गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातील अगदी नाजुक काळ असतो.
त्या काळात कोणतेही औषध किंवा इंजेक्शन घेणे काळजीचे वाटू शकते. असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे.
त्यामुळेच अनेक गरोदर महिला कोविडची लस घेण्यास देखील घाबरत आहेत.
परंतु त्यामुळे त्यांना गरोदरपणात किंवा बाळंत होत असताना कोविड होणे, होणाऱ्या बाळाला कोविड होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
परंतु २ जुलै पासून सरकारने गरोदर महिलांना कोविडची लस देण्यासाठी मान्यता दिली आहे. सदर मान्यता ही भारतीय लसीकरण परिषद आणि भारतीय स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांचा विभाग ह्यांच्या सल्ल्याने देण्यात आली आहे.
The Ministry of Health has given the guideline that vaccine can be given to pregnant women. Vaccination is useful in pregnant women and it should be given: Dr Balram Bhargava, DG, ICMR#COVID19 pic.twitter.com/Mr5vBiRMhz
— ANI (@ANI) June 25, 2021
त्यामुळे आता गरोदर महिलांनी निर्भयपणे कोविडची लस घेण्यास हरकत नाही.
गरोदर महिलांना लस घेणे सुरक्षित आहे ना ह्याच्या पुरेशा चाचण्या करून सदर लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी ह्यासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर विशेष प्रयत्नशील होते कारण कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वांना कोविडचा जास्त धोका निर्माण झालेला दिसून येत होता.
परंतु कोविड लसीकरण ऐच्छिक असल्यामुळे आणि मनातील अनेक शंकांमुळे अनेक महिला कोविडची लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत असे दिसून आले आहे. अशा महिलांना लसीद्वारे कोविडपासून संरक्षण मिळावे म्हणून आज आपण ह्या विषयातल्या शंकांची उत्तरे शोधणार आहोत.
प्रश्न १.) गरोदर महिलांनी कोविडची लस का घ्यावी?
उत्तर – कोविड हा आजार कोणालाही, केव्हाही होऊ शकतो. त्यावर अजूनही ठोस औषध मिळालेले नाही. मास्क वापरुन आणि सोशल डिस्टनसिंग पाळून आपण कोविड पासून बचाव करू शकतो. परंतु शिवाय जर लस घेतलेली असेल तर जास्त संरक्षण मिळू शकते. म्हणून गरोदर महिलांनी कोविडची लस घ्यावी.
प्रश्न २.) गरोदर महिलांना कोविडच्या इन्फेक्शनचा इतरांपेक्षा जास्त धोका आहे का?
उत्तर – नाही, गरोदर असल्यामुळे कोविड होण्याचा धोका जास्त आहे असे अजिबात नाही. इतरांना जसा कोविडचा धोका आहे तसा आणि तेवढाच गरोदर महिलांना आहे. हेल्थ वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिला, तसेच घराबाहेर पडून काम करणाऱ्या महिला ह्यांना कोविडचा धोका जास्त असू शकतो. परंतु त्याचा गरोदरपणाशी थेट संबंध नाही.
प्रश्न ३.) कोविड झाला तर त्याचा गरोदर महिलेच्या तब्येतीवर काय परिणाम होतो?
उत्तर – कोविड झाला तरी ९०% गरोदर महिला घरीच औषधोपचार करून बऱ्या होतात. केवळ १०% महिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागू शकते. त्यातही फार थोड्या महिलाना आयसीयू मध्ये ठेवण्याची वेळ येऊ शकते.
प्रश्न ४.) पोटातील बाळावर कोविडचा परिणाम होऊ शकतो का?
उत्तर – बहुतांश बाळांना कोविडची लागण होत नाही असे दिसून आले आहे. मात्र कोविड झालेल्या महिलेची प्रसूती लवकर होऊ शकते (प्रीमॅचुअर) आणि त्यामुळे नवजात बाळाचे वजन कमी असण्याची शक्यता असते.
प्रश्न ५.) गरोदर स्त्री अथवा पोटातील बाळाला लसीचे काही साइड ईफेक्टस् जाणवतात का?
उत्तर – कोणत्याही लसी प्रमाणेच कोविडच्या लसीने देखील ताप येणे, लस दिलेल्या जागेवर दुखणे आणि अंगदुखी होणे अशा सारखे साइड इफेक्टस दिसतात. परंतु ते २ ते ३ दिवसात कमी देखील होतात. पोटातील बाळावर लसीचा कोणताही दुष्परिणाम होताना दिसत नाही. जर काही गंभीर परिणाम जसे की श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, फिट येणे, खूप जास्त ताप येणे दिसले तर मात्र त्वरित डॉक्टरांना दाखवावे. अर्थात अशा प्रकारचे गंभीर साइड इफेक्टस होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
प्रश्न ६.) गरोदर महिलेने कोविडची लस केव्हा घ्यावी?
उत्तर – गरोदरपणात केव्हाही कोविडची लस घेता येते. ती संपूर्णपणे सुरक्षित आहे.
प्रश्न ७.) गरोदर स्त्रियांनी लसिकरणासाठी कसे रजिस्टर करावे?
उत्तर – गरोदर स्त्रियांनी इतरांप्रमाणेच रजिस्टर करून लस घ्यावी,
प्रश्न ८.) ज्या महिलेला गरोदर असताना आधीच कोविड झाला असेल तिने लस केव्हा घ्यावी?
उत्तर – गरोदरपणी कोविड झाला असेल तर त्या स्त्रीने डिलिव्हरी झाल्यावर लवकरात लवकर लस घ्यावी.
प्रश्न ९.) कोणत्या गरोदर महिलांना कोविडची रिस्क जास्त आहे?
उत्तर – ज्या गरोदर महिलांचे वय ३५ पेक्षा जास्त असेल, ज्या स्थूल असतील, ज्यांना मधूमेह, दमा असे आजार आधीपासून असतील त्या महिलांना कोविडची रिस्क जास्त असू शकते.
तर ही आहेत गरोदर महिलांच्या मनातल्या लसीकरणाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे.
पण मैत्रिणींनो, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. न घाबरता लस तर घ्याच. पण लस घेतली म्हणून कोविडसंबंधी काळजी घेणे बंद करू नका.
१. डबल मास्क वापरा.
२. गर्दीत जाणे टाळा.
३. सोशल डिस्टनसिंगचे पालन करा.
४. वारंवार हात धुवा.
अशा रीतीने गरोदर महिला निःशंक मनाने लस घेऊन आणि स्वतःची योग्य काळजी घेऊन कोविडला दूर ठेऊ शकतात.
तर मित्र मैत्रिणींनो ह्या लेखातील माहितीचा लाभ जरूर घ्या,
हा लेख जास्तीत जास्त शेअर करून सर्वांपर्यंत पोचवा म्हणजे आपण भावी माता आणि येणाऱ्या नव्या पिढीला कोविडमुक्त ठेऊ शकू.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.