‘सदगुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी..’ या ओवीतून संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णलेला गुरूचा महिमा अत्यंत बोलका आहे. अनादी काळापासुन ‘गुरु’ समाजात वंदनीयच राहिले आहेत. माणसाला उत्कर्षाची वाट दाखवून त्याच्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त करून देण्याचे कार्य गुरु करतात. म्हणूनच गुरुप्रती आपला आदरभाव, कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा रूढ झाली.
गुरुपौर्णिमेची सुरवात बघायची झाली तर, आपल्याला महाभारतापर्यंत मागे जावे लागेल.. याच दिवशी महर्षी व्यास मुनींनी ब्रह्मसूत्रांचे लिखाण पूर्ण केले होते, असे काही जण मानतात तर, या दिनी व्यासांचा जन्म झाला होता, अशी काहींची धारणा आहे. महर्षी व्यास यांनी हिंदू संस्कृतीला अनेक धर्मग्रंथ दिलेत. जगाकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी महर्षींनी मानवजातीला आपल्या ग्रंथातून प्रदान केली आहे. मानवी संस्कृतीच्या संदर्भात मूलगामी विचार मांडणा-या, त्यावर भाष्य करणा-या आणि त्याचा प्रसार करणा-यांना ‘व्यास’ म्हणावे, असा विचार महर्षींनी दिला. म्हणूनच ज्या पीठावरून विचारांची निर्मिती होऊन त्याचा प्रसार होतो त्याला ‘व्यासपीठ’ असे म्हणतात. जो मार्गदर्शन करतो तो गुरूच्याच स्थानी असतो. अशा या मागर्दर्शकांना वंदन करून त्यांच्यविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा..
माणसाच्या जीवनात अनेक नाती असतात.. काही रक्ताची, तर काही त्यापेक्षाही घट्ट असतात. त्यातलंच एक नातं म्हणजे मैत्रीचं आणि दुसरं गुरु-शिष्याचं. मैत्रीच्या नात्यामुळे जीवन सुखकर आणि आनंददायी होतं, तर गुरु आपल्या जीवनाला खरा अर्थ देतात. गुरु आपल्या शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर त्याला सुखकर जीवन जगण्याचे मार्गदर्शन करत असतो. एखादा कुंभार जसे मातीच्या मडक्याला आकार देतो, अगदी तसेच गुरूसुद्धा शिष्यांच्या मनाला आकार देतो. त्यामुळेच गुरूला आई वडिलांपेक्षाही मोठा दर्जा आणि मान देण्याचा प्रघात आहे. अर्थात, आजच्या आधुनिक आणि प्रगत काळात गुरु आणि शिष्यांच्या नात्यात तद्वातच संकल्पनात फार मोठा बदल झाला आहे .
पूर्वी शिष्य गुरूच्या आश्रमात शिक्षणासाठी जाई. गुरु त्याला शिक्षणासोबत जीवनातील आदर्श मूल्यांचे संस्कार आणि त्याच्याकडे असलेल्या कलेचे शिक्षण देई. आज मात्र शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. पुस्तकाच्या ओझ्याखाली दबलेल्या आजच्या पिढीसाठी मूल्यशिक्षण आणि कला हे शब्द केवळ पुस्तकातच उरले आहेत. मार्काचे आकडे गुणवत्ता ठरवू लागल्याने शिक्षणाचा ढाचाच बदलून गेला. जसा शिक्षण पद्धतीती बदल झाला तसाच बदल गुरु-शिष्याच्या नात्यात देखील झाला. कालचा शिष्य आज विध्यार्थी झाला असून गुरु शिक्षकांच्या भुमीकेत आला आहे. गुरु आपल्या शिष्याला घडविण्यासाठी शिक्षण देत असे, मात्र आज शिक्षक विध्यार्थ्याला पास होण्यासाठी शिक्षण प्रदान करतो. अर्थात यात ना शिक्षकांचा दोष ना विद्यार्थ्यांचा. आजची व्यवस्थाच तशी बनली आहे. आज एकलव्य, अर्जुनसारखे शिष्य नाही त्यामुळे द्रोणाचार्यासारखा गुरूदेखील नाही. आजचा सगळा खेळ व्यावहारिक दृष्टिकोनावर अवलंबून आहे. गुरु दक्षिणेपूरती आणि शिष्य मार्क मिळ्वण्यापुरते एकमेकांवर विसंबून असतात. गुरु-शिष्याच्या नात्यालाही कलंक लावण्याच्या घटना अधून मधून समोर येत असतात. त्यामागे हेच कारण असले पाहिजे.
