RO फिल्टर वापरणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की घातक? आपल्यासाठी वॉटर फिल्टर कसा निवडावा? 👈 या लेखात बऱ्याच वाचकांचे पाणी उकळण्याबद्दल प्रश्न होते. पाणी उकळवणे जास्त चांगले का वॉटर प्युरिफायर वापरणे जास्त चांगले? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची पारंपारिक पद्धत म्हणजे पाणी उकळून घेणे. पाणी उकळून घेतल्यामुळे ते शुद्ध होते, त्यातील आरोग्याला हानिकारक असणारे विषाणू निघून जातात आणि ते पचायला देखील काही प्रमाणात हलके होते. त्यामुळे घरोघरी पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी उकळवून घेण्याचा लोकांचा कल असतो.
परंतु पूर्वापार चालत आलेली ही पद्धत योग्य आहे का? या पद्धतीला काही दुसरे पर्याय उपलब्ध आहेत का? याबाबतची सर्व सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम आपण पाणी उकळले की काय होते आणि ते नेमके कशा प्रकारे उकळावे ते जाणून घेऊया.
१. पाणी उकळले की त्यात असणारे सर्व घातक मायक्रो ऑरगॅनिझमस् नष्ट होतात जे एरवी पाणी नुसते गाळून घेतल्यामुळे जात नाहीत. पाणी उकळले गेले की वाढलेल्या तापमानामुळे हे मायक्रो ऑरगॅनिझम नष्ट होतात.
मात्र या मायक्रो ऑरगॅनिझमची पाण्यात पुन्हा वाढ होऊ नये म्हणून उकळलेले पाणी २४ तासात वापरून संपवणे आवश्यक असते. त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असे पाणी वापरू नये. म्हणजेच फक्त २४ तासांसाठी आवश्यक असणारे पाणीच एकावेळी उकळावे अन्यथा ते पाणी टाकून देण्याची वेळ येते आणि पाणी वाया जाते.
२. पाण्यात असणारे सर्व घातक मायक्रो ऑरगॅनिझम नष्ट होण्यासाठी पाणी कमीत कमी २० मिनिटे उकळले गेले पाहिजे. पाणी गरम होऊन नुसते बुडबुडे आले म्हणजे ते पाणी संपूर्णपणे शुद्ध झाले असे होत नाही. २० मिनिटे उकळलेले पाणी लगेच पिणे तर शक्य नसते.
अशावेळी ते पाणी गार करताना त्यात पुन्हा काही अशुद्धी मिसळल्या जाऊ नये याची काळजी घेणे फार आवश्यक असते. उकळलेले पाणी आणि गार करण्यासाठी ठेवताना वापरण्यात आलेली भांडी आणि वापरणाऱ्याचे हात अतिशय स्वच्छ असणे आवश्यक असते. अन्यथा उकळलेल्या पाण्यात काही अशुद्धी मिसळल्या जाऊन पाणी उकळण्याचा फायदा नाहीसा होतो.
३. पाणी उकळले की त्यातील ऑक्सिजन बुडबुड्यांच्या स्वरूपात वर येऊन पाण्यातून बाहेर पडतो. त्यामुळे उकळून गार केलेल्या पाण्याची चव नेहमीच्या पाण्यापेक्षा वेगळी लागते. तसेच पाण्यात जास्त प्रमाणात क्षार असतील तर असे पाणी उकळले तरीसुद्धा पुरेसा फायदा मिळत नाही.
४. पाणी २० मिनिटे उकळले तरी त्यातील क्लोरीन आणि लेड अशा केमिकल इम्पुरिटीज नाहीशा होत नाहीत. तसेच पाण्यात असणाऱ्या न विरघळलेल्या काही अशुद्धी नुसत्या फडक्याने गाळून गाळल्या जात नाहीत. त्यासाठी उत्तम प्रकारचे फिल्टरेशन आवश्यक असते.
५. परंतु हे मात्र खरे की पाणी २० मिनिटे उकळले तरी त्यातील शरीराला आवश्यक असणारे मिनरल्स नष्ट होत नाहीत. ते तसेच राहतात.
यावरून आपल्या असे लक्षात येते की पाणी उकळवून घेणे ह्या पारंपारिक पद्धतीचा काही अंशी फायदा असला तरी ही पद्धत वेळखाऊ असून पाणी शुद्ध करण्यासाठी संपूर्ण सुरक्षितता देऊ शकत नाही. उकळलेले पाणी जर अयोग्य रीतीने हाताळले गेले तर ते पुन्हा अशुद्ध होऊ शकते तसेच पाण्यातील इतर काही अशुद्धी तशाच राहू शकतात.
पाणी उकळून घेण्याचा आणखी एक उद्भवू शकणारा त्रास म्हणजे अपघात होणे. पाणी उकळले जात असताना ते अंगावर सांडून किंवा हातांवर पडून भाजले जाण्याच्या अनेक घटना घडतात.
