रिच डॅड पुअर डॅड – भाग १ (Rich Dad Poor Dad)

नोव्हेंबर २०१२ मध्ये माझा एक आर्किटेक्ट मित्र एम्वे कंपनीचे नेटवर्क मार्केटींग करण्यासाठी माझ्याकडे खुपदा यायचा. अशाच एका संध्याकाळी तो ऑफीसला येवुन माहीती देऊ लागला, “तु खुप पैसे कमवशील, फ्री मध्ये विदेशात जायला मिळेल, ह्या कमाईच्या सापळ्यातुन आपण मुक्त होवु”,

मी म्हणालो, “खरं सांगु, आजकाल मला पैसे कमवण्यात इंट्रेस्टच वाटत नाही, आपण एवढी मरमर का करतो? पैशाच्या मागे धावुन काय साध्य होतं?”

तु “Rich Dad Poor Dad” वाचलंयस का? स्मितहास्य करत त्याने प्रतिप्रश्न केला, त्याच्या डोळ्यात एक आनंददायी चमक होती, मी पहील्यांदाच त्या पुस्तकाचं नाव ऐकत होतो, तेव्हा मी म्हण्टलं, “नाही!”

तीन दिवसांनी मला न सांगता त्या एक पुस्तकाची प्रत घेऊन आला, मी एम्वे बिजनेसचे अनेक सेमिनार अटेन केले, अनेक पुस्तके खरेदी केली, अनेक प्रॉडक्ट खरेदी केले, पण बिजनेस काही जॉईन केला नाही, पण त्या आर्किटेक्ट मित्रांने चांगली चांगली पुस्तकांची ओळख करुन दिली, पैशाचं महत्व मला समजावलं, आणि नेटवर्कची महती मला समजावली, आयुष्याच्या आर्थिक प्रांतांकडे बघण्याच्या दृष्टीकोण बदलवला, इतका की मी त्याचा आजही शतशः ऋणी आहे, अशीच माझी आजही प्रामाणिक भावना आहे.

त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य, गुंतवणुक याविषयी अनेक उत्कृष्ट पुस्तके वाचली, पण ‘रिच डॅड पुअर डॅड’ नेच ह्या गुहेचं दार उघडुन दिलं, जीवनशैली बदलायला भाग पाडलं, ह्या पुस्तकाची अनेक पारायणे केली, ह्या पुस्तकाचा आशय आणि त्याबद्द्लचे माझे अनुभव आज तुमच्यासमोर मांडत आहे.

ही गोष्ट आहे अमेरीकेतल्या हवाई बेटावरच्या रॉबर्ट कियोसॉकीची, त्याच्या मित्राचे वडील त्याला श्रीमंत कसं व्हावे याचे गुपितं सांगतात. आर्थिक साक्षरतेबाबतचं हे ज्ञान आणि रॉबर्टच्या आयुष्याचा प्रवास ह्या पुस्तकात वर्णन केला आहे.

धडा पहीला – श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत.

गरीब आणि श्रीमंत लोक दोघेही, जेव्हा खिशात पैसे नसतात, तेव्हा संधी मिळेल ते काम करतात, त्यातुन त्यांना जेमतेम पैसे मिळतात, पण गरीब लोक हे पैसे खुप तुटपुंजे आहेत, असा समज करुन घेतात आणि आहेत तेवढे पैसे खर्च करुन टाकतात आणि पुन्हा दुःख व्यक्त करत बसतात, बचत, गुंतवणुक आणि कमाईचे दुसरे मार्ग यापैकी काहीही त्यांच्या गावीही नसते.

श्रीमंत लोक कितीही कमी उत्पन्न असु दे, नियमित बचत-गुंतवणुक करतात, मालमत्ता तयार करतात, ज्या त्यांच्यासाठी पुन्हा उत्पनांची साधने बनतात. त्यासाठी अडचणीच्या दिवसात ते साधी जीवनशैली जगतात, एकेक रुपया विचार करुन खर्च करतात. हे फक्त काही दिवसांसाठीच आहे, हे त्यांना माहीत असते.

श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. ह्याच्याच अर्थ असा की श्रीमंत लोकांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. ते आधी आयुष्यभरासाठी संपत्तीचे निष्क्रीय स्त्रोत उभे करतात आणि मग आयुष्यभर मौजमजा करतात. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक हातात आलेल्या पैशाचं महत्व जाणुन घेत नाहीत, त्यांच्या अतृप्त इच्छा त्यांच्यावर हावी होतात, आणि निष्क्रीय कमाईचे स्रोत उभे करण्याच्या आजुबाजुला दडलेल्या संधी त्यांना दिसत नाहीत.

