७० च्या दशकातील ही घटना आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक ए.भिमसिंग आणि ए.पी. नागराजन हे दोघे प्रसिद्ध तामिळ लेखक-निर्माते व दिग्दर्शक एकमेकांचे चांगले मित्र, ए.पी. नागराजन यांनी १९६४ मध्ये शिवाजी गणेशन् यानां घेऊन “नवरात्री” हा चित्रपट तयार केला होता. हा चित्रपट खूप चालला. ए. भिमसिंग यांना या चित्रपटाचा हिंदी रिमेक करायचा होता. या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन ते दिलीपकुमार यांच्याकडे गेले. दिलीपकुमार यांनी पटकथा लक्षपूर्वक वाचली आणि ते म्हणाले- “हा चित्रपट फक्त एकच कलाकार करू शकतो आणि माझा आग्रह आहे की तुम्ही त्यानाचं या चित्रपटात घ्यावे.” उत्तर ऐकून ए.भिमसिंग यानां आश्चर्य वाटले की इतका दिग्गज अभिनेता दुसऱ्या कुणा अभिनेत्याची शिफारस करत आहे. ते रिकाम्या हाताने परत आले.
आता थोडे फ्लॅशबॅक मध्ये जाऊ यात…..साधरण ६० चे दशक असेल. एक २५ वर्षांचा तरूण मुंबईतील प्रसिद्ध नाटयसंस्था “इप्टा”च्या नाटकात एखादी भूमिका करायला मिळावी म्हणून धडपडत होता. त्याची धडपड बघून प्रसिद्ध अभिनेते ए.के. हंगल यांनी त्याला एक छोटी भूमिका देऊ केली. “डमरू” या नावाच्या नाटकातील ही भूमिका एका ७० वर्षीय म्हाताऱ्याची होती. ए.के. हंगल स्वत: त्यात भूमिका करत होते. या तरूणाने त्यांच्या वडीलाची भूमिका साकारली होती. गमंत बघा..ए.के. हंगल त्यावेळी त्या तरूणापेक्षा वयाने २४ वर्षे मोठे होते. त्याच्या अभिनयाने त्या तरूणाने वाह !!! वा !! पण मिळवली. मात्र पूढे आयुष्यभर हे वृद्धत्व त्या तरूणाला गोचीडा सारखे चिकटले. जी.ए. कुलकर्णी यांच्या बहूतेक लेखनात “प्राक्तन’’ वा “नियती’’ सतत डोकावत राहते…अगदी तसेच या तरूण कलावंता सोबत झाले. हा तरूण चित्रपटसृष्टीतला एक महान कलावंत झाला……पण शेवटा पर्यंत या प्राक्तन नावाच्या पिशाच्चाने त्याची पाठ सोडली नाही.
चित्रपट क्षेत्रातील हा कदाचित एकमेव असा अभिनेता असेल ज्याने एकाच वेळी एकाच अभिनेत्रीचा नायक, वडील, सासरा आणि पती म्हणून भूमिका साकारली असेल….. विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट असे नव्हते की त्यात काळाचा फार मोठा फरक आहे, उलट काही चित्रपट तर एकाच वर्षी प्रदर्शीत झाले होते. एखाद्या अभिनेत्यासाठी अशा भूमिका अत्यंत आव्हानात्मक असतात. जया भादूरी सोबत “अनामिका’’ चित्रपटात हे प्रेमी होते तर “परिचय” या चित्रपटात याच अभिनेत्रीचे ते पिता होते, “शोले” मध्ये ते सासरे झाले तर “कोशीश मध्ये” पती…… होय…..मी संजीव कुमार या अभिनेत्या बद्दल बोलत आहे…..विशेष म्हणजे या सर्वच भूमिकांचा आपल्या प्रेक्षकांनी स्विकारही केला…मला स्वत:ला हे एक दुर्मिळ उदाहरण वाटते.
