प्रश्न – मागच्या एका वर्षात, माझ्या आयुष्यात अनेक उलथापालथी घडल्या.
पगाराच्या अमिषाने मी माझी चांगली नौकरी सोडली, नव्या नौकरीमध्ये पुर्णतः फसवला गेलोय.
क्षुल्लक कारणामुळे माझा घरच्यांशी वाद झाला, आम्ही नवराबायकोने अंगावरच्या कपड्यांनिशी गाव सोडले.
एकीकडे घरच्यांपासुन वेगळा झाल्याचं दुःख डाचत आहे, दुसरीकडे पगार कमी असल्यामुळे मानसिक तणावात आहे. काय करु?
मित्र, नातेवाईक आणि समाजात चेष्टा उपहास केला जात आहे, तो वेगळाच!
मानसिकरित्या मी खचुन गेलो आहे, मला मदत करा, सर!
१. समस्या मुक्त जीवन
न्युयॉर्कच्या पाचव्या अव्हेन्युमध्ये बसलेल्या, नॉर्मन विंसेट पील यांना एका सभेला जायचे होते. तेवढ्यात एक माणुस त्यांच्या ऑफीसमध्ये येतो, “मि. पील., मला मदत करा, माझ्यासमोर भयानक समस्या आहेत, मला यापासुन मुक्ती हवी आहे.”
डॉ. पील त्याला म्हणतात, “मला एक जागा ठाऊक आहे, जिथे कोणालाही समस्या नाही, तुला ती जागा बघायची आहे का?”
“हो, हो, अवश्य!”
मग डॉ. पील त्यांच्या घराजवळच्या स्मशानभुमीत त्या माणसाला घेऊन गेले, “जंटलमन, पृथ्वीवर ही अशी एकच जागा आहे, जिथे कोणालाच कसलीच समस्या नाही.”
२. समस्या संधी असतात.
ही वाक्ये तुमच्या मनात येतात का?
“हे प्रश्न माझ्या जीवनात नसले असते, तर सगळे छान झाले असते, बरं!”
“ही जीवघेणी समस्या मला छळते, समस्या असणं वाईट आहे!”
“ह्या प्रश्नानं माझ्या आयुष्यातला आनंद हीरावुन घेतला आहे.”
- समस्या सिद्ध करतात, की तुम्ही जिवंत आणि कार्यक्षम आहात.
- तुमच्या जीवनाला वेगळे वळण देण्यासाठी समस्या आलेल्या असतात.
- परीक्षा असल्याशिवाय मुले अभ्यास करतील का?
- प्रश्न पडल्याशिवाय उत्तरे गवसतील का?
- तापवल्याशिवाय सोन्याला झळाळी येईल का?
- हातोडा-छिन्नीचे घाव सोसल्याशिवाय सुंदर मुर्ति बनेल का?
- प्रत्येक यशस्वी माणुस समस्यांना फेस करुनच तिथं पोहचला आहे.
- प्रत्येक समस्या आपल्याला घडवत आहे, मजबुत बनवत आहे. काहीनाकाही शिकवत आहे.
तेव्हा विश्वास ठेवा, ‘मेहनत का फल और समस्या का हल’ जरुर मिलता है!
३. चार प्रकारच्या समस्या
साधारणतः चार प्रकारचे प्रश्न असतात.
पैसा, नातेसंबंधात तणाव, प्रकृती अस्वास्थ्य आणि भीती, शंकाकुशंका आणि चिंता, एकटेपणा यांनी भरलेले मन!
यातली प्रत्येक समस्या सोडवता येते, कारण आयुष्यात केव्हा ना केव्हा प्रत्येक माणसाला यातुन जावे लागलेले असते. तरीही आपल्या अवतीभवतीचे आनंदाने जगत असतात.
- एखाद्याला वाटत असेल की परिस्थीती बिकट आहे, तर माफ करा, तुम्ही समस्येला वाढवुन चढवुन बघत आहात.
- सत्यान्नव टक्के चिंता मनातच राहतात, त्या प्रत्यक्षात कधीच येत नाहीत.
- स्वतःवर आणि देवावर अतुट विश्वास हे प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी लागणारं बळ निर्माण करतात.
४. आर्थिक प्रश्न
- आर्थिक समस्या आहेत म्हणुन तुम्ही प्रयत्नाचा वेग किती वाढवला?
- समस्यांना मनात घोळवल्याने माणुस आळशी बनतो, बारा बारा तास झोपतो.
