याबरोबरच परिसरातील प्रत्येक गावात कपाटावर लिहिलेल्या मजकुराबाबत चवीने चर्चा झडताना दिसत होत्या. कपाटावर लिहिले होते, भाऊ आम्हाले माफ करा! आमची चूक झाली की, आम्ही तुमच्या घरात चोरी केली. यापुढे कानाले खडा लाऊन शप्पथ घेऊन सांगतो, अशी चोरी जन्मात कधीच करणार नायी!
केसाय मे फुगे घ्याऽऽ केसाय मे फुगेऽऽ जोरदार आवाज देत फुगेवाल्यानं जवळ असलेली पुंगी जोरात वाजवली. चला, आणा लवकर लवकर केसं! चला, चला रंगीबेरंगी फुगे घ्याऽऽ
फुगेवाल्याचा आवाज ऐकल्याबरोबर गावातील मुलं सैरभैर गावभर पळत होती. प्रत्येक घरावरील छताच्या बांबूमध्ये खोचून ठेवलेले केसांचे पुंजके शोधत होती. शोधून आणलेल्या केसांचा पुंजका फुगेवाल्याला दिल्यानंतर तो इत्ताच लाया क्या, इसमे कुछ नही आयेगा! और ला! म्हणून पुन्हा मुलांना केसं आणायला पाठवत होता.
अय् मा, मले अजुन केस पायजे, इतक्या कमी केसांमध्ये तो फुगेवाला फुगा देत नाही. ..हर्या रडत रडत त्याच्या आईला सांगत होता.
अरे, बापा कुठून देऊ तुले केसं आता! घराच्या कौलायखाली खोशेल होते तेवढे देले तुले! आता कुठून आणू! अजून सापडतात काय पाय एखाद्या कौलाखाली?
नाही सापडत. सगळे बांबू आणि कौलं पायले. मले फुगा पायजे! म्हणत हर्यानं जमीनीवर लोटांगण घ्यायला सुरुवात केली.
सरू, काय म्हणते तो, काहून थयथयाट करुन रायला सकावूनच!
फुग्यावाला येल हाये गावात. केसाय मे फुगे देते. यानं नेले घरावर खोशेल होते तेवढे केसं! पण तो म्हणते अजून आण! तं हे बेनं घरी येऊन थयथय नाचून रायलं!
त्याले म्हणा, तुवं चोंडकं बंद कर, अन इथून चालता व्हय! मावं डोक्स आंधीच लय तपेल हाय कालपासून!
बाबू तुवा बाप भलकसा रागात हाय, उठला ना जाग्यावून, त होबाळलंच फोडते बरं!
सरूबाईचं बोलणं ऐकून हर्यानं नरमाईची भूमिका घेऊन घरातून काढता पाय घेतला.
उन्हायाचा टाईम हाय, वावरातला माल इकून आता लोकायची घेवाण-देवाण केली. आता काई उरलं का हातात आपल्या? तुच सांग! पण ही परिस्थिती काही आपलीच नाही. सगळ्या कास्तकारायची गत्या अशीच हाय! वर्षभर वावरात काम करुन रक्त आटवा लागते. मालाचे पैसे आले की, देवाण घेवाण केली की, हात रिकामेच! त्यात हे काहीबाही इकणारे चालूच रायतात. आता हा गेला की, तो आईसकांडीवाला येते, मग तो लोवालोखंडमे गुळपट्टीवाला! म्हणजे दिवसभर चालूच रायतात. जर दिवसभर हे चालूच रायतीन तर इतका पैसा कुठून पुरवाव पोरायले? ..नानाराव सराटे तळमळीनं बोलत होते.