पहिल्या प्रसंगात दिलीपकुमारने जी शिफारस केली होती ती संजीवकुमारची. याचा अर्थ या अभिनेत्यात किती ताकद आहे हे दिलीपकुमारने पूरेपूर ओळखले होते असेच म्हणावे लागेल. इतकेच नाही तर चित्रपटाच्या सुरूवातीला अभिनेते दिलीप कुमार यांनी नॅरेशन करताना संजीव कुमारची मनमोकळेपणे प्रशंसाही केली. ए.भिमसिंग यांनी जी पटकथा दिलीपकुमारला वाचायला दिली होती त्यात ९ प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका एकाच अभिनेत्याने साकार करायच्या होत्या. आणि प्रत्येक भूमिका एकमेकापेक्षा सर्वस्वी वेगळ्या होत्या. ए. भिमसिंग यानीही मग संजीवकुमारवर विश्वास दाखवला. १९७४ मध्ये आलेल्या “नया दिन नयी रात” या चित्रपटात संजीवकुमारने ९ प्रकारच्या भूमिका अप्रतिमपणे साकार केल्या. या सर्व भूमिकेत संजीव कुमारचे मेअपमन सरोश मोदी यांचीही कमाल होती. या तंत्रज्ञ कलावंताने वेगवेगळ्या प्रकारच्या ९ व्यक्तीरेखा कमालीच्या कल्पकतेने साकार केल्या.
हरीहर जेठालाल जरीवाला हे त्यांचे मूळ नाव. हे गुजराती कुटूंब मुंबईचेच. वडील जरीचा व्यवसाय करीत म्हणून जरीवाला. त्यांच्या कुटूबांत काही विचित्र योगायोग घडले होते….. ‘कुटूंबातील मोठ्या मुलाचा मुलगा १० वर्षांचा झाला की वडीलांचा मृत्यू होत असे’ त्यांच्या आजोबा, वडील आणि भावा सोबत असे घडले होते. जरीवाला कुटूंब तसे गरीबच होते. जेव्हा एखाद्या कलासक्त व्यक्तीचा कष्टमय संघर्ष सुरू होतो तेव्हा त्याला पडणारी स्वप्नेही मग दुसऱ्या दुनियेतली असतात. हरीहरचे मन जरीच्या कामात फारसे लागत नव्हते. त्यांचा ओढा रंगभूमीकेडे होता. या रंगभूमीची पण एक गमंतच आहे काही काळ का होईना अभिनेत्याला जो तो नाही त्याची भूमिका करण्याची संधी देते. त्याला पडणारी बरीच स्वप्नं तो या रंगभूमीवर काही काळ का होईना पूर्ण करतो.
जसा प्रत्येकाचा संघर्ष सुरू होतो तसा हरीहर भाईचाही सुरू झाला. १९६० मध्ये “हम हिंदुस्तानी” या चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळाली. मग तीन वर्षे असेच गेले एकही भूमिका मिळाली नाही. परत १९६४ मध्ये “आओ प्यार करे” या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली. याच काळात कमाल अमारोही काही तरूणांच्या स्क्रिन टेस्ट घेत होते. या स्क्रिनटेस्टला पांढरा कुर्ता शेरवानी या वस्त्रभूषेत हरीहर भाई पण पोहचले. एक सिन त्यांना दिला होता ज्यानुसार नायिका बसलेली असते. नायक येतो तिच्या जवळ बसतो. ती विचारते- “आप कौन?’’ तरूण किंचीत गालात हसतो आणि म्हणतो- “हुसैन.’’ हा एकच शब्द त्यांनी आपल्या खास स्मित हास्याने असा काही उच्चारला की या टेस्टमध्ये हरीहर भाई पास झाले. त्यांची ही खास “मुस्कान’’ आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिली. हा चित्रपट होता निर्माता होमी वाडीया यांचा “निशाण”. कॉस्ट्युम ड्रामा या चित्रपट शैलीचे होमी वाडिया सम्राट होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अस्पी इराणी जे त्यावेळी बी ग्रेड चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. नायिका होती नजिमा. नाशिकला जन्मलेली नजिमा ६० ते ७० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील बहिणीच्या (Resident Sister) भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होती. पूर्णत: कॉस्ट्युम ड्रामा असलेल्या या चित्रपटात हरीभाई मूख्य नायकाच्या भूमिकेत होते. विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटात त्यांचा डबल रोल होता. एक डाकूचा चांगला मुलगा आणि दुसरा अय्याश राजपूत्र. १९६५ मध्ये चित्रपटतंत्र फारसे प्रगत नसतानाही होमी वाडिया यांनी डबल रोलचे प्रसंग उत्कृष्ट चित्रीत केले आहेत. हरीभाईची या चित्रपटात “संजीवकुमार” या नावाने दमदार सुरूवात झाली. खरं तर हा संजीव कुमार चा पहिला चित्रपट असूनही नवखेपणाची छाया मात्र दिसत नाही. पूढे त्यांच्यातला खरा कसदार अभिनेता समोर येई पर्यंत या प्रकारच्या बऱ्याच भूमिका ते करत राहिले.
