भांडी घासणे एक कला आहे ह्यावर पूर्वी माझा विश्वास नव्हता म्हणजे अगदी लहान असताना पण हळू हळू मी स्वतः भांडी घासायला लागलो तेंव्हा त्यातली गम्मत आणि लय समजली मला, भांडी घासताना जी तंद्री लागते ती कुठल्याही मादक पदार्थाशिवाय लागणारी असते, भांडी घासायची म्हणून घासायची नसतात तर त्यात आपला जीव ओतावा लागतो कारण त्या भांड्यातून पूर्ण ब्रह्म म्हणजे काय ते आपल्यला अनुभवायचे असते रोज, सकाळपासून स्वयंपाक सुरवात केल्यापासून शेवटी भांडी घासण्यापर्यँतचं एक समाधान असतं आणि कदाचित बायकांना ते समाधान जास्त प्रमाणात मिळत असत, भांडी घासणं तेव्हढं सोपं नाही म्हणजे कलात्मक रीतीने भांडी घासल्यास त्यात फार वाकबगारता लागते आणि सवयही, येऱ्यागबाळ्याला भांडी घासायला सांगितल्यास नक्कीच त्याचा राडा घालून ठेवणार ती व्यक्ती, भांडी घासण्यास एक नजाकत असायला हवी तर भांडी सुद्धा समाधानी होतात अगदी…..
जेवण झाली की जे जडत्व येत त्यामुळे कुठली काम करणे जीवावर येत असत बहुतेकांच्या कारण उत्तम जेवण आणि मग वामकुक्षी अश्या रम्य कल्पना असतात आपल्या परंतु ज्या भांड्यांनी आपल्याला हा जेवणाचा आनंद दिलाय त्यांचं काय? म्हणजे गरज सरो वैद्य मारो ह्या उक्ती प्रमाणे अनेकजण भांडी घासू नंतर ह्या फंड्या प्रमाणे उष्टी भांडी मोरीमध्ये म्हणजे पूर्वी मोरीच म्हणायचे ठेऊन देतात आणि देतात ताणून पण जे उत्साही असतात त्यांना चैन पडत नाही भांडी जागच्या जागी गेल्याशिवाय त्यातीलच मी एक आहे असे समजा…..
प्रथमतः जेवताना अजागळासारखे जेवणारे खूप असतात त्यांना पर्वा नसते जगाची, म्हणजे सांडून ठेवणारे, पानात टाकणारे, कडीपत्ता /मिरच्या /मोहरी इत्यादी नावडते पदार्थ बाजूला काढू टाकणारे, पानाभोवती खरकटं करून ठेवणारे, वाट्यातून पातळ पदार्थ तसेच ठेवणारे हे सर्व बघितले की भांडी घासण्याची उर्मी येईल का? पण ज्याला येते उर्मी अशीच तोच कलात्मक रीतीने भांडी घासू शकतो कदाचित, सर्व पसरलेली भांडी व्यवस्थित साईझ प्रमाणे एकात एक घालून म्हणजे भाज्यांची भांडी कढई, मोठया तोंडाची भांडी वगैरे एकात एक घालून व्यवस्थतीत ताटामध्ये घेऊन म्हणजे ही ताट सुद्धा लहानमोठी प्रमाणात लावून घेऊन ती उचलून घासण्याच्या जागी आणणे हे सुद्धा कौशल्य असतं…..
नंतर त्यातील खरकटं गोळा करून कचऱ्यात टाकणे, नंतर पाण्यानी भांडी विसळणे आणि मग व्यवस्थति लिक्विड साबणाने ती घासणे ह्यात फार लक्षपूर्वकता लागते अन्यथा सांड लवंड आणि पसारा आणि घाण होऊ शकते, घासताना पातेली कशी घासावेत त्यात एक लय असते म्हणजे चार बोट आणि अंगठ्यात घासण्याचा स्पंज अथवा स्क्रबर काय असेल ते गोलाकार भांड्यात फिरवून भांड व्यवस्थित घासणे ह्यात तन्मयता लागते, प्रथम सर्व ताट घासून घेणे नंतर सर्व डाव चमचे उलथनं इत्यादी नंतर मोठीं लहान भांडी क्रमाने, नंतर नळाचा फोर्स किती ठेवावा ह्यात सुद्धा हुशारी लागते नाहीतर सर्व अंगावरचे कपडे ओले होण्याची शक्यता असते, नंतर सावकाश विसळणे, धुताना भांड्यांचे काने कोपरे, डाव चमच्याचे मागून पुढून घासणे, ताट मागून पुढून धुणे हे सर्व प्रकार कौशल्याने करावे लागतात भांड्यांचा आवाज न करता, नंतर परत एकात एक भांडी घालून ती निथळत ठेवणं आणि मोरी बेसिन स्वच्छ करण हे सुद्धा जिकरीचे काम असते,
एकंदरीत भांडी घासणे हे सर्वसामान्य माणसाचे काम नाही तर त्यात जीव ओतावा लागतो नाहीतर मोलकरणीने घासलेली भांडी परत चेक करावी लागतात आणि कधी कधी परत घासूनही घायवी लागतात….. त्यामुळे भांडी घासणे हे नुसताच श्रमाचं काम नाही तर ते कलात्मक काम आहे, ते व्यवस्थित केलं तरच समाधान मिळत असत कदाचित……
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.