तुले सांगतो सरू, काही लोकं काहीबाही इक्याच्या निमित्तानं दिवसा घरं पाहून घेतात. अन् मंग रात्री चोर्या करतात! हे बरोबर एकटे येऊन सगळं पाहून जातात अन् रात्री गच्चू देतात. त्यायले माहीत हाये या टायमाले कास्तकरायनं मालटाल इकेल असते. लोकायच्या घरात पैसा-अदला असते. कधी कधी बाया येतात बांगड्या, कंगवे, कटलरीचं सामायन घेऊन, घरात घेत जाऊ नको कोणालेच! आपलं घर कसं टामटूम दिसते लोकायले. त्याच्याच्यानं अशा लोकायचं लवकर ध्यान जाते आपल्या घरावर!
सरू वयनी, नानाभाऊ एकदम खरं बोलून रायले बरं! बार्शिटाकळीत परवाच्या दिवशी रात्री दरोडा टाकला चोरायनं. एका सोईनं दहा घरं फोडले, एकाच लायनीतले! ..संतुर फोकनाडे बोलतच आवारात प्रकटला.
संतुर्या तू काय करुन रायला बे इकडे, बातखबाल्या! गेला नाहीस काय टॅक्टरवर किस्तकारीले? ..नानाराव म्हणाले.
डिझेल सरलं कालच! रामरावभाऊ जायेल हायेत सकावूनपासून आण्याले! संध्याकायलोक जर आले तर रात्री जा लागीन! माळाच्या वावरात नांगरटी कर्याची हाय. सोयाबीन होतं त्यात अन् तूर होती! सोयाबीन झुरलं सगळं, आता फक्त तुरीचे खुटं हायेत. दहा एकराचा नंबर हाय बात देतो उडवून अन् झोपतो मस्त उतान्या तंगड्या करुन!
लोकायचे गहू खपत नाहीत गड्या पण तू बोंडं खपवतं बोलण्यानं! बोलण्यानं दिल्ली जिंकता आली असती की नाही, तर तुनंच जिंकली असती बावा! काय काम काढलं मायाकडे सांग आता! ..नानारावनं विचारलं.
काही नाही उन्ह जयरासारखं तपून रायलं. रस्त्यावरच्या निंबाखाली मस्त बाज टाकून लोयलाय करून रायलतो, तंबाखूची तलब आली. मायाजवळची नगीनची पूडी सरली रात्रीच! म्हणलं तुमच्याकडे व्हईन काही सोयपाणी?
अबे, हिमण्याच्या घरी चिमणा गेला अन् सरती रात हिवानं मेला, अशी गत झाली गड्या तुयावाली! हे पाय तंबाखूची डबी डणडण हाये! पण थांब घरात पायतो अर्धीकं पुडी अशीन तर! असली तर तुही अन् मायीबी सोय होऊन जाईन! आण बरं वं पानपुडा, पानाचीबी तलब येल हाय! अर्धकखांड पानाचा टुकडा अशीन तर पायतो. नगीनची पुडीबी अशीन माया अंदाजानं त्यात! माया डबीतली तंबाखू सरली सायाची! आण मायी डबीबी भरुन घेतो, यालेबी देतो! पान खातं काय बे बावा?
वा, वा! अशीन तर खातोच! मले काय पत सांगेल हाये का डाक्टरनं! तुम्हीबी इचारुन रायले राजा!
अर्ध अर्धच खाऊ गड्या! दोन-तीनच पान हायेत. आज संध्याकायलोक पुरवा लागतीन एवढेच! तशेबी आज आम्ही जाऊन रायलो रात्री झुटींगबाबाच्या दर्शनाले! पायदल दिंडी जाऊन रायली, त्यात येतो जाऊन, मंग एकदा वावरातले कामं चालू झाले की, जाता येते का? लोकायच्या सकावूनच्या न्यायर्या नाही व्हत तं आम्ही घरी येतो!
जा, बुवा! तुमाले भेटते टाईम देवाजोळ जायाले! मले तर देव कधीच बलावत नाही. पण तुम्ही जाऊन रायले तर मायासाठीबी प्रसादी, अंगारा गिंगारा आणजा, झुटींगबुवाचा! ..तंबाखूच्या डबीचं झाकन लावून पान चावत संतुर्या निघून गेला.