मेहमूद या निर्माता अभिनेत्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या कलावंताच्या अभिनय क्षमतेची त्याला लगेच जाणीव होत असे. आर.डी.बर्मन, अमिताभ बच्चन, राकेश रोशन, संजीवकुमार यांच्या क्षमतेची ओळख मेहमूदला अगदी सुरूवातीच्या काळातच झालेली आढळते. १९६६ मध्ये मेहमूदने आपल्या “पती पत्नी” या चित्रपटात संजीव कुमार ला मूख्य नायकाची भूमिका दिली. नायिका होती नंदा. संजीवकुमार मधील विनोदी अभिनेता किती ताकदीचा आहे हे मूहमूदने पक्के ओळखले होते. या चित्रपटात संजीवकुमारचा सहज सुंदर अभिनय बघायला मिळतो. याच वर्षात त्यानां अलिफ लैला, अलीबाबा और चालीस चोर, स्मगलर, बादल, नौनिहाल, छोटीसी मुलाकात सारख्या चित्रपटात भूमिका मिळाल्या पण चित्रपट सो सो होते. यात अभिनयाला फारसा असा वाव नव्हताच जी मिळेल ती भूमिका करत रहाणे हा त्यांचा शिरस्ता. पण आणखीही ओळख मिळाली नव्हती.
१९६८ मध्ये त्यांनी “शिकार” या चित्रपटात धमेंद्र सोबत भूमिका साकारली. मात्र यात धमेंद्र नायक असल्यामुळे ते केंद्र भूमिकेत होते. मात्र यातील इन्स्पेक्टरच्या त्यांच्या भूमिकेची लांबी मोठी होती. याच वर्षी एस.एच. रावेल यांचा “संघर्ष” रिलीज झाला. यात दिलीपकुमार बरोबर त्यांना एक भूमिका मिळाली. ही भूमिका फार मोठी नव्हती मात्र अभिनयाच्या दृष्टीने सशक्त होती. दिलीपकुमार सोबत त्यांचा एक प्रसंग होता. ज्यामध्ये त्यानां दिलीपकुमारला विष द्यायचे असते पण चुकून तो प्याला ते स्व:ताच पितात आणि या छोट्याशा भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनय क्षमतेची चूणूक दाखविली. स्वत: दिलीपकुमारही त्यांच्या अभिनयाने प्रभावीत झाले. या चित्रपटाच्या पटकथेचे एक लेखक गुलजारही होते. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात बहूदा संजीव कुमार पक्के घुसले असावे. ‘शिकार’ आणि ‘संघर्ष’ या दोन चित्रपटाने मात्र संजीवकुमार फोकस मध्ये आले. प्रेक्षकांना त्यांची तोंडओळख झाली. खरी ओळख व्हायला आणखी दोन वर्षे लागणार होती.
६८ ते ६९ या काळात संजीवकुमारचे १६ चित्रपट प्रदर्शीत झाले. पण एक वगळता सर्वच चित्रपटात ते सहनायकाच्याच भूमिकेत होते. “आशीर्वाद”, “सत्यकाम”, “राजा और रंक”, “गौरी”, “सच्चाई”, “जीने की राह”, “धरती कहे पूकार के”, “चंदा और बिजली”,”बंधन”, “माँ का आंचल” इत्यादी चित्रपटात ते होते. या चित्रपटातुन त्यांचे अस्तित्व चित्रपटसृष्टीत आहे हे जाणवत असे. पण अभिनेता म्हणून जी काही एक ओळख लागते ती मात्र मिळत नव्हती. मग१९७० मध्ये संजीव कुमार चा “खिलौना” प्रदर्शीत झाला आणि त्यांच्या आयुष्याला वळण मिळाले. खरं तर या चित्रपटात जितेंद्र नायक होता. पण बोलबाला झाला तो संजीवकुमारचाच. त्यातील वेड्याची भूमिका त्यांनी अप्रतिमपणे साकार केली. विशेष म्हणजे या चित्रपटात नायिकेचे काम करणारी मूमताज देखिल क्रमांक एकवर आली. या चित्रपटा नंतर मात्र संजीव कुमार यांनी सर्वानां आपली दखल घेण्यास चित्रपटसृष्टीला भाग पाडले. राजेंद्र सिंग बेदी हे प्रसिद्ध कथाकार व संवाद लेखक. याच वर्षी म्हणजे १९७० मध्ये त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेला “दस्तक” हा चित्रपट प्रदर्शीत झाला. रेहाना सुलताना यात त्यांची नायिका होती. यातील हमीद या पात्राने संजीव कुमार ला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.
