ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वीची. चीन मध्ये एक बौद्ध मठ होता. तिथे अनेक भिक्षू शिक्षण घेत होते. त्या मठाचे प्रमुख गुरु खूपच ज्ञानी आणि वयोवृद्ध होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ध्यानधारणा करत असत. जीवनातील अंतिम सत्य समजून घेण्यासाठी ते साधना करत होते.
एके दिवशी एक मुलगा त्या मठात आला. तो थेट गुरुंसमोर जाऊन उभा राहिला. आणि म्हणाला मला तुमचा शिष्य म्हणून इथे राहू द्या. मला जीवनातील सत्य शोधून काढायचे आहे. मी सत्याचा शोध घेत इथवर आलो आहे.
गुरुजी त्याला म्हणाले की सत्याचा शोध घ्यायचाय ना? मग तुझे संपूर्ण आयुष्य तुला यासाठी वाहून घ्यावे लागेल.
आणि एवढे करुनही तुला सत्याचा शोध लागेलच याची कोणतीही खात्री मी देऊ शकत नाही. एवढी वर्षे तपश्चर्या करायला तू तयार आहेस का?
तो मुलगा म्हणाला की माझी तयारी आहे. मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही.
गुरुजी म्हणाले की ठीक आहे. आता तू एक काम कर. या मठात पाचशे भिक्षू रहातात.
त्यांच्या भोजनासाठी तांदूळ कुटून तयार करावे लागतात. तू संपूर्ण दिवस हे काम कर.
जेव्हा तू थकून जाशील तेव्हा आराम कर. आणि पुन्हा उठून तेच तांदूळ कुटायचे काम सुरू कर. इतर कोणतेही काम तू करायचे नाहीस.
दुसरा कोणताही विचार सुद्धा करू नकोस. फक्त मी सांगितले आहे तेच करायचे. तू पुन्हा मला भेटायला देखील येऊ नकोस.
गरज लागेल तेव्हा मीच तुला भेटेन. आता तू तुझे काम सुरू कर.
गुरुंना वंदन करून तो मुलगा तिथून निघाला. थेट धान्याच्या कोठारात गेला व सरळ तांदूळ कुटण्याचे काम त्याने सुरू केले.
त्या मठात पाचशे भिक्षू शिक्षण घेत होते. त्यांना वेळोवेळी भोजन देण्यासाठी खूप जास्त प्रमाणात तांदूळ तयार ठेवावा लागत असे. त्यामुळे तो मुलगा भल्या पहाटे उठून आपले काम सुरू करायचा.
थेट रात्रीपर्यंत न थांबता तो तांदूळ कुटत रहायचा. तो आपलं काम एवढं मन लावून करायचा की आजूबाजूला त्याचं लक्षच नसायचं. दमून रात्री तो तिथेच झोपायचा आणि परत पहाटे आपल्या कामाला लागायचा.
तो कोणाशीच बोलत नसे, ना मठातील कोणी शिष्य त्याच्याशी बोलायला येत.
अशाप्रकारे काही महिने निघून गेले. तांदूळ कुटताना त्याच्या मनात पूर्वीच्या आठवणी येत. पण त्याचं इतर कुठेच लक्ष नसल्याने नवीन विचार त्याच्या डोक्यात आलेच नाहीत.
त्यामुळे हळूहळू त्याच्या मनात विचार येईनासे झाले. मन अगदी शांत, निर्विकार होत गेलं. काही वर्षांनंतर तर तो स्वतःचं नाव सुद्धा विसरून गेला.
तो अगदी शांतपणे पूर्ण एकाग्र होऊन आपलं काम करत होता. त्याने ना कधी ध्यानधारणा केली ना कुठल्या शास्त्राचा अभ्यास केला. दिवसभर एकच एक काम!!!
मठातील भिक्षू त्याची टिंगल करत. इतकंच काय तर त्याला मूर्ख समजत असत.
बघता बघता बारा वर्षे निघून गेली. एके दिवशी प्रमुख गुरुंनी घोषणा केली की आता माझं वय झालं आहे. त्यामुळे मी मठाचा उत्तराधिकारी निवडणार आहे.
माझ्यानंतर तोच या मठाचा प्रमुख गुरु म्हणून सर्व जबाबदारी पार पाडेल.
माझ्या ज्या शिष्याला आत्मसाक्षात्कार झाला असेल त्याने आज रात्री माझ्या दालनाजवळ यावे.
आणि तिथल्या भिंतीवर आपल्या जीवनात त्याने आजपर्यंत काय समजून घेतले ते लिहून ठेवावे. तेच त्याच्या जीवनाचे सार असेल.
अनेक शिष्य स्वतःला गुरुंचा उत्तराधिकारी होण्यास लायक समजत होते. पण एक शिष्य सर्वात जास्त वर्षे साधना करत होता.
त्याने सर्व धर्मग्रंथ तोंडपाठ केले होते. तो रात्री गुरुंच्या दालनाजवळ गेला. तिथल्या भिंतीवर त्याने काही ओळी लिहिल्या. त्याने लिहिले की मन म्हणजे एक आरसा आहे.
त्यावर विचार व इच्छा यांची धूळ जमा होते. ही धूळ साफ करण्यासाठीच ध्यानधारणा करावी लागते. आणि जी व्यक्ती मनावरची धूळ काढून टाकू शकते तिला मोक्ष प्राप्त होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गुरुंनी हे वाचले तेव्हा त्यांना भयंकर राग आला. कुठल्या मूर्खाने हा कचरा भिंतीवर टाकलाय?
असे त्यांनी विचारले. ज्याने हे लिहिले होते तो शिष्य काहीच बोलला नाही. त्याने लिहीलेले तत्त्वज्ञान बरोबर होते. पण ते सर्व पुस्तकी ज्ञान होते.
पण तो शिष्य खूपच चलाख होता. त्याने आपल्या लिखाणाखाली नाव मात्र लिहिले नव्हते.
आपण जे काही लिहिले आहे ते खरे की खोटे हे त्याला निश्चितपणे माहीत नव्हते. कारण त्याला आत्मसाक्षात्कार झालाच नव्हता.
गुरुंनी ते सर्व लिखाण पुसून टाकले. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मठात या एकाच विषयाची चर्चा सुरू झाली.
याच बाबतीत बोलत बोलत दोन शिष्य धान्याच्या कोठाराजवळून चालले होते. तिथे नेहमीप्रमाणे तो मुलगा तांदूळ कुटत होता. शिष्यांचे बोलणे ऐकून तो हसू लागला.
शिष्यांच्या मते तो अगदी मठ्ठ आणि निरक्षर होता.
कोणीही त्याला आजवर ध्यान किंवा शास्त्रपठण करताना पाहिले नव्हते. त्या मठात एकापेक्षा एक विद्वान होते. त्यांच्या तुलनेत हा मुलगा म्हणजे एक तुच्छ व्यक्ती होता.
त्याला हसताना पाहून त्यांनी कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला की गुरुंनी भिंतीवरील लिखाण म्हणजे कचरा आहे असे म्हटले ते अगदी योग्य आहे.
ते ऐकूनच मी हसत आहे. यावर ते शिष्य चकीत झाले. त्यांनी त्या मुलाला विचारले की तू यापेक्षा चांगलं लिहू शकतोस का?
तो मुलगा म्हणाला की मी तर निरक्षर आहे. मी काहीच लिहू शकत नाही. पण जर तुम्ही मला गुरुंच्या दालनाजवळ घेऊन गेलात तर मी काही ओळी नक्कीच सांगेन. तुम्ही त्या भिंतीवर लिहा.
