सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: ओव्हेरीयन सिस्ट : कारणे, लक्षणे आणि उपाय | महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्ट | अंडाशय दुखणे | Cyst meaning in Marathi | ओव्हेरीयन सिस्ट म्हणजे काय
ओव्हरी म्हणजे अंडाशय हा स्त्रियांमधील प्रजनन संस्थेतील एक अवयव आहे. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना ओटीपोटात दोन ओव्हरी असतात.
ओव्हरीजमध्ये स्त्रीबीज तयार होते. त्याचप्रमाणे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स देखील तयार होतात.
ओव्हेरीयन सिस्ट हे नरम असून बंद थैली प्रमाणे दिसतात. त्यात एक तरल द्रवपदार्थ भरलेला असतो. हे सिस्ट ओव्हरीजमधे तयार होतात.
या सिस्ट लहान असतील तर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण मोठ्या आकाराच्या असतील तर खालील लक्षणे दिसतात.
1) पोटात व कंबरेत दुखणे. कधीकधी या वेदना पाठीपर्यंत जातात. हेच याचे मुख्य लक्षण आहे.
2) कंबरेचा घेर वाढणे.
3) पोटात सूज किंवा अपचन.
4) संडासला होताना वेदना.
5) लघवीला होताना दुखणे.
6) शारीरिक संबंधांच्या वेळी वेदना.
7) ओटीपोटात उजव्या किंवा डाव्या बाजूला वेदना.
8) उलटी आणि मळमळ.
ओव्हेरीयन सिस्टची अनेक कारणे तसेच विविध प्रकार आढळतात. उदा. चॉकलेट सिस्ट, फॉलिक्यूलर सिस्ट, डर्माइड सिस्ट आणि PCOD
ओव्हेरीयन सिस्ट सामान्यतः कॅन्सरस नसतात. यांचे निदान सोनोग्राफी किंवा योनीमार्गातून परीक्षण करून केले जाते. ओव्हेरीयन सिस्ट आहे का हे पहाण्यासाठी ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी म्हणजे योनीमार्गातून अल्ट्रासाऊंड तपासणी केली जाते.
जर याप्रकारची सिस्ट पोटात फुटली तर रक्तस्राव व वेदना होतात. तसेच गंभीर लक्षणे दिसून येतात.
ओव्हेरीयन सिस्टची कारणे व प्रकार
याचे बरेच प्रकार आहेत. उदा. डर्मोइड सिस्ट, एंडोमेट्रियोमा सिस्ट.
परंतु यात मुख्यत्वे दोन प्रकार आढळतात.
फॉलिकल सिस्ट व कॉर्पस ल्युटियम सिस्ट. यांना फंक्शनल सिस्ट असे म्हणतात.
१. फॉलिकल सिस्ट
मासिक पाळी दरम्यान छोट्या थैली सारखे जे स्त्रीबीज तयार होते त्याला फॉलिकल म्हणतात.
हे ओव्हरीजमध्ये असते. सामान्यपणे ही थैली फुटून स्त्रीबीज बाहेर पडते. पण जर का ही फुटली नाही तर द्रवपदार्थ युक्त सिस्ट तयार होते.
२. कॉर्पस ल्युटियम सिस्ट
स्त्रीबीज बाहेर पडल्यानंतर फॉलिकल नष्ट होते. पण जर असे झाले नाही तर त्यात अतिरिक्त द्रवपदार्थ साठत जाऊन कॉर्पस ल्युटियम सिस्ट तयार होते.
अन्य प्रकारच्या ओव्हेरीयन सिस्ट कोणत्या ते पाहूया
१. डर्मोइड सिस्ट
ओव्हरीजवर फॅटस्, टिश्यू व अन्य घटक यांपासून सिस्ट तयार होते.
२. सिस्टाडेनोमास
ओव्हरीच्या बाह्य आवरणावर तयार होणारी नॉन कॅन्सरस सिस्ट.