संजीव कुमार चे एक ठळक वैशिष्ट्ये म्हणजे जे चित्रपट सहसा मेन स्ट्रीम मधले नसत पण कथा संवेदनशील असे त्यात ते आवर्जुन काम करत. त्यामुळे अनेक संवेदनशल दिग्दर्शकांसाठी संजीव कुमार महत्वाचे ठरत. “अनुभव” हा बासू चटर्जी यांचा असाच एक चित्रपट होता. यातील त्यांच्या भूमिकेचे विविध वर्तमानपत्रात आणि मासिकांत रसग्रहण छापून आले. भारतीय चित्रपटाचा “हिरो” आजही पुष्कळ प्रमाणत टिपीकल असतो. तो स्टार वा सुपर स्टार असतो. तरूण व हीमॅन असतो. मला व्यक्तीश: संजीव कुमार हा अत्यंत संवेदनशील अभिनेता वाटतो. तो स्टार होता की नाही माहित नाही पण प्रचंड ताकदीचा अभिनय करायचा.
१९७२ मधील “परिचय” आणि “कोशीश” या दोन्ही चित्रपटात जया भादूरी त्यांची सहकलाकार होती. परिचय मधील त्यांची भूमिका एका सर्वसामान्य संगीतकाराची होती व जयाचे ते वडील होते. “बिती ना बिताई”या गाण्यातील त्यांचा अभिनय अत्यंत नैसर्गिक होता. त्याच वेळी “कोशीश” चित्रपटात ते जयाचे पती म्हणून भूमिका करत होते. यातील त्यांची मूक बधीर भूमिका म्हणजे केवळ लाजवाब…..या चित्रपटात या अभिनेत्याने अक्षरश: आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाद्वारे अभिनय केला आहे. जया आणि संजीवकुमार जेव्हा जेव्हा त्यांच्या देहबोलीने संवाद म्हणत तेव्हा ते संवाद कानाला स्पष्ट एकू येत असत…यातील एका प्रसंग तर लाजबाव आहे…. जेव्हा त्यांचा मुलगा त्याची वाग्दत्त वधू मुकी बहीरी असते म्हणून लग्नाला नकार देतो त्यावेळचा संजीव कुमार चा अभिनय म्हणजे अक्षरश्: अंगावर काटे आणतो……हे फक्त आणि फक्त तोच करू जाणे. या चित्रपटाने त्यांना दुसरा राष्ट्रीय पूरस्कार मिळवून दिला. ७० च्या दशका पर्यंत विनोदी भूमिकेसाठी तशाच एखाद्या अभिनेत्यास घेतले जाई. नंतर हा ट्रेन्ड बदलत गेला. अनेक मूख्य अभिनेतेही विनोदी भूमिका साकार करू लागले यात संजीव कुमार अग्रणी होते. विनोदी भूमिकेतील त्यांची संवादफेक केवळ लाजबाब असायची. “अंगूर’ आणि “पती पत्नी और वो” मध्ये त्यांनी अक्षरश: धमाल केलीय. ओठांची विशिष्ट हालचाल करून जबरदस्त पंच मारण्याची त्यांची शैली तर अफलतुनच होती.