लेखक सांगतो, रोज कमवणे आणि खाणे हा सापळा आहे, कमवण्याच्या नादात आपल्याला अनेक स्वप्नांचे बळी द्यावे लागतात, आयुष्यातला रस कमी होत जातो, जगणं ही शिक्षा बनु लागते. बहुतांश प्रश्नांचे मुळ पैशामध्ये आहे, तेव्हा हा सापळा तोडा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या.

धडा दुसरा – अर्थसाक्षरता कशासाठी?

पैशाच्या अभावाने चिंताग्रस्त लोक सतत भय आणि लोभ यांच्या छायेखाली वावरत असतात. पैसा त्यांना हवं तसं नाचवतो, लेखक सांगतो, कृपया तुमचं आयुष्य पैशाच्या हाती सोपवु नका, त्याऐवजी तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवा.

आपण आजुबाजुला अनेक उदाहरणे पाहतो, अचानक झटपट श्रीमंत झालेले लोक असतात, जसं की जमिन विकुन रग्गड पैसा आलेले, इन्शुरंसचे पैसे आलेले, व्हीआरएस घेतलेले किंवा मोठ्या रकमेची लॉटरी लागलेले बरेचशे लोक तेवढ्याच वेगाने आलेला पैसा गमावतात, कारण त्यांच्याजवळ आर्थिक साक्षरता नसते, गुंतवणुकीचे ज्ञान नसते,

आजचा एक रुपया उद्या एक हजार रुपये बनु शकतो, याबद्द्ल ते अनभिज्ञ असतात. मला २०१३ मध्ये माझे ग्रह खुप जोरात होते, त्या वर्षात माझा निव्वळ नफा जवळपास बारा लाख रुपये होता पण तो पैसा जितक्या वेगाने आला तेवढ्याच वेगाने तो निघुनही गेला, तेव्हा मी अर्थसाक्षर नव्हतो, जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा माझ्याजवळ निष्क्रीय स्र्तोत नव्हते, तेव्हा माझी आधीची उधळपट्टी आठवुन मला अजुनच त्रास व्हायचा. मात्र त्याच दिवसांनी मला मॅचुअर बनवले. त्या अनुभवानंतर असे उत्पन्नाचे स्त्रोत उभे करण्याचे महत्व मला कळाले,

त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये जिद्दीने, मी माझ्या महीन्याच्या खर्चापेक्षा दुपटीहुन जास्त रक्कमेची निष्क्रीय कमाई उभी करण्यात यशस्वी झालो. सापळ्यातुन मुक्त झालो, मनसोक्त खर्च करुनही माझी गुंतवणुक दरमहा वाढतेच आहे,

हे मी करु शकतो ते तुम्हीही सहज करु शकता, संकल्प करा, आणि त्याची जोमाने दररोज अंमलबजावणी करा.

पैशामध्ये अफाट शक्ती आहेच, पण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती म्हणजे आपली बुद्धी आहे, तिचा वापर करुन जास्तीत जास्त पैसा कमवा, पैसा जमवा, पैसा गुंतवा आणि मग त्यातुन बोनसरुपाने मिळालेल्या पैशाचा मनमुराद आनंद घ्या.

धडा तिसरा – तुमचा उद्योग कोणता?

रॉबर्टने एक क्वांड्र्ंट मांडला, नौकरी म्हणजे इतरांसाठी काम करणं, त्यातुन दिर्घकालीन फायदा होत नाही, उलट नौकरीमुळे आपल्याला चाकोरीबद्ध जगायची सवय लागते, चौकटी मोडायचं धैर्य संपुन जातं, ताण देणारी वरिष्ठ माणसं असल्यास सतत दडपण आणि भीती वाटते, मन दुबळं आणि कमकुवत बनतं, परावलंबी असल्याची जाणीव अस्वस्थ करते, पंख छाटले जातात.

मान्य आहे, नौकरी कोणी स्वेच्छेने करत नाही, मजबुरी असते. पण नौकरी करताना स्वतःचे स्किल्स डेव्हलप करण्याकडेही लक्ष द्यावे. दरमहा रक्कम जमवावी, पाच वर्षांनी स्वतःचा एक व्यवसाय उभा करु असे ध्येय डोक्यात असावे. उद्योजकाच्याच थाटात वावरावे. आत्मविश्वास बळकट बनवावा.

महागाईच्या पटीत पगारवाढ होत नाही, मुले मोठी होतात, खर्चे आवासुन उभा राहतात, आणि त्यासोबतच आपलीही काम करण्याची शक्ती आणि धमक कमी कमी होत जाते,
आज बक्कळ वाटणारी पगार उद्या कुठे कुठे संपुन गेली, तेच कळत नाही, वेळीच सावध होवुन तरुणपणीच गुंतवणुकीचा मार्ग अवलंबल्यास आपल्याच जीवनाचे भले होते.

