हॉस्पिटलच्या गेटजवळच तो त्याला भेटला.
“अरे तू ….?? इथे कुठे …?? आज माझ्या एरियात …?? पहिल्याने दुसऱ्याच्या हातात हात घेऊन विचारले.
“अरे …एकाला पाहायला आलो. माझाच कस्टमर होता. पण काम झाले नाही….” दुसरा उत्तरला.
“ठीक आहे …. आता आला आहेस तर चल… चहा पिऊ” असे म्हणत दोघेही समोरच्या हॉटेलमध्ये शिरले.
अरे हो…. तुमची ओळख करू दिली नाही मी. ते दोघेही हेलवर्ड या कंपनीचे ट्रान्सपोर्ट प्रतिनिधी. म्हणजेच थोडक्यात मृत्यूदूत. ज्यांची वेळ झाली त्यांना घेऊन जाणारे.
दोघेही चहाची ऑर्डर देऊन समोरासमोर बसले. दुसऱ्याने पहिल्याला विचारले “मग… कसे कांय चालू आहे सध्या ….”?
“फार काम नाही राहिले इथे. सिरीयस लोक येतात पण अत्यानुधिक उपकरणे. मनापासून मेहनत करणारे डॉक्टर्स आणि नवीन औषधे यामुळे बऱ्याचदा माणूस वाचतोच. त्यामुळे घेऊन जायला फारच कमी माणसे असतात. काल तर मोजून दोन जण सापडले त्यातही एक म्हातारा…. कितीतरी दिवस त्याचे नातेवाईक विनवणी करत होते घेऊन जा घेऊन जा…..पण त्या नवीन आणलेल्या मशीनने त्यांचा श्वास काही थांबत नव्हता. चुकून कोणाच्या तरी हातून त्याचे बटन क्षणभरासाठी दाबले गेले आणि मी त्याच क्षणी उचलले त्याला. फार कठीण परिस्थिती आहे इथे. इंसेंटिव्हसाठी जास्त तास काम करावे लागते. तुझे बरे आहे. फिरतीचा जॉब…. आज येथे तर उद्या तिथे… मलाही आता बदलीचा अर्ज दयावा लागेल”.
तसा दुसरा हसला…” तुला वाटते तितके सोपे नाहीय ते. मला वेळ कमी पडतो त्यांना उचलायला….. घरी जाण्याची निश्चित वेळ नाही. पूर्वी काम कमी होते. एखादाच अपघात व्हायचा आणि क्वचित दंगल पण हल्ली दंगल वाढल्या. अतिरेकी कारवायांमुळे अपघात वाढले. एकाच वेळी शेकडो माणसे मरु लागली. त्यांना उचलून न्यायला वेळ नाही. हल्ली तर अपघातात जास्त माणसे सापडू लागली आहेत. मी तर दोन दोन दिवस घरी जात नाही. काय उपयोग त्या इंसेंटिव्हचा …??
“म्हणजे आपल्या साहेबांनी समतोल साधला म्हणायचा…. कारण हल्ली नैसर्गिक मृत्यू लांबला आहे. लोकांच्या आजाराला अनेक उपचार आणि औषध निघाली आहेत, काही काही जण अवयव ही बदलतायत. मी तर ऐकले आहे की अमरत्वावर संशोधन चालू आहेत…..” पहिला आश्चर्याने म्हणाला.
“होय ….खरे आहे म्हणूनच आपल्या साहेबांनी दुसऱ्याप्रकारे हा समतोल राखायचा ठरविला आहे . इथे जन्माला येण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही उलट नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण कमी व्हायला लागले आहे. म्हणून आज अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढवले आहे. अतिरेकी जन्माला घातले गेले. तर काही ठिकाणी पूर वादळसारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण केली. शेवटी कितीही झाले तरी पृथ्वीवर समतोल राखणे हेच आपल्या साहेबांचे काम आहे.”
“खरे आहे तुझे ….” पहिला हताशपणे म्हणाला.
” पण त्यामुळे माझे काम वाढलंय….. दुसरा वैतागून म्हणाला” एका माणसांमुळे आज चार माणसे जातायत. आता बघ ना ….काही अतिरेकी शहरातील भर बाजारात बॉम्बस्फोट करणार आहेत त्यात ज्यांचे दिवस भरले नाहीत तेही हकनाक मारले जातील. पण पर्याय नाही. समतोल राखायचा असेल तर काही निरापराध्यांचा बळी द्यावाच लागेल आणि त्यांना घेऊन जाण्याचे काम करावेच लागेल…” असे बोलून तो उठला आणि बाजाराच्या दिशेने चालू पडला .
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.