आजकाल क्रेडिट कार्ड वापरणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. सगळेजण निरनिराळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे आपल्याला आधी खर्च करून नंतर यथावकाश त्या खर्चाचे बिल भरण्याची सुविधा मिळते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर समाजात अतिशय लोकप्रिय झाला आहे.
परंतु यातूनच काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे इतरांना लुबाडण्याचे प्रकार करू लागले आहेत. आज आपण क्रेडिट कार्ड संबंधीच्या अशाच एका पद्धतीची माहिती जाणून घेणार आहोत जिचा वापर करुन सर्वसामान्य लोकांना लुबाडले जाते.
RBL बँकेचे एक ग्राहक श्री. आनंद ( सुरक्षेच्या कारणाकरता ग्राहकाचे नाव बदलले आहे. परंतु घडलेली घटना सत्य आहे.) यांनी त्यांच्या बाबत घडलेली ही घटना सविस्तरपणे सांगितली आहे.
ते म्हणतात, “इतर काही बँकांच्या क्रेडिट कार्ड बरोबरच मी RBL बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतो. काही दिवसांपूर्वी मला 6391504865 ह्या मोबाईल नंबर वरून फोन आला. फोनवरून बोलणारी व्यक्ती अतिशय उत्तम इंग्रजी बोलत होती आणि त्या व्यक्तीने आपण RBL बँकेचे कर्मचारी आहोत असे मला सांगितले. बँकेतून फोन आला असेल अशा समजुतीने मी संभाषण सुरू ठेवले. सदर व्यक्तीने मला बँकेकडून दिल्या गेलेल्या क्रेडिट कार्ड संबंधी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याने मला असे विचारले की क्रेडिट कार्ड इशू करताना बँकेने मला कार्डच्या वापरासंबंधीची जॉइनिंग आणि हॅंडलिंग फी याबद्दल माहिती दिली आहे का? तसेच माझ्या कार्ड वर मला जितके कबूल करण्यात आले होते तितके क्रेडिट लिमिट नक्की मिळते का?
हे नेहमी सारखे साधे सरळ प्रश्न वाटल्यामुळे मी ह्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर सदर व्यक्तीने, मला बँक माझे क्रेडिट लिमिट १ लाख रुपयाने वाढवून देत आहे असे सांगितले. त्यासाठी त्या व्यक्तीने मला माझा पॅन नंबर सांगितला आणि तो बरोबर आहे ना याची खात्री करून घेण्यास सांगितले.
आश्चर्याची गोष्ट अशी की सदर व्यक्तीने माझा पॅन नंबर अगदी योग्य सांगितला होता. त्यानंतर सदर व्यक्तीने मला असे सांगितले की माझे क्रेडिट लिमिट वाढवण्यासाठी माझ्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो मी त्या व्यक्तीस सांगावा. ओटीपी सांगावा असे म्हटल्याबरोबर माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तरीही मी संभाषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
माझ्या फोनवर खरोखरच आरबीएल बँकेच्या मेसेजिंग सर्विस कडून एक ओटीपी आला. परंतु नेहमी मला बँकेचे पैशासंबंधीचे व्यवहार केल्यावर जसा ओटीपी येतो त्या पद्धतीचा तो ओटीपी होता. सदर ओटीपी मध्ये क्रेडीट कार्ड लिमिट वाढवण्याची नव्हे तर क्रेडिट कार्डचे सेटिंग बदलण्याची नोंद होती.
माझ्या क्रेडीट कार्डचे सेटिंग बदलण्याची परवानगी देण्यासाठी तो ओटीपी होता हे माझ्या लगेच लक्षात आले. परंतु तरीही हा फ्रॉड कॉल आहे याची खात्री करून घेण्यासाठी मी त्या व्यक्तीला माझे सध्याचे क्रेडिट लिमिट किती आहे हा प्रश्न विचारला. आतापर्यंत त्याच्या प्रश्नांची नीट उत्तरे देणारा मी अचानक प्रश्न विचारू लागल्याने सदर व्यक्ती गडबडला. त्याला माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. मी त्याला मी ओटीपी सांगणार नाही. तुम्ही मला बँकेच्या ऑफिशियल मेल आयडी वरून इमेल पाठवा असे सांगितल्यावर मला तो फ्रॉड आहे हे समजले आहे अशी त्याची खात्रीच पटली आणि थातूरमातूर उत्तरे देऊन त्याने फोन ठेवला.
