पुरेशा झोपेमुळे हार्ट फेलचा धोका 42 टक्क्यांनी कसा कमी करता येऊ शकतो, जाणून घेऊया या लेखातून
“नींद न मुझको आए” किंवा “मुझे नींद ना आए” सारखी गाणी कितीही रोमँटिक वाटली तरी, प्रत्यक्षात पुरेशी झोप झाली नाही तर
आपल्या दिवसभराच्या उत्साहाला सुरूंग लागू शकतो.
पुरेशी झोप झाली की आपल्याला अलवार जाग येते. दिवसभर आपण अगदी फ्रेश राहतो.
पुरेशा व्यवस्थित झोपेचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ञ पुन्हा पुन्हा सांगत असतात की पुरेशी झोप घेतली तर आरोग्याच्या कितीतरी समस्या सहज दूर होतात.
एका प्रयोगातून केलेल्या संशोधनाव्दारे पुरेशा झोपेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा समोर आलाय. प्रयोग करणाऱ्या या संशोधकांचं असं म्हणणं आहे की, झोपेचं परफेक्ट वेळापत्रक सांभाळणा-या प्रौढ व्यक्तींमध्ये हार्ट फेलचा धोका कमी असतो.
संशोधनात असं दिसून आलय की चुकीच्या वेळापत्रकानुसार झोप घेणा-यां प्रौढ व्यक्तीच्या तुलनेत, झोपेचं वेळापत्रक काटेकोर सांभाळणा-या व्यक्तींमध्ये हार्ट फेलचा धोका 42 टक्क्यांनी कमी होतो.
कसं असायला हवं झोपेचं वेळापत्रक?
लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे’, असं म्हटलं जातं. हेच आहे झोपेचं आरोग्यदायी वेळापत्रक.
१) सकाळी वेळेवर जाग येणं.
२) सात आठ तासांची आरामदायी पुरेशी झोप. हे आहे झोपेचं हेल्दी वेळापत्रक.
३) रात्री उशीरा पर्यंत झोप न येणं, घोरणं किंवा दिवसभर पेंग येणं यांना दूर राखतं ते खरं झोपेचं वेळापत्रक.
पुरेशी झोप झाली तर हार्ट फेलचा धोका कसा टाळला जातो, याचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन केलं गेलं.
कोणत्या प्रयोगावर आधारित आहे हे संशोधन?
पुरेशी झोप आणि हार्ट फेल यांच्या मधील संबंध तपासण्यासाठी काही निरीक्षणं नोंदवण्यात आली. 2006 ते 2010 या कालावधीत ही निरीक्षणं नोंदवण्यात आली होती.
वय वर्षे 37 पासून 73 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींची नोंद ठेवण्यात आली. चार लाखापेक्षा जास्त व्यक्तींची माहिती या प्रयोगात नोंदवण्यात आली होती. 2019 पर्यंत हा प्रयोग सुरू होता. यात हार्ट फेलच्या संदर्भातील माहीती एकत्र करण्यात आली.
दहा वर्षांच्या या संशोधनात 5000 हून अधिक हार्ट फेलच्या केसेस नोंदवल्या गेल्या.
संशोधकांनी झोपेची गुणवत्ता तपासताना झोपेच्या वेळापत्रकाचं ही विश्लेषण केलं. झोपेची गुणवत्ता तपासताना झोपेचा कालावधी, अनिद्रा, घोरणे, आणि झोपेच्या इतर समस्यांचा विचार करण्यात आला. रात्रीचं जागरण आणि दिवसा झोप येणे याचाही अभ्यास करण्यात आला.
हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी झोपेचं वेळापत्रक कसं असावं?
संशोधकांनी झोपेचं जे आदर्श वेळापत्रक तयार केलं होतं त्यासाठी पाच पैलूंचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. यासाठी एक प्रश्नावली तयार करून फोनच्या माध्यमातून लोकांच्या झोपेच्या सवयींची माहिती जमा केली गेली.
यासाठी तीन विभाग ही पाडण्यात आले. जसं की अपुरी म्हणजे सात तासांपेक्षा कमी झोप, साधारण आठ तासाची पुरेशी झोप आणि आठ नऊ तासापेक्षा जास्त असणारी अतिझोप या विभागात उत्तरं मागवण्यात आली.
जमा केलेल्या माहितीच्या आधारे जे संशोधन केलं गेलं त्यानुसार असा निष्कर्ष मांडण्यात आला झोपेचं काटेकोर वेळापत्रक सांभाळणा-या व्यक्तींमध्ये झोपेचं वेळापत्रक बिघडलेल्या व्यक्तींपेक्षा हार्ट फेलचा धोका 42 टक्क्यांनी कमी असतो.
याशिवाय संशोधकांच्या असं लक्षात आलं की हार्ट फेलचा धोका वेगवेगळ्या पातळीवर कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे
1) जी व्यक्ती सकाळी वेळेवर उठते त्या व्यक्तीला हार्ट फेलचा धोका 8 टक्के कमी होतो.
2) ज्या व्यक्ती सात ते आठ तास पुरेशी झोप घेतात त्यांची धोक्याची पातळी 12 टक्क्यांनी कमी होते.
3) ज्या व्यक्तींना अनिद्रेची समस्या सतावत नाही त्यांच्या मध्ये या धोक्याची तीव्रता 17 टक्क्यांनी कमी जाणवली.
4) सगळयात महत्त्वाचा मुद्दा ज्या व्यक्ती दिवसा अजिबात झोपत नाहीत त्यांच्यात हार्ट फेलचा हा धोका 34 टक्के कमी असतो.
संशोधकांनी आणखी काही गोष्टींवर ही लक्ष केंद्रित केलं, ज्यामुळे या निष्कर्षावर परिणाम होऊ शकतो.
एकूण काय तर आपल्या झोपेकडे डोळसपणे पाहिलं तर आपण एक पाऊल आरोग्याच्या दिशेनेच उचलू शकतो.
जाणून घ्या हृदयातील ब्लॉकेजची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि पथ्ये
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice