आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण (Ways of Happier Life)

नमस्कार, मनाचेTalks च्या वाचकांना प्रेमपूर्वक नमस्कार,

मित्रांनो, जास्तीत जास्त आनंदी जीवन कसे बनवावे (Happier Life), ह्या विषयी मी एक व्हाट्स एप कोर्स पूर्वी घेत असे ,

ह्यात बरेच सदस्य आपापल्या ग्रुपवर समस्या मांडतात.

आशीच एक समस्या आणि तिचे उत्तर, आज तुमच्यासोबत शेअर करत आहे!..

रत्नागिरीहुन प्रXXजी लिहतात…….

“सर, मी पतसंस्थेत नौकरी करतो, वय वर्ष – ४७ झालयं, पगार महीना १४०००/-, दुसरे कसलेही उत्पन्न नाही, नौकरीमध्ये भविष्याची कसलीही तरतुद नाही, त्याचं खुप टेन्शन येते, माझ्या पत्नीचं आणि मुलाचं काय होणार? याचंही टेन्शन येते, कमी उत्पन्नामुळे समाजात आणि कुटुंबात सन्मान मिळत नाही, हे एक दुःख आहेच,”

“आर्थिक परीस्थीती सुधरण्यासाठी काय करावे, याचं उत्तर मिळत नाही, माझ्या कामाला अर्प्रीसीएशन मिळत नाही, सतत ताण जाणवतो, आता या वयात कसं जमवु? हा प्रश्न जाणवतो, आणि ह्या ताणामुळे मधुमेह झालाय, २०१५ मध्ये एंजियोप्लास्टी झाली, काही सुचत नाही, काय करु?”

प्रXXजी, सर्वप्रथम तुमचे अभिनंदन आणि खुप खुप कौतुक, तुम्ही मनमोकळेपणाने, नेमक्या शब्दांत परिस्थिती सांगितली, प्रॉब्लेम असल्याचे मान्य केलेत, आणि यावर असणार्‍या उत्तराची अंमलबजावणी करायला तुम्ही उत्सुक आहात, इथचं तुम्ही पहीली लढाई जिंकलीत.

तुमचं आयुष्य आधिकाधिक आनंदी होण्यासाठी, मी काही सोप्या स्टेप्स तुम्हाला सांगणार आहे,

१) विसरा

“माझं वय, माझी उमेदीची वर्ष, माझी शक्ती, माझं आरोग्य, माझ्या जबाबदार्‍या,” ह्या शब्दापासुन सुरु होणारी वाक्ये आपल्या काळजात काळजीची भुयारं खोदतात.

बरं!, प्रचंड विचार करुन, टेंशन घेऊन काहीच साध्य होत नाही.

जी गोष्ट केल्याने प्रॉब्लेम सुटायला मदत होईल, अशी प्रत्येक गोष्ट करावी माणसाने.

नुसती चिंता करुन, खुप विचार करुन, उदास निराश बसुन, वेळप्रसंगी रडारड करुन, काडीचाही फायदा होत नसतो, “कसं होईल?” ह्या भीतीने फक्त आणि फक्त हृदय पोखरले जाते, परीस्थीती दिवसेंदिवस अजुन बिकट बनते, मन दुबळं बनतं.

तुम्हाला अधिकाधिक आर्थिक संपन्न बनायचे आहे? त्यासाठी तुम्हाला नवनव्या कल्पना हव्या आहेत? त्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सळसळता उत्साह हवा आहे? तुम्हाला तुमच्या आयुष्याला नवीन वळण द्यायचे आहे?

असं समजा, ही तुमची सेकंड इनिंग आहे, आता नव्या दमाने तुम्हाला पीचवर उतरायचे आहे, पहील्या इनिंगमध्ये मी समाधानकारक स्कोर करु शकलो नाही, मग खराब पीचमुळे असो वा अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे, आता काथ्याकुट करुन काय फरक पडतो?

गेलेल्या दिवसाला टाईम मशीनमध्ये जाऊन बदलता आले असते, तर भुतकाळाचा अति सुक्ष्मपणे विचार करण्याला, चुका शोधण्याला, अर्थ होता.

असे नाही, तसे केले असते, अशा कल्पनारंजनाला अर्थ होता.

पण दुर्दैवाने अशी टाईममशीन काही मोजक्या चित्रपटांमध्येच असते, खर्‍या आयुष्यात आस्तित्वात नसते.

त्यामुळे “काय घडले?” “का घडले?” “दोष कोणाचा?” “मी चुकलो,” “त्यांनी मला फसवले”, “त्यांनी माझा गैरफायदा घेतला,” “माझ्या वाट्याला हा भोग का आला?” हे सगळे प्रश्न फालतु आणि निरर्थक आहेत, असले आणि यासारखे, विचार आपली सर्जनशक्ती शोषुन घेतात.

घडून गेलेल्या घटनांवर आपण मनातल्या मनात इन्क्वायरी कमिशन बसवतो, स्वतःच स्वतःची उलटतपासणी करतो, यातुन एकतर आपण दोषी ठरतो किंवा दुसर्‍याला दोषी ठरवुन मोकळे होतो, असे केल्याने आत्मसन्मान खचतो किंवा इतरांवरचा विश्वास उडतो.

साध्य काहीच होत नाही, उर्जा वाया जाते.

तेव्हा मनात जन्मल्याबरोबर ह्या शत्रुंना ओळखा, चेचुन-ठेचुन काढा, त्यांच्यावर दहशत बसवा, त्यांना ठणकवा, माझ्या अनमोल मेंदुची जागा, तुमच्यासारख्या फडतुस विचारांना भाड्याने मिळणार नाही, चालते व्हा!..

एकदा आपल्या मेंदुच्या आणि मनाच्या सुपीक जमीनीतले ‘तण’ काढलेत की आता कल्पनाशक्तीचे नांगर वापरुन तिथे, तुम्हाला जे हवे आहे त्या चांगल्या विचारांची, भव्य दिव्य, मोठ्या, आनंदी, उत्साही आयुष्याची, समृद्ध स्वप्नांची पेरणी करा!

त्यासाठी त्रास देणार्‍या विषारी विचारांच्या मुळ्या नष्ट करा. भुतकाळ विसरा! असं समजा, रोज सकाळी आपण उठतो, तेव्हा एक नवा जन्म झाला आहे, मागची पाटी कोरी करा, मन कोरं करा, दिवसाला ताज्या दमानं सामोरे जा!

२) इतरांना तुमच्याविषयी काय वाटते, ह्याला काहीही महत्व देऊ नका!

तुम्हाला दुःख वाटते, आर्थिक परीस्थीतीमुळे, मला योग्य तो सन्मान मिळत नाही, माझ्या कामाची कदर केली जात नाही, “अजी, छोडो जी!”

“कुछ तो लोक कहेंगे,” लोक लई भारी असत्येत, ते श्रींमतांना माजलेले आहेत म्हणतात, गरीबांची मस्करी उडवतात, कष्टाळुंना बैल- मेहनत करतो म्हणतात, डोक्यानं पैसे कमवणार्‍याला ऐतखाऊ म्हणतात, महत्वकांक्षी लोकांना हाव-हाव करतो म्हणतात, समाधानी लोकांना अल्पसंतुष्ट आहे म्हणतात, संवेदनशील व्यक्तीला रडका आहे म्हणतात, भावनांवर नियंत्रण मिळवल्यास त्या व्यक्तीला पाषाणहृदयी म्हणतात, व्यवहारीक असल्यास पैसा पैसा करतो, म्हणतात, दया आणि कवण दाखवुन पैसे सोडल्यास मुर्ख आहे म्हणतात…..

मला सांगा, का महत्त्व द्यायचे अशा लोकांना, “लोकांच्या मताचा फुटबॉल बनायचे नाही, नाहीतर ते पायी चालु देत नाहीत आणि घोड्यावरही बसु देत नाहीत!”

३) तुमच्या आनंदाचं कारण तुम्ही स्वतः आहात, दुसरा कोणीही व्यक्ती तुम्हाला आनंद देऊ शकत नाही

आनंद कुठे लपलेला आहे, शोधा!

तासन्तास एखादं काम करण्यात तल्लीन होवुन जावं, ह्यात खरा आनंद आहे.

अवघड परिस्थिती असताना आपला सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स द्यावा, ह्यात तुडुंब आनंद भरलेला आहे.

आवडणार्‍या छानशा संगीतात रममाण व्हावं, हरवुन जावं, ह्यात आनंद आहे, सुर्योदय, सुर्यास्त, डोंगर, समुद्र, धबधबा, नदीकिनारा, हिरवागार निसर्ग ह्यांच्या निरीक्षणात, एकरुप होवुन जावं, ह्यात आनंद आहे.

एखाद्या दिवशी जोरजोरात म्युझीक लावावं, आणि वय, भान विसरुन, मनसोक्त नाचावं, ह्यात आनंद आहे.

शरीर थकवुन टाकेपर्यंत केलेली अंगमेहनत मग ते चालणं, असो वा व्यायाम, त्यानंतर शरीरात रिलीज झालेलं एंडॉर्फीन हार्मोन रिलीज होणं, म्हणजे आनंद आहे.

फक्त मनाजोगता पैसा नाही, उत्पन्न नाही, म्हणुन सतत दिवसरात्र दुःखी राहणं, स्वतःच्या मनाला छळणं, जीवनातला सगळा रस गेला असं समजणं, म्हणजे आपण स्वतः स्वतःवर अन्याय करुन घेणं, असंच नाही का?

याउलट आयुष्यात मिळालेली वरदानं शोधावीत, हक्काचं छप्पर, ठणठणीत आरोग्य, सोन्यासारखी पत्नी, आज्ञाधारक आणि जिगरबाज मुलंमुली, प्रेमळ मित्र, जिव्हाळ्याचे नातेवाईक, सुरक्षित समाज, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, चवदार अन्न, याबद्द्ल सतत आनंदी राहुन, हृदयात कृतज्ञतेची भावना उचंबळुन येईपर्यंत आभार मानावेत, जीवन समृद्ध आहे, तृप्त असं स्वतःच्या मनाला सतत बजावुन सांगावं!

मान्य आहे, सुरुवातीचे काही दिवस हे असं नाटक करावं लागतं, मग थोड्या दिवसांच्या नियमित सरावानंतर एक क्षण असा येतो, की आपोआपच तृप्ततेची अनुभुती येते.

कसलाही दुःखाचा डोंगर कोसळला तरी मी त्याला पुरुन उरेल, अशा आत्मविश्वासाने आयुष्याला सामोरं जावं!

४) दुसर्‍या व्यक्तीशी आपली तुलना करु नका, त्याने केलेल्या प्रवासाची तुम्हाला जराही कल्पना नाही.

आपल्या दुःखाचं अजुन एक कारण म्हणजे तुलना, असं माझ्याच वाट्याला का? हा प्रश्न म्हणजे इतर लोक माझ्यापेक्षा जास्त सुखी का? असाच प्रश्न! इथल्या प्रवासात प्रत्येकजण आपापली वाटचाल करतोय, जो तो आपापली चॅलेंजेस फेस करतोय!

५) खुप विचार करुन डोक्याला ताण देणं, थांबवा! प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालचं पाहीजे, असं नाही!

आयुष्यात काही प्रश्न अनुत्तरीत शिल्लक असले, तरी त्याचा त्रास करुन घेऊ नये, उलट शांत होवुन त्यांच्याकडे कुतुहलाने बघावं!

६) हसा! कारण सगळ्या जगाचे प्रॉब्लेम्स सोडवण्याचा ठेका तुम्ही एकट्याने घेण्याचे काहीच कारण नाही!