तुम्ही तर मले काहीच सांगत नाही बयना! आता आपल्याले देवाच्या दर्शनाले जायाचं हाये तर आंधी सांग्याले! निरा वक्तावर सांगत जा तुम्ही! तुम्हाले काय फरक पडते, निंघा म्हणलं की निंघाले. काय आवरा लागते का सावरा लागते घरदार! ..तोंडाचा खकाना करत सरू तनक्यानं निघून गेली.
भयताड बोड्याच्या हर्या, जास्त फुग्यात हवा भरु नको बाबू! गाल फुगतीन, मंग बसशीन लडत! आपल्याजोळ तर काही पैसे नाहीत बुवा तुले दवाखान्यात न्याले! संध्याकायी आपल्याले जायाचं हाय भाईर! देवाच्या दर्शनाले, तुये गाल जर दुखले तर तुले घरीच रावा लागीन, सांगून रायलो!
नानारावभाऊ, कुठी काढला दौरा संध्याकायच्या पायरी! ..रस्त्यावरुन येणारे जाणारे लोक विचारत होते.
झुटींगबाबाच्या दर्शनाले चाललो राजा, पायदल दिंडीत! उद्या सकाळलोक येतो वापस! ..प्रत्येक माणसाला सांगून नाना वैतागले होते.
पकडाऽऽ पकडा चोरऽऽ चोरऽऽ ..संतुर्या टॅक्टर सोडून गावात ओरडत सुटला होता.
त्याच्या आवाजानं पायटी परसाकळे जाणारे लोक टमरेल सांडवून आवाजाच्या दिशेने धावत सुटले होते. काही लोक झोपेतून उठून घराबाहेर पडले होते.
काय झालं बे भयताड काहून लोकायले सकाऊनच भंडावून सोडून रायला लेका!
नाही ना राजेहो! मी वावरातून टॅक्टर घेवून घरी येऊन रायलो होतो. म्हणलं पायटचे पाच वाजले घरी जाऊन एक झोप होते चांगली. तर मारवाड्याच्या आखरात सात-आठ जण एका अलमारीत काहीतरी शोधत होते. टॅक्टरच्या आवाजानं ते सगळे सातरगावच्या इकडे पयत गेले. त्यायले पाहून माया आंगांचं पाणी पाणी झालं सायाचं! माया तोंडातून आवाजही निघत नव्हता राजा! बरीच बरी झाली ते आता! मायी मलेच मायीत भाऊ! ज्याची जयते त्यालेच कयते म्हणतात, ते कायी खोटं नाही!
नानाराव सराटेच्या घरी कोणीच नव्हतं रात्री. पण मला आता येताना त्यायच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांच्याच घरात चोरी झाली वाटते. याची बकबक आयक्यापेक्षा आपण चोरायले शोधू! याच्याच गप्पाईत रायलो तर चोर जातीन सातरगावच्या पुढे पऊन! ..गावातील एक जण म्हणाला.
लोक मिळेल त्या रस्त्यानं चोरांचा शोध घेत होते. हातात काठ्या, तलवारी, कुर्हाडी घेऊन तरुण, म्हातारी माणसं सातरगावच्या दिशेने पळत होती. बाया, लहान मुलांनी नानाराव सराटेच्या घरापुढे गर्दी केली होती.
महिला चर्चेतून किती पैसे चोरीला गेले असतील याचा अंदाज बांधत होत्या. पैशांसोबत दाग-दागिनेसुद्धा चोरले असतील का? याचीही चर्चा गावभर पसरली होती.
देव दर्शन करून आलेल्या सराटे कुटुंबाला त्यांच्या घरापुढे गर्दी पाहून आश्चर्य वाटलं. नानारावांना अंदाज येईना. त्यांनी पुढ्यात जाऊन एका महिलेला विचारलं.
