गेल्या आठवड्यात भारताने एका नवीन टीम मध्ये प्रवेश केला. अर्थात राजकारण, पगडी, आंबे ते शिकंजी पासून योगा मध्ये बिझी असणाऱ्या लोकांना ह्या गोष्टीची कल्पना असणं तस थोड कठीणंच आहे. तर हि नवीन टीम ज्यात भारताने प्रवेश केला ती आहे अवकाशात पृथ्वी शोधणारे देश. येत्या काही वर्षात किंवा दशकात पृथ्वी वरील जागा आणि इथले उर्जेचे साठे संपत जाणार आहेत व तोवर नवीन जागेची पहाणी अनेक देशांनी सुरु केली आहे. आता ह्या शोधात भारताने हि आपली पावले टाकायला सुरवात केली आहे. सामान्य माणसासाठी मोठी गोष्ट नसली तरी अशीच छोटी पावले उद्याचं भविष्य घडवत असतात. म्हणूनच पुढल्या विश्वाच्या संशोधनात आपला काही भाग आणि सहभाग असणार ह्याची चुणूक ह्या निमित्ताने बघयला मिळाली आहे.
भारतातील फिजिकल रिसर्च प्रयोगशाळा, अहमदाबाद इथल्या वैज्ञानिकांनी शनी पेक्षा लहान पण नेपच्यून पेक्षा मोठ्या एका ग्रहाचा शोध लावला आहे ह्याचं नाव आहे के २ – २३६ बी. पृथ्वीच्या २७ पट वस्तुमान आणि ६ पट त्रिज्या असणारा हा ग्रह सूर्यासारख्या के २ -२३६ ताऱ्याच्या भोवती फिरत असून अंदाजे ६०० प्रकाशवर्ष आपल्यापासून लांब आहे. ह्या ताऱ्याचा शोध नासा च्या केपलर दुर्बिणीने लावला होता व ह्याच्या भोवती ग्रह असण्याची शक्यता वर्तवली होती. भारतीय वैज्ञानिकांनी ह्या माहितीच्या आधारे आपल्या PRL Advance Radial-velocity Abu-Sky Search’ or PARAS ह्या माउंट आबू इकडे असणाऱ्या दुर्बिणीच्या साह्याने जवळपास १.५ वर्ष स्पेक्ट्रोग्राफ चा अभ्यास केला. त्यातून त्या ग्रहावर असणारं वातावरण तसेच एकूणच ग्रहाची रचना ह्याबद्दल आपल्याला कळलं. ह्या ग्रहावरचं तपमान ६०० डिग्री सेंटीग्रेड असून ६०%-७०% वस्तुमान हे सिलीकेट, लोखंड, बर्फ ह्यांनी बनलेलं आहे. इतक्या दुरून ग्रहाची रचना ओळखणं हे प्रचंड कठीण समजले जाते. ह्यावर मानवी वस्ती अशक्य असली तरी इतक्या लांबून ग्रहाचा अभ्यास करून त्याच्या रचनेचा केलेला अभ्यास भारताला एका नवीन टीम चा सदस्य करून गेला आहे. आजवर विश्वातील फक्त २३ अश्या सिस्टीम मधील ग्रहांच्या रचनेबद्दल आपल्याला माहिती आहे. ह्यावरून भारतीय संशोधकांनी केलेलं संशोधन किती महत्वाचं आहे हे कळून येते.
नासा ने २००९ मध्ये केपलर दुर्बीण अवकाशात सोडली ती एक्सोप्लानेट शोधण्यासाठी. ह्या दुर्बीणीचं मुख्य काम होत ते म्हणजे पृथ्वीसारखे दुसरे ग्रह शोधण्याचं. आपल्याला जर अवकाशात अजून कुठे वस्ती करायची असेल तर आपल्याला पृथ्वी सारखाचं ग्रह लागणार. ज्या गोष्टी तिकडे वस्ती साठी लागणार त्यात प्रामुख्याने वातावरण, तपमान आणि गुरुत्वाकर्षण. ह्या गोष्टी पृथ्वीवर का आहेत तर त्याला प्रामुख्याने कारण आहे ते पृथ्वी च सूर्यापासून असलेलं अंतर. आपल्या ताऱ्यापासून जास्ती जवळ तर जास्ती तापमान आणि जास्ती लांब तर कमीत कमी तापमान ह्या दोन्ही गोष्टींमध्ये कोणताही सजीव तग धरून राहणं तसं कठीणच पण पृथ्वीच सूर्यापासून असलेलं अंतर ह्या दोन्ही टोकामधील गोष्टी मध्यावर आणते. त्यामुळे सजीवांना पोषक असं तपमान पृथ्वीवर निर्माण झालं आहे.
