“आता dance करायचाय,” सात वर्षांची चिमुरडी सांगते आणि तिचे दोन बेस्ट फ्रेंड्स Dance साठी तयार होतात. हे बेस्ट फ्रेंड्स अनेक गोष्टी करतात. Surprise देतात, भातुकली खेळतात, लपाछपी खेळतात. आवडीचा खाऊ बनवतात. वाट्टेल तिथे बसून खाऊ देतात. तासन्तास न कंटाळता गप्पा मारतात, त्यापेक्षा ऐकतात. एकच गोष्ट रोज तशीच चार-चार वेळेस सुद्धा सांगतात. त्यांच्याशी अनेक सिक्रेट्स शेअर केले जातात. ह्या बेस्ट फ्रेंड्सचं वय असत ५८ आणि ६०. आपले आई-बाबा आणि आपल्या मुलांचे आज्जी-आबा हे एकच असले तरीही, ‘हेच का ते?’ असा प्रश्न आपल्याला पडावा एवढं त्यांचं वागणं बदललेलं असतं.
आजी-आजोबा आणि नातवंड हे नातं सगळ्यात सुंदर नातं असावं. आपले आई-बाबा म्हणून जे आपल्यावर ओरडलेले असतात, ज्या गोष्टींसाठी ओरडलेले असतात, त्याच गोष्टी ते नातवंडाना अत्यंत प्रेमाने सांगत, समजावत असतात. आपली मुलंही ज्या गोष्टींसाठी आपल्याला पळवतात त्या गोष्टी आजीकडून अगदी शांतपणे करून घेतात. माझा स्वत:चा असा समज आहे कि जगात सगळ्यांत चांगला स्वयंपाक फक्त माझ्या आज्जीला जमतो. गंमत म्हणजे माझ्या मुलीलाही तिच्या आज्जीबद्दल अगदी हेच वाटतं.
गेल्या काही वर्षांत मात्र, अनेक घरांत हे नातं बदलत चाललंय असं दिसून येतं. अनेक ठिकाणी आजी-आजोबा Baby Sitting करताना दिसतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांच्या मागे धावाधाव होत असेल का? असा प्रश्न पडतो. बर मुलांना वाढविणे म्हणजे त्यांना वेळच्या वेळी खाऊ घालणे एवढंच असतं का? नातवंडांच्या शाळा, अभ्यास, इतर क्लासेस, खोड्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीच बघायच्या असं चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळतं. नोकरी, करियर, धावाधाव ह्यांत आजी-आजोबांना पुन्हा आई-बाबांच्या रोलमध्ये शिरावं लागतं. मग ओघाने मुलांना रागावणे, चिडणे ह्या गोष्टी होतात. वाढत्या वयामुळे आलेला थकवा, हळवेपणा आणि नातवंडांची जबाबदारी ह्या गोष्टी त्यांना झेपत असतील का? हा विचार आई-बाबांनी करावा.
एक गरज म्हणून आजी-आजोबांची थोडीशी मदत घेणं, हि गोष्ट वेगळी आणि पूर्णपणे आजी-आजोबांवर मुलांना सोपविणे हि गोष्ट वेगळी. अनेक घरांमधून हा Balance ढळलेला दिसतो. ह्याचा परिणाम मग आजी-आजोबांशी असणाऱ्या नात्यावर दिसून येतो. नातवंडांना पाहण्याची, त्यांच्याशी खेळण्याची इच्छा कमी-कमी होत जाते. मग आजी-आजोबा रोज त्याच राजाची तीच गोष्ट चार-चार वेळेस सांगू शकत असतील का? खेळू शकत असतील का? बेस्ट फ्रेंड्स होऊ शकत असतील का?
अनेक घरांमध्ये सुनेशी, जावयाशी असणाऱ्या वादाचा परिणाम ह्या नात्यावर झालेला दिसून येतो. माझ्या मुलाला तुम्ही काही बोलायचं नाही असं आईवडिलांचं म्हणणं असतं. जणूकाही तुमचा मुलगा त्यांचा कुणीच नाही. आजी-आजोबांचं सांगणं मग मुलंही हवेत उडवून लावतात. तर काही वेळेस आजी-आजोबांचा मुलांवर एवढा पगडा असतो कि, मुलं आईला किंवा वडिलांना मोजतच नाहीत. ह्यादोन्ही गोष्टींसाठी मुलांचे आई-वडील जेवढे जबाबदार असतात तेवढेच आजी-आजोबाही. पण ह्यांतून मुलं एका सुंदर नात्याला मुकतात. कारण, मग आजी-आजोबांकडे जाणे ह्या गोष्टीवर बंधनं टाकली जातात.
आजी-आजोबांशी असणारं मैत्रीचं नातं एक माणूस म्हणून फार समृद्ध बनवणारं असतं. वर सांगितल्याप्रमाणे, अनेक आजी-आजोबा मुलांना अनेक गोष्टी नकळत शिकवतात. मुलांशी गप्पा मारतात. त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगू शकतात. आई-बाबा आणि मुलं ह्यांना सांधणारा पूल होऊ शकतात. अनुभव आणि त्यांतून आलेली परिपक्वता, मुलांना वाढविताना पडलेले अनेक प्रश्न ह्यासगळ्यांसाठी आजी-आजोबा असणं आणि त्यांच्याशी आजी-आजोबांचंच नातं असणं गरजेचं असतं.
वाचण्यासारखे आणखी काही…
चित्रपट
खगोल / अंतराळ
प्रेरणादायी
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.