- समस्यांना पाठ दाखवुन पळणारा खरा मर्द नाही, समस्यांशी लढणारा खरा मर्द आहे.
- प्रत्येक अतिश्रीमंत माणुस कधीतरी गरीब होता, ते तुम्हाला माहित नाही, इतकचं!
हसत रहा, आनंदी रहा, दोन टाईम खायला भेटतं, त्यासाठी देवाचे मनापासुन आभार माना, मोठ्ठी ध्येय बाळगा, प्रामाणिकपणे मेहनत करा, सुख आणि समृद्धी यांना तुमच्यासाठी दार उघडावेच लागेल.
५. समस्यांसह जगणे
- असे का घडले? माझा दोष काय? ते असे का वागले? जग असे का आहे? माझे नशीब खराब आहे का? असल्या फालतु प्रश्नांमध्ये उर्जा खर्च करणाऱ्यांपैकी एक बनु नका, तो अपयशी लोकांचा गुणधर्म आहे.
- समस्यांचा हसतमुखाने स्वीकार करा.
ऋतु बदलतात, रात्रीनंतर दिवस येतो, अगदी तसेच कितीही अडचणीचे दिवस असले तरी हे ही दिवस जातील. जाता जात तुम्हाला खुप काही शिकवुन जातील. त्यांचे आभार मानायला विसरु नका.
६. तळ गाठणे म्हणजे नवी सुरुवात!
वार्षिक दहा लाख रुपये कमवणारा मी जेव्हा दोन हजार चौदाच्या दुष्काळात प्रचंड कर्जबाजारी झालो होतो, तेव्हा माझं मन मला ओरडून ओरडुन म्हणायचं, “पंकज, यापेक्षा वाईट काहीच असु शकत नाही. संपलं सारं!”
पण एके दिवशी अचानक समजलं, “आता मी स्वतःला सिद्ध करायला मोकळा आहे, कसलचं ओझं नाही, नावडती नौकरी नाही, कुणाचाच दबाव नाही, हातात कुठलेच काम नाही, वेळच वेळ आहे, आता मी स्वतःवर काम करेन, पुस्तकं वाचेन, मोठ्मोठी ध्येयं ठरवेन, उघड्या डोळ्यांनी भव्यदिव्य स्वप्न बघेन.”
“याच्यापेक्षा वाईट होणार नाही म्हणजे यापुढे सगळं चांगलंच होणार!”
त्या क्षणी, अगदी त्या एका अनमोल क्षणी, त्या एका विचारानं, माझं आयुष्य बदललं.
“सगळं संपलं, म्हणजे नवी सुरुवात पण होणार ना!”
बस्स! ह्या एका विचाराने मला ताकत दिली.
आज मी आर्थिक स्वतंत्र आहे. नौकरी धंदा नाही केला तरी आयुष्यभर बसुन खाऊ शकेन अशा गुंतवणुकी मी उभ्या केल्या. ह्याचे क्रेडीट तेव्हाच्या त्या भयंकर संकटाला आणि तेव्हाच्या त्या अपयशालाच जाते.
माझ्या आयुष्यात समस्या आल्या म्हणुनच हे शक्य झालं.
समस्या आल्या की त्यातुन बाहेर पडण्यासाठी डोकं चालु लागलं.
नवे रस्ते सुचले, नव्या वाटा मिळाल्या, नवी उमेद मिळाली.
स्वतःला स्वतःची नव्याने ओळख झाली.
ज्यामुळे जगाला मी माझी नवी ओळख करवुन देऊ शकलो.
आणि माझा पक्का विश्वास आहे जर हे मी करु शकतो, तर तुम्हीही नक्की करु शकता.
कारण आपल्या सगळ्यांमध्ये देवाने सारखीच शक्ती ठेवलेली आहे.
शुभेच्छा आणि धन्यवाद!
वाचण्यासारखे आणखी काही…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
I want to join ur course sir
सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.
धन्यवाद.
माझ्या व्हॉट्सएप कोर्स करण्यास उत्सुक आहात, यासाठी धन्यवाद! सध्याचा कोर्स सुरू होऊन एक महिना झाला आहे, तो अजून एक महीना चालणार आहे, पुढच्या कोर्सची माहिती वेळोवेळी मनाचे टोक्स आणि फेसबुकवर दिली जाईल!..
धन्यवाद आणि शुभेच्छा!