प्रत्येक दिवसाला प्रसन्न मुद्रेने सामोरे जावे, रोज सकाळी आपल्या खात्यात देवाने बहुमुल्य असे चोवीस तास म्हणजे शहाएंशी हजार चारशे सेकंद भरले, म्हणुन मनापासुन त्याचे आभार मानावे.

बारीकसारीक घटनांनी विचलित होऊन मनाला गढुळ होवु देऊ नये. नियमित ध्यान करावे, बिगर भांडवली धंदे शिकण्यात पुढाकार घ्यावा, माणसे जोडावीत, हृदयात इतरांसाठी जितका प्रेमाचा शुद्ध झरा प्रवाही असेल, तितका जास्त पैसा खिशात जमा होतो.

धंद्याचे तीन प्रकार असतात

पहीला प्रकार – भांडवलाचे धंदे – ज्यामध्ये पैसा पैशाला जन्म देतो, ह्यामध्ये फार काही न बोलताही, कमी श्रमात पैसे मिळतात.

दुसरा प्रकार – अंगभुत कौशल्याच्या बळावर धंदा – कलेच्या प्रांतात अद्वितीय असणारी लोकं, त्या मानाने इतरांपेक्षा अधिक झटपट श्रीमंत होतात, अभिनेते, गायक, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार, लेखक, राजकारणी नेता अशी आपल्याकडे उपजत असलेली कूठलीही कला यशाच्या शिखरावर नेते.

तिसरा प्रकार – बिगर भांडवलाचा धंदा – ज्यामध्ये, दुसर्‍यामध्ये फक्त बोलुन बोलुन पैशे मिळतात. हा प्रकार तसा सर्वांना झेपत नाही, म्हणुन विरळच, तीव्र इच्छाशक्ती असणारे आणि शुन्यातुन भरारी घेणारे, मोजके लोकं इथल्या कप्प्यात भरभरुन सापडतील.

माणसं जोडायची आणि विक्री करायची, ह्या दोन कला शिकल्या की कुठलाही बिगरभांडवली बिजनेस दणदणीत पैसा मिळवुन देतो, मग तो इन्शुरंसचा असो, किंवा कुठल्याही नेटवर्क मार्केटींगचा! त्यासाठी पुस्तकं वाचा, ज्ञानासाठी भुकेले व्हा!, थोडं अर्थशास्त्र समजुन घ्या, थोडं मानसशास्त्र समजुन घ्या आणि स्वतःला असं जबरदस्त डेव्हलप करा की तुमच्या तोडीचा माणुस तुमच्या गावात सापडणार नाही.

पैसा, वय आणि परिस्थिती कोणत्याच माणसाला यशस्वी बनण्यापासुन अजिबात रोखु शकत नाही, खिशात एक रुपया नसताना, धीरुभाई अंबानींनी अब्जोपती होण्याचं स्वप्न बघितलं आणि होवुन दाखवलंहि, वयाच्या पासष्टाव्या वर्षी कर्नल सॅंडर्स ने नवा व्यवसाय सुरु केला आणि जगभर पसरवला, ज्याचं नाव केएफसी!

आणि आजुबाजुला पाच पाच महासत्ता धुमाकुळ घालत असताना, पोरासोरांना एकत्र करुन, स्वराज्य उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज!……

आणि आपण त्यांचे वंशज, संकटे आली तर हरणासारखे कावरेबावरे होवुन संकटाना पाठ दाखवुन, जीवाच्या आकांताने पळत सुटायचा मार्ग निवडायचा का वाघाच्या छातीने शत्रुवर चाल करुन त्याचा कोथळा बाहेर काढायचा?

निर्णय आपला आहे!

ह्या लेखातला शब्दन्-शब्द आपल्या ह्रद्याला साद घालण्यात यशस्वी होवो, ह्या प्रामाणिक इच्छेसह….

धन्यवाद आणि आभाळ भरुन शुभेच्छा!..

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आयुष्याकडे बघण्याचा आनंदी दृष्टिकोण (Ways of Happier Life)”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।