माझ्या राणीचा खून त्या माणसाने केला. तिच्या माझ्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून क्षणार्धात वेगाने स्पर्श करून गेल्या. तिच्यावर केलं होतं प्रेम अगदी मनापासून. तिने देखील माझ्यावर तितक्याच सहजरीत्या केले.
तिला मी रोज पाहायचो आणि मला वाटायचं की ती पण माझ्याकडे पहायतेय, नाही म्हणजे अनेकदा ती माझ्याकडे पहात असताना तिला मी हेरलं होतं. तशी आमची रोजची अबोल भेट आणि तिला पाहिल्याशिवाय मी बिल्डींगच्या बाहेर जाऊच शकत नव्हतो.
खरं म्हणजे ती इतकी गोड आणि निरागस होती ना की तिला पाहिल्यावर कोणीही तिच्या प्रेमात सहज पडू शकेल आणि त्याला मी अपवाद असणे शक्यच नाही. गम्मत तर तेव्हा वाटायची जेव्हा ती जीभ बाहेर काढून मला चिडवायची. एक दिवस जरी नाही दिसली तरी जीव कासावीस व्हायचा. अनेक प्रश्न आणि नको नको ते विचार डोक्यात यायचे आणि संध्याकाळी दिसली की जीवात जीव यायचा.
असे खूप दिवस आम्ही अबोल होतो पण शेवटी तिने धीर केला आणि माझ्याकडे यायला लागली तेव्हा मला कळालं की तिच्या एका पायाला व्यंगत्व आले आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल अधिक सहानभूती निर्माण झाली. तिने माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आणि हसण्यासारखं म्हणजे पुन्हा तिने जीभ बाहेर काढली आणि एक उडी मारली.
तिचा तो अल्लडपणा पाहून मी थोडासा सुखावलो पण तिला लंगडताना पाहून खूप वाईट वाटलं. पण ती अशी वागत होती जस काय जगातली सारी सुखं तिच्यापुढे लोटांगण घालत आहेत. जाताना पुन्हा तिने माझ्याकडे पाहून जीभ बाहेर काढली. खरंच तिचं ते गोड चिडवनं मला खूप भावायचं.
एकदा तळमजल्यावर राहणाऱ्या काकांना विचारलं राणीच्या एका पायाला काय झालंय? काकांनी सांगितलं ,”ती एकदा मुलांबरोबर रस्त्याच्या बाजूला खेळत होती आणि खेळता खेळता एका मुलाने मारलेला बॉल रस्त्यावर गेला, त्या बॉलच्या मागे राणी धावत धावत गेली आणि नेमकं त्याचवेळी एक भरधाव रिक्षा तिच्या पायावरून गेली, नशीब थोडक्यात बचावली. मी आणि पवारांनी तिची मलमपट्टी केली.”
पुढे पुढे आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. मला तिच्यासोबत वेळ घालवणं खूप आवडू लागलं. मी तिच्यासाठी रोज संध्याकाळी बिस्किटे घेऊन यायचो, तिला ती खूप आवडायची. एकदा तर राणी आणि मी बागेत फिरत असताना उगाच त्या साने काकांच्या सनी सोबत भांडत बसली. तिला तिथून कसंतरी आणलं. माझ्या परतीची वाट ती तितक्याच तीव्रतेने पहायची. मला तिचा लळा लागला होता आणि तिलाही माझा. नेहमीप्रमाणे मी सकाळी कॉलेजला जायला निघालो आणि सवयीप्रमाणे त्यांनी मला लाडिक चिडवलं. मी हसत हसत बिल्डींगच्या बाहेर पडलो. आणि येताना खूप सारी बिस्कीट आधीच तिच्यासाठी आणायची असं ठरवून मी गेलो कॉलेजमध्ये.
४:२० झाले ,पाठीला बॅग अडकवली आणि घरी जायला निघलो. दुकानात काही बिस्कीट घेतली. घरी पोहचेपर्यंत मला ५.३० झाले होते. मग झरझर पावले टाकत पोहचलो. नेहमीप्रमाणे गेटजवळ माझी वाट पाहणारी राणी मला दिसली नाही. मला वाटलं बागेत गेली असेल म्हणून मी घरी गेलो आणि परत फ्रेश होऊन आलो. तरीपण ती कुठे दिसेना. खूप वेळ झाला तरी राणी आली नव्हती. मी धावत धावत बागेत गेलो तर ती तिथे पण नव्हती. मी तर पूर्ण घाबरून गेलो .ज्या ज्या ठिकाणी ती जाऊ शकते त्या त्या सर्व ठिकाणी मी शोधलं. शेवटी साने काकांच्या घराची बेल वाजवली. काकूंनी दार उघडले. समोर सनी बसला होता. त्याचा चेहरा पडला होता. त्याच्या समोर असलेली बिस्किटं अजून तशीच होती. काका मोबाईलवर काहीतरी करत सोफ्यावर बसले होते. मी काकांना विचारलं, “काका राणीला पाहिलं का?”
काकांचा चेहरा उतरलेला होता.काकांनी अगदी दुःखी होऊन सांगितलं, ” दुपारी ती बाहेरच्या मैदानातून खेळून परत येत होती तेव्हा रस्ता ओलांडताना एका सद्सद्विवेकबुद्धी हरवलेल्या ड्राईव्हरने तिच्या वरून आपली गाडी नेली आणि न थांबताच पुढे निघून गेला ”
माझ्या राणीचा खून त्या माणसाने केला. तिच्या माझ्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून क्षणार्धात वेगाने स्पर्श करून गेल्या. तिच्यावर केलं होतं प्रेम अगदी मनापासून. तिने देखील माझ्यावर तितक्याच सहजरीत्या केले. प्राण्यांना फक्त शारीरिक वेदना होतात ते मानसिक वेदनांपासून मुक्त आहेत अशी विधाने या निरागस राणीच्या बाबतीत लागू होत नाहीत. माणुसकी फक्त माणसांसोबतच दाखवायची का?
माणूसकी !!!! माणूस हा माणूस तेव्हाच बनतो जेव्हा त्याला “की” चा अर्थ कळतो. या “की” मध्ये प्रेम ,करुणा, वेदना ,भावना समजून घेण्याची वृत्ती सामावलेली असते. माझ्यामते हीच “की” (Key-चावी) आहे माणसाने माणूस बनण्याची. आपला मेंदू खूप प्रगल्भ आहे. त्यांना समजून घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे…!!
वाचण्यासारखे आणखी काही…..
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.