लहान मुले विशेषतः मुली डोके खाजवू लागल्या की त्यांच्या आया अगदी काळजीत पडतात. केसांमध्ये उवा झाल्या की डोके खाजवू लागते. उवा हा एक प्रकारचा परजीवी प्राणी असतो. दाट केसांमध्ये लपून उवा डोक्यातील रक्त पितात. त्यावर त्यांचे पोषण होते. उवा फक्त डोक्यात होतात असे नाही तर काही लोकांमध्ये शरीराच्या कपड्यांनी झाकलेल्या घाम येणाऱ्या भागात देखील उवा होऊ शकतात.
उवा लांब आणि दाट केसांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. उवा डोक्याला चावताना संवेदना होणार नाहीत अशा प्रकारचे रसायन त्यांच्या शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या केसात उवा असतील त्यांना त्या चावलेल्या कळत नाहीत. अशाप्रकारे चावून उवा डोक्याचे रक्त पितात.
एक ऊ साधारणपणे ९० दिवस जिवंत राहू शकते. तेवढ्या काळात त्यातील मादी उवा साधारण ९० ते १०० अंडी देतात. सात दिवसांमध्ये त्यातून नवीन उवा बाहेर पडतात. पुढील १० दिवसांमध्ये त्या उवा मोठ्या होतात आणि अंडी देऊ शकतात. हे चक्र सुरूच राहते. त्यामुळे उवांवर वेळीच उपाय केले नाहीत तर त्यांची संख्या भराभर वाढत जाते आणि मग त्यांना नियंत्रणात आणणे अवघड बनते. त्यामुळे आज आपण उवा नष्ट करण्याचे घरगुती उपाय पाहणार आहोत.
केसात उवा का होतात?
उवा होण्याचे प्रमुख कारण केस नियमितपणे स्वच्छ न ठेवणे हेच आहे. वैयक्तिक स्वच्छता न ठेवणे, नियमितपणे केस न धुणे, अंघोळ न करणे, अस्वच्छ जागी वावरणे, दूषित अन्नपदार्थ खाणे आणि उवा झालेल्या व्यक्तीच्या सानिध्यात येणे यामुळे केसात उवा होतात.
उवा होणे हा काही आजार नाही परंतु अशाप्रकारची अस्वच्छ जीवनशैली असणे ही मात्र चांगली गोष्ट नाही.
केसात उवा झाल्या आहेत हे कसे ओळखावे?
१. केसांमध्ये खूप खाज येणे.
२. केसात काहीतरी चालत असल्यासारखे वाटून अस्वस्थ वाटणे.
३. केसात उवांची पांढरी अंडी दिसणे.
केसात उवा होऊ नयेत म्हणून काय करावे?
१. दररोज स्वच्छ आंघोळ करावी.
२. स्वच्छ धुतलेले कपडे वापरावेत.
३. केस नियमितपणे स्वच्छ धुवावेत.
४. केसांना नियमितपणे खोबरेल तेल लावावे.
५. केस पुसण्याचा टॉवेल स्वच्छ आणि प्रत्येकाचा स्वतंत्र असावा. एकमेकांचे कपडे, कंगवे, टॉवेल वापरू नयेत.
६. ज्यांच्या केसात उवा झाल्या आहेत अशा लोकांच्या थेट संपर्कात येणे टाळावे.
केसातील उवा नाहीशा करण्याचे घरगुती उपाय
हे उपाय घरच्याघरी सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरुन केले जातात. त्यामुळे ते करणे सर्वांना शक्य होते तसेच हे उपाय फारसे खर्चीक देखील नाहीत.
१. फणीने केस विंचरणे
हा केसातील उवा काढण्याचा पारंपारिक उपाय आहे. तेल लावून अगदी बारीक दातांच्या फणीने केस विंचरुन केसातील उवा काढता येतात. दिवसातून दोनदा हा उपाय करावा. असे सलग सात आठ दिवस केल्यास उवा कमी होतात. परंतु हा उपाय वेळखाऊ आहे तसेच अशा प्रकारे केस विंचरताना वेदना होतात. विशेषतः लहान मुले अशा पद्धतीने केस विंचरून घेण्यास लवकर तयार होत नाहीत. अशा वेळी खाली दिलेले इतर उपाय उपयोगी ठरतात.
२. टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल हे नैसर्गिक तेल आहे. हे तेल केसांना लावून कमीत कमी सात ते आठ तास ठेवावे. त्यानंतर केस स्वच्छ धुऊन बारीक दातांच्या फणीने विंचरावे. उवा कमी होण्यास मदत होते.
३. एरंडेल तेल
केसांना एरंडेल तेल लावणे उवा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. रात्रभर असे तेल लावून ठेवून सकाळी केस स्वच्छ धुवावेत. त्यानंतर बारीक दातांच्या फणीने केस विंचरावे. उवा मरतात तसेच त्यांची अंडी कमी होण्यास मदत होते.
४. पेट्रोलियम जेली
केसांच्या मुळांशी पेट्रोलियम जेली लावावी. ४ ते ५ तास ठेवून नंतर केस स्वच्छ धुऊन टाकावेत. उवा कमी होण्यास मदत होते.
५. कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची पाने वाळवून, चुरून त्यांची पाणी अथवा खोबरेल तेल घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांच्या मुळांशी लावून ठेवावी. ४ ते ५ तास ठेवून केस स्वच्छ धुऊन टाकावेत. कडूलिंबामुळे उवा मरतात. तसेच त्यांची अंडी नष्ट होतात.
६. आले आणि लिंबाचा रसाची पेस्ट
एक चमचा आल्याच्या पेस्टमध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावून ठेवावे. २० मिनिटांनी केस धुऊन टाकावेत. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास बराच फायदा होतो. असेच लसणाची पेस्ट आणि लिंबाचा रस वापरुन देखील करता येते.
७. तुळस
तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून ती केसांच्या मुळांशी लावावी. वीस मिनिटे ठेवून वाळल्यावर केस स्वच्छ धुऊन टाकावेत. बराच फरक पडतो. झोपताना उशीजवळ तुळशीची पाने ठेवण्याचा देखील उपयोग होतो.
८. मीठ आणि विनेगर
मीठ आणि विनेगर एकत्र करून केसांच्या मुळांशी लावावे. दोन तासांनी केस स्वच्छ धुऊन टाकावे. हा उपाय सलग तीन दिवस करावा.
९. एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा
एरंडेल तेलात बेकिंग सोडा मिसळून हे मिश्रण रात्रभर केसांना लावून ठेवावे. सकाळी केस स्वच्छ धुऊन टाकावे आणि नंतर फणीने विंचरावे.
१०. खोबरेल तेल आणि ऍपल साइडर विनेगर
खोबरेल तेल आणि अॅपल साइडर विनेगर ह्यांचे मिश्रण केसांना लावून ठेवावे. काही तासांनी केस स्वच्छ धुवून टाकावे आणि बारिक दातांच्या फणीने विंचरावे. मेलेल्या उवा सहजपणे निघून जातात.
११. ओवा
ओवा केसांसाठी गुणकारी आहे. १० ग्राम ओवा बारिक वाटून त्यात लिंबाचा रस मिसळून केसांना लावावा. काही तासांनी केस स्वच्छ धुवून विंचरावेत. उवा निघून जाण्यास मदत होते.
तर हे आहेत केसातील उवा मारण्याचे घरगुती उपाय. शारीरिक स्वच्छता ठेवली तर मुळात उवा होणारच नाहीत. तसेच उवा झाल्या तरी केसांची स्वच्छता ठेवून आणि वरील उपाय करून त्या कमी करणे तसेच नष्ट करणे सहज शक्य आहे. केसांना नियमित तेल लावणे, चांगल्या प्रतीचा शाम्पू अथवा शिकेकाई केस धुण्यासाठी वापरणे यामुळे या समस्येवर सहज मात करता येऊ शकते.
मैत्रिणींनो, हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हे उपाय जास्तीत जास्त लोकांना माहीत होण्यासाठी हा लेख शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mostly useful