तर्कशुद्ध बुद्धी वापरायची म्हणजे खूप जड असं काही करायचंच नाही. “Just use your common sence which is not so common”.
जन्माला आल्यावर काही गोष्टी आपल्याला आपसुकच मिळतात. म्हणजे आपले आई–वडील, आपले भाऊ– बहिण, आपले नातेवाईक, आपला देश आणि त्या देशातील चालीरीतींमध्ये असलेले धर्म आणि जात पण.
खरे तर माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म मानून आयुष्य जगायचं सोडून आपण अचानक ह्या नवीन निर्माण झालेल्या व्यवस्थेत स्वतःला गुंतवून घेतो. नावा मुळे मिळालेल्या आपल्या ओळखीला आडनावाची जोड मिळाली की मग त्याला जाती आणि धर्माचा शिक्का लागतो.
आपण मोठे होत जातो ते अनेक संस्कारामधून ह्यातील बरचसे आपल्याला आपल्याला कुटुंबातून मिळत असले तरी काही मात्र आपण ज्या समाज व्यवस्थेचा भाग असतो त्यातून मिळत असतात.
जिकडे अमृतासोबत विष निघते तिकडे चांगल्या सोबत वाईट ही आपल्या पर्यंत ह्याच सर्व व्यवस्थेतून येते. मग ते कुटुंब असो वा समाज. दोन्हीकडून घेण्यासारखं बरंच काही असतं.
एका वयापर्यंत आपण सर्वच जे समोर येते तसे घेतो. पण एका वयानंतर आपण आपल्याला हवं तसं निवडून घेतो. ही प्रगल्भता आपल्याला आपले शिक्षण, आपले अनुभव किंवा इतर तत्सम गोष्टी देतात ज्या आपल्या एकूण व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकत असतात.
आपण एका जातीत जन्माला आलो म्हणून त्या जातीतील सगळ्याच गोष्टी चांगल्या किंवा वाईट असतील असं मुळीच नाही. त्यातलं काय चांगल आणि काय वाईट निवडायचं ह्याचा निर्णय आपल्याला घेता यायला हवा.
पण अनेकदा आपण दुसरे काय निर्णय घेतात ह्यावर आपले निर्णय ठरवतो. समाज काय म्हणेल? ह्यावर आपले निर्णय घेतो. खरे तर समाज कोण असतो.
तुमच्या आमच्या सारखे लोकच ना? जर एक माणूस दुसऱ्या माणसा सारखा नाही तर समाजातील विचार हे एकसारखे कसे असतील? त्यामुळे समाज तुम्ही कोणताही निर्णय घेतला तरी चांगल वाईट दोन्ही बोलणारच.
समाजाने काही ठरवलं आणि जर गोष्टी आपल्याला पटत नसतील तर त्याचं अनुकरण करण्याचं बंधन आपण झुगारु शकतोच. एखादी गोष्ट समाज वाईट आणि चुकीच्या पद्धतीने करत असेल तर आपण त्या समाजाचे भाग म्हणून मूक संमती द्यायची की त्या विरुद्ध योग्य त्या शब्दात आणि योग्य त्या मार्गाने विरोध करायचा ह्याचा निर्णय आपल्याला घेता यायला हवा.
आपण जर समाजातील एक घटक असू तर आपण म्हणजे समाज नाही हे पण तितकच आपल्या धान्यात असायला हवं. हेच तत्व प्रत्येक समाजातील व्यक्तीला लागू आहे. म्हणून कोणतीही जात, धर्म अथवा पंथ असो त्यातील प्रत्येक घटक चांगला किंवा वाईट असा नसतोच.
पण जर त्या समाजातील अनेक घटक एक दुसऱ्याचं बघून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून जर अंधानुकरण करत असतील तर मात्र समाजाची एक प्रतिमा नक्कीच निर्माण होते. आता त्या प्रतिमेत आपण प्रत्येकाला तोलायचं की प्रतिमेच्या छायेतून आपण योग्य ती मतं बनवायची हे आपण ठरवायचं.
समाजात तेढ निर्माण करायला वेळ लागत नाही. कारण भावनेच्या आहारी जाऊन आपली तर्कशुद्ध बुद्धी बाजूला टाकणारे आपल्याकडे कमी नाहीत.
आता तर्कशुद्ध बुद्धी वापरायची म्हणजे खूप जड असं काही करायचंच नाही. “Just use your common sence which is not so common”.
हा “कॉमन सेन्स” म्हणजे काय तर आपली प्रगल्भता जी की इतकी सोप्पी असते. पण त्याचा अभ्यास खूप कमी जण करतात. आपण समाजाला काय देतो?
ह्याचा विचार आपण जेव्हा करू तेव्हा आपण योग्य की अयोग्य ह्या तराजूत योग्य तो निर्णय घेऊ शकू. कोणाला कमी लेखून आपली उंची वाढवण्यापेक्षा आपली उंची आपल्या प्रगल्भेतून वाढवणं हे आपल्याला जमलं तर आपल्या मतांचा समाजाला नक्कीच सकारात्मक उपयोग होईल.
माणुसकी हा आपला धर्म आहे आणि आपण जिकडे राहतो तो देश म्हणजे आपला समाज. शाळेतली प्रतिज्ञा पुस्तकापुरती रहाते तेव्हा समाजाची वाटचाल अधोगतीकडे होते.
ज्या वेगाने आपण ग्लोबलायझेशन कडे जात आहोत. तेव्हा आपल्या समाजाची क्षितिज देशाच्या भिंती जुगारून पूर्ण जगाच्या दिशेने विस्तारात आहेत. पण आपण जर भूतकाळातल्या गोष्टी काढून पुन्हा त्यातच रमणार असू तर नक्कीच आपला समाज आपल्याला कळला नाही हेच खरे!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.