शिक्षणात गुरु जसा वंदनीय तसाच अध्यात्मात गुरु पूजनीय आहे. संत महात्म्यांच्या या भूमीत अनेक साधू संतांनी मानवाला जीवन जगण्याचा आदर्श मार्ग दाखविला आहे. शास्त्र, धर्म, ग्रंथ आदींच्या आधारे संपूर्ण मानवजातीला तिच्या कल्याणासाठी जीवन जगण्याचा विचार देणारी प्रत्येक व्यक्तीला समाज गुरूचा दर्जा देऊन त्या व्यक्तीची पूजा करतो. अर्थात आसाराम, रामरहीम यांच्यासारख्या काहींनी आपल्या स्वार्थासाठी या उज्वल परंपरेला बट्टा लावला आहे. त्यामुळे आजच्या काळात तथाकथित अध्यात्मिक गुरूंपासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र या नाण्याला दुसरीही बाजू आहे. आजही काही लोक निस्वार्थ भावनेने जागच्या कल्याणा कष्ट उपसत आहेत. मुळात शाळेत शिकवणे आणि अध्यात्मावर प्रवचन करणे इतकी संक्षिप्त व्याख्या गुरुची निश्चितच नाही.
गुरु हा शब्द अथांग आहे. त्याची व्याप्ती फार मोठी आहे, त्याचा महिमा आगाद आहे. त्यामुळे गुरुची व्याख्या किंव्हा गुरु कुणाला म्हणावे याचे शब्दात वर्णन करणे जवळपास अश्यक्यच. कारण जीवन जगात असताना अडलेल्या ठिकाणी योग्य मार्ग दाखविणारा प्रत्येक व्यक्ती हा गुरूच्याच स्थानी असतो. जन्म झाल्यावर मुलाला चालायला बोलायला शिकवणारे आई- वडील आपलं आद्य गुरु आहेत. मार्ग चुकलेल्या एखाद्या व्यक्तीला उचित मार्ग दर्शन करणारा हि गुरुच. अंधारातून प्रकाशाचा किरण दाखविणारा गुरच असतो. अनुभवसारखा मोठा दुसरा गुरु नाही, असे म्हणतातअनुभवप्रमाणेच ग्रंथही आपल्याला जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवीत असतात त्यामुळे ग्रंथ ही गुरूच्याच स्थानी. मुळात कठीण समयी शिष्याला जवळीकतेने आणि निरपेक्ष भावनेने योग्य मार्ग दाखविणे म्हणजे ‘गुरु’ची भूमिका निभावणे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच आज काही अपवादात्मक घटना घडत असल्या तरी मानवाच्या अंधकारमय जीवनात ज्ञानाचा प्रकाश पाडणाऱ्या गुरुचे महत्व आजही वंदनीय आणि पूजनीय असेच आहे, आणि उद्याही ते तसेच राहील. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक शिष्याने आपल्या संस्कृतीनुसार आणि समजुतीनुसार ज्ञानाचा मार्ग दाखविणाऱ्या तमाम गुरूंना वंदन करून त्यांनी दाखविलेल्या आदर्श मार्गाने जाण्याचा संकल्प करण्याची गुरुदक्षिणा देणे, ही काळची गरज आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.