मित्रांनो, न्यूमोनिया हा एक गंभीर आजार आहे. दरवर्षी अनेक लहान मुले न्युमोनिया मुळे गंभीररित्या आजारी पडतात. हा आजार लहान मुलेच नव्हे तर मोठ्या माणसांनाही होऊ शकतो.
न्यूमोनियामध्ये फुप्फुसांना सूज येणे, फुप्फुसांमध्ये पाणी भरणे अशी लक्षणे दिसतात. वेळेत लक्षात आला नाही तर न्युमोनिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. आज आपण न्यूमोनियाची लक्षणे जाणून घेऊया.
न्यूमोनिया म्हणजे काय?
न्युमोनिया म्हणजे फुफ्फुसांना संसर्ग होऊन होणारा आजार आहे. हा संसर्ग व्हायरस, बॅक्टेरिया किंवा पॅरासाईटस् मुळे होतो. दुसऱ्या एखाद्या आजारामुळे देखील फुप्फुसांना संसर्ग होऊन न्यूमोनिया होऊ शकतो.
न्यूमोनियाची लक्षणे
न्यूमोनिया झाला असेल तर खालील लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये लक्षणे पटकन दिसतात तर काहींमध्ये ती हळूहळू समोर येतात. न्यूमोनियामध्ये प्रामुख्याने फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात.
१. खोकला हे न्युमोनियाचे प्रमुख लक्षण आहे.
२. अतिशय थकवा आणि अशक्तपणा दिसून येतो.
३. खोकल्याबरोबर कफ देखील पडतो.
४. रुग्णाला थंडी वाजून येऊन ताप येतो. काहीजणांना खूप घाम येतो.
५. श्वास घेण्यास त्रास होतो. श्वासोच्छवास जोराने केला जातो.
६. रुग्णाला छातीमध्ये वेदना होतात.
७. रुग्णाला सतत बेचैन वाटते.
८. भूक कमी लागते किंवा अजिबात लागत नाही.
लहान मुलांमधील न्यूमोनियाची लक्षणे
लहान मुलांना झालेला न्यूमोनिया गंभीर स्वरूप धारण करू शकतो. तसे होऊ नये म्हणून मुलांमधील न्युमोनियाची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
१. लहान मुलांना तापाबरोबरच हुडहुडी भरून येणे आणि खूप घाम येणे असे लक्षण दिसते.
२. खूप जास्त प्रमाणात खोकला येतो.
३. मुले खूप अस्वस्थ दिसतात. बेचैन वाटतात.
४. त्यांना अजिबात भूक लागत नाही. जेवण जात नाही.
न्युमोनियाचे पाच प्रकार आहेत.
१. व्हायरल न्युमोनिया
२. बॅक्टेरियल न्युमोनिया
३. मायकोप्लाजमा न्युमोनिया
४. एस्पिरेशन न्युमोनिया
५. फंगल न्युमोनिया
न्युमोनियावरील घरगुती उपाय
१. लसूण
एक कप दुधात चार कप पाणी मिसळावे. त्यात अर्धा चमचा लसणाची पेस्ट घालून ते एक चतुर्थांश होईपर्यंत उकळावे. मग ते मिश्रण दिवसातून दोन वेळा सेवन करावे. बराच फरक पडतो.
२. वाफारा घेणे
वाफारा घेण्यामुळे छातीतील संसर्ग कमी होतो. साठलेला कफ कमी होतो. रुग्णाला श्वास घेण्यास मदत होऊन खोकल्याचे प्रमाणदेखील कमी होते. गरम वाफेमुळे छातीतील जडपणा कमी होतो.
३. मोहरीचे तेल
मोहरीचे तेल थोडेसे गरम करून त्यात चमचाभर हळद मिसळावी. हे मिश्रण छातीला चोळून लावावे. त्याचा मसाज करावा.
४. हळद
श्वासाशी निगडित असणार्या समस्यांसाठी हळद अत्यंत गुणकारी आहे. दिवसातून दोन वेळा गरम दुधात हळद घालून त्याचे सेवन करणे अतिशय फायद्याचे आहे. तसेच अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा काळीमिरी पावडर कोमट पाण्यात मिसळून त्याचे सेवन दिवसातून दोन वेळा करावे.