जर अजून कुठे ह्या विश्वात दुसरी पृथ्वी असेल तर अश्याच एखाद्या ग्रहासारखी असली पाहिजे आणि ती सूर्यासारख्या ताऱ्याच्याभोवती परिक्रमा करत असली पाहिजे. त्यासाठी नासाची केपलर दुर्बीण हि पृथ्वीसारख्या हॅबिटायटल झोन मध्ये असणाऱ्या ग्रहांचा शोध घेते. तर अश्याच अनेक ताऱ्यांच्या भोवती फिरणारे ग्रह आणि त्यांची कक्षा केपलर ज्या पद्धतीने शोधते ते खूप महत्वाचं आहे. ताऱ्यांभोवती समजा ग्रह परिक्रमा करत आहेत आणि आपण लांबून कुठून तरी त्यांना बघत असू तर त्याचं अस्तित्व कळून येणं अशक्य आहे. एकतर त्यांचा आकार कमी असेल ताऱ्यांच्या मानाने आणि ताऱ्यांच्या प्रकाशात त्याचं अस्तित्व दिसून येणं शक्य नाही. पण जो प्रकाश ताऱ्यांकडून आपल्याकडे येतो तो मात्र आपल्याशी बोलतो. तर जेव्हा ताऱ्या समोरून कोणताही लहान मोठा ग्रह जातो. तेव्हा ताऱ्याकडून येणारा प्रकाश अंधुक होतो. ते अंधुक होणं किती असेल हे त्या ग्रहाच्या आकारावर अवलंबून आहे. तसेच ते किती वेळानी होते ह्यावरून आपण त्या ताऱ्याभोवती तो ग्रह फिरण्याचा अंदाज लावू शकतो. समजा आपण आपल्याच सौरमालेकडे लांबून बघितल तर जेव्हा गुरु ग्रह सूर्यासमोरून जाईल तेव्हा सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशात २% घट होईल. हे कमी होणं पण विशिष्ठ वेळाने असेल ज्यावरून आपण गुरु ची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ठरवू शकतो.
अजून एक पद्धत जी एक्सोप्लानेट शोधण्यासाठी वापरली जाते तिला वोबली असं म्हणतात. वोबली म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी थोड बेसिक बघू. कोणत्याही वस्तूचं एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असते. जशी एखादी फुटपट्टी घेतली तर तिच्या मध्यावर जर आपण सपोर्ट केला तर आपण तिला तोलू शकू. हे शक्य होते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे. जेव्हा कोणत्याही दोन गोष्टी अवकाशात फिरत असतात तेव्हा त्यांच्या वस्तुमानाचा सुद्धा एक सेंटर अथवा मध्य असतो. हा मध्य त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. म्हणजे जी वस्तू वस्तुमानाने अधिक तिच्या जवळ हा मध्य जसं सूर्य आणि पृथ्वी ह्यांचा मध्य काढला तर तो सूर्याच्या आत सेंटर पासून जवळच असेल कारण सूर्याच्या मानाने पृथ्वीचं वस्तुमान खूप कमी आहे. पण हेच सूर्य आणि गुरु ह्यांचा मध्य सूर्याच्या थोड्या बाहेर आहे. कारण गुरु पृथ्वी पेक्षा ३१८ पट वस्तुमानाने जास्त आहे. ह्या मध्याला बॅरिसेंटर असं म्हणतात. तर ह्या गुणधर्मामुळे जेव्हा गुरु सारखा एखादा अजस्त्र ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो तेव्हा तारा त्या बॅरिसेंटर भोवती फिरतो. ह्यामुळे तारा स्थिर न वाटता वोबली म्हणजे मागे पुढे होत आहे अस वाटतं. जेव्हा तारा असा दिसतो तेव्हा आपण तर्क बांधू शकतो कि ह्याच्या आसपास एखादा मोठा ग्रह परिक्रमा करत आहे. पण ह्या पद्धतीत मोठे ग्रह आपण शोधू शकतो म्हणजे गुरु सारखे. पण पृथ्वी सारख्या ग्रहांच्या शोधात हि पद्धत तितकीशी उपयोगी पडत नाही. कारण वस्तुमानातील फरक हा खूप कमी वोबली मोशन निर्माण करतो जे खूप लांबून ओळखणे शक्य नसते.
भारतीय संशोधकांनी लावलेला शोध खूप महत्वाचा आहे. कारण गेल्या २० वर्षाच्या प्रवासात आपण ३२०० एक्सोप्लानेट शोधले आहेत. ह्यातील अजून नक्की न झालेल्या ग्रहांची संख्या विचारात घेतली तर हा आकडा ५६०० च्या पुढे जातो. हे फक्त काही आकाशगंगांच्या अभ्यासातून शोधलं आहे. जसे जसे तंत्रज्ञान अजून प्रगत होत आहे तसे ह्या माहितीत प्रचंड भर पडत आहे. अश्या ग्रहांच्या कक्षा त्याचं आकारमान जर पृथ्वी सारखं असेल तरी त्यावर असलेलं वातावरण शोधणं खूप महत्वाचं आहे. कारण त्याशिवाय आपल्याच सारख्या दुसऱ्या पृथ्वीचं अस्तित्व मिळणं अशक्य आहे. भारतीय वैज्ञानिकांनी ह्या कामात खारीचा वाटा उचलताना अश्याच एका ग्रहाच्या वातावरणाची माहिती मिळवली आहे. त्यासाठी एक भारतीय म्हणून त्यांचं अभिनंदन आणि अश्याच एका पृथ्वीच्या शोधासाठी त्यांना शुभेच्छ्या.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.