मसाला हा शब्द उच्चारला तरी आपल्या नजरेसमोर रूचकर पदार्थ उभे रहातात.
जर हे मसाल्याचे पदार्थ नसते तर जेवणाला चव कशी आली असती? यांच्या नुसत्या आठवणीनेच भुकेची जाणीव होते.
खमंग फोडणीचा गंध किचनमधून थेट आपल्या नाकापर्यंत येऊन भिडतो आणि भूक खवळून उठते.
पाककृतींमध्ये मसाल्याचं स्थान वादातीत आहे. विविध प्रांतातील वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ जेवणाची लज्जत वाढवतात. याचबरोबर या मसाल्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
विविध आजारांमध्ये प्राथमिक स्वरूपाचे उपचार करण्यासाठी यांचा उत्तम उपयोग होतो.
आजीबाईच्या बटव्यातील वनस्पतींसारखाच या मसाल्यांचा पूर्वापार वापर केला जातो आहे.
प्रत्येक स्वयंपाक घरातील मिसळणीचा डबा ही एक जादुची पोतडीच जणू!!!
घराघरातील अन्नपूर्णा आपले कौशल्य वापरून यातून चविष्ट, पौष्टिक पदार्थ बनवतात. हा मिसळणीचा डबा उघडला की मसाल्यांचा खमंग सुवास मन अगदी प्रसन्न करून टाकतो.
मोहरी, जिरे, लवंग, मिरे, वेलची, दालचिनी, तमालपत्र हे आपल्या भारतीय किचनमध्ये आवर्जून आढळणारे मसाले. याशिवाय प्रत्येक प्रांताची स्वतःची अशी एक खासियत असतेच.
आपल्या जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या मसाल्यांची खासियत काय ते आता पुढे पाहू
ठसकेबाज मिरची
अगदी मिरचीचं उदाहरण घेतलं, तर भारतात अनेक प्रजाती आढळतात.
यात रंगापासून ते तिखटपणा पर्यंत एवढं वैविध्य आहे की यावर एक प्रबंध लिहिता येईल!!!
काश्मीरी मिरची तिखट कमी पण पदार्थाला सुरेख लालभडक रंग देणारी, तर लवंगी मिरची तिखटजाळ!!!
हिरवी मिरची भाज्या, कोशिंबीर यांची चव वाढवते. पण एवढाच या मिरचीचा उपयोग नाही तर हिरव्या मिरची मध्ये व्हिटॅमिन C असते.
यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यात असलेले कॅप्सिसिन जेवढे जास्त तेवढी मिरची तिखट!!!
पण कॅप्सिसिन मुळे शरीराचे तापमान नियंत्रित केले जाते. म्हणून उष्ण हवामानात रहाणाऱ्या लोकांच्या आहारात हिरव्या मिरचीचे प्रमाण जास्त असते.
हिचे इतर गुणधर्म म्हणजे रक्ताभिसरण सुधारणे, सायनस, सर्दी यात उपयोगी, वेदनाशामक, डोळे आणि त्वचा यांच्यासाठी उपयुक्त पण अल्सर, पित्त विकार असलेल्या व्यक्तींनी मात्र जपून वापर करावा.
लाल मिरची पावडर स्वरूपात वापरली जाते. यात इतर मसाल्याचे जिन्नस मिसळून भाजका मसाला बनवतात. याचे प्रमाण मात्र प्रत्येक कुटुंबाचे आपापल्या आवडीनुसार, परंपरेनुसार ठरलेले असते.
कोकणी मालवणी मसाला, कोल्हापुरी, नागपुरी असा प्रांतवार चवीत आणि तिखटपणात फरक पडत जातो.
आजकाल तयार मसाले वापरले जात असले तरी साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी हे मसाले घरीच बनवले जात होते. उन्हाळ्याच्या दिवसात लाल मिरच्या आणून अंगणात कडकडीत उन्हात वाळवणे, मिरच्यांचे देठ काढून निवडणे मग डंकावर नेऊन दळून आणणे आणि खमंग दरवळ असलेला हा मसाला हवाबंद डब्यात, बरणीत भरून ठेवला की गृहीणीची वर्षभराची बेगमी तयार असायची.
ही सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायची असल्याने शेजारणी एकमेकींच्या मदतीला जात असत. एक सोहळाच असायचा म्हणा ना !!!
अजूनही खेड्यात घरगुती मसाला बनवतात पण शहरांमधून जागेअभावी आणि वेळ नसल्याने विकतचा मसाला बहुतांशी आणला जातो.
सोनसळी हळद
हळदी शिवाय आपले किचन अपूर्ण आहे. रक्तशुद्धी, जखमेवर लावण्यासाठी, जंतुनाशक, त्वचेचा रंग, पोत सुधारणारी, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हळद खूप उपयोगी आहे.
कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर हळदीचा उपयोग होतो हे समजल्यावर हळदीचे पेटंट घेण्यासाठी किती चढाओढ चालली होती हे आपण पाहिलेच आहे. धार्मिक कार्यात हळद वापरतात. लग्नसमारंभात हळद लावणे हा मोठा कार्यक्रम असतो. यावरून हळद सौंदर्य वाढवते हे सिद्ध होते. पी हळद नि हो गोरी अशी म्हण आहे. याचा संबंध हळदीच्या रक्तशुद्धी करण्याशी आहे. चिमूटभर हळद एखाद्या पदार्थाचा कायापालट करते. वरणात हळद नसेल तर … कल्पना सुद्धा करता येत नाही!!!
लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र
लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र हे पदार्थाला एक विशिष्ट सुगंध देतात आणि चव वाढवतात. त्यामुळे पुलाव, बिर्याणी यामध्ये आवर्जून वापरले जातात. मांसाहारी पदार्थ पचायला जड असतात.
मांस शिजवताना त्यात मसाले वापरले की चव वाढते, मांसाचा उग्रपणा कमी होऊन ते पचायला हलके होते.
आयुर्वेदानुसार या मसाल्यांचा औषधी उपयोग सांगितला आहे. लवंग दाढदुखीवर आणि तोंडाच्या दुर्गंधी वर उपयुक्त आहे.
म्हणून भोजनानंतर जो विडा देतात त्यात लवंग असते.
मिरी उत्तम पाचक आहे. तोंडाला चव नसणे, भूक न लागणे, अपचन यात गुणकारी आहे.
त्रिकटु म्हणजे सुंठ, मिरे आणि पिंपळी यापासून बनवलेले औषध चूर्ण स्वरूपात वापरतात.
दीपन, पाचन कार्य करणारे मिरी भारतात खूप जास्त प्रमाणात पिकते. पांढरे आणि काळे असे मिरीचे दोन प्रकार आहेत. किनारपट्टीवरील भागात माडाच्या झाडावर आंतरपीक म्हणून मिरी लागवड केली जाते.
याचप्रमाणे दालचिनी आणि तमालपत्र हे वजन कमी करण्यासाठी वापरतात. दालचिनीचे संस्कृत नाव आहे ‘त्वक’ म्हणजे त्वचा. जायफळाच्या झाडाची साल म्हणजे दालचिनी.
कफ, खोकला, सूज येणे या अवस्थेत काढा करताना त्यात दालचिनी घातले तर छान उपयोग होतो.
डायबिटीस कंट्रोल साठी दालचिनी वापरतात. लवंगाप्रमाणेच दालचिनीचे तेल दंतरोगात प्रभावी आहे. संधीवात आणि हाडांच्या दुखण्यावर सुद्धा उपयुक्त आहे.
तमालपत्र हे सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, डायबिटीस, अजीर्ण यात वापरले असता उत्तम उपयोग होतो.
मसाल्यांच्या या गटामध्ये उडनशील, सुगंधी तेल असते. यांचा अरोमा खूप आकर्षक असल्याने जगभरात यांना भरपूर मागणी आहे.
वेलची, जायफळ हे जरी मसाले वर्गातील असले तरी गोड पदार्थ बनवताना न विसरता वापरले जातात.
खीर, पुरणपोळी म्हटलं की यांच्या घमघमाटानं जिभेला पाणी सुटतंच!!!
कॉफीची लज्जत वाढवण्यासाठी सुद्धा यांचा वापर होतो. ताज्या जायफळापासून चविष्ट लोणचे बनवतात.
विविध प्रकारचे हर्बल टी बनवताना त्यात हे मसाले वापरतात.
धणे आणि जिरे
धणे आणि जिरे हे खास करून उष्णतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी वापरावेत. युरीन इन्फेक्शन, जळजळ तसेच उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी खूप उपयोगी आहेत.
आयुर्वेदामध्ये धणे, जिरे वापरून हिम, फाण्ट अशी गारवा निर्माण करणारी पेयं बनवली जातात.
ओवा
ओवा तर पोटदुखी, गॅस यासाठी रामबाण उपाय. लहान मुलांना ओव्याची पुरचुंडी करून पोटावर शेक देतात.
सर्दी,पडसे झाले की ओवा गरम करून तो नाकाजवळ धरून हुंगावा.
बेसनाच्या पदार्थांमुळे पोटात वात होऊ नये म्हणून त्यात ओवा घालतात. ओव्याच्या पानांची रुचकर भजी औषधी गुणांनी युक्त अशी आहे.
मेथी
मेथी म्हणजे तर आरोग्याची खाणच!!! डायबिटीस, pcos यात वजन नियंत्रणात आणण्यासाठी मेथी वापरतात. मेथी हाडांना मजबूत बनवते.
चरबी नियंत्रित करते. इडली, डोस्याच्या पिठात फरमेंटेशन साठी मेथीदाणे टाकतात. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मेथीचा आहारात जरूर वापर करावा.