याला पर्याय म्हणून बाजारात अनेक प्रकारचे रेडीमेड वॉटर प्युरिफायर आणि फिल्टर्स उपलब्ध आहेत. पाणी उकळल्यामुळे मिळणारी सुरक्षा तर ते देतातच शिवाय इतरही प्रकारे पाण्यातील अशुद्धी नष्ट करण्यास मदत करतात.
वॉटर प्युरिफायर किंवा फिल्टर नेमके कसे काम करतात?
१. पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र म्हणजे वॉटर प्युरिफायर. या यंत्राचा वापर केल्यास पाणी उकळून घेण्याची गरज उरत नाही.
२. पाणी उकळून आणि गाळून घेण्यापेक्षा वॉटर प्युरिफायर वापरणे हे अगदी सोपे, सुरक्षित आणि जास्त फायदेशीर आहे. वॉटर प्युरिफायर लवकर, कमी वेळात शुद्ध केलेले पाणी पुरवू शकतो. तसेच वॉटर प्युरिफायरचा वापर केल्यास अपघात होऊन इजा होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच.
३. वॉटर प्युरिफायर वापरुन शुद्ध केले गेलेले पाणी वापरल्यास बाटलीबंद पाणी पिण्याची गरज उरत नाही. पाण्यातील सर्व हार्मफुल इम्पुरिटीज नाहीशा होतात तसेच हे पाणी पचायला सोपे असून शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढवते असे सिद्ध झाले आहे.
४. वॉटर प्युरिफायरचे कार्बन फिल्टर असणारे, युव्ही ट्यूब असणारे आणि आर ओ फिल्टर असणारे असे तीन प्रकार असतात.
A) कार्बन फिल्टर असणाऱ्या वॉटर प्युरिफायरमधून पाणी चांगल्या प्रकारे गाळले जाऊन त्यातील सर्व अशुद्धी नष्ट होतात. आपल्याला होत असणाऱ्या पाण्याचा पुरवठा जर चांगल्या प्रतीचा असेल तर या पद्धतीचा वॉटर प्युरिफायर वापरणे पुरेसे असते.
B) युव्ही ट्यूब असणारे वॉटर प्युरिफायर वापरण्याची गरज अशा घरांमध्ये असते जिथे महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा थेट घरात होत नाही. आलेले पाणी आधी बिल्डींगच्या वर असणाऱ्या ओव्हर हेड टॅंक मध्ये साठवले जाते आणि तेथून घराघरात पाणीपुरवठा केला जातो. अशावेळी हे पाणी जास्त अशुद्ध झालेले असण्याची शक्यता असते. म्हणून असे पाणी यूव्ही ट्यूब असणाऱ्या वॉटर प्युरिफायरमधून शुद्ध करून घेणे आवश्यक बनते.
C) आर. ओ. फिल्टर असणारे वॉटर प्युरिफायर अशा घरांमध्ये वापरावे लागतात जिथे होणारा पाणीपुरवठा खूप जास्त प्रमाणात क्षार असणाऱ्या पाण्याचा असतो. उदाहरणार्थ बोरिंग वॉटर. बोरच्या साह्याने जमिनीतून काढलेले पाणी वापरावे लागत असेल तर त्यातील क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर ओ फिल्टर वापरण्याची आवश्यकता भासते.
पाण्याची शुद्धता कशी ठरते?
आपल्याला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची शुद्धता मोजण्यासाठी त्या पाण्याचे टीडीएस (टोटल डिजॉल्वड सॉलिडस्) तपासावे लागते. ह्यासाठी टी डी एस मीटर ह्या नावाचे एक यंत्र मिळते. ह्या यंत्राच्या सहाय्याने पाण्याचा टीडीएस मोजून त्यानुसार कोणत्या प्रकारचा वॉटर प्युरिफायर वापरणे आवश्यक आहे हे ठरवता येते.
निष्कर्ष
या सर्व माहितीवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की पारंपारिक पद्धतीने पाणी उकळवून घेण्यापेक्षा वॉटर प्युरिफायर वापरणे जास्त सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
जरी वॉटर प्युरिफायर खरेदी करताना काही रकमेची गुंतवणूक करावी लागली तरी त्यानंतर पाणी उकळण्यासाठी लागणाऱ्या गॅसची बचत झाल्यामुळे तो खर्च भरून निघू शकतो.
त्याचप्रमाणे वॉटर प्युरिफायरमधून विशेष काहीही कष्ट न करता सहजपणे उकळलेले शुद्ध पाणी वापरण्यासाठी मिळू शकते तसेच त्या पाण्यात शुद्धीकरणानंतर इतर काही अशुद्धी मिसळण्याची शक्यता अजिबात नसते.
याचा अर्थ असा की आपल्याला होत असणाऱ्या पाणीपुरवठ्याचे परीक्षण करून आपल्या घरी सूटेबल होईल आणि आवश्यक असेल असा वॉटर प्युरिफायर वापरणे जास्त फायदेशीर आहे.
मित्रांनो, तुमच्या घरी तुम्ही पाणी शुध्द करण्याची कोणती वापरता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
तसेच पाण्याच्या शुद्धीकरणाबाबतची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.