सध्याचे आपले जीवन कितीही गतिमान आणि धावपळीचे झाले असले तरीही थकलेल्या मेंदूला आणि शरीराला विश्रांती देण्यासाठी आवश्यक असते ती झोप. दिवसभर काम करून थकलेले शरीर आणि मेंदू पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी कमीत कमी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते.
शांत झोप लागली की शरीरातील झीज भरून निघते, मेंदूच्या पेशी नव्याने निर्माण होऊन जास्त जागरूकपणे काम करू लागतात आणि कामामुळे आलेला थकवा भरून निघून दुसरे दिवशी काम करण्याचा उत्साह वाढतो.
सर्वसाधारणपणे दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी झोप घेणे असेच सर्वांचे रुटीन असते. परंतु हल्ली वेगवेगळ्या कारणांमुळे रात्री लवकर न झोपणे, रात्री अजिबात न झोपता दिवसा झोपणे, रात्री अतिशय कमी वेळ झोपणे असे केले जाते.
रात्रीची पुरेशी आणि शांत झोप न मिळण्याची कारणे काहीही असली तरी त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्या शरीरावर आणि पर्यायाने आपल्या आरोग्यावर होत असतात.
रात्रीच्या जागरणामुळे किंवा अपूर्ण झोपेमुळे साध्या डोकेदुखीपासून ते नैराश्य आणि हृदयविकारापर्यंत अनेक वेगवेगळे आजार होऊ शकतात. तज्ञ असे सांगतात की दररोज किमान सात ते आठ तास झोप आणि तीदेखील रात्रीच्या वेळी घेणे हेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे.
अपुऱ्या झोपेमुळे किंवा निद्रानाशामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम खालील प्रमाणे
१. प्रतिकारशक्ती कमी होणे
अपूर्ण झोपेचा सर्वात मोठा फटका शरीराच्या प्रतिकारशक्तीला बसतो. आपण शांत झोपलेलो असताना आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीची यंत्रणा (इम्युन सिस्टीम) जागृत असते, ही यंत्रणा आपण झोपलेलो असताना शरीराला आजारपणापासून सुरक्षा पुरवणारे सायटोकिन्स आणि अँटीबॉडीज यांची निर्मिती करत असते.
यामुळेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. परंतु जर आपली झोप अपूर्ण राहिली तर आपल्या इम्यून सिस्टिमला हे काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, परिणामी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.
२. अपचन होणे
जागरण करणे किंवा अपुरी झोप घेणे यामुळे शरीराच्या पचनशक्तीला मोठा फटका बसतो. तसे झाल्यामुळे अन्नाचे पचन नीट न होणे, ऍसिडिटी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात. ज्या लोकांना वारंवार अपचन किंवा पोट बिघडणे असा त्रास होतो त्यांना निद्रानाशाचा किंवा अपुर्या झोपेचा आजार असतो असे आढळून आले आहे.
३. हृदयविकाराचा धोका वाढणे
रात्रीच्या वेळी किमान सात ते आठ तासांची शांत झोप घेतली की त्या वेळेत आपले शरीर दिवसभरात झालेली झीज भरून काढण्याचे काम करत असते. या झोपेच्या वेळात हृदय आणि रक्तवाहिन्या आपली झीज भरून काढणे आणि शरीरात आवश्यक ठिकाणी नव्या रक्तवाहिन्यांची निर्मिती अशी कामे करत असतात.
परंतु रात्रीचे जागरण किंवा अपूर्ण झोप यामुळे हृदयाला हे काम करता येत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयगती वाढणे, हृदयविकार आणि पक्षाघात अशा आजारांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. याचा अर्थ रात्रीची पुरेशी शांत झोप आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते.
४. नैराश्य येणे
निद्रानाश किंवा अपूर्ण झोप हे डिप्रेशनचे एक प्रमुख लक्षण आहे. डिप्रेशन किंवा नैराश्य हा एक प्रकारचा मानसिक आजार असून पुरेशी झोप झाली नाही तर तो बळावतो. झोप पूर्ण झाली नाही तर आधीपासून नैराश्यात असणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळे भास होणे, स्वभावात आक्रमकता वाढणे, मूड स्विंगज असे परिणाम जाणवतात.
म्हणूनच मानसिक आरोग्यासाठी देखील कमीत कमी सात ते आठ तासांची शांत झोप अतिशय आवश्यक असते.
५. वजन वाढणे
पुरेशी झोप झाली नाही तर शरीराला ऊर्जा कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे मेंदू ही कमी पडलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी जास्त अन्नाचे सेवन करण्याचे संदेश शरीराला देतो. त्यामुळे जागरण करणार्या व्यक्ती त्यांच्या नकळत जास्त प्रमाणात अन्नाचे सेवन करतात.
तसेच जागरणामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून अन्नपचन करणाऱ्या यंत्रणा आणि शरीरातील फॅट्सचे विघटन करणाऱ्या यंत्रणा त्यांचे काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत. या सर्व गोष्टींमुळे वजन वाढू लागते आणि वाढलेल्या वजनाचे वेगवेगळे दुष्परिणाम दिसू लागतात.
