दात घासण्याचे महत्व तर आपण सगळे जाणतोच.
दातांची, तोंडाची स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाची आहे हे काही नव्याने सांगायला नको.
अगदी लहानपणापासून ते आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. पण त्याचबरोबर जिभेची स्वच्छता देखील महत्वाची असते ह्याकडे मात्र आपले नकळत दुर्लक्ष होते.
आज आम्ही आपल्याला आपली जीभ स्वच्छ ठेवणे का महत्वाचे आहे आणि त्याचे आपल्या आरोग्याला नेमके कोणते चांगले फायदे होणार आहेत हे सविस्तरपणे सांगणार आहोत.
आपली जीभ स्वच्छ ठेवणे का महत्वाचे आहे?
चार-चौघात कधी एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीने, तुमच्या तोंडाला घाणेरडा वास येतो आहे असे तुम्हाला सांगितले आहे का?
किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना ही?
कोणी जर आपल्याला असे सांगितले तर अगदी कुठे तोंड लपवू असे होऊन जाते.
तोंडाला वाईट वास येण्याचा संबंध आपण सहजपणे दातांच्या स्वच्छतेशी जोडतो. परंतु केवळ दात स्वच्छ नसणे हेच तोंडाला वाईट वास येण्याचे कारण नाही.
जर आपली जीभ स्वच्छ नसेल तरी देखील आपल्या तोंडाला वाईट वास येऊ शकतो.
जिभेवर पांढरा थर जमा झालेला असणे हे तोंडाला वाईट वास येण्याला कारणीभूत तर ठरतेच, परंतु त्याशिवाय आरोग्याच्या दृष्टीने देखील ते हानीकारक आहे.
म्हणूनच आज आपण जीभ स्वच्छ ठेवण्याचे वेगवेगळे फायदे जाणून घेणार आहोत.
जीभ स्वच्छ ठेवण्याचे फायदे खालीलप्रमाणे
१. अन्नाची चव योग्यप्रकारे कळते.
दिवसातून दोनदा आपली जीभ स्वच्छ करण्यामुळे जिभेवरील आधी खाल्लेल्या अन्नाचे कण आणि वेगवेगळे बॅक्टेरिया निघून जातात.
असे केल्यामुळे जिभेवर असणारे टेस्ट बड्स जागृत राहतात आणि त्यामुळे खाल्लेल्या अन्नाची चव योग्यप्रकारे कळण्यास मदत होते.
जीभ स्वच्छ असेल तर कडू, खारट, तुरट, आंबट, तिखट आणि गोड या चवी योग्य प्रकारे कळतात.
२. तोंडातील बॅक्टीरिया नष्ट होतात.
खाणे झाल्यावर जर दात, तोंड आणि जीभ योग्य प्रकारे स्वच्छ केली नाही तर आपल्या तोंडात निरनिराळे बॅक्टीरिया निर्माण होतात.
जिभेवर असे बॅक्टीरिया जमा होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. आपण जर दिवसातून किमान २ वेळा आपली जीभ घासून स्वच्छ ठेवली तर असे बॅक्टीरिया निर्माण होत नाहीत किंवा झाले तरी लगेच नष्ट होतात.
यामुळे तोंडाला दुर्गंधी येण्याचा प्रॉब्लेम तर नाहीसा होतोच शिवाय शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जिभेवर असणाऱ्या मृत पेशी निघून जाण्यास देखील यामुळे मदत होते.
३. अन्नपचन सुधारते.
अन्नपचनाची प्रक्रिया आपल्या तोंडापासूनच सुरु होते. अन्न खाल्ले की तोंडात त्यामध्ये लाळ मिसळली जाते आणि अन्नाच्या पचनाची प्रक्रिया तिथूनच सुरू होते.
आपली जीभ जर स्वच्छ असेल, दिवसातून किमान दोन वेळा घासून आपण ती स्वच्छ ठेवत असू, तर अन्नाच्या पचनासाठी उपयोगी पडणारे एन्झाइम्स लाळेत भरपूर प्रमाणात निर्माण होतात.
याचा अन्नाचे योग्य प्रकारे पचन होऊन शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयोग होतो.
४. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
सकाळी उठल्यानंतर दात घासणे याबरोबरच जीभदेखील घासून स्वच्छ करण्यामुळे रात्रभरात तोंडात निर्माण झालेले टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
त्याच बरोबर दात आणि जीभ घासल्यामुळे अन्ननलिका आणि इतर अंतर्गत अवयव जागृत होण्यास मदत होते.
५. तोंडाला दुर्गंधी येण्याचे प्रमाण कमी होते तसेच दातांचे आरोग्य ही चांगले राखले जाते.
दररोज नियमित दोन वेळा जीभ घासून स्वच्छ करण्यामुळे जिभेवरील उरलेले अन्नाचे कण, वेगवेगळे विषाणू काढून टाकण्यास मदत होते.
असे करण्यामुळे तोंडाला दुर्गंधी येण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते त्याचप्रमाणे दातांचे आरोग्य देखील सांभाळले जाते.
दात किडणे, दात दुखणे किंवा हिरड्यांना सूज येणे अशा समस्या जिभेच्या स्वच्छतेमुळे कमी होतात.
६. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
दररोज किमान दोन वेळा जीभ घासून स्वच्छ ठेवण्यामुळे तोंडाचे आरोग्य उत्तम राखले जाते.
ओरल हायजीन म्हणजेच तोंडाची स्वच्छता चांगली असेल तर आपोआपच शरीराचे आरोग्य चांगले राहते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे सिद्ध झाले आहे.
तर हे आहेत आपली जीभ घासून स्वच्छ ठेवण्याचे सहा फायदे.
मित्र-मैत्रिणींनो, या लेखामुळे जीभेच्या स्वच्छतेचे महत्त्व तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल. आता दररोज दातांच्या स्वच्छतेबरोबरच जिभेची स्वच्छता करायला देखील विसरू नका.
जीभ स्वच्छ ठेवण्यासाठी विशिष्ठ प्रकारचे उपकरण बाजारात मिळते त्याचा वापर करता येईल.
तसेच बऱ्याच कंपन्या टुथब्रशच्या मागच्या बाजूला जीभ स्वच्छ करता येईल अशा प्रकारची रचना करून देतात. त्याचाही वापर करता येऊ शकतो. याचाच अर्थ जिभेची स्वच्छता राखणे हे काम अगदी कमी खर्चात आणि कमी श्रमात तसेच थोड्याशा वेळात होऊ शकते.
याबाबत तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्याचा फायदा सर्वांना मिळावा यासाठी हा लेख नक्की शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.