माझ्या सजगतेमुळे मी त्यादिवशी फ्रॉडचा शिकार होण्यापासून वाचलो. परंतु इतरांनाही या विषयाची माहिती असावी म्हणून मी माझ्याबाबतीत घडलेली घटना डिटेल मध्ये सांगत आहे.“
श्री आनंद यांनी त्यानंतर ताबडतोब RBL बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून सदर घटनेची माहिती दिली आणि त्यामुळे तो फोन फ्रॉड होता यावर शिक्कामोर्तब झाले.
तर मित्र मैत्रिणींनो श्री आनंद यांनी सजगता दाखवल्यामुळे ते फ्रॉड होण्यापासून वाचले परंतु सर्वजण काही तितके नशीबवान नसतात. अशीच अजून एक घटना RBL बँकेचे दुसरे ग्राहक ज्यांनी त्यांचे नाव गुप्त ठेवले आहे त्यांच्या बाबतीत घडली.
ते सांगतात, “माझ्या ऑफिसच्या कामात अतिशय व्यस्त असताना आलेल्या फोन मुळे मी क्रेडिट कार्ड फ्रॉड चा शिकार झालो आहे. आलेल्या फोनवर सदर व्यक्तीने मला माझे पॅन नंबर आणि क्रेडिट कार्ड वरील काही आकडे सांगितले. जे योग्य होते त्यामुळे माझा त्या व्यक्तीवर विश्वास बसला. तसेच कामाच्या घाईगडबडीत असल्यामुळे मी फार काही विचार केला नाही. त्यांनी मागितल्या नुसार माझ्या कार्ड वरील क्रेडिट लिमिट वाढवण्यासाठीचा ओटीपी मेसेज नीट न वाचताच मी त्यांना सांगितला.
त्यानंतर ताबडतोब माझ्या क्रेडीट कार्ड वरून १६१००/- रुपयांची खरेदी झाल्याचा मेसेज मला आला. खरे तर मी माझा कार्ड वर असणारा cvv सांगितला नव्हता. परंतु ओटीपी शेअर केल्यामुळे सदर ट्रांझॅक्शन पूर्ण झाले. मी ताबडतोब बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून तक्रार नोंदवली. परंतु मी स्वतःच ओटीपी शेअर केलेला असल्यामुळे बँकेने काहीही कार्यवाही करण्यास असमर्थता दर्शवली. याबाबत बँकेची काही चूक आहे असे म्हणता येणार नाही कारण ह्या व्यवहारासाठी दिला गेलेला ओटीपी माझ्याकडूनच त्या गुन्हेगार व्यक्तीला सांगितला गेला होता. माझी अशी फसवणूक झाल्यामुळे आता मी अतिशय काळजीपूर्वक असे व्यवहार करतो. तसेच इतरांनाही याची माहिती व्हावी म्हणून ही घटना सविस्तरपणे सांगायचे मी ठरवले.”
मित्र-मैत्रिणींनो, तर अशी आहे ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांची इतरांना फसवण्याची पद्धत. आपण बँकेतून बोलत आहोत असे सांगणारे कोणतेही फोन घेताना अतिशय सावध असावे.
आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, कार्डचे, अकाऊंटचे डिटेल्स, पासवर्डस, cvv नंबर्स आणि आलेले ओटीपी कोणालाही सांगू नयेत. आपण कामाच्या गडबडीत असू तर असे फोन घेताना विशेष दक्षता घ्यावी. कारण असे फोन करणारे लोक आपल्याला बोलण्यात गुंतवून आपल्याकडून त्यांना हवी ती माहिती काढून घेतात. बँकेकडून वारंवार ग्राहकांना ह्यासंबंधी सावध करणारे मेसेज आणि ईमेल पाठवले जातात.
ऑनलाइन बँकिंग आणि क्रेडिट कार्ड वापरणे अतिशय सोपे आणि सोयीस्कर असले तरी त्यातून फसवले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. आम्ही असे म्हणत नाही की ह्या सुविधा वापरू नका. त्यांचा वापर अवश्य करा परंतु सावधपणे.
ही माहिती इतरांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख जास्तीतजास्त शेअर करा. तसेच तुम्हालाही असे काही फ्रॉड फोन कॉल आले असतील तर त्याची माहिती आम्हाला कॉमेंट करून द्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.