नमस्कार मित्रांनो, रोजच्या सवयीप्रमाणे, काम करता करता, एक सिनेमा लावला, आणि काम करत होतो, पंधरा वीस मिनीटांतच पिक्चर आवडायला लागला, इतका की पुढचे दोन तास त्यातच गुंतुन गेलो.
आणि शेवटी तृप्त झालो….
आज ‘ब्लु क्रश’ नावाचा अप्रतिम चित्रपट पाहीला, इतका सुंदर सिनेमा की त्याचं वर्णन करण्याचा मोह आवरला नाही, आणि म्हणुन हा लेख!..
ही गोष्ट आहे, कॅलिफोर्नियात राहणार्या डेना नावाच्या मुलीची, तिनं आपल्या आईला लहानपणीच गमवलं आहे, डेनाची आई एक उत्कृष्ट सर्फर होती, जगातल्या बहुतांश अवघड किनार्यांवर तिनं सर्फिंग केलीय!..
डेनालाही खवळलेल्या समुद्रांच्या लाटांवर सर्फींग करायचा थरारक छंद आहे, तिच्या अशा मुक्त आणि स्वच्छंदी वागण्याला तिच्या वडीलांचा अर्थातच विरोध आहे, ते तिच्याकडुन शिक्षण पुर्ण करुन चाकोरीबद्ध जगण्याची अपेक्षा ठेवतात.
अशातच आपल्या चित्रपटाची गोड दिसणारी नायिका डेनाच्या हाती, तिच्या आईची एक डायरी लागते, त्यात तिच्या आईचे जगातल्या वेगवेगळ्या धोकादायक समुद्रकिनार्यावर सर्फिंग करतानाचे फोटो ती बघते, तिच्या आईने उराशी जपलेले एक स्वप्न होते, डेनाला घेऊन तिला, सर्फिंगच्या दुनियेत, सर्वात खतरनाक, समजल्या जाणार्या अफ्रीकेतल्या ‘जेफ्री-बे’ नावाच्या समुद्रकिनार्यावर सर्फिंग करायची इच्छा असते!…… पण त्याआधीच तिचा कॅंसरने मृत्यु होतो, आणि डेनाच्या आईचे स्वप्न अधुरे राहते.
ती डायरी वाचुन, चित्रपटाची गोड चेहर्याची, निरागस डोळ्याची, गोंडस नायिका डेना, आपल्या वडीलांना चकवा देऊन, एकटीच एका आगळ्यावेगळ्या प्रवासाला निघते, ज्या ज्या समुद्रकिनार्यावर डेनाच्या आईने समुद्राच्या लाटांवर सर्फिंग केलीय, त्या सर्व किनार्यांवरच्या उसळणार्या लाटांवर स्वैर व्हायच्या प्रवासावर ती निघते, आणि चक्क अफ्रीकेतल्या डर्बन शहरात पोहचते…..
किनार्याकडे जाण्याच्या प्रवासात तिची भेट एका हौशी सर्फर असलेल्या, पुशी नावाच्या स्थानिक तरुणीशी होते, त्या दोघींना आव्हान देणारा समुद्र भुरळ पाडतो, फेसाळलेला समुद्र आणि खवळलेल्या लाटा दिसल्या की दोघींच्या उत्साहाला उधाण येतं…….
दोघी मनसोक्त सर्फिंग करतात, त्या दोघींची घनिष्ट मैत्री होते, पुशी डेनाला आपल्या रहायच्या ठिकाणी घेऊन जाते.
नयनरम्य समुद्रकिनार्यावर ते अनेक मनमौजी सर्फर एका अनधिकृत झोपडीवजा घरात राहतायत….. तिथे डेनाची भेट राजबिंड्या, निळ्या डोळ्यांच्या, गोर्यापान ‘टिम’ शी होते, टिम मुळचा ऑस्ट्रेलियाचा, निसर्गावर, प्राण्यांवर आणि समुद्रावर असलेलं प्रेम त्याला इतक्या लांब, अफ्रीकेच्या जंगलात घेऊन आलयं.
टिमनं त्याच्या केअर-व्हॅन ला छान सजवुन त्यातच बस्तान मांडलयं, सुरेख संसार मांडलायं, आणि इथल्या हत्तींवर त्याचं विशेष प्रेम आहे.
डेनाला इथले लोक, त्यांचा स्वच्छंदीपणा, निर्भेळ जगणं, रोज खवळलेल्या समुद्रावर चढाई करणं, आणि रात्री धुंद होऊन, बेभान होवुन नाचणं-गाणं, खुप आवडायला लागतं, ती ही त्यांच्यातलीच एक होवुन जाते.