३. एंडोमेट्रियोमा
गर्भाशयाच्या आतील पेशी गर्भाशयाबाहेर वाढू लागतात. या ओव्हरीला चिकटतात व सिस्ट तयार होतात.
काही स्त्रियांना PCOS हा आजार असतो. यात ओव्हरी मधे मोठ्या प्रमाणात लहान आकाराचे सिस्ट तयार होतात. त्यामुळे ओव्हरीचा आकार वाढत जातो. यावर उपचार केले नाहीत तर गर्भधारणा होण्यास अडथळा येतो.
ओव्हेरीयन सिस्ट व PCOS यात कोणता फरक आहे?
ओव्हरीमधे भरपूर प्रमाणात फॉलिकल असणे म्हणजे PCOS. हा आजार शारीरिक मेटॅबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया बिघडल्याने होतो. हे फॉलिकल्स जरी अपायकारक नसले तरी यांच्यामुळे हार्मोन्सची पातळी बिघडते.
त्यामुळे अनियमित मासिक पाळी, स्थूलता, गर्भधारणा न होणे, केसगळती, शरीरावर दाट केस उगवणे, ऑयली स्कीन अशा अनेक समस्या निर्माण होतात. हा आजार तरुण मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.
ओव्हेरीयन सिस्टमधे तरल द्रवपदार्थ भरलेला असतो. या ओव्हरीच्या आत किंवा बाहेर असू शकतात. अनेक स्त्रियांना असा त्रास होतो.
पण यापासून विशेष काही अपाय होत नाही. या सिस्ट पाळीच्या वेळी किंवा गरोदरपणात होतात.
यासाठी औषधे घेण्याची गरज नसते. काही काळानंतर या आपोआप गायब होतात.
ओव्हेरीयन सिस्टची लक्षणे PCOS सारखीच असतात. याखेरीज यात हाय बीपी, पाठीच्या खालच्या भागात वेदना, ओटीपोटात दुखणे, मळमळ व पोटावर ताण जाणवणे अशी लक्षणे दिसतात.
ओव्हेरीयन सिस्टची लक्षणे
सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. पण जसजशी सिस्ट वाढत जाईल तशी खालील लक्षणे दिसतात.
1) पोटावर सूज किंवा पोट फुगते.
2) शौचाला होताना वेदना.
3) पाळीच्या वेळी किंवा आसपास ओटीपोटात दुखणे.
4) शारीरिक संबंधांच्या वेळी वेदना.
5) पाठीच्या खालच्या भागात किंवा मांड्या दुखणे.
6) स्तनांमध्ये जडपणा किंवा वेदना.
7) उलटी आणि मळमळ.
ओव्हेरीयन सिस्टची गंभीर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. यात तातडीने उपचार करण्याची गरज असते.
1) कटिभागात तीव्र वेदना
2) ताप
3) चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे
4) श्वास घ्यायला त्रास होणे
या लक्षणांवरून सिस्ट फुटणे किंवा तिला पीळ पडणे या शक्यता लक्षात येतात. यावर लगेच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होतात.
ओव्हेरीयन सिस्टपासून बचाव कसा करावा?
हा आजार रोखण्यासाठी आपण काही करु शकत नसलो तरी नियमितपणे तपासणी करणे आपल्या हातात आहे. त्यामुळे सिस्ट किती मोठी आहे हे समजते.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर खालीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.
1) पाळी अनियमित होणे
2 भूक न लागणे
3) कंबरदुखी
4) अकारण वजन कमी होणे
5) सतत पोट भरलेले वाटणे
वरील लक्षणे ओव्हरीच्या कॅन्सरची सुद्धा असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ओव्हेरीयन सिस्टचे परीक्षण कसे करतात?
नियमितपणे तपासणी केली तर याचे परीक्षण करणे सोपे जाते. अल्ट्रासाऊंड करुन सिस्ट आहे की नाही हे समजते.
यावरुन सिस्टचा आकार, रचना, स्थिती याबाबत अधिक माहिती समजते.
त्याचप्रमाणे सीटी स्कॅन, MRI इत्यादी चाचण्या केल्या जातात.
