माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)

नमस्कार मित्रांनो, माणसं जोडणं, ही सगळ्यात मोठी कला आहे, म्हणून म्हणतात, सामान्य माणसं ‘वर्क’ करतात, असामान्य माणसं ‘नेटवर्क’ करता.

ह्याच विषयावर मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध लेखक-पटकथाकार शिवराज गोर्ले यांनी सुंदर पुस्तक लिहलं आणि आयुष्यभराच्या अनुभवाने जाणलेली, माणसं जोडण्यासाठी आवश्यक अशी, रहस्यमयी, तेहतीस सुत्रं शोधुन, सर्वांपुढे उघड केली.

याआधीच्या दोन भागात (पहिला भाग, दुसरा भाग) मी प्रत्येक लेखात दहा सुत्रांच रसग्रहण मांडलं होतं, त्याच शृंखलेतला हा तिसरा लेख!..

१) माफ करा, मन साफ करा!

रोजच्या जगण्यात असे अनेक प्रसंग घडतात, की कित्येकदा आपण दुखावलो जातो, कधी परक्यांकडुन, कधी आपल्याकडुनच, कधी आपली चुक नसताना, आपल्याला ऐकवलं जातं, वड्याचं तेल वांग्यावर निघतं!

एखाद्याला व्यवहारात आपण, जवळचं समजुन, आपल्या बिजनेस प्रिन्सीपलच्या चौकटी मोडुन, परीघाबाहेर जाऊन मदत करतो, आणि त्याचा गैरफायदा घेऊन आपली आर्थिक फसवणुक केली जाते, अशा वेळी जो मानसिक आणि आर्थिक असा दुहेरी घाव बसतो, तो सहजासहजी विसरता येत नाही,

ह्या सगळ्याचा मनाच्या आणि शरीराच्या स्वास्थ्यावरही परीणाम होतो.

अशा घटनांचा अतिरेक झाला की, कामावरचं लक्षच उडतं, मग ह्या असह्य करणार्‍या आठवणी कशा हाताळाव्यात? अशा लोकांना पुन्हा पुन्हा सामोरं कसं जावं?

ज्याचा राग आला असेल, त्याला शक्य असेल तर माफ करुन टाकावं आणि आपलं मन साफ करुन टाकावं!

लातुर मध्ये एक मोठी आसामी आहे, एका साखर कारखान्याचे मालक! २०१३ मध्ये मी त्यांच्यासाठी एक हॉस्पीटल डिझाईन केले, साईटवर फरशीवाल्याकडून कामचुकारपणा झाला, खरं तर तो कॉन्ट्रेक्टर त्यांच्याकडून अपॉईंट केलेला, पण माहीत नसताना साहेबांनी आपला तोफखाना आमच्यावर सुरु केला, खुप वाईट वाटले, पण मी स्वभावाप्रमाणे गप्प राहीलो!, “बडे बडे देशोमे…’ म्हणत त्यांना मनोमन माफ करुन टाकले, जास्त त्रास करुन घेतला नाही.

पुढे काही दिवसांनी त्यांच्या असिस्टंटने, साहेबांना सांगितले की फरशीवाल्याला आपणच अपॉईंट केले आहे, तेव्हा आर्किटेक्टचा त्यात काही दोष नाही आणि साहेबांनीही मोठ्या मनाने माझी माफी मागीतली, विषय संपला!

पुढे एक वर्षाने त्यांनी दहा हजार फुटाचे शेड बांधायला, डिझाईन आणि देखरेख करण्यासाठी, पुन्हा माझीच निवड केली, ज्या कामाची पुढे मला तीन लाख फिस मिळाली! आजही नवीन बांधकाम असलं की ते माझी आठवण काढतात.

मित्रांनो, मोकळ्या मनाने माफ केल्याने नाती जिवंत राहतात, मैत्रीचे दरवाजे किलकिले उघडे राहतात, मनं ताजी राहतात, संवादाला जागा शिल्लक राहते, मनं जुळण्याच्या अंधुक शक्यता उरतात, कधी कधी मला वाटतं, सर्वजण एकमेकांना, मोठ्या मनाने माफ करु लागतील, त्यादिवशी बहुतांश पोलीस स्टेशन, कोर्ट आणि वकीलांची ऑफीसं, ओस पडतील, जेलं आणि कारागृह रिकामी राहतील, कारण गुन्हेच कमी घडतील, एकमेकांना माफ करण्यात इतकी मोठी ताकत आहे!