याच काळात त्यांचा “सीता और गीता” हा चित्रपट देखिल प्रदर्शीत झाला. खरे तर हा चित्रपट पूर्णपणे नायिका प्रधान त्यात हेमा मालिनीची दूहेरी भूमिका. यातील दोन्ही नायक तसे सहाय्यकच होते. यात संजीव कुमार एका डॉक्टराच्या भूमिकेत होते. त्यांच्यासाठी खूप प्रसंगही लिहलेले नव्हते पण तरीही त्यांच्या सहज उस्फुर्त विनोदी संवादामुळे ही भूमिका खूपच सुंदर झाली. यात एका प्रसंगात संजीव कुमार सीताला भेटतो त्यावेळी ती – “तूम और यहाँ !!!” असे एक वाक्य उच्चारते. त्यावर संजीव कुमार ने इतकी अप्रतिम रियाक्शन दिली आहे की बस्स…तो फक्त “हाँ मै यहाँ” इतकेच वाक्य ज्या खास अंदाजने उच्चारतो त्याला तोड नाही. या चित्रपटातील त्यांची भूमिका अशाच छोट्या छोट्या प्रसंगानी फुलवली आहे. एका हातात अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार तर दुसऱ्या हातात कमर्शियल हिट असा दुहेरी प्रवास आता सुरू झाला. आणि येणाऱ्या वर्षात अभिनयाचे असे अनेक झेंडे संजीवकुमार फडकावित राहिले.
१९७३ मध्ये राजा नवाथे दिग्दर्शीत “मनचली” आणि रघुनाथ झालानी दिग्दर्शीत “अनामिका” झळकले. यात ते सिंगल नायक होते आणि दोन्ही चित्रपट हिट ठरले. एकाचवेळी रोमॅटिंक आणि विनोदी भूमिका असलेले दोन वेगवेगळे नायक त्यांनी ताकदीने साकार केले. १९७४ मध्ये “आपकी कसम” या चित्रपटात ते राजेश खन्ना या सुपर हिरो सोबत होते. यात ते एका संवेदनशील व्यक्तीच्या भूमिकेत होते. तर याच वर्षी प्रदर्शीत झालेला “मनोरंजन” हा शम्मी कपूर यांच्या दिग्दर्शनाचा पहिला व शेवटचा चित्रपट. शम्मी कपूरने या चित्रपटासाठी संजीव कुमार चीच निवड केली. हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी होता जो येथील प्रेक्षकानां पचला व रूचला नाही. याच वर्षीच्या मेहमूद दिग्दर्शीत “कुंवारा बाप” मध्ये मैत्री खातर एक छोटीशी भूमिका साकार केली.
याच काळात त्यांच्या काही भूमिका अशा होत्या की त्याचा नामनिर्देश केल्या शिवाय चैन पडणार नाही. एक त्यांची भूमिका होती रिटायर्ड कर्नलची. त्यांची बोलण्याची शैली, देहबोली, हालचाली अशा होत्या की ते खरोखरच लष्करातुन निवृत्त झाले असावेत. एका भूमिकेत ते एका ढोंगी साधूच्या भूमिकेत होते. मुळात गुन्हेगार असलेला ही व्यक्ती साधू बनून लोकानां मूर्ख बनविण्याचा उद्योग करतेय. एक भूमिका होती प्रचंड श्रीमंत असलेल्या आणि पत्नीच्या वियोगात दिवसरात्र दारू पिणाऱ्या माणसाची जो वैफल्यग्रस्त आहे. त्यांनी धनराज शेट नावाची एक व्यक्तीरेखा साकार केली. एक भूमिका होती एका अशा करोडपती माणसाची ज्याला कुष्ठरोग झालाय व तो थेट रस्त्यावर आला आहे आणि अत्यंत लाजिरवाणे जीणं जगत आहे. १९७४ मध्येच त्यांनी शेरसिंग नावाच्या कुठलीच दयामाया नसलेल्या एका क्रूर दरोडेखोराचीही भूमिका केली. डॉ. कृपाराम नावाच्या मानसोपचार तज्ञाची एक वेगळीच भूमिकाही केली. एका भूमिकेत ते रंगभूमिचे कलाकार होते ज्याला सर्वजण गुरू म्हणतात. गुरूचे बरेच हावभाव देहबोली, डोळे फिरविण्याचा अंदाज बायकी आहेत. आणि एक भूमिका एका नॉर्मल माणसाची…..या सर्व भूमिका त्यांनी एकाचवेळी “नया दिन नयी रात” या चित्रपटात साकारल्या. लेखाच्या सुरूवातीला जो मी संदर्भ दिला तो हाच चित्रपट.
