जाणून घ्या अशा चार बँकांची नावे ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षाच्या मुदत ठेवीवर ७.३० टक्क्यांपर्यंत व्याज देतात
ज्येष्ठ नागरिक म्हणजेच वयाची ६० वर्षे पूर्ण केलेले नागरिक. सहसा असे नागरिक सेवानिवृत्त झालेले असतात. त्यामुळे जवळ असणाऱ्या पैशाची योग्य प्रकारे बचत करून त्यातून जास्तीतजास्त व्याज मिळवण्याकडे त्यांचा कल असतो. कारण ह्या व्याजाच्या उत्पन्नावर अनेक जेष्ठ नागरिक अवलंबून असतात.
बऱ्याच जेष्ठ नागरिकांना आपले पैसे मुदत ठेवी म्हणजेच FD मध्ये गुंतवणे सोयीचे वाटते. कारण मुदत ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे कोणत्याही अडचणीच्या वेळी चटकन काढता येतात. त्यावरील व्याजदेखील हव्या त्या पद्धतीने काढता येते आणि मुद्दल सुरक्षित राहते. तसेच मुदत ठेव पावती करणे हे सुटसुटीत आणि सोयीचे देखील असते.
आपल्या माहितीच्या बँकेत मुदत ठेव पावती करून पैसे ठेवणे जेष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि सोपे वाटते. एकदा FD करून त्यावरील फक्त व्याज काढून घेत राहून मुद्दल तसेच राहू देण्याकडे जेष्ठ नागरिकांचा कल असतो. त्यामुळे जितका जास्त मुदत ठेवीचा व्याजदर तितका जेष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होतो.
परंतु रिजर्व बँकेने ‘की रेपो रेट’ मागच्या वर्षभरापासून ४% इतकाच ठेवल्यामुळे जवळजवळ सगळ्या मोठ्या सरकारी आणि निमसरकारी बँकांनी त्यांचे मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे.
मात्र काही लहान आणि नवीन बँका मात्र ३ वर्षांसाठी मुदत ठेव पावती ठेवणाऱ्या जेष्ठ नागरिकांना जवळजवळ ७.३० टक्क्यांपर्यंत व्याजदर देतात. हे जेष्ठ नागरिकांसाठी फायद्याचे ठरू शकेल.
म्हणूनच आज आपण अशा बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या जेष्ठ नागरिकांना जास्तीतजास्त व्याजदर देण्याचा प्रयत्न करतात आणि तुलेनेने लहान बँका असल्या तरी त्या सुरक्षित आहेत.
१. सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक
ही बँक ३ वर्षांसाठी मुदत ठेव पावती करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना ७.३० % इतका व्याजदर देत आहे. हा कोणतीही बँक देत असलेला सर्वाधिक व्याजदर आहे. ह्या व्याजदराने रु १ लाख गुंतवले असता त्याचे ३ वर्षांनी रु. १ लाख २४ हजार होतात. ह्यासाठी करायची कमीत कमी गुंतवणूक रु. १०००/- इतकी आहे. त्यामुळे कोणतेही जेष्ठ नागरिक ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
२. येस बँक
ही बँक ३ वर्षांसाठी मुदत ठेव पावती करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना ७ % इतका व्याजदर देत आहे. हा कोणतीही खाजगी बँक देत असलेला सर्वाधिक व्याजदर आहे. ह्या व्याजदराने रु १ लाख गुंतवले असता त्याचे ३ वर्षांनी रु. १ लाख २३ हजार होतात. ह्यासाठी करायची कमीत कमी गुंतवणूक मात्र रु. १०००० /- इतकी आहे.
३. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
ही बँक ३ वर्षांसाठी मुदत ठेव पावती करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना ७ % इतका व्याजदर देत आहे. ह्या व्याजदराने रु १ लाख गुंतवले असता त्याचे ३ वर्षांनी रु. १ लाख २३ हजार होतात. ह्यासाठी करायची कमीत कमी गुंतवणूक रु. १०००/- इतकी आहे. त्यामुळे कोणतेही जेष्ठ नागरिक ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
४. इंडसइंड बँक
ही बँक ३ वर्षांसाठी मुदत ठेव पावती करणाऱ्या जेष्ठ नागरिकांना ६.५० % इतका व्याजदर देत आहे. ह्या व्याजदराने रु १ लाख गुंतवले असता त्याचे ३ वर्षांनी रु. १ लाख २१ हजार होतात. ह्यासाठी करायची कमीत कमी गुंतवणूक रु. १००००/- इतकी आहे. त्यामुळे कोणतेही जेष्ठ नागरिक ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
तर ह्या आहेत त्या चार बँका ज्या ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच वयाच्या ६० ते ८० वर्षे दरम्यानच्या भारतीय नागरिकांना रु. १ कोटीच्या आत असणाऱ्या कोणत्याही मुदत ठेव पावतीवर जास्तीतजास्त व्याजदराने व्याज देण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करण्यामुळे ह्या तुलनेने नव्या आणि लहान असणाऱ्या बँकांमधील ठेवींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अर्थातच त्यांना प्रस्थापित होण्यास मदत मिळणार आहे.
तसेच रु. ५ लाख पर्यंतच्या मुदत ठेव गुंतवणुकीस रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या ‘द डीपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ चे संरक्षण असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवलेले पैसेदेखील सुरक्षित राहणार आहेत. ही बँक आणि ग्राहक दोघांसाठीही सुरक्षित बाब आहे. आपल्या गुंतवलेल्या पैशांना संरक्षण आहे हे समजल्यावर जेष्ठ नागरिक निर्धोकपणे गुंतवणूक करू शकतात.
तर मित्र मैत्रिणींनो, ह्या माहितीचा जरूर लाभ घ्या. आपल्या घरातील आणि परिसरातील जेष्ठ नागरिकांना ह्या योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवून देण्यास मदत करा. तसेच ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.