मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करणं हे सक्तीचं नसलं तरी गरजेचं मात्र आहे. मृत्यूपत्र करताना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेपेक्षाही कठीण काम असत ते मालमत्तेचं वर्गीकरण आणि विभाजन. सगळ्या मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येत नाहीत. जरी सर्व मालमत्ता तुमच्या स्वतःच्या मालकीच्या असल्या तरी काही मालमत्ता या संबंधीत कायद्यांनुसारच हस्तांतरित केल्या जातात किंवा त्या मालमत्तांसाठी मालकी हक्क निर्माण होतानाच लाभार्थीचं (beneficiary) नाव नमूद करावं लागतं.
त्यामुळे या मालमत्तांची तरतूद मृत्यूपत्रात केल्यास एका मालमत्तेसाठी एकापेक्षा जास्त लाभार्थींची (Multipal Beneficiary) तरतूद केली जाऊ शकते व त्यामुळे मालमत्ता हस्तांतरित करण्यावरून विनाकारण निर्माण होणाऱ्या गोंधळाचाही सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठीच सामान्यतः ज्या मालमत्तांच्या हस्तांतराची तरतूद अगोदरच केलेली असते किंवा तशी करणे कायद्याने बंधनकारक असते, अशा मालमत्तांची तरतूद मृत्यूपत्रात करता येत नाही. यामध्ये प्रामुख्याने खाली नमूद केलेल्या मालमत्तांचा सामावेश करण्यात येतो.
आयुर्विमा पॉलिसी ( Life Insurance Policy)
प्रत्येक आयुर्विमा पॉलिसीमध्ये सुरुवातीपासूनच लाभार्थी (beneficiary) नमूद केलेला असतो. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूपश्चात पॉलिसीची रक्कम पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या लाभार्थीलाच मिळते. त्यामुळे या विमा पॉलिसीची नोंद मृत्यूपत्रामध्ये सामाविष्ट करता येत नाही. परंतु विमा कायद्यानुसार (Insurance Act) पॉलिसीमध्ये लाभार्थीचं नाव बदलता येतं.
निवृत्तीवेतन, निवृत्ती प्लॅन (Retirement plans, pensions)
निवृत्तीवेतन विमा अथवा पेंशन फंड यासाठी तरतूद करताना जेव्हा फॉर्म भरला जातो तेव्हा त्याचवेळी त्यामध्ये लाभार्थीचं (beneficiary) नाव नमूद केलेलं असतं. त्यामुळे सदर मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये सामाविष्ट करता येत नाही.
(यासंदर्भात मात्र भिन्न मते आहेत. काही केसेसमधील हाय कोर्टाचे निकाल या नियमाविरुद्ध जाणारे आहेत. परंतु प्रत्यक्ष कायद्यान्वये अशी कोणतीही दुरुस्ती (amendment) करण्यात आलेली नाही. काही परिस्थितीमध्ये दोन वेगवेगळ्या ॲक्टमधील तरतूदी परस्परविरोधी जाऊ शकतात. अशावेळी केसची परिस्थिती, साक्षी-पुरावे व त्या केसवर असणाऱ्या विशिष्ठ कायद्याचा प्रभाव इत्यादी गोष्टी विचारात घेऊन हाय कोर्टाकडून निर्णय दिले जातात. त्यामुळे येथे ठाम मत मांडणे तसं कठीण आहे.)
स्टॉक्स आणि बॉंड्स (Stocks and bonds)
यामध्येही फॉर्ममध्ये नमूद केलेल्या लाभार्थीला (beneficiary) सर्व मालमत्ता देण्यात येते. त्यामुळे सहाजिकच या मालमत्ता मृत्यूपत्र करताना विचारात घेतल्या जात नाहीत. परंतु ब्रोकरेज कंपनीशी बोलून लाभार्थीचं नाव बदलता येतं.
प्रॉपर्टी इन लिविंग ट्रस्ट (Property in a living trust)
प्रोबेट टाळण्याचा एक मार्ग म्हणजे प्रॉपर्टी इन लिविंग ट्रस्ट. यामध्ये समाविष्ट केलेली मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये सामाविष्ट करता येत नाही. लिविंग ट्रस्टमधील मालमत्ता आपोआप लाभार्थींना जाते आणि त्याचे ट्रस्टीद्वारे व्यवस्थापन केले जाते आपण ही व्यवस्था बदलायची असल्यास, ट्रस्ट फॉर्म व कागदपत्रांद्वारेच करावे लागेल. यासाठी आपण मृत्यूपत्रात तरतूद करु शकत नाही.
संयुक्त भाडेपट्टीची मालमत्ता (Joint tenancy property)
या मालमत्तेचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, संयुक्त मालकी धारकांपैकी एकाचा मृत्यू झाल्यास त्याचे मालमत्तेमधले हितसंबंध हे उत्तरजीवित्त्वाच्या अधिकारान्वये इतर संयुक्त मालकांना (joint tenant) प्राप्त होतात आणि असे शेवटचा संयुक्त मालकीधारक जीवित असेपर्यंत चालत राहतं. मग असा शेवटचा संयुक्त मालकीधारक हा त्या मालमत्तेचा संपूर्ण मालक म्हणून ती मालमत्ता धारण करतो. त्यामुळे सदर मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये सामाविष्ट करता येत नाही. यामध्ये मालमत्तेचे हक्क मृत्यूपश्चात कायद्यानुसार दुसऱ्याच्या नावे केले जात असल्यामुळे मृत्यूपत्राद्वारे तिसऱ्याच व्यकीच्या अथवा ट्रस्ट च्या नावे करणे शक्य नाही.
या मालमत्तांचा उल्लेख मृत्युपत्रात केला जात नाही असा सर्वसाधारण कायदा आहे. परंतु या मालमत्तांसंदर्भातील हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय हे या नियमाच्या विरोधातही असू शकतात. कारण या मालमत्तांशी संबंधित इतर कायदे व त्यामधील तरतुदी तसेच प्रत्येक केसची परिस्थिती यांवर हे निर्णय ठरत असतात. परिस्थितीजन्य साक्षी पुरावे हा कोर्टाच्या निर्णयाचा एक महत्वाचा भाग असतो. त्यामुळे कोर्टाचे काही निर्णय हे सर्वसामान्य नियमांना छेद देणारे असू असतात.
Disclaimer: सदर लेखाचा हेतू हा अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे असून, उपरोक्त विषयासंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकील/चार्टर्ड अकाउंटंट/सल्लागार अथवा तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत.
मृत्युपत्र गरज आणि मार्गदर्शन: लेखक. ऍडव्होकेट अरुण गोडबोले या पुस्तकाच्या अमेझॉनद्वारे खरेदीसाठी येथे क्लिक करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.