सोसायटीच्या गेटवर ती वृद्धा हातात काठी घेऊन उभी होती. गेटवरून उतार असलेल्या रस्त्यावर चालण्यात तिला अडचण येत होती. नेहमीप्रमाणे त्याला उशीरच झालेला. तो घाईघाइने गेटजवळ आला. तिने कसेनुसे हसत त्याला थांबविले. काही क्षण त्याच्या मनात एक चीड उमटली. दुसऱ्याच क्षणी तो थांबला तिचा हात धरून उतारावरून रस्त्यावर आणले. तिने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. मन भरून येणे म्हणजे काय ते त्याला त्याक्षणी कळले.
नेहमीसारखी विंडोसीट मिळाली त्याला. ताबडतोब खिश्यातून मोबाईल काढून कॅंडी क्रॅश खेळू लागला. बराच वेळ त्यातच गुंग होऊन गेला तो. अचानक त्याच्या लक्षात आले शेजारून कोणतरी मोबाईलमध्ये डोकावून बघतय. सहा वर्षाचा तो छोटू कुतूहलाने त्याचा गेम पाहत होता. डोळ्यात प्रचंड उत्सुकता आणि आनंद दिसत होता. क्षणात त्यांची नजरानजर झाली. त्याने सहज मोबाईल त्याच्या हाती दिला. डोळ्यात अविश्वास आणून छोटुने त्याच्या हातातून मोबाईल घेतला आणि त्याचा गेम पुढे चालू केला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो हसला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. आज पहिल्यांदाच बाहेरचा निसर्ग त्याला प्रिय वाटू लागला.
तो रात्री उशिरा घरी आला होता. सकाळीही लवकर उठून जायचे होते. सकाळी झोपेतच त्याच्या पाठीवर ओझे पडले आणि मागून बोबड्या आवाजात “चल मेरे घोडे टिक…टिक .. नाराजीनेच त्याने डोळे उघडून पाहिले सकाळी सहा वाजले होते. आईच्या कुशीत झोपलेले त्याचे पिलू जागे होऊन त्याच्या पाठीवर चालून घोडा घोडा करीत होते. तोही तसाच उठला घोड्यासारखा खिकाळला आणि त्याला तसेच पाठिवर घेऊन खोलीभर चक्कर मारली. पिलूचा तो हसरा चेहरा पाहून आपण काय कमावलाय याची जाणीव झाली.
तो आज लवकरच घरी आला. नेहमीप्रमाणे दर महिन्यात एकदा होणाऱ्या मीटिंगला जायचे होते त्याला. पैसे कमविण्यासाठी हे सर्व करावे लागतेच. गल्लीतच काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यांनी मारलेला चेंडू अचानक त्याच्या तोंडावर आला. इतक्या वर्षांच्या सरावाने त्याची आपोआप हालचाल झाली आणि चेंडू एक हातात सहज पकडून त्याने तितक्याच वेगात परत फेकलाही. त्याची चपळपणा पाहून मुले चकित झाली. काही न बोलता एकाने त्याच्या हातात बॅट दिली. नजरेतील इशारा ओळखून त्याने बॅटिंग करायला सुरुवात केली. हा हा म्हणता दोन तास कसे निघून गेले कळले नाही. मुलांच्या आनंदात त्याचा आनंद मिसळून गेला. खेळ संपल्यावर मुलांच्या दिशेने हात हलवीत घरी निघाला. आज मीटिंग बुडाल्याचे त्याला काहीच वाटले नाही.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.