नानारावभाऊ तुमच्या घरात पायटी चोरी झाली. वावरातून संतुर्या आला तेव्हा त्याले रस्त्यात चोर दिसले. गावातले सगळे लोकं गेले आहेत चोरायले पकड्याले.
चोरीबाबत ऐकताच सरूबाई रडायला लागली. आईला रडताना बघ्ाून हर्या बोंबलत सुटला. नानारावांनी सरूबाईला समजावत घरात नेलं. घराची पाहणी केली. घरातील कपड्यांचे कपाट उचकटून कपडे घरभर फेकून दिले होते. स्वयंपाकघरातील भांडी इकडे तिकडे पडली होती. दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेला दिसत होता आणि घरातील छोटं तिजोरीसारखं दिसणारं कपाट गायब होतं.
घरातील परिस्थिती बघून सरूबाई देवाचा धावा करत होती. झुटींगबाबाचा जप करून ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती.
सरू, आपल्या घरातलं सगळं सामान जसंच्या तसं आहे. फक्त छोटं कपाट तेवढं चोर घेऊन गेलेऊ अजुन काही गेलं असं वाटते का तुले!
हो, दवळीत चार-पाच भाकरी होत्या केलेल्या आणि हिरव्या मिरच्यायची चटणी वाटेल व्हती…… भयताड ते इचारून रायलो का मी तुले! भाकरी अन् चटणी गेली तर गेली बाकीचं इचारून रायलो! कपाटात किती पैसे व्हते? मायीत हाय काय तुले?
कपाटात काय, त्यात शंभर रुपये व्हते फक्त! तेही तुमच्या चोरून ठेवले होते!
हळू बोल, कोणी आयकीन. हे पाय मी सांगतो तसं कर! कोणं इचारलं तर कपाटात 90 हजार रुपये होते म्हणाव, कापसाचे! शंभर रुपये होते हे अजिबात सांगू नको कोणाले! इज्जत काढतं काय माणसाची भयताड!
इतक्यात चोरांना शोधणारी माणसं माघारी आली होती. चोरांच्या पायाचे ठसेसुद्धा कोणाला दिसले नव्हते.
लोक संतुर्यावर खापर फोडत होते. यानं बोलण्यात आपल्याला गुंतवलं नसतं तर चोर नक्कीच सापडले असते, असा सूर लोकांच्या बोलण्यातून उमटत होता.
आता बर्यापैकी दिवस उजाडला होता. संतुर्या नानारावसह सगळयांना घेऊन तिजोरी शोधायला गेले होते. मारवाड्याच्या आखराच्या खालतल्ल्या मेरीवर मोठ्या दगडानं फोडलेल्या कपाटाकडे सर्वांची नजर गेली. कपाटाच्या बाजुला एक भला मोठा दगड होता. जवळच भाकरीच्या काही तुकड्यांना मुंग्या लागल्या होत्या. या सगळ्यात कपाटावर लिहिलेला मजकुर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. 90 हजाच्या चोरीची वार्ता गावात येईपर्यंत चोरीच्या रकमेचा आकडा एक लाख झाला होता. चोरीची चर्चा परिसरात वणव्यासारखी पसरली होती. एका गावातून दूसर्या गावात खबर जाईपर्यंत हा आकडा पटीने वाढत होता. याबरोबरच परिसरातील प्रत्येक गावात कपाटावर लिहिलेल्या मजकुराबाबत चवीने चर्चा झडताना दिसत होत्या. कपाटावर लिहिले होते, भाऊ आम्हाले माफ करा! आमची चूक झाली की, आम्ही तुमच्या घरात चोरी केली. यापुढे कानाले खडा लाऊन शप्पथ घेऊन सांगतो, अशी चोरी जन्मात कधीच करणार नायी!
वाचण्यासारखे आणखी काही…..
आमचा हरी
स्कायलॅब कोसळणार!!!
माझी म्हातारी
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.