विदेशामधल्या एका मुलाखतीत, गुरुजींना एक प्रश्न विचारला गेला, ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ आणि ‘द सिक्रेट’ आजकाल खूप चर्चेत आहे, तेव्हा याबद्दल तुमचे मत काय आहे?
गुरुजींनी उत्तर दिले, ह्यात नवीन काहीच नाही, हजारो वर्षांपासुन ह्याचा वापर केला जातोय, आमच्याकडे ह्याला संकल्पशक्ती म्हण्टलंय, संकल्प म्हणजे तुम्ही एखादी इच्छा मनात धरा, आणि परमशक्तीला समर्पित करा, त्या शक्तीवर दृढ विश्वास ठेवा, की ती शक्ती तुम्हाला पाहीजे ते ईप्सित साध्य मिळवुन देण्यास मदत करणार आहे.
आणि तुम्हाला हवी ती गोष्ट नक्की मिळते!….
ह्यात अडथळाही आहे, तो म्हणजे विकल्प, हे होईल का नाही?, ते मिळेल का नाही?, ती शक्ती खरचं अस्तित्वात आहे का? ती मला हवे ते मिळवुन देईल का? असे वेगवेगळ्या प्रकारचे संशय हेच आपले सर्वात मोठे शत्रु आहेत.
बेंगलोरमध्ये असताना गुरुजींनी महेश योगींना शंकराचार्यांची गादी स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला, आणि स्वतः एक नवे सर्जन करण्याचे ठरवले, जेव्हा त्यांनी १९८१ मध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेची स्थापना केली, तेव्हा त्यांच्याजवळ कसलीच साधने नव्हती, जागा नव्हती, पैसा नव्हता, कोणाचा वरदहस्त नव्हता, होता तर फक्त विश्वास, मी लाखो-करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेन, हा विश्वास!… मी दु:खी कष्टी माणसांना जीवन जगण्याची कला शिकवेन, हा विश्वास!….. ध्यान, साधना, सेवा आणि सत्संग या मार्गाने मी लोकांना प्रभूच्या समीप घेऊन जाईन, हा विश्वास!……
आणि आजही ते ह्याच ध्येयाने प्रेरित होऊन रोज अठरा-एकोणीस तास काम करत आहेत.
त्यांनी त्यांच्या जीवनात लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा वापरला याचं एक उदाहरण आहे..
ते आणि त्यांचे सहकारी आश्रमासाठी एक जागा शोधत होते. तेव्हाच्या बेंगलोर शहरापासुन साठ सत्तर किलोमीटर दुर एक ओसाड रानमाळ होते, गुरुजी पहील्यांदा तिथे सर्वांना घेऊन जागा बघायला गेले, तेव्हा तिथे फक्त मोठमोठाले दगडं धोंडे होते.
गुरुजी काही मिनीटात तो डोंगर चढुन माथ्यावर पोहचले, त्या जागेला पाहुन गुरुजी हरखुन गेले होते, इतर लोक मात्र तितके समाधानी नव्हते, ते एक प्रकारचे गावाबाहेरचे जंगलच होते, तिथे कसलीच सुविधा नव्हती, ठिकठिकाणी अतिक्रमणे होती, इलेक्ट्रीसिटी नव्हती, तिथल्या लोकांना पाणी दुरवरुन आणावे लागायचे, भाज्या आणि धान्य अशा अत्यावश्यक गोष्टींसाठी सुद्धा पन्नास किमी दुर जावे लागायचे, पण गुरुजींनी ही जागा निवडली.
अठरा वर्ष गुरुजी तिथे एका झोपडीवजा कुटीर मध्ये राहीले. त्या काळात दोनशे लोकांचे शिबीर भरवले तर जागा अपुरी पडायची. इतका लहान आश्रम होता.
हळुहळु आश्रम मोठा होत गेला की आज एक लाख लोकांपेक्षा जास्त लोक तिथे आरामात राहु शकतात, ह्या आश्रमाचे आजचे रुप गुरुजींना तेव्हाच माहीत होते. त्या डोंगरावर पायवाटा कशा असतील. पायर्या कुठे असतील, रस्ते कशे असतील. इमारती कशी असतील, हे सर्व बारीकसारीक डिटेल त्यांना ठाऊक होते, अठरा वर्ष कुटीरामध्ये त्यांनी ध्यानात हे सर्व पाहीले होते, आणि म्हणुणच हा ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ प्रत्यक्षात उतरलाय!
जगभरातल्या कोट्यावधी आर्ट ऑफ लिविंगच्या साधकांसाठी, आज हा आश्रम म्हणजे पवित्र, पुण्यभूमी आहे.
शून्यातून उभा केलेला साडेपाचशे एकरचा आश्रम, ज्याच्या कुठल्याही फरशीवर देणगीदाराचे नाव नाही, असा आश्रम आहे हा!..
लॉ ऑफ अट्रेक्शन अजुन वेगळा काय असतो बरे?,
पण आर्ट ऑफ लिविंगचे एक टिचर सांगतात, नुसते व्हिजुअलायझेशन करुन फायदा नाही, त्यासाठी प्रत्यक्षात कृती करणे, तितकेच आवश्यक आहे.
‘श्री श्रीं’ चे मोठेपण म्हणा किंवा वेगळेपण, त्यांनी सुदर्शन क्रिया शिकवून लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधरवले. सत्संगातून त्यांना गायला, नाचायला शिकवले, प्रश्नोत्तरातून विज्ञान समजावले, सेवा करण्याच्या संधी देऊन, आत्मिक समाधान मिळवून दिले, ध्यानाचे वेगवेगळे प्रकार शिकवून मानसिक शांती मिळवून दिली. मी तुझाच आहे, हा दृढ विश्वास उभा करण्यात ते यशस्वी झाले. म्हणूनच की काय, लाखो लोक त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षले जातात, त्यांना तन-मन-धन देतात आणि त्यांचा जयजयकार ही करतात.
एका प्रवचनात गुरुजी सांगतात, जे तुम्हाला हवे आहे, ते तुमच्याकडे ऑलरेडी आहे, असे समजा, भगवंताला आणि आनंदाला शोधू नका, तो आहेच तुमच्यापाशी, त्याचा अनुभव घ्या!……. जे तुमच्यापाशी आहे, त्यात समाधानी आणि आनंदी राहा……लॉ ऑफ अट्रेक्शन अजुन वेगळा काय असतो बरे?
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.