५. तुळस
तुळशीच्या दहा-बारा पानांचा रस काढून त्यामध्ये ताजी कुटलेली मिरपूड घालून दर सहा तासांनी सेवन करावे. न्यूमोनिया साठी या उपायाचा बराच फायदा होतो.
६. पुदिना
पुदिना छातीतील जळजळ आणि कफ कमी करतो. चहा करताना त्यात पुदिन्याची ताजी पाने घालून उकळावे. हा उपाय लाभदायक ठरतो.
७. गाजर
गाजराचा रस किंवा ज्यूस काढून त्यामध्ये चवीपुरते लाल तिखट मिसळुन त्याचे सेवन करावे. या दोन्ही पदार्थांचा न्युमोनिया बरा होण्यासाठी खूप उपयोग होतो.
८. मेथीचे दाणे
एक कप पाण्यात ६ ते ७ मेथीचे दाणे, अर्धा चमचा आल्याची पेस्ट आणि एक लसणाची पाकळी घालून ते पाणी उकळून घ्यावे. दिवसातून ३ ते ४ वेळा हे पाणी प्यावे.
९. लवंग
लवंग भाजून त्याची पूड करून घ्यावी. त्यामध्ये मध मिसळून त्याचे चाटण घ्यावे.
१०. तीळ
चमचाभर तीळ एक कप पाण्यात उकळून ते पाणी गाळून घ्यावे. दिवसातून दोन वेळा असे पाणी प्यावे. बराच फायदा होतो.
११. हिंग
न्युमोनियाच्या रुग्णांना हिंगाच्या नियमित सेवनाने बराच फायदा होतो.
न्यूमोनिया बरा होण्यासाठी करण्याचे इतर घरगुती उपाय
१. न्युमोनियाच्या रुग्णांना निरनिराळ्या भाज्यांचे गरम सूप पिणे लाभदायक ठरते.
२. गरम पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करणे घशाला आराम देते.
३. गरम चहा अथवा कॉफी पिणे घसा आणि छातीला आराम देते.
न्यूमोनिया झाला असेल तर आहार कसा असावा?
१. संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा.
२. दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
३. हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे दररोज सेवन करावे.
४. प्रोटीन युक्त आहार जसे की मांसाहार, दूध, दही यांचे सेवन करावे.
५. सर्व अन्न उत्तम प्रकारे शिजवलेले असावे. कच्चे अथवा अर्धवट शिजवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत.
खूप थंडी अथवा पावसाळ्यात न्युमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सीजन बदलताना सर्वांनी तब्येतीची काळजी घ्यावी. अतिथंड पदार्थ खाणे, गार वाऱ्यात बाहेर फिरणे अशा गोष्टी टाळाव्यात.
कोणत्याही आजाराचा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी.
तर हे आहेत न्यूमोनियावर करण्याचे घरगुती उपाय. ह्या उपायांचा जरूर वापर करा. परंतु जर ह्या घरगुती उपायांमुळे फरक पडला नाही तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
खालील लक्षणे असल्यास रुग्णाने ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
१. जर रुग्णाचे वय साठ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असेल.
२. जर रुग्णाचा रक्तदाब १४० पेक्षा जास्त असेल.
३. रुग्णाचा श्वासोच्छवास फार जलद गतीने सुरु असेल.
४. रुग्णाला श्वास घेण्यास फार त्रास होत असेल
५. रुग्णाची हृदय गती ५० पेक्षा कमी अथवा १०० पेक्षा जास्त असेल.
६. रुग्णाच्या शरीराचे तापमान कमी झाले असेल.
७. लहान मुलांची नखे आणि ओठ निळसर पडत असतील तर त्यांना ताबडतोब दवाखान्यात घेऊन जावे.
८. लहान मुलांमध्ये न्यूमोनिया फार पटकन तीव्र स्वरूप धारण करतो. त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर उपचार सुरू करावेत.
तरीही आहे न्यूमोनिया बद्दलची संपूर्ण माहिती. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साठी हा लेख शेअर करा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.