याशिवाय आपलं मन, नितळ पाण्यासारखं, स्वच्छ आणि साफ राहतं, हा फायद वेगळाच!..

एरीस्टोटल सुद्धा म्हणतो, ‘टु फोर्गिव्ह ऑल इज टु अंडरस्टॅंड ऑल’!

२) अपमानाचा बदला मानानं घ्या!

अपमानाला, आपल्या सगळ्यांनाच कधीनाकधी सामोरं जावं लागतं.

माझ्या कॉलेजमधली एक आठवण आहे, सतरा अठरा वर्षांचा असताना, माझ्या फर्स्ट ईयरमध्ये माझं सबमिशन अपुरं होतं, मी डिझाईनमध्ये खुप वीक होतो, तेव्हा आमच्या डिझाईनच्या सरांनी, सगळ्या मुलामुलींसमोर मला खुप खुप रागवले, त्यांनी अक्षरशः माझे वाभाडे काढले, घरच्यांचा आणि ‘लातुर पॅटर्न’ चा उद्धार केला, तेव्हा त्या क्षणी मी तो अपमान, गुपचुप सहन केला, पण रात्रीची झोप उडाली, अन्नपाणी गोड लागेना, सारखे त्यांचे शब्द आठवायचे, पेटुन उठलो होतो मी!

मग मी स्वतःसाठीच चॅलेंज स्वीकारले, सेकंड इयरला वर्गात ‘पहीला’ येऊन दाखवीन, आणि रात्रंदिवस डीझाईनमध्ये गुंतवुन घेतले, हॉस्टेलवर सगळी मुलं खुप मजा करायची, मी रुममधुन बाहेर पडायचो नाही, झपाटल्यासारखे काम केले, आणि त्या सेमिस्टरमध्ये मी दुसरा आलो! सगळीकडे माझी, माझ्या कामाची चर्चा सुरु झाली, मी भरुन पावलो.

आजही हे सगळं आठवलं की उर भरुन येतो, कारण त्या दिवशी आयुष्यात पहील्यांदा मी स्वतःच्या नजरेत स्वतःसमोर सिद्ध केले होते.

महत्प्रयासाने, अपमानाचा बदला मी मानाने घेतला होता. पुढे अशाच जिद्दीने फायनल इयरला युनिव्हर्सीटीत पाचवा आलो. ह्याचं श्रेय त्या घडलेल्या प्रसंगालाच आहे.

३) टीकाकारांची दाद मिळवा!

आपण इतरांवर टीका करणं टाळतो, पण जेव्हा लोक आपल्यावर टीका करतात, तेव्हा आपण अस्वस्थ होणं साहजिक आहे, मग त्याला आनंदाने सामोरं कसं जायचं?

जर आपण खरचं चुक वागलो असु, तर ते मोठ्या मनाने मान्य करुन टाकायचे आणि मोकळे व्हायचे.

टीकाकाराला जिंकण्याचा हुकुमी उपाय म्हणजे त्याला, त्याच्या परखडपणाला दाद द्या, मोठ्या हिमतीने तो आपल्याला वास्तवाचं भान करुन देत आहे.

टीकेमधुन खुप काही शिकता येतं, स्वतःच्या गुण अवगुणांकडं त्रयस्थपणे पाहण्याची संधी भेटते, स्वतःमध्ये आवश्यक त्या सुधारणा करता येतात.

टीकेमुळे नाऊमेद होवु नका, आपली चुक नाही अशी खात्री असल्यास लोकांना वाटेल तसं बोलु दे, त्यांना आणि त्यांच्या मतांना, अनावश्यक महत्व देऊ नका.

४) मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे!

कधीकधी व्यावहारीक जगात कितीही समजुतदार असल्या तरी दोन व्यक्ती एकमेकांना खटकु लागतात, तेव्हा दुर होणं, आपली वेगळी वाट निवडणं, अपरीहार्य ठरतं, पण म्हणुन सगळे संबंध तोडूनच वेगळं व्हावं, असही नसतं, हसत खेळत, केलेल्या उपकाराची जाण ठेवुन, आभार मानत, वेगळं होता येतं! न पटणार्‍या गोष्टी आठवुन, कडाक्याचं भांडण करण्यापेक्षा, जुळणार्‍या गोष्टी आठवुन मैत्रीचा सोहळा करत, वेगळं होणं, कधीही चांगलं!..