धडा चौथा – आयकराची जुळवणी

श्रीमंत लोक कमावतात, खर्च करतात आणि कर भरतात.
गरीब लोक कमवतात, कर भरतात, आणि खर्च करतात.

नौकरी करताना हातात पगार पडण्याआधीच टॅक्स कापुन घेतला जातो, व्यवसायात नियमात राहुन कमीत कमी टॅक्स भरण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. श्रीमंत लोक टॅक्स सिस्टीमचा, बारीकसारीक अभ्यास करतात, सवलतींचा अभ्यास करतात, त्यांचा वापर करतात.

गरीब लोकांजवळ हा पर्यायच नसतो, म्हणुन दिर्घकालीन उद्दिष्ट ठेवुन, प्रत्येकाने व्यावसायिक बनण्यासाठी लेखक आग्रह करतो.

धडा पाचवा – श्रीमंत लोक पैसा निर्माण करतात.

आपल्या सगळ्यांमध्येच प्रचंड कार्यशक्ती आणि प्रगती करण्याची क्षमता लपलेली आहे, आपल्या सर्वांमध्येच ईश्वरी देणगी लपलेली आहे, पण आत्मविश्वासाच्या अभावी आपण ती वापरत नाही, स्वतःबद्द्ल शंका घेत आपण मागे राहतो.

जे लोक ह्या दुर्गुणावर मात करतात, ते स्वतःचा आर्थिक बुद्ध्यांक वाढवतात, जोडीला धैर्य वाढवतात, भीती आणि शंका यांच्यावर मात करतात, श्रीमंत बनतात.

श्रीमंत लोक असं तंत्र उभं करतात की त्यातुन आपोआप पैशाची निर्मिती होत जाते.

धडा सहावा – शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नको.

आपल्या प्रत्येकातचं काही ना काही कला आहे, आपण सगळे बुद्धीमान आणि सुशिक्षित आहोत, आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात तज्ञ आहोत, पण श्रीमंत होण्यासाठी तितकं पुरेसं नाही, त्यासाठी आपल्याला आपल्या कलेला आकर्षक स्वरुपात इतरांसमोर व्यक्त करता आलं पाहीजे. त्याची योग्य किंमतीत विक्री करण्याचं कौशल्य असल्यासच आपल्या कलेची जगासमोर चीज होते.

आर्थिक बुद्धीमत्ता म्हणजे अकांउटींग, मार्केटींग, गुंतवणुक आणि कायद्याचं ज्ञान! ह्या चार गोष्टी शिकल्या तर पैशाने पैसा मिळवणं, खरंच सोप्पं आहे.

प्रत्येक गोष्टीची मला थोडी थोडी माहीती असावी, अशी श्रीमंत व्यक्तीचा आग्रह असतो. श्रीमंत लोक नेतृत्वगुण शिकतात, स्वतःला तसं घडवतात. मनातली पुर्ण भीती नाहीशी होईपर्यंत त्या गोष्टीवर काम करत राहतात.

लेखक म्हणतो, सतत शिकत रहा, कारण, दुरचा विचार केल्यास शिक्षण ही गोष्ट पैशापेक्षा जास्त महत्वाची आहे.

नौकरी करत असताना मला कंपनीने खर्च करुन बिल्डींगचे थ्रि-डी सॉफ्टवेअर शिकवले, शिकताना खुप दमछाक झाली, पण चिकाटीने मी कोर्स पुर्ण केला, पुढे स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यास ह्या सॉफ्टवेअरचा मला प्रचंड फायदा झाला!

असंच कधीतरी मी फावल्या वेळात कॉम्पुटरवर मराठी टायपिंग शिकलो, आज अर्ध्या तासात मी एक हजार शब्दांचा लेख टाईप करु शकतो, सुरुवातीला छंद म्हणुन लिहत असलेले लेख, आता वर्तमानपत्र आणि मॅग्झीनवर प्रकाशित झाल्याने माझ्या निष्क्रीय कमाईचे स्त्रोत बनत आहेत.

रॉबर्ट कियोसोकीचं हे पुस्तक आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलुन टाकतो, ह्या पुस्तकात दिलेले अजुन काही अनमोल धडे घेऊन पुन्हा भेटेन पुढच्या भागात!

धन्यवाद!..

‘रिच डॅड पुअर डॅड’ पुस्तकाची मराठी आवृत्ती

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “रिच डॅड पुअर डॅड – भाग १ (Rich Dad Poor Dad)”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।