भर श्रावणात अचानक आंदोलन झाल्यामुळे श्री.काळूभाऊ कावळे चिडले होते. श्रावणात संपूर्ण महिना म्हणजे विविध पदार्थांची मेजवानी. काही ठिकाणी तर लोक स्वतःहून बोलावतात. अश्यावेळी संघटनेच्या कावळ्यांनी आंदोलन करायची गरज काय..??
प्रत्येकाला जागा / हद्द ठरवून दिल्या आहेत…. तेथे जे काही मिळेल ते त्यांचेच….. अर्थात काही ठिकाणी काही कावळ्यांनी मोक्याच्या जागा पटकाविल्या आहेत हे मान्य…. आणि त्याबद्दलचा योग्य हिस्सा श्री. कावळे यांना मिळत होता ती गोष्ट वेगळी….. म्हणूनच काही कावळे चिडले होते.
घाईघाईने उडत ते नाक्यावरच्या वडाच्या झाडावर असलेल्या ऑफिसमध्ये शिरले. आत शिरताच एका सदस्याने ताबडतोब एक ताजी जिवंत अळी त्यांच्यासमोर ठेवली. पण श्रावण असल्याने त्यांनी रागाने काव काव करून चीड व्यक्त केली.
“कोणाचा प्रॉब्लेम आहे ….??? त्यांनी सेक्रेटरीला विचारले. तिने नाजूक आवाजात काव काव करीत एक निवेदन त्यांच्याकडे दिले. दशक्रिया विभागात नेमलेल्या काहीजणांची तक्रार आहे.
“ते दहा वाजता आले तेव्हाच शंका आली मला….. दहानंतर मोकळेच असतात ते….. बोलवा त्यांना आत… ” बाहेर फांद्यांवर बसलेले काही कावळे आत शिरले.
” साहेब….. आमची बदली करा. आता नाही जमत तिथे. ते हात जोडून श्री. कावळे यांना म्हणाले.
” काय प्रॉब्लेम आहे तिथे…?? सगळ्यात आरामाची जागा आहे तुमची. सकाळी दोन तास फक्त घाईचे….. नंतर आरामच असतो. स्वतःची पार्ट टाइम कामेही करता तुम्ही …” श्री.कावळे चिडून म्हणाले.
” साहेब…. आहो तेच तेच अन्न खाऊन कंटाळा आलाय आम्हाला. किती वर्षे झाली तरी पिंडातील अन्नात बदल नाही. शिवाय हल्ली कामाचा लोड वाढलाय. पूर्वी रोज तीन ते चार कार्य व्हायची पण आता पन्नास कार्य होत असतात त्यामुळे पिंडाचा दर्जा ही खराब झालाय. आम्हाला धड काव काव ही ओरडता येत नाही. कसेही गोळे बनवितात आणि आमच्या पुढ्यात ठेवतात. बरे…. जोपर्यंत चोच मारत नाहीत तोपर्यंत ते जात ही नाहीत”
“बरे…. बरे….. हे कळते मला. हल्ली तुम्हीही चोच मारायचा कंटाळा करता… पण त्याचे परिणाम किती वाईट होतात ते माहितीय का.. ?? त्या दिवशी एका तरुणांच्या पिंडाला शिवलात नाही तुम्ही… तेव्हा घरी गेल्यावर त्याच्या विधवा बायकोने सगळ्यांच्या शिव्या खाल्ल्या. तर परवा म्हाताऱ्याच्या पिंडावर चोच नाही मारलीत तर त्याची मुले म्हातारा अजूनही अतृप्त दिसतोय साला गेल्यावर ही त्रास देतोय असे ऐकावे लागले. तुमच्या न शिवण्यामुळे कित्येकजणाना उशीर होतो…. दिवस वाया जातो. कित्येकजण आंघोळ न करता कामावर जातात. लोकल ट्रेन बसने प्रवास करतात. आपल्याला शिव्या देतात. अरे…. फक्त ह्याच प्रसंगी आपल्याला मान देतात लोक आणि तुम्ही त्यातही शिव्या खातात…..”. श्री कावळे चिडूनच बोलत होते कारण त्यांच्या जागी बदलीवर कोणताच कावळा जाणार नव्हता आणि श्री. कावळे यांनाही वरकमाई काहीच नव्हती. पण तरीही त्यांना संघटनेची काळजी होती कावळ्याना दुखावून चालणार नव्हते.
“ठीक आहे….. मी शोध घेतो आणि काही महिन्यासाठी तुमची बदली करतो. पण लक्षात ठेवा जिथे जाल तिथे नीट वागा. परवा एकाची बदली केली तो एका घरी सकाळी सहा वाजता जाऊन काव काव करू लागला तेव्हा वहिनीने गरम पाणी अंगावर ओतले त्याच्या… नंतर लक्षात आले जुना कावळा सकाळी दहा वाजता तिथे जायचा “…. असे बोलून काव काव करीत श्री. कावळे उडून गेले.
त्याच वडाच्याखाली ग्रामस्थांची सभा भरली होती. श्री.मुणगेकर मास्तर अध्यक्षस्थानी होते.
“दादानो….. ह्या दिवसाचा काय तरी ठरवा. हल्ली कोण दिवसाक येऊच नाय. पाया पडून पळून जातत. जेवान किती फुकट जाता…. गावाच्या बायकांचे कष्ट वाया जातत नाय…..”?? अशोक सावंत चिडून बोलत होता.
“बरोबर हाय भाऊंचा…. हरी तिकडून बोलला. पण हातातली विडी काही टाकली नाही. लोक दिवसाक येतात ते चार लोका भेटतील …. एकत्र बसून जेवतील….. दुःख दाखवतील… पण तेराव्याचे जेवान काही बराबर नाय. किती वर्ष ताच ताच खाणार…. डाळ भात…. बिरडा खाऊन कंटाळा येता लोकांक. त्यात रविवार बुधवार असलो की घरातले सोडून बाहेरचो कुत्रो पण येऊचा नाय. एक तर लोकांका पॉटभर जेवूक घाला नाहीतर कायच देऊ नका….”
“ठीक आहे ….माका पटता. आता तुम्हीच उपाय सांगा….”?? मुणगेकरानी ग्रामस्थांना विचारले.
“गावात म्हातारी माणसे गेली तर मटनाचा जेवण ठेवू आणि भाकऱ्या ठेवू, थोडो भात… बाकी काय नाय. तीनच वस्तू…. खर्च कमी आणि काय फुकटपन जवचा नाय…… आणि कोण तरणो मेलो तर चाय चिवडा ठेवू. नायतर हल्ली म्हाताऱ्यांका कोण विचारत नाय. जेवढे लवकर जातील तेवढे चांगले. बाहेरच्यांपेक्षा घरचेच खुश होऊचे..” हरी विडीचा झुरका मारत म्हणाला.
“व्हय…. व्हय …! आमका चालता.. सगळ्यांनी हात वर केले. आणि मुणगेकरांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.