वेगवेगळ्या समुद्रकिनार्यांवर चढाई करण्याचं, डेनाचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी पुशी साथ देण्यास तयार होते, दोघींच्या ह्या आगळ्यावेगळ्या सफारीला ते ‘ओडीसी’ असं नाव देतात. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांचा नवा मित्र, ‘ग्रॅंट’, उदार मनाने, त्यांना आपली प्राणाहुन प्रिय असलेली मजबुत आणि देखणी ‘लॅंड रोव्हर’ गाडी देतो.
ह्या ओडीशी सफारीत दोघींवर अनेक संकटे येतात, पण डेना प्रत्येक संकटाला पुरुन उरते. ह्या सफारीवर, आयुष्यात सतावणार्या प्रश्नांची उत्तरे तिला सापडतात.
डेना आणि पुशीचा पहील्या दिवसापासुन तिरस्कार करणारे, टेरा आणि तिचे गुंड मित्र डेनाला विवीध प्रकारे तिला त्रास देऊ पाहतात, नाउमेद करण्याचा प्रयत्न करतात.
प्रत्येकवेळी डेना त्यांना निर्भयपणे, साहसाने सामोरी जाते, चिकाटीने लढते, आणि आपल्या अनोख्या चिवट स्वभावाने, शेवटी त्यांना आपलसंही करुन टाकते.
डेनाला समजतं की, आपल्याला आधार देणारी, जिवलग मैत्रीण, पुशीला ‘रॉक्सी प्लेअर’ व्हायचं आहे, तेे होणं, अतिशय खडतर आहे.
पुशीचं उराशी बाळगलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी डेना तिला एक नवी उर्जा देते, हिंमत देते, तिला सर्फींगचे नवनवे डाव शिकवते!
प्रसंगी वाईट होवुन, मोक्याच्या क्षणी, कच खायची पुशीची सवय मोडुन काढते आणि तिला विजयी बनण्यास भाग पाडते.
कॅलिफोर्नियाहुन डेनाचे वडील तिला शोधत अफ्रिकेत दाखल होतात, पीटरबर्ग्जला येऊन डेनाला भेटतात, सुरुवातीला त्यांच्यावर चिडलेली डेना, वडीलांना हळुवारपणे आईची डायरी आणि तिचं जगातला सर्वात धोकादायक समुद्र ‘जे-बे’ ह्याच्यावर चढाई करण्याचं स्वप्नं उलगडुन सांगते.
तेव्हा तेही तिच्या स्वप्नात सामील होतात, तिला प्रोत्साहन देतात.
चित्रपटात समुद्रकिनार्यावर चित्रीत झालेली, प्रत्येक फ्रेम, पापणीची उघडझाप करु नये, इतकी सरस, इतकी सुरेख आहे, संगीत-गाणी अप्रतिम आहेत.
डेना, नेत्रदिपक, निळ्याशार, फेसाळलेल्या समुद्रावर प्रेम करते, म्हणुन चित्रपटाचं नाव ब्लु क्रश!…..
नकळत आपल्यालाही समुद्रावर आणि निरागस डेनावर प्रेम करायला भाग पाडतो, हा आगळावेगळा ‘ब्लु क्रश’!..
सर्फिंग करता करता डेनाला तिच्या आयुष्याचा अर्थ गवसला, आपण आपलं आयुष्य का जगतोय? असा विचार करायला भाग पाडणारा ब्लु क्रश!..
आईला श्रद्धांजली देण्यासाठी, प्राणाची बाजी लावणारी डेना पाहुन, आपल्याला कशाचं वेड आणि पॅशन आहे, असं विचारुन, आपल्याला अंतर्मुख करण्यात यशस्वी होणारा, ब्लु क्रश!..
निर्भयपणे आव्हानांना सामोरे गेलं की आधी उपहास आणि विरोध करणारं जग, थक्क होवुन किनार्यावर जमा होतं, शिट्या आरोळ्या देऊन आपल्या विजयात सामील होतं, असा वेगळाच संदेश देणारा ‘ब्लु क्रश!’
मैत्री कशी करावी, मैत्री कशी निभवावीे, मैत्रीचा नव्याने अर्थ शिकवणारा, ‘ब्लु क्रश’!
इतरांचं स्वप्नं पुर्ण केल्यास, आपसुक आपलंही इप्सित साध्य होतं, हे महान रहस्य ठळकपणे मांडणारा ‘ब्लु क्रश’!
साध्या सोप्या रंजक प्रसंगातुन, गंमतीजंमतीतुन, दररोज आयुष्याचा सोहळा साजरा करण्याचं गुढ ज्ञान देणारा ‘ब्लु क्रश’!..
‘ब्लु क्रश’ चे अनेक यशस्वी सिक्वेल आहेत, त्यापैकी वर उल्लेख केला आहे तो ‘ब्लु क्रश – २’
तेव्हा मित्रांनो, हा चित्रपट अवश्य पहा, आणि तुम्हाला ‘ब्लु क्रश’ झाल्यास प्रतिक्रीया कळवा!..
धन्यवाद!..
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.