोण आहे रे.
अरे तो अमजद खान आहे ना.
हो का. मग तर खूप फायटींग असेल यार या पिचरमध्ये. सगळे ऐका सुरात एकच वाक्य म्हणतात हो. फायटींगच फायटींग असायला पाहिजेत यार. मग मजा येईल.
यांच्या पिचरच्या गप्पा चालू असताना बाजूच्या शेतातील रखवालदार ओरडतो बैलं कोणाचे आहेत रे! जनावरांकडे लक्ष द्या जरा नंतर मारा गप्पा.
हो काका. विन्या रखवालदाराला नरमाईच्या सुरात सावरतो…….दिवस मावळतीला आला होता. जनावरांना तहान लागल्यामुळे त्यांना आता घराकडे जाण्याची ओढ लागली होती. त्यामुळे विन्याचे बैल आपोआप घराकडे निघाले होते.
त्याच्या बैलांच्या पाठोपाठ बाकीची जनावरे देखील घराच्या वाटेने निघाली होती. अज्याच्या दोन म्हशींवर बसून निघालेल्या चौकडीच्या मनात पिच्चर कधीच सुरू झाला होता.
संध्याकाळपासूनच लंगड्या सोन्याच्या घराजवळ गर्दी दिसत होती. विन्या आणि त्याचे मित्र जेवायलासुद्धा घरी गेले नव्हते. कधी पिक्चर लागणार याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. तितक्यात सोन्याचा आवाज आला अरे लाईन लावा रे. चिल्लर पैसे आणा. लंगडा सोन्या चिरक्या आवाजात सगळ्यांना सांगत होता.
जवळपासच्या चार पाच गावातील लोकांनी पिक्चरला गर्दी केली होती. काही महिला लहान मुलांना घेवून आल्या होत्या. त्यामुळे लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता.
‘भाऊ सुरु झाला का पिच्चर.’ एकाने पैसे देता देता सोन्याला विचारले.
‘नाही अजून आता गाणे सुरु आहेत. थोड्यावेळात चालू करतो. बरं हे घ्या पैसे.’
चिल्लर देनं यार. आता वीस रुपयांची चिल्लर मी कुठून आणू. भाऊ नंतर दया.
‘बरं ठीक आहे जा आत. थांबा आवाज करु नका आता शांत रहा.’ सोन्या सगळ्यांना सांगत होता.
‘खूप वेळ झाला लावा हो भाऊ पिच्चर.’ सगळीकडून लोक ओरडू लागले होते.
बाहेरची गर्दी कमी होत नव्हती. अन् आत बसलेल्या लोकांचा गोंधळ वाढतच होता. गोंधळ ऐकून सोन्या आतमध्ये आला. तो आतमध्ये दिसल्याबरोबर सगळीकडून टाळ्यांचा आवाज आला.
लोक जोरात ओरडू लागले आता लागते रे, शांत राहा. आवाज करु नका. तेवढ्यात सोन्याने व्हीसीआरमध्ये कॅसेट टाकली. टीव्हीमध्ये हिरव्या, पिवळ्या आणि पांढर्या रंगाच्या पट्ट्या दिसल्याबरोबर लोकांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला. लहान मुले ओरडायला लागली. लागला रे लागला. आता पिचर पाहा चुपचाप. आवाज करु नका, लोक एकमेकांना सांगत होते.
टीव्हीवर पिक्चरचे नाव दिसताच परत आरडाओरड सुरु. महिलासुध्दा शांत व्हा, पाहू द्या, असे ओरडून सांगत होत्या. सिनेमात फाईट सुरु झाली की लोक टाळ्या वाजायचे. मध्येच अमिताभने गुंडाला फाईट मारली की, मार, मार असे ओरडायचे. काही लोक अमिताभच्या फाईट मारण्यासोबतच उठून उभे राहायचे.
लहान मुले आनंदाने अजून मार. अजून मार असे ओरडायचे. तिकडे अमिताभने फाईट मारली की महिला घाबरुन ओरडायच्या.
या सगळ्या गोंधळात कुठूनतरी विन्याचे वडिल एकदम टीव्हीसमोर येवून उभे राहिले. त्यांच्या हातात भला मोठा दगड होता. त्यांना बघताच लंगडा सोन्या त्यांच्या दिशेने धावला. विन्याच्या वडीलांचा राग अनावर झाला होता.
ते रागातच ओरडले, बंद करा. बंद करा हे सगळं. नाहीतर हा दगड मी टीव्हीवर टाकीन. जर पाच मिनिटांत हे सगळं बंद नाही झालं तर. सगळं इथेच फोडून टाकतो. विन्याच्या वडिलांचा अवतार बघून सर्व लोक वाट मिळेल तिकडून बाहेर पडू लागले.
सोन्या विन्याच्या वडिलांचे पाय धरुन रडू लागला. असं करु नका मामा. तुमच्या पाया पडतो. माझं घरदार सगळं विकलं तरी या सगळ्या वस्तूंची भरपाई मी करु शकत नाही. असं नका करु. मी बंद करतो. रडक्या आवाजात सोन्या विनंती करु लागला.
‘नाही, पुन्हा कधीच गावात पिच्चर आणणार नाही असं वचन दे मला. तरच आज सोडतो तुला, नाहीतर.’
नाही मामा, मी परत कधीच यानंतर गावात पिच्चर नाही आणणार. पण असं करु नका, सोन्याच्या काळजानं ठावच सोडला..
विन्यासकट जमलेले सगळे लोक विन्याच्या वडिलांना शिव्या देत घरी गेले. अन गावातील व्हिडीओ बंद झाला. त्याबरोबरच गावातील गोंधळ कायमचा शांत झाला…. आणि कायमचाच ‘पिच्चरचा दि एन्ड’ झाला
वाचण्यासारखे आणखी काही…..
आमचा हरी
स्कायलॅब कोसळणार!!!
माझी म्हातारी
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.