वेळ संध्याकाळ
कोणतीतरी तरी एक मराठी वाहिनी…..
मालिका एक…. नायिका अतिशय हुशार. लग्न होण्याआधी खूपच बंडखोर. स्त्रीमुक्तीवाली….. नाईलाजाने न आवडणाऱ्या मुलाशी लग्न करते मग हळू हळू पतीवर प्रेम. त्यासाठी सासरचा सर्व जाच सहन करते. नवऱ्याच्या सर्व चूका माफ. पती हा परमेश्वर….
मालिका दोन …. नायिका हुशार डॉक्टर. एका लहान मुलीच्या प्रेमाखातर तिच्या वडिलांबरोबर लग्न करते नंतर त्यामुलींसाठी डॉक्टरकी सोडते. सासू आणि दिराचा छळ सहन करते. नवऱ्याचा तिरसटपणा सहन करते. धन्य ती आई….
मालिका तीन …. नायिका गावंढळ तर नवरा मोठ्या पदावर अधिकारी. आधुनिक…… दुसऱ्या मुलीच्या मागे. तिच्यासाठी बायकोला सोडतो. तरीही नायिका सहन करतेय. बरेच दिवस सहन केल्यावर आता विनोदी मार्गाने त्याला वठणीवर आणायचे काम चालू आहे. धन्य ती बायको…
मालिका चार….. नायकाला सैन्यात जायचे आहे. त्याआधीच तो प्रेमात पडलाय. प्रेक्षक वाट पाहतायत हा कधी सैन्यात जाऊन देशाची सेवा करतोय. प्रेक्षकांचा अंत पाहून शेवटी त्याला सैन्यात जावे लागले. तिथेही त्याची प्रेम कहाणी चालूच आहे. त्यासाठी अधिकारीही त्याला मदत करतात. हा सैनिक बनेल की प्रेमवीर हेच प्रेक्षकांना अजून कळत नाही.
मालिका पाच….. नायिका शिक्षिका तर नायक अशिक्षित. अति भोळा पण जमीनदार. तरीही त्यांचे प्रेम नंतर लग्न. सासरी सासू नाही पण जाउबाई आहेत त्रास द्यायला. कळत असूनही सहन करतेय. धन्य ती पत्नी…
मालिका सहा…. नायक नायिकेचे लग्न झालेय. ती सरकारी नोकर तर हा आयटीवाला. लग्नानंतर तिचा स्वभाव उफाळून आलाय त्याचा परिणाम घटस्फोटात होतोय. परत त्यांची ऍडजस्टमेंट. परत भांडणे. ती नवऱ्यासाठी सासूच्या वेगवेगळ्या परीक्षेतला सामोरी जाते. सासूची तिला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या योजतेय…
नवऱ्यासाठी काहीही……
मालिका सात…. नायक श्रीमंत उद्योगपती नाईलाजाने गरीब घरच्या मुलीशी लग्न. त्याच्या उधळ्या लाडावलेल्या बहिणीचे तिच्या भावाशी लग्न. नायकाचे खरे दुसऱ्या श्रीमंत उद्योगपती मुलीशी प्रेमसंबंध. तरीही नायिकेला ते कळत नाही की दाखवत नाही ??? ती नेहमी मान खाली घालून सहन करणारी. पती हाच परमेश्वर मानणारी. सर्व त्रास आनंदाने सहन करणारी.
मालिका आठ……. नायिकेला लग्न करायचे नाही तिला तिचे करियर करायचे आहे. तिच्याशी लग्न करणाऱ्या नायकाचे दुसऱ्या मुलीवर प्रेम. घरच्यांचा विरोध म्हणून नायक आणि नायिकेला जबरदस्तीने लग्न करावे लागते. आता नायिका नवऱ्याला त्याचे पाहिले प्रेम मिळवून द्यायचे प्रयत्न करतेय. त्यासाठी ती सासरच्या जाचक अटी ही सहन करते. आजी सासूचा त्रास सहन करतेय. नवऱ्याला आणि त्याच्या मैत्रिणीला होईल तितकी मदत करतेय. स्वतःचे करियर विसरून गेलीय. धन्य ती पत्नी….