६. विसराळूपणा वाढणे
स्मरणशक्ती कमी होणे किंवा विसराळूपणा वाढणे हा अपुऱ्या झोपेचा एक मोठा दुष्परिणाम आहे. स्मरणशक्ती योग्य राहण्यासाठी तसेच वाढण्यासाठी मेंदूला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असते.
आपण झोपलेलो असताना मेंदूतील पेशी त्यांची झीज भरून काढून नव्या जोमाने काम करू लागतात. त्यामुळेच विद्यार्थीदशेत केलेला अभ्यास लक्षात राहावा म्हणून विद्यार्थ्यांना पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. सर्वच वयोगटातील व्यक्तींनी आपली स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
७. डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणे, दृष्टीवर परिणाम होणे
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे डोळ्यांवरील ताण देखील वाढतो. त्याचा आपल्या दृष्टीवर वाईट परिणाम होतो. डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या कमकुवत होणे, जवळच्या वस्तू, अक्षरे नीट स्पष्ट न दिसणे असे दुष्परिणाम जागरणामुळे होताना आढळून येतात.
तर हे आहेत निद्रानाश किंवा अपूर्ण झोपेमुळे आपल्या आरोग्यावर होणारे ७ वेगवेगळे दुष्परिणाम.
आपल्या आरोग्यावर असे दुष्परिणाम होऊ नये आणि रात्री वेळेवर झोप येऊन आपल्याला शांत किमान सात ते आठ तासांची झोप मिळावी यासाठी खालील उपाय फायदेशीर ठरतात.
चांगली झोप येण्यासाठीचे उपाय
१. झोपण्यापूर्वी शरीराला उत्तेजना मिळणारी पेये घेऊ नयेत
चहा, कॉफी, दारू, सिगरेट यासारख्या पदार्थांमुळे शरीराला आणि मेंदूला उत्तेजना मिळते. झोपण्यापूर्वी या पदार्थांचे सेवन केल्यास झोप उडून निद्रानाश होतो. असे होऊ नये म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन तास शरीराला उत्तेजना देणारे कोणतेही पेय पिऊ नये.
२. गॅजेट्स पासून लांब राहावे
आपणा सर्वांना झोपेपर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप पाहण्याची किंवा टीव्ही पाहण्याची सवय असते. परंतु स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रकाशामुळे आपल्या मेंदूला जागरुक राहण्याचा संदेश मिळतो आणि त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. हे होऊ नये म्हणून झोपण्यापूर्वी किमान ४५ मिनिटे ते १ तास मोबाईल लॅपटॉप आणि टीव्ही बंद करावा.
३. झोप आल्यावर ताबडतोब झोपावे
शरीराला झोपेची गरज निर्माण झाल्यावर शरीर तसा संदेश आपल्या मेंदूला देते आणि आपल्याला झोप येऊ लागते. परंतु आपल्यापैकी बहुतेक जण येणाऱ्या झोपेकडे दुर्लक्ष करून करत असलेले काम पुढे चालु ठेवतात. काही काळ गेल्यानंतर झोप येईनाशी होते आणि मग निद्रानाशाचा अनुभव येतो.
असे होऊ नये म्हणून सुरुवातीलाच झोप आल्याबरोबर लगेचच झोपावे. म्हणजे शरीराला आवश्यक असणारी विश्रांती आणि पुरेशी झोप मिळू शकेल.
४. झोपेची नियमित वेळ ठरवावी
दररोज एक ठराविक वेळ ठरवून त्याच वेळी झोपण्याची स्वतःला सवय लावून घ्यावी. असे केल्यामुळे विनाकारण जागरण न करता ठराविक वेळी झोपण्याची शरीराला सवय लागेल आणि शरीराची झोपेची गरज पूर्ण होईल.
दररोज झोपण्याची आणि उठण्याची एक ठराविक वेळ ठरवली आणि ती पाळली की आपल्या शरीराचे बॉडी क्लॉक योग्य प्रकारे चालते आणि शरीर निरोगी राहण्यास याची खूप मोठी मदत होते.
५. झोपण्याच्या खोलीतील तापमान योग्य असावे
खूप जास्त थंड अथवा खूप जास्त गरम तापमानात झोप येणे अशक्य आहे. शांत झोप येण्यासाठी खोलीतील तापमान योग्य असणे, खोलीत हवा खेळती असणे, योग्य प्रकारचे व्हेंटिलेशन असणे आणि खोलीत मंद दिवा चालू असणे या गोष्टी फायदेशीर ठरतात. असे केल्यामुळे कोणताही डिस्टर्बन्स न होता शांत झोप लागू शकते.
तर मित्र मैत्रिणींनो, हे आहेत साधे सोपे ५ उपाय ज्यांचा निद्रानाशावर खूप उपयोग होताना दिसतो.
जर तुम्ही निद्रानाशाचे किंवा अपूर्ण झोपेचे बळी ठरत असाल तर वरील उपायांचा वापर करून त्यावर मात करा आणि आपले आरोग्य सुधारा. तसेच या माहितीचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग व्हावा म्हणून हा लेख जरुर शेअर करा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.