तुम्ही म्हणाल की, खिचडी तर काय आम्ही नेहेमीच करतो. त्यात विशेष असं काय आहे? पण तसे नाही, मुगाची खिचडी खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. कोणते ते जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
मुगाची खिचडी हा पदार्थ एक परिपूर्ण आहार म्हणून गणला जातो. भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागात खिचडी केली जाते आणि आवडीने खाल्ली ही जाते. लहान मुलांना शाळेत पोषण आहार म्हणून खिचडी दिली जाते.
सध्याच्या पावसाळ्याच्या कुंद वातावरणात गरमागरम खिचडी खाण्याची मजा काही औरच.
तर अशी ही स्वादिष्ट खिचडी अतिशय पौष्टिक देखील आहे. खिचडीचे आरोग्याला होणारे फायदे वाचून तुम्ही निश्चितच आश्चर्यचकित व्हाल.
आज आपण खिचडीचे फायदे तर जाणून घेणार आहोतच शिवाय इतकी पौष्टिक असणारी ही खिचडी नेमकी करायची तरी कशी हे सुद्धा जाणून घेणार आहोत.
खिचडी हा पदार्थ शाकाहारी लोकांसाठी तर वरदान आहेच, कारण ह्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि त्याचबरोबर वेगन (प्राणीजन्य पदार्थ न खाणारे लोक) लोकांसाठी सुद्धा खिचडी अतिशय योग्य आणि परिपूर्ण आहार आहे.
खिचडी सहसा तांदूळ आणि डाळ एकत्र करून केली जाते. त्यात मसाल्याचे प्रमाण कमी असते आणि खिचडी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज पचणारी आणि खाण्यास सोपी अशी असते.
मात्र लहानपणापासून बरेच वेळा आजारी पडल्यावर खिचडी खाल्ल्यामुळे नकळत आपल्या मनाने खिचडीची सांगड आजारपणाशी घातलेली असते. खरेतर पचायला हलकी आणि पौष्टिक असल्यामुळे आजारपणात खिचडी खायला दिली जाते. अन्यथा ते काही फक्त आजारपणात खायचे अन्न नव्हे.
योग्य प्रकारे शिजवलेली खिचडी अतिशय पौष्टिक असते आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वादिष्ट देखील असते.
या खिचडीचे आरोग्याला होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
१. परिपूर्ण आणि पोषक आहार
खिचडी हे केवळ तांदूळ आणि कुठलीही डाळ यांचे मिश्रण नसून खिचडी मध्ये अतिशय योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स, डायटरी फायबर, कॅल्शिअम आणि फॉस्फरस असते.
खिचडीचे पोषणमूल्य आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या देखील घालता येऊ शकतात.
त्यामुळे खिचडी हे अतिशय परिपूर्ण आणि पोषक असे वन डिश मील आहे. जेवणात फक्त खिचडी असली तरीही आपल्या शरीराच्या अन्नाच्या सर्व गरजा त्यातून भागवल्या जाऊ शकतात.
२. पचायला हलकी
खिचडी मध्ये फार जास्त प्रमाणात मसाल्याचा वापर केलेला नसतो. तसेच तिखटाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे खिचडी पचायला अतिशय हलकी असते.
अगदी तान्ह्या बाळापासून ते वयस्कर, वृद्ध किंवा आजारी लोकांपर्यंत कोणालाही खिचडी सहजपणे पचू शकते.
याच कारणामुळे तान्ह्या बाळांना भरवला जाणारा पहिला घन आहार खिचडीच असते.
३. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.
आयुर्वेदात सांगितलेले कफ, पित्त आणि वात दोष खिचडीच्या सेवनाने नियंत्रणात राहू शकतात. तसेच खिचडीचे योग्यप्रकारे पचन झाल्यामुळे शरीरातील एनर्जीचे प्रमाण वाढते, शरीराची प्रतिकार शक्ती वाढते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते.
४. ग्लुटेन फ्री आहार
अलीकडे अनेक लोकांना पदार्थांमधील ग्लूटेनची ऍलर्जी असल्याचे दिसून येते. गहू आणि तत्सम धान्यामध्ये आढळणारे ग्लूटेन तांदूळ आणि डाळीत मात्र नसते. त्यामुळे अशी ऍलर्जी असणारे लोक सुद्धा बिनधास्त खिचडी खाऊ शकतात.
ग्लूटेनची एलर्जी असणाऱ्या लोकांसाठी खिचडी हे वन डिश मील म्हणजे वरदानच आहे.
५. हृदयाचे आरोग्य आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
खिचडी मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे शरीराला ताकद मिळून त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याच प्रमाणे खिचडीमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखले जाऊ शकते.
अशी ही अतिशय पौष्टिक असणारे खिचडी नेमकी करायची तरी कशी?
आज आपण पौष्टीक अशा मुगाच्या खिचडीची करण्याची अगदी सोपी आणि चांगली रेसिपी जाणून घेऊया..
मुगाच्या डाळीची खिचडी
साहित्य
अर्धी वाटी मुगाची डाळ ( आवडीप्रमाणे सालासह अथवा पिवळी डाळ घेऊ शकतो)
- अर्धी वाटी तांदूळ
- एक कांदा बारीक चिरलेला
- एक टोमॅटो बारीक चिरलेला
- अर्धा इंच आले बारीक चिरून
- दोन मिरच्या बारिक चिरून
- फोडणीचे साहित्य
- तेल अथवा तूप
- शिजवण्यासाठी पाणी
कृती
सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. अर्ध्या तासाने ते पाणी काढुन टाका.
तांदूळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवून का ठेवावे, याचे कारण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
एका प्रेशर कुकर मध्ये तेल अथवा तूप घालून ते गरम झाल्यावर जिरे घाला. जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून तो चांगला परतून घ्या.
नंतर त्यात टोमॅटो, आलं आणि मिरचीचे तुकडे घाला. थोडी हळद आणि हिंग घालून सर्व पदार्थ चांगले परतून घ्या.
टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ घाला. डाळ आणि तांदूळ चांगले परतून त्यामध्ये, चवीनुसार मीठ घालून साडेतीन ते चार कप पाणी घाला. प्रेशर कुकरचे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करा.
आपली खिचडी तयार आहे. गरमागरम खिचडी सर्व्ह करताना त्यावर तूप घाला. तसेच दही आणि सॅलड बरोबर खायला द्या.
या खिचडीचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी आपण त्यात आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या जसे की गाजर, मटार फ्लॉवर इत्यादी घालू शकतो. तसेच मूग डाळ वापरण्याबरोबरच तूर डाळ, उडीद डाळ किंवा मसूर डाळ वापरुन सुद्धा खिचडी करता येते. डाळ वापरताना काही आजार असल्यास त्यासाठी ची पथ्य विचारात घ्या, म्हणजे खिचडी तुमच्यासाठी पूर्णान्न ठरेल.
तर अशी ही स्वादिष्ट आणि पौष्टिक खिचडी आणि त्याचे फायदे.
तुम्ही तुमच्या घरी नेमकी कशा पद्धतीने खिचडी करता ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.
तसेच साध्या वाटणाऱ्या पण अतिशय पौष्टिक असणाऱ्या या खिचडीचे महत्व सगळ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून हा लेख नक्की शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.