मालिका नऊ ….. नायक सुशिक्षित परदेशात राहून आलेला. नायिका गरीब अशिक्षित अडाणी. काही वेगळ्या परिस्थितीमुळे त्यांचे लग्न होते. पुन्हा सासूचा, मामाचा त्रास आहेच. नवराही संशय घेईल असे प्रसंग, शेवटी ती गायब नायक दुसरे लग्न करतो. तीही सालस सुशील पती हाच परमेश्वर मानणारी. परत मूळ नायिकेचे आगमन. नवऱ्यावरील प्रचंड प्रेमाने तिला दुसरी पत्नी स्वीकारावी लागलीय. नंतर दुसरी पत्नी गायब. मग परत नायिका गायब. तशीच दिसणारी दुसरी नायिकेचे आगमन. सासूच्या कारवाया सुरूच. मूळ नायिका दुसरीकडे आहेच. देवा काय चालू आहे हे कोणालाच माहीत नाही…… पण तरीही नायिकेचा पती हाच परमेश्वर
मालिका दहा ….. (रिऍलिटी शो) संगीतावर आधारित कार्यक्रम. गायन स्पर्धा. काही वर्षांपूर्वी ह्याच कार्यक्रमातून विजेते झालेले आता एक सूत्रसंचालक आणि एक परीक्षक, दुसरे एक दिग्दर्शक आणि एक सिनेमामुळे प्रसिद्धीस आलेले गायक. अतिशय घाईघाईत कार्यक्रम संपविला गेला. फायनलही live झाली. कार्यक्रम कधी आला कधी गेला ते कळलेच नाही
प्रत्यक्षात
रात्रीचे दोन वाजलेत माझा दारावरची बेल वाजली म्हणून मी घाईत दरवाजा उघडला तर समोर विक्रम उभा. अर्थात स्वारी फुल होती ते सांगायलाच नको. “बायको घरात घेत नाही म्हणून तुझ्याकडे आलो. बाहेर झोपतो सकाळी जाईन.” असे म्हणत आत शिरला. तितक्यात सौ बाहेर आली “भावोजी ..! तुम्ही घरात यायची गरज नाही पाहिजे तर याना घेऊन बाहेर जा. मीही तुम्हाला घरात घेणार नाही. आणि हो घरात खायला ही काही नाही. असे म्हणून आम्हा दोघांनाही घराबाहेर ढकलले.
सकाळी बंड्या रस्त्यात भेटला म्हणाला “च्यायलाभाऊ… असे वाटते मराठी सिरियलमधील एक नायिका बायको म्हणून मिळावी. सर्व कश्या सोशिक नाजूक, सुंदर आणि मुख्य म्हणजे पती हाच परमेश्वर मानून त्याच्या सर्व चूका माफ करणाऱ्या. सासू विरुद्ध एकही शब्द न बोलणाऱ्या. मी रागाने त्याच्याकडे पाहिले. काही न कळून तो सरळ चालू पडला. घरी आलो तर शेजारचा गौरव डिस्कवरी चॅनल लावून बसला होता. विचारले तर म्हणाला “आई म्हणाली नुसते माझा देश माझे सैनिक त्यांना सलाम असे म्हणू नकोस तर ते कसे राहतात त्यांचे ट्रेनिंग कसे हे ही बघ म्हणून काल रात्री टीव्ही लावला तर तिने चॅनल बदलला म्हणाली मला ती सिरीयल पहायची आहे आज त्यात नायिकेच्या खुनाचा प्रयत्न होणार आहे. आज सकाळी पाहायला गेलो तर म्हणाली मला दुसरी सिरीयल पहायची आहे त्यात नायिका तिच्या नवऱ्याच्या प्रेयसीला रंगेहाथ पकडणार आहे. म्हणून तुमच्याकडे येऊन बघतोय.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.