१९७५ मधील “उलझन”, “मौसम”, “आंधी” आणि “शोले” या चित्रपटात त्यांच्या अभिनयाची वेगवेगळी रूपे बघता आली. ‘’आंधी’’ची गाणी तर आजही लोक विसरले नाहीत. खरेतर “शोले” मधील त्यांचा बलदेव सिंग “ठाकूर” हा आज पर्यंतच्या हिंदी चित्रपटातील प्रचलित खल वृत्तीच्या ठाकूरपेक्षा सर्वस्वी वेगळा ठाकूर होता. मूळात या चित्रपटात ते मध्यवर्ती भूमिकेत आहेत. त्यांच्या अवती भोवती बाकीची पात्रे वावरतात. ही एक सूडकथा आहे ज्यात ठाकूर हे मूख्य पात्र आहे. ठाकूर म्हणून असणारं कुठलेही वैभव या ठाकूर जवळ नाही किंवा गावकऱ्यासाठी काही विशेष भरीव कामही केलेले नाही. त्यांच्या समोर विरोधी पात्र आहे ते डाकू गब्बरसिंगचे. जो प्रचंड बडबड करतो आणि नसलेले ज्ञानही वाटतो. तर बलदेवसिंग एकदम शांत, मोजकेच पण ठामपणे बोलणारा. आवाजात जरब असणारा. तर अशी ही फक्त ठाकूरी पिळ असलेली व्यक्तीरेखा त्या काळात संजीव कुमार शिवाय आणखी कोण करू शकला असता? गब्बरला पायाने तुडवतानां संजीव कुमार चा एक अप्रतिम शॉट या चित्रपटात आहे. ज्यात त्याच्या पायाचे खिळेदार जोडे आणि अंगार ओकणारे डोळे एकत्रित चित्रीत केले आहेत.
“त्रिशुल” मध्ये तर संजीव कुमार आणि अमिताभ यांची जुगलबंदीच आहे. यातला इंजिनीअर ते राजकूमार गुप्ता हा व्यावसायिक ही व्यक्तीरेखा त्यांनी अत्यंत समर्थपणे उभी केली आहे. संजीवकुमार आपल्या व्यक्तीरेखेचा तपशीलवा अभ्यास करत असत याची साक्ष या चित्रपटातील अनेक प्रसंगात दिसून येते. आपल्या सहकाऱ्याला पैशाच्या नोटांची बंडल देताना ज्या बेमुर्वतपणे ते नोटा उचलतात आणि सहजपणे देतात त्यातुन या व्यक्तीरेखाची मानसिकता कशी आहे ते प्रेक्षकांच्या लगेच लक्षात येते. अशीच जुगलंबदी “विधाता” मध्ये दिलीपकुमार सोबत बघायला मिळाली.
एकाचवेळी विविध अंगाने संजीव कुमार समृद्ध होत गेले. १९७५ हे वर्ष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचे अत्युच्च टोक होते. नंतर मात्र यापेक्षा ते फार वर गेले नाही तर आहे ते टिकवत राहिले. जागतिक किर्तीचे दिग्दर्शक सत्यजीत रे यांनी “शतरंज के खिलाडी” हा फक्त एकच हिंदी चित्रपट तयार केला ज्यात संजीव कुमार होते. या भूमिकेसाठी त्यांनी खास लखनवी उर्दूचा सराव केला. सतत बुद्धीबळ खेळणाऱ्या या नवाबाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले की तो भूवयांच्या केसानां पिळ देऊ लागतो. ही कल्पना स्वत: त्यांची होती. म्हणजे एखाद्या व्यक्तीरेखेत आत पर्यंत किती खोल शिरत होता हा अभिनेता !!!
एकूणात संजीव कुमारला भलेही आपण एकवेळ विसरू पण त्याने साकार केलेल्या व्यक्तीरेखा कधीच विसरता येणार नाहीत. संजीवकुमारचे डोळे विलक्षण बोलके होते, बिटवीन द लाईन मधला गॅप हे डोळे अतिशय ताकदीने भरून काढत असत. त्यांच्या चेहऱ्यावरीन नस न नस थरथरत असे असाच बोलका चेहरा मला राजकपूरचा दिसे. संजीव कुमार चा एक प्रदीर्घ असा टाईट क्लोजअप एका चित्रपटात आहे. बहूतेक “हथकडी” हा चित्रपट असावा. फोनवर एक गुन्गारी विश्वातला पिता आपल्या मुलाशी बोलतोय. चेहऱ्यावरची नस न् नस या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने जीवंत केली.