बाळंतपणानंतर मेथीची खीर, मेथीचे लाडू असे पदार्थ खाल्ल्याने कंबरदुखी कमी होते.
नागकेसर, खसखस
नागकेसर, खसखस हे देखील सुगंध वाढविण्यासाठी वापरतात. पण यांचा वापर अगदी कमी प्रमाणात करावा.
कारण हे तीक्ष्ण गुणाचे पदार्थ आहेत आणि यांचा अतिवापर नुकसानकारक होऊ शकतो.
खसखस म्हणजे अफूचे बीज. याचा वापर वेदनाशामक तसेच झोप न येणे यासाठी करतात. नागकेसर मासिक पाळीचे आजार, पोटात वेदना होणे यासाठी अतिशय गुणकारी आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्येसुद्धा याचा वापर करतात.
नागकेसर आणि वेलची यांचा उचकी थांबवण्यासाठी खूप उपयोग होतो.
बादयान, चक्रीफूल
बादयान, चक्रीफूल, मसाला वेलची यांचा पण सुगंध आणि स्वाद खूप छान असतो.
आता पाहूया ताजे मसाले
वरील सर्व सुक्या मसाल्यांप्रमाणेच ओले किंवा ताजे मसाले म्हणजे आले, लसूण, कढीपत्ता.
आलं आणि लसणाची ताजी, कोवळी पात चटणी, कोशिंबीर यांची चव वाढवते.
याशिवाय उष्ण गुणात्मक असल्याने कफ, वाताचे विकार यात प्रभावी आहेत.
आलेपाक, आल्याचे पाचक असे ताजे मसाले अपचन, अरुची नाहीशी करतात.
लसूण वेदनाशामक आहे. हृदयासाठी आरोग्यदायक आहे. सांधेदुखी कमी करते. पण उष्ण असल्याने अतिरेक टाळावा.
कढीपत्ता म्हणजे तर बहुपयोगी पदार्थ. यात folic acid, iron असल्याने शरीरातील रक्त वाढवतो. केसांसाठी उपयोगी आहे.
कोंडा, केसगळती यावर खूप छान उपयोग होतो. कढीपत्त्याची चटणी हृदयरोगावर गुणकारी आहे.
यात कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C असल्यामुळे यकृताचे कार्य सुधारते,
लठ्ठपणा कमी होतो, डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
आमटी, भाजी, सांबार, चटणी याला कढीपत्त्याची फोडणी दिली की खमंग वास दरवळतो. विशेषत: दक्षिण भारतातील घराघरात रोज कढीपत्ता भरपूर प्रमाणात वापरतात.
हेच दाक्षिणात्य स्त्रियांच्या लांबसडक, चमकदार केसांचे रहस्य असेल का?
आपण रोजच्या वापरातील हिरवी मिरची, कढीपत्ता, ओवा, पुदीना, कोथिंबीर, आलं, लसूण अगदी सहजपणे अंगणात किंवा बाल्कनीतही उगवू शकतो.
असं किचन गार्डन मनाला खूप आनंद देतं. आणि हे आपल्या हाताने पिकवलेलं, ताजं, केमिकल मुक्त, हिरवंगार वैभवच जणू!!!
मसाला लागवड एक व्यावसायिक संधी
व्यावसायिक दृष्ट्या मसाल्याची लागवड करणे हा पर्यटनपूरक व्यवसाय आहे.
केरळमध्ये अशी अनेक स्पाईस गार्डन्स आहेत. पर्यटक इथे भेट देतात, माहिती घेतात आणि भरपूर खरेदी करतात.
भारत सरकार तर्फे सुगंधी वनस्पती आणि आयुर्वेदिक वनस्पती यांची नर्सरी, लागवड, देखभाल, खरेदी विक्री यांचे प्रशिक्षण दिले जाते.
हा व्यवसाय करण्यासाठी सबसिडी दिली जाते. कृषिविद्यापिठे आणि सरकार यासाठी अनेक योजना राबवताना दिसतात.
भारतीय मसाल्यांचा दरवळ आता फक्त किचन पुरता मर्यादित राहिला नाही तर क्षितिजापलीकडल्या संधी उपलब्ध आहेत.
मसाल्यांबद्दलचे ज्ञान हा आपला पारंपारिक ठेवा, traditional wisdom आहे.
आपण त्याचे प्राणपणाने रक्षण केले पाहिजे. नवीन काळानुसार प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित documentation करणे गरजेचे आहे.
म्हणजे दुसरे कोणीही आपल्या ज्ञानावर हक्क सांगू शकणार नाही. पुढच्या पिढीला या अनमोल खजिन्याची माहिती देणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
यापुढे मसाल्यांचा वापर करताना युक्तीने करा आणि शरीर निरोगी राखा!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.