अधिकांश सिस्ट आपोआप नाहीसे होतात. त्यामुळे घाईघाईने ट्रिटमेंट सुरू करण्याची गरज नसते. डॉक्टर काही आठवड्यांनी पुन्हा
अल्ट्रासाऊंड टेस्ट करुन पहातात. जर सिस्टचा आकार वाढत असेल तर इतर काही टेस्ट करण्यात येतात.
१. प्रेग्नंसी टेस्ट
२. हार्मोन्स टेस्ट विशेषतः इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन
३. ओव्हेरीयन कॅन्सर साठी सीए – 125 ही ब्लड टेस्ट
ओव्हेरीयन सिस्टवरील उपचार
सिस्ट नाहीशी होत नसेल किंवा तिचा आकार वाढत असेल तर डॉक्टर सिस्ट काढून टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात.
गर्भनिरोधक गोळ्या
या गोळ्यांमुळे वारंवार होणारे सिस्ट तयार होणे बंद होते. या गोळ्यांमुळे ओव्हरीच्या कॅन्सरची शक्यता कमी होते. रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना याचा धोका जास्त असतो.
लेप्रोस्कोपी
गाठ लहान आकाराची असेल तर या प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. यात अगदी एक किंवा दोन टाके पडतात.
लेप्रोटॉमी
या प्रकारची शस्त्रक्रिया पोट उघडून केली जाते. मोठ्या आकाराच्या सिस्ट याप्रकारे काढतात.
कॅन्सरची शंका असेल तर याचवेळी बायोप्सी केली जाते. असा धोका असेल तर ओव्हरी व गर्भाशय काढून टाकण्यासाठी हिस्टरेक्टॉमी केली जाते.
ओव्हेरीयन सिस्टमुळे कोणती गुंतागुंत होऊ शकते?
काही वेळा तपासणी दरम्यान कॅन्सरयुक्त सिस्टीक अंडाशय असल्याचे समजते.
याशिवाय जर मोठ्या आकाराचे सिस्ट असेल तर त्याला पीळ पडतो आणि ओव्हरीला रक्तपुरवठा होत नाही. ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे मृत्यू येऊ शकतो.
यात इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागते. या अवस्थेला ovarian torsion असे म्हणतात. सिस्ट फुटली तर अंतर्गत रक्तस्त्राव व त्यात इन्फेक्शन झाले तर जंतुसंसर्ग होऊन पेशंट दगावण्याची शक्यता असते.
ओव्हेरीयन सिस्टमुळे होणाऱ्या वेदना कशा ओळखाल?
ज्या बाजूला सिस्ट असेल त्या बाजूला ओटीपोटात सूज, वेदना व ताण जाणवतो. या वेदना अचानक होतात. त्यांचे स्वरूप तीव्र किंवा कमी प्रमाणात देखील जाणवतात.
ओव्हेरीयन सिस्टमुळे होणाऱ्या वेदना वाढतात का?
जर सिस्ट मोठी असेल तर पोटात किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात. यामुळे हालचाल करण्यास त्रास होतो. जर सिस्ट फुटली तर गंभीर परिणाम होतात. अशावेळी तीव्र वेदना होतात.
उजव्या बाजूच्या ओव्हेरीयन सिस्टमुळे डाव्या बाजूला दुखणे शक्य आहे का?
ओव्हरी ओटीपोटात असून याच्या सिस्टमुळे नाभीच्या खालच्या भागात वेदना होतात. या वेदना तीव्र स्वरूपाच्या व जास्त काळ टिकून रहातात.
ऍक्यूट पेन तीव्र असून थोडा वेळ टिकतो.
क्रॉनिक पेन हळूहळू सुरु होतो व कित्येक महिने हे दुखणे सुरू रहाते. व्यायाम करणे अथवा मूत्रविसर्जन करताना या वेदना वाढतात.
काही वेळा या दुखण्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येतात. हालचाल करणे अवघड होते.
ओव्हेरीयन सिस्टवरील हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन सांगा.
लाईक व शेअर करून उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.