आयुष्य हे सुखद सुंदर असावं असं सोनेरी स्वप्न प्रेत्येकाचंच असतं. पण असं सोनेरी स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण होत नाही किंवा ज्यांना पूर्ण होतं त्यांचंही ते इतक्या सहजतेने पूर्ण झालेलं नसतंच. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात.
प्रत्येक सुंदर कलाकृतीमागे जसे खुप मेहनत व समर्पण लागते तसेच, सुखी आयुष्यासाठी अनेक कटुगोड अनुभवाचा प्रवास करावा लागतो. यश-अपयशाच्या पायऱ्या चढत, अनेक दुःख संकटांचा सामना करत आयुष्य घडत जाते.
अशावेळी काही अनुभव नकोसे वाटतात पण ते गरजेचे असतात. कठीण परिस्थितिला तोंड देतच तुम्ही अधिक कणखर बनू शकता.
स्वप्नं पूर्ण करायची, आयुष्यात यशस्वी व्हायचं तर खडतर मार्गाने जाणं, कष्ट घेणं, कडू आठवणी पचवणं हे तर आलंच!!
मग हा प्रवास सुंदर करण्यासाठी आपण स्वतः मध्ये काही बदल तर केले पाहिजेच ना!!
तर आता बघा आयुष्य सोपं, सुंदर करण्यासाठी ७ सूत्रं
१) सकारात्मक विचारांची सुरुवात
आपण आपल्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीला किंवा दूरच्या नातेसंबंधातील कुणाला सहज म्हणून प्रश्न विचारला की ‘कसं चाललंय’? तर त्याच्या उत्तरातुन कधी-कधी त्रस्त असल्याची भावना प्रकर्षाने जाणवते. किंवा ‘मजेत चाललंय’ असे जरी म्हटले तरीही खरंच तसे असेल असं नाही.
प्रत्येक जण एका साचेबद्ध रुटीन मध्ये अडकलेला आहे. नोकरदार व्यक्ती सततचे काम, वरिष्ठांचा जाच, घरच्या कटकटी या सगळ्यामध्ये गुंतून जातो.
अडचणी, ‘हेक्टिक शेड्युल’ हा जर आपल्या रोजच्या जीवनाचाच भाग बनला आहे, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आपण दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने केली तर?
उदाहरणार्थ आपण विचार करूया की ‘आज कामं भरपूर आहेत, पण सगळी कामे उत्तमरीत्या वेळेत पूर्ण होतील.’ असे जर विश्वासाने तुम्ही स्वतःला सांगितले तर तसेच होईल. कारण प्रत्येक काम हे एक जबाबदारी नसून आपण ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी व प्रगतीसाठी करतोय हे तुम्ही तुमच्या अंतर्मनाला पटवून दिलेले असेल. जर सुरुवात सकारात्मक असेल तर शेवटही सकारात्मक होईल.
२) प्रयत्न करणे गरजेचे
आयुष्यात मोठी स्वप्ने बघावी हे आपल्याला माहीत आहे. पण स्वप्ने ही केवळ बघायची नाही तर पूर्ण करायची असतात.
लहानपणी शाळेत ‘तुला कोण व्हायला आवडेल?’ या प्रश्नाचे फार रंजक उत्तर प्रत्येकाने दिलेले असते. परंतु मोठे होता होता ती स्वप्ने आपण विसरतो.
हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी काही ध्येयवेडी माणसं ती पूर्ण करतात व बाकीचे अडकतात ‘अरे संसार संसार….’ मध्ये.
स्वप्न अपूर्ण राहण्याचे कारण आपण जोखीम घ्यायला तयार नसतो. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी तितका वेळ दयावा लागतो, परिश्रम करावे लागतात. त्याशिवाय शून्यातून विश्व निर्माण करता येत नाही.
एखाद्याला जर सायकलने भारत भ्रमण करायची इच्छा असेल, तर त्याआधी त्याला सायकलिंगचा सराव करावा लागेल.
सगळ्या मार्गांचा, तिथल्या भौतिक परिस्थितीचा अभ्यास करून मग हे साध्य होईल. म्हणजे स्वप्ने तत्काळ पूर्ण होत नाही, त्यासाठी भरपूर वेळ लागतो, गरज असते ती संयमाची!
३) सर्वकाही मिळणार नाही याची जाणीव
‘परिपूर्ण’ असं काहीच नसतं. रिक्तता ही असतेच. परिपूर्णतेचा अट्टहास करणेच मुळात चुकीचे आहे. काही बाबतीत जे आहे, जसे आहे तसे स्वीकारायला शिकले पाहिजे.
‘जिथे चणे आहेत तिथे दात नाहीत, व दात आहेत तिथे चणे नाहीत’ ही म्हण सुपरीचीत आहे. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपण एकत्र मिळवू शकत नाही, हे वास्तव आहे.
आपण एखादी इच्छा मनात धरली, आणि पूर्ण न झाल्यास आपण म्हणतो ‘जे झाले ते चांगले झाले, यातून काहीतरी चांगलेच होईल’. म्हणजे आलेल्या परिस्थितीला सामोरे जायला आपण स्वतःला तयार करतो.
संघर्ष कशासाठी करायचा व कुठे लवचीकतेने परिस्थितीला स्वीकारायचं यातील निवड आपल्याला करता आली की प्रश्न सुटतात.