दोघे शिष्य त्याला तिथे घेऊन गेले. तेव्हा तो मुलगा म्हणाला की मी सांगतो त्याप्रमाणे लिहा. त्या शिष्यांनी तो जे बोलला ते लिहीले. आणि खाली त्या मुलाचे नाव लिहीले, ‘तांदूळ कुटणारा मुलगा ‘.
त्याने सांगितलेली वाक्यं अद्भुत होती. ती वाक्यं नीट लक्षपूर्वक वाचा.
मन म्हणजे एक भ्रम आहे. मन नावाची कोणतीही गोष्ट नाही. मनाचा आरसा सुद्धा नाही. जर मनच अस्तित्वात नाही तर मग त्याच्यावर धूळ साठणे शक्यच नाही. हे ज्याला समजलं त्याला जीवनातील अंतिम सत्य समजले !!!
गुरुंनी जेव्हा हे वाचले तेव्हा मध्यरात्रीच ते त्या मुलाकडे गेले. तो शांतपणे झोपी गेला होता. गुरुंनी त्याला उठवले.
आपल्या हातातील दंड व वस्त्र त्याला दिली. ते म्हणाले की आजपासून माझा उत्तराधिकारी म्हणून तुझी नियुक्ती मी करत आहे.
पण तू या मठापासून दूर निघून जा. कारण इथे जे शिष्य आहेत ते स्वतः ला फार मोठे विद्वान समजतात.
ते एका साधारण तांदूळ कुटणाऱ्या मुलाचा मठाधिपती म्हणून स्विकार करणार नाहीत. ते तुला ठार मारतील.
तुला आत्मसाक्षात्कार झाला आहे याची मला खात्री आहे. आणि हे ज्ञान तू सहजपणे तांदूळ कुटता कुटता मिळवले आहेस.
जे ज्ञान मला मिळाले आहे ते सर्व आता तुझ्याकडे आले आहे. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे लोक तुझ्याजवळ येतील. कारण जेव्हा फूल उमलते तेव्हा त्याचा सुगंध लपून राहूच शकत नाही.
त्याने गुरुंचा आशीर्वाद घेतला व मध्यरात्रीच तिथून निघून गेला.
सारांश
आपण समजतो की ध्यान करणे म्हणजे एक विशेष प्रक्रिया आहे. त्यासाठी एकांतात डोळे मिटून तासनतास बसावे लागते. पण खरं तर असं काहीच नाहीय.
आपलं काम करता करता पण ध्यान करणं शक्य आहे. एवढंच काय तर चालताना सुद्धा आपण ध्यान करु शकतो.
खरं तर ध्यान म्हणजे आपण करत असलेल्या कामाशी एकरुप होऊन जाणे.
काम करत असताना तहानभूक विसरून जाणे म्हणजे ध्यान!!! अगदी तांदूळ कुटणाऱ्या मुलासारखेच.
तो आपल्या कामामध्ये इतका गढून गेला होता की त्याला स्वतः चा देखील विसर पडला. म्हणूनच त्याला आत्मसाक्षात्कार झाला.
बुद्धीझम नुसार ध्यान म्हणजे झेन !!!
झेनचा खरा अर्थ आहे प्रत्येक क्षणी वर्तमानात रहाणे.
इतर कसलाही विचार न करणे. कारण जर विचार असतील तरच मन आहे. विचारच नाहीसे झाले की मन उरतच नाही.
आणि मन नाहीसे झाले तरच तुम्ही स्वतःला ओळखू शकता. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात!!!
मित्रांनो, ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जे कोणतंही काम तुम्ही करता त्यात एवढे गुंग होऊन जा की तुम्हाला कसलेच भान रहाणार नाही. मग तुमचं कामच ध्यान होऊन जाईल.
झेन तत्त्वज्ञान सांगणारी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ?
कमेंट्स करुन जरुर सांगा.
गोष्ट आवडली तर लाईक व शेअर करायला विसरू नका.
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्रश्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Osm……..khup bhari👍✨
Very nice 👍✨