हरीहर जरीवाला ते संजीव कुमार असा बी-ग्रेड चित्रपटा पासून सुरूवात करत अभिनयाच्या उच्च शिखरा पर्यंतचा त्यांचा प्रवास दिपवून टाकणारा आहे. संजीव कूमार यानां वयस्कतेचे जे कवच चिकटले ते मात्र शेवटपर्यंत कायम राहिले. त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा अधिक वयाच्या भूमिकाच त्यानां सतत भेटल्या पण त्यांनी आपल्या अभिनयाशी कधीच अप्रामाणिकपणा केला नाही. एकदा त्यांची खास मैत्रीण अभिनेत्री तबस्सूमने त्यांना विचारले होते की- “तुला प्रोढ व्यक्तीरेखा करण्याची काय एवढी हौस आहे?” यावर हा अभिनेता म्हणाला- “मी आयुष्यात कधीच म्हातारा होणार नाही म्हणून आता हौस भागवून घेतो.” यातील हास्य वजा जाता योगायोग म्हणजे संजीव कूमारच्या कुटूबांत कुणीही वयाची पन्नाशी ओलांडू शकला नाही, स्वत: संजीव कूमार देखिल.
संजीव कुमार ने १४ फिल्मफेअर पुरस्कारा शिवाय १३ विविध पुरस्कार देखील मिळवले. संजीव कुमार यांचे वैयक्तीक आयुष्य मात्र गुंतागुंतीचेच राहिले. हेमा मालिनी सोबत विवाह करायची ईच्छा पूर्ण नाही झाली. तर सुलक्षणा पंडित सोबत सूर जुळत असतानां त्यानीच नकार दिला व मग सुलक्षणा पण अविवाहित राहिली. राजेश खन्ना, शशी कपूर, देवेन वर्मा, शिवाजी गणेशन्, बी. नागीरेड्डी, शर्मिला टागोर, तनुजा हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र. आपल्यापेक्षा ज्युनीअर कलावंताशी ते खूपच प्रेमळपणे वागत असत.
ते दररोज कायम मित्रां सोबत मैफल् जमवित असत. एकटेपणा आवडत नसे त्यानां. कधीकाळी भरपूर गरीबी, कष्ट, अवहेलना, मानाहानी, विश्वासघात सहन केल्यामुळे असेल नंतर कुणावर फारसा विश्वास टाकायला त्यांचे मन धजावले नसावे. जेव्हा भरपूर पैसा आला तेव्ही ते तसेच राहिले. पैशांशी अती सलगी करणे त्यानां कधी आवडत नसे. पैसा एकाचवेळी त्यांच्यासाठी “हेट अन्ड लव्ह” असा प्रकार होता. संजीव कुमार हे “सेन्स ऑफ ह्युमर” असणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असे. ह्युमरची पण एक गंमतच आहे याचे वरदान बहूतेक अशा सर्वच प्रतिभावंताना मिळालेले दिसते जे आतुन दु:खी आहेत. मनातली ही वेदना वाणी व चेहऱ्यावर येई पर्यंत हास्यात बदलविण्याची ताकद या लोकात असते. दु:ख जितके वेदनाकारक तितके हास्य देखिल टोकदार. अशा व्यक्तींच्या हृदयातील कोणता तरी कप्पा का रिता राहत असावा माहित नाही.
१९७६ मध्ये संजीव कुमार यांना पहिला हार्ट अटॅक आला त्यावेळी त्यांनी अमेरिकेत जाऊन बाय पासही केली. पण १९८५ मध्ये त्यांनी अल्विदा केले त्यावेळी ते अवघे ४७ वर्षांचे होते. आज ते जीवंत असते तर ८० वर्षांचे राहिले असते व कुणास ठावूक त्यांनी शंभरी पार झालेल्या एखाद्या वृद्धाची अफलातुन भूमिकाही साकार केली असती……..प्रत्यक्षात जरी त्यांनी जरीकामाचा व्यवसाय केला नाही तरी अभिनायाची एकापेक्ष एक सरस अशी भरजरी वस्त्रं मात्र सुंदर गुफली.
आज ९ जुलै त्यांचा जन्म दिवस…..त्यांच्या अभिनय कर्तृत्वास सलाम.
वाचण्यासारखे आणखी काही…..
आमचा हरी
चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.