चिमुकल्या आयुष्यात मोजकी घरं आणि त्यांची दार आपल्यासाठी सताड उघडी असतात, त्यातलं एक दार स्वतःहुन बंद करण्यात काय पुरुषार्थ! त्यापेक्षा आयुष्याभरात कधीही त्या दारावर जाण्याची संधी कायम ठेवावी!

५) इतिहास बदलु नये!

काळाच्या ओघात संबंध कितीही ताणले गेले असतील, बिघडलेही असतील, पण ते पुन्हा सुरळीतही होवु शकतात, व्यावहारीक पातळीवर तर नक्कीच नव्या संधी आल्यास, कडवटपणा विसरुन, पण एकमेकांचा मान राखुन, खुल्या दिलाने सहज एकत्र यावे!

आता दोघांनाही एकमेकांचा स्वभाव माहीत असतो, तेव्हा इतिहासातील घटनांमधुन बोध घेऊन, एकमेकाचा आदर राखावा.

संबंधामध्ये पुर्वीचा उत्साह नाही आला तरी जवळ आल्याने, एकत्र बसल्याने, हसुन खेळुन बोलल्याने, कटुता संपते, हेही काही कमी नाही!

६) पैशापेक्षा माणुस महत्वाचा!

पैशाला महत्व दिलेच पाहीजे पण त्यापुढे माणसाला ‘तुच्छ’ समजणे मात्र तितकेच चुक आहे, एडीसनने जेव्हा पहीला बल्ब बनवला, तेव्हा त्याच्या ऑफीसबॉयने तो उचलला पण आनंदाच्या भरात, चुकुन त्याच्या हाततुन सुटून तो फुटला, सर्वांना वाटले, एडीसन रागवेल, पण एडीसन शांत होता, लोकांनी त्याला विचारले, तुम्ही त्याला रागवले का नाही?

एडीसन म्हणाला, “बल्ब फुटला तर नवा बनवता येईल, माणसाचं मन तुटलं, तर कसं जोडता येईल?”

७) मैत्रीला जागलचं पाहीजे!

प्रकाश मेहरा आणि अमिताभच्या मैत्रीचा किस्सा व्हॉटसएपच्या जगात प्रसिद्ध आहे, अडचणीच्या वेळी धावुन येतो, तो खरा मित्र! अमिताभच्या करीअरला प्रकश मेहरांच्या जंजीरने तारले, आणि तेच प्रकाश मेहरा जेव्हा कर्जबाजारी झाले होते, तेव्हा केवळ एक रुपया मानधन घेऊन अमिताभने त्यांच्यासाठी शराबी चित्रपट केला, जो सुपरडुपर हीट ठरला.

इतिहासाची पुनुरावृत्ती बघा, हाच अब्जोपती अमिताभ दिवाळखोर झाला, लोक म्हणाले, अमिताभ संपला, त्याच्यासाठी खरेच कठिण दिवस होते ते, मिळेल ते काम तो करत होता, काम मागत निर्माता दिग्दर्शकांकडे चकरा मारत होता, तेव्हा त्याचा जिवलग मित्र यश चोप्राने, जुन्या मैत्रीला जागत, अमिताभला काम देण्यासाठी मुलाला सांगुन एक नवा चित्रपट बनवायला सांगीतला, तोच मोहबतें चित्रपट, ज्यात कडक हेडमास्तरची ‘शंकर नारायण’ ची मुख्य भुमिका अमिताभला देण्यात आली, अमिताभ-शाहरुखच्या जुगलबंदीने पिक्चर सुपरहीट झाला, अमिताभची घसरलेली आर्थिक गाडीही रुळावर आली, कदाचित अमिताभचे पुर्वीचे सत्कर्म कामाला आले.

चिमुकल्या आयुष्यात मोजकी घरं आणि त्यांची दार आपल्यासाठी सताड उघडी असतात, त्यातलं एक दार स्वतःहुन बंद करण्यात काय पुरुषार्थ! त्यापेक्षा आयुष्याभरात कधीही त्या दारावर जाण्याची संधी कायम ठेवावी!

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)”

  1. आमचा पन आयुष्यात हे क्षण होऊन गेलेत. खूप छान लिखाण आहे

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।