क्रिकेट ला आपला खेळातील धर्म मानणाऱ्या देशात क्रिकेट च्या कोणत्याही टुकार सामन्यात कोणाविरुद्ध जिंकलं तर फटाके वाजवले जातात. कोणत्या खेळाडूने किती धावा केल्या किंवा कोणी किती फलंदाज आउट केले ह्याच्या खमंग चर्चा होतात. पण एका आंतराष्ट्रीय क्रीडा महोत्सवात मिळालेल्या सुवर्णपदकाचं मोल मात्र भारतीयांच्या गावी ही नसते. कधी एखादी बातमी आलीच तर पेपरच्या एखाद्या कोपऱ्यात आणि ती भूतकाळात अशी विलुप्त होते की काही दिवसांनी असं काही पदक मिळालं होतं हे कोणाला आठवत ही नाही.
नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय महिलांच्या चमूने ४ X ४०० मीटर रिलेच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. हे सुवर्णपदक भारतासाठी अजून जास्ती महत्वाचं ठरतं ते ज्यांनी ह्याची कमाई केली त्या चारचौघींसाठी. ह्या चारचौघी कोण? असा प्रश्न विचारला तर ९९% भारतीयांना त्याचं उत्तर देता येणार नाही. कारण आपण क्रिकेट पलीकडे काही असते ह्याचा विचारच करत नाही. १५ वर्षापूर्वी कोणी कोणत्या सामन्यात किती धावा काढल्या हे अनेकांना माहित असते पण एक आठवड्यापूर्वी जिंकलेल्या सुवर्णपदकाच्या मानकरी कोण हे आपल्याला माहित नसते. आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रकारात जर भारताचं नाव पुढे यायचं असेल तर खेळाडूंना प्रोत्साहित करणारा सुजाण प्रेक्षक वर्ग आणि नागरिक आपण तयार करायला हवेत. कारण जेव्हा प्रोत्साहन मिळते तेव्हा आपोआप स्पर्धेत आपली अतुच्य कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.
गेल्या आठवड्यात ज्या चार जणींनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले त्यात भारताची अनुभवाने सगळ्यात वरिष्ठ असणारी आणि ह्या स्पर्धेचा अनुभव असणारी एकमेव धावपटू होती एम. आर. पुवम्मा. तिने मंगलोर मधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल असून बिझनेस मॅनेजमेंट मधली पदवी असणारी २८ वर्षीय धावपटू होती. ह्या चमूतील दुसरी धावपटू सरिता गायकवाड गुजरात राज्यातील दांग जिल्ह्यातील असून २०१० पर्यंत राष्ट्रीय पातळीवर खो-खो खेळत होती. धावण्यातील आपला वेग लक्षात घेऊन सरिता ने धावण्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं होतं. ह्या चमूतील तिसरी धावपटू व्ही. के. विस्मया केरळ मधून असून ती फक्त २१ वर्षाची आहे. तर ह्या चमूतील सगळ्यात लक्षवेधी आणि वेगवान धावपटू म्हणजे हिमा दास. अवघी १८ वर्षाची असलेली हिमा भारताच्या चमूतील एक महत्वाचा भाग होती. कोणत्याही रिले स्पर्धेत आपल्या सर्वात वेगवान धावपटूला सगळ्यात शेवटी धावण्याची संधी देण्याचा प्रघात आहे. शेवटच्या टप्प्यात काही शंताश सेकंदाने पदक निसटू नये ह्यासाठी प्रत्येक संघ ही रणनीती घेऊन स्पर्धेत उतरतो.
स्पर्धेच्या दिवशी सकाळी भारताने आपल्या अनुभवी आणि वेगवान धावपटूनां आधी ठेवण्याचं ठरवलं. बहरीन चा संघ ह्या स्पर्धेत जिंकेल असं सर्वाना वाटत होतं. त्यांच्यावर मानसिक दबाव वाढवून सुरवातीलाच मोठी आघाडी घेण्याचा विचार भारताच्या चमूने केला. मानसिक दबावाखाली पुढे येणाऱ्या विरुद्ध संघाच्या धावपटू वरचा दबाव प्रचंड वाढेल आणि ह्याचा फायदा आपल्याला होईल अशी ही रणनीती होती. अर्थात हा एक जुगार होता. कारण आधी मिळालेली आघाडी शेवटच्या टप्प्यात टिकवणं आणि एकतर ती पहिल्या टप्प्यात निर्णायक मिळवणं ह्यासाठी प्रत्येकाने आपली सर्वोत्तम वेळ नोंदवणं गरजेच होतं.
गोळी सुटली आणि स्पर्धेला सुरवात झाली. सुरवातीच्या टप्प्यात भारतीय कुठेही दिसत नसताना हिमा दास ने चित्याच्या चपळाईने आघाडी घेताना इतर धावपटूंपेक्षा जवळपास १०-२० मीटर ची आघाडी पहिल्या टप्प्यात घेतली. हीच आघाडी टिकवताना भारताच्या उरलेल्या तिन्ही धावपटूंनी सुवर्णपदकाला गवसणी घालताना ३ मिनिटे २८.७२ सेकंदाची वेळ नोंदवली. बहरीन चा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. भारत आणि बहरीन च्या वेळेतील फरक २ सेकंदापेक्षा जास्त होता ह्यावरून भारताने घेतलेली आघाडी किती निर्णायक होती हे दिसून आलं. स्पर्धा जिंकल्यावर चौघींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद दिसत तर होताच पण भारताचं राष्ट्रगीत सुरु होताच त्या चारचौघींच्या डोळ्यात दिसणारा गर्व, अभिमान प्रत्येक देशवासीयांची छाती अभिमानाने फुलून यावी असाच होता.
ज्या देशात शेकडो वर्ष स्त्री ला मुख्य प्रवाहापासून दूर आणि चूल- मुल ह्यामध्ये अडकवण्यात आलं. त्याच देशातून ह्या चारचौघीनीं देशाचं प्रतिनिधित्व करताना देशाच नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळवून टाकलं आहे. क्रिकेट पलीकडे देशात खेळ आहेत आणि त्यात मान सन्मान आहे. आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर तोडीस तोड कामगिरी करू शकतो हा आत्मविश्वास ह्या चारचौघींनी सगळ्या स्त्रियांना तर दिलाच आहे पण त्या पलीकडे देशात एका नवीन क्रांतीची सुरवात केली आहे.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.