थोडक्यात जे महत्वाचे आहे त्यावर जास्त लक्ष दयावे व कमी महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
४) ‘नकारात्मक कल्पनाशक्ती’ एक शत्रू
माणसाचे मन हे कायम अस्थिर असते. कायम चंचल. एक विचार, मग दुसरा विचार, त्यावरून तिसरा मग काळजी, भीती हे चक्र सुरूच राहते. मनाच्या या अशा चल-बिचलतेचे कारण काय?… तर आपली कल्पनाशक्ती.
कल्पनाशक्ती जर चांगल्याप्रकारे व कल्पकतेने वापरली तर ठीक परंतु ‘नकारात्मक कल्पनाशक्ती’ मात्र निष्कारण भीती व काळजी वाढवण्याचे काम करते.
एखाद्याशी असलेल्या चांगल्या नातेसंबंधात दुरावा येत असेल तर त्याचे कारण आपल्या मनातील कल्पनाशक्ती आहे का याचा नक्की एकदा विचार करून बघा.
यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण ‘समोरची व्यक्ती अशी वागू शकते याची मी कल्पनाच केली नव्हती’ असे आपण म्हणतो म्हणजे ती व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही, म्हणून आपल्याला त्रास झाला, वास्तविक ती जसे वागायचे तशी वागली, पण आपण आधी तिच्याबद्दल जे विचार केले ते पूर्ण न झाल्याने अपेक्षाभंगाचे दुःख झाले.
दुसरे म्हणजे एखादे किचकट काम आपल्याला करायचे असेल तर त्याच्या केवळ कल्पनेने आपल्याला कंटाळा येतो. वास्तविक ते काम हे आपल्या कंटाळवाण्या कल्पनेपेक्षा अधिक आनंददायी नक्कीच असू शकते.
म्हणूनच या शक्तीचा योग्य वापर करणे आपल्याला फायदेशीर ठरते.
५) सगळेकाही मर्यादित आहे
एखाद्या व्यक्तीला भटकंती करायला आवडते म्हणून तो जगातील सर्वच पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे खायला आवडणाऱ्या खवय्याला सगळीच व्यंजने चाखता येणार नाहीत.
आपल्याला इच्छित असलेले सगळेच आपण करू शकत नाही कारण इच्छा अमर्याद असल्या तरीही आपल्याला भरपूर मर्यादा असतात.
आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीचे निधन होणे ही एक परिस्थिती आहे, ज्यामध्ये आपण कमालीच्या मर्यादेनी बांधल्या गेलो आहोत.
भौतिक मर्यादे बाहेर जाऊन आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहचू शकत नाही, म्हणून कालांतराने आपण आहे त्या परिस्थितीला स्वीकारतो.
त्या व्यक्तिशिवाय जगणे शिकतो आणि हीच एक नवी सुरुवात असते. म्हणून मृत्यू ही पण एक सुरुवातच आहे.
६) सगळेच विश्वासार्ह नाही
विश्वासार्ह म्हणजे ज्याच्यावर आपल्याला डोळे झाकपणे विश्वास ठेवता येईल किंवा जो कधीही आपला विश्वास तोडणार नाही असे आपल्याला वाटते तो. पण असे किती लोकं आपल्या आयुष्यात असतात?
विश्वास हा सदृढ नातेसंबंधाचा पाया आहे. एकमेकांमध्ये प्रेम व विश्वास असेल तर ते नातं दीर्घकाळ टिकतं.
कुण्या एका व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला पण त्यानुसार जर त्याची वागणूक नसेल तर साहजिकच त्याच्याबद्दल आपल्या मनात घृणा किंवा राग निर्माण होऊ शकतो.
पण एका कुणाकडून विश्वासभंग झाला म्हणून सर्वांना त्याच नजरेतून बघणे चुकीचे ठरेल.
काही माणसे आपल्याला धडा शिकवायलाच जणू आयुष्यात येतात. अशा व्यक्ती तोवर आपल्यासोबत राहतात जोवर त्यांची काही उद्दीष्टे आपल्याकडून साध्य होतात.
एकदा त्यांना हवे ते मिळाले की ती स्वतःहून निघून जातात. म्हणून आपण हे ओळखणे गरजेचे आहे की आपले कोण?
आपल्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी घेणाऱ्या, आपला आदर करणाऱ्या व्यक्तींशी आपण अधिक घनिष्ट नाते निर्माण करू शकतो जे दोघांनाही आनंददायी असेल.
७) स्वतःची खरी ओळख निर्माण करा
आपण कोण आहोत? म्हणजे इतरांसाठी आपण कसे आहोत ही आपली खरी ओळख निश्चितच नाही. आपण कसे राहतो, कसे कपडे परिधान करतो ही केवळ बाह्यरूपाची ओळख झाली.
पण आपण मनातून कसे आहोत याची जाणीव आपल्या स्वतःला असते.
आपल्यात असणाऱ्या उणीवा, आपल्या मनातील भीती, भावनिक काळजी हे सगळं म्हणजे आपण आहोत, याची जाणीव इतरांना झाली तर कदाचित त्यांना आपण आवडणार नाही.
पण इतरांसाठी आपण स्वतःची प्रतिकृती वेगळी दर्शवू शकत नाही. आपण जे आहोत, जसे आहोत तसेच आपण स्वतःला स्वीकारायला पाहिजे. इतरांशी तुलना करत बसण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करणे अधिक चांगले.
एकंदरित काय, आयुष्यातील ह्या काही अशा गोष्टी आहेत ज्याचा अवलंब करून आपण अधिक चांगले आणि सोपे आयुष्य जगू शकतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.