भारतीय सैन्यामध्ये ‘गोरखा रेजिमेंट’ ला एक विशेष स्थान आहे.
आपले सध्याचे सैन्यप्रमुख जनरल बी. पी. रावत आहेत.
किंवा देशाचे याआधीचे सैन्यप्रमुख दलवीर सिंग सुहाग दोघेही गोरखा रेजिमेंट मधुनच आहेत.
एवढचं काय आपले पहिले आर्मी चीफ फिल्ड मार्शल सॅम माणकेशॉ हे सुद्धा गोरखा रेजिमेंटमधलेच!
दुसर्या महायुद्धामध्ये ब्रिटीशांकडुन लढताना गोरखा रेजिमेंटने असा काही पराक्रम गाजवला की जर्मनीचा सेनाप्रमुख हिटलर म्हणाला की असं शुर सैन्य माझ्याकडे असलं असतं, तर मी जगावर राज्य केलं असतं!
मित्रांनो, अशा शुर आणि नावाप्रमाणाचं बहादुर असलेल्या गोरखा रेजिमेंटमधल्या एका वीर योद्ध्याची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे.
ह्या एका योद्ध्याने, स्वतःच्या हिंमतीवर, अख्ख्या कारगिल युद्धालाच एक नवे वळण दिले.
त्याने उच्चारलेले शब्द माझ्या कानात गुंजतात, आणि प्रत्येक वेळी ते शब्द ऐकुन माझ्या अंगावर काटे येतात.
“जर स्वतःला सिद्ध करण्याच्या आधी मरण आलचं तर मी मृत्युलाही मारुन टाकीन.”
त्या साहसी वीराचं नाव कॅप्टन मनोज कुमार पांडे! २५ जुन १९७७ मध्ये उत्तर प्रदेशच्या सीतापुर गावात त्यांचा जन्म झाला. वडील सैन्यात होते, आणि मुलानंही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय सैन्यात प्रवेश केला.
एनडीए च्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला, “आर्मी जॉईन करण्याचा उद्देश्य काय?”
“मला परमवीरचक्र मिळवायचं आहे.”
त्याचं उत्तर ऐकुन मुलाखत घेणारे स्तब्ध झाले, “तुला माहित आहे का परमवीरचक्र कुणाला दिले जाते?”
“हो, बर्याचदा ते मृत्युनंतर दिले जाते, पण मला ते जिवंतपणीच मिळवायचे आहे.”
कॅप्टन मनोज आर्मीत भरती झाले.
४ मे १९९९. ऑपरेशन रक्षक करता कॅप्टन मनोजपांडे आणि गोरखा रेजिमेंटमधल्या त्यांच्या साथीदारांना कारगिलला जाण्याचा आदेश मिळाला.
पाकिस्तानी सैन्याने पाकव्याप्त काश्मिरपासुन जवळ असलेल्या खालुबार नावाच्या जागेवर कब्जा केला होता, पाकिस्तानी सैन्याला मागुन शस्त्रात्रे, अन्नसामुग्री आणि इतर रसद मिळत होती.
घुसखोरांना समोरुन नष्ट करणं, अवघड जात होतं, म्हणुन त्यांच्या पाठीमागुन त्यांच्यावर हल्ला करता येईल का? हा विचार सुरु झाला.
जर ‘खालुबार’ ह्या ठिकाणाहुन पाकिस्तानी सैन्याला हुसकावुन लावले तर युद्धाचं पारडं आपल्या बाजुने फिरवता येईल, असा निश्चय झाला आणि तसा प्लान बनवला गेला.
जबाबदारी कॅप्टन पांडे आणि कॅप्टन राय यांना देण्यात आली.
पराक्रमी गोरखा सैन्य चौदा तास अथक चढाई करुन खालुबारच्या शत्रुच्या तळाजवळ पोहचलं.
दुर्दैवाने शत्रुला संशय आला आणि अचानक दोन दिशांनी आपल्या सैन्यावर अखंड गोळीबार सुरु झाला, कॅप्टन मनोज अजिबात डगमगले नाहीत, प्रत्युत्तर देत त्यांनी चढाई सुरु ठेवली.
दुश्मन परेशान झाला, त्याने तोफा डागल्या.
कॅप्टन मनोज यांना माहित होतं, शिखरावर भारतीय सैन्याचा कब्जा होणं हे किती महत्वाचं आहे, असं झाल्यास, अख्ख्या कारगिल युद्धाचं रुप पालटुन गेलं असतं.
चवताळलेल्या पाकिस्तानी सैन्याने ह्या सैन्याला थोपवण्याचा आणि नष्ट करण्याचा चंग बांधला, एअर बर्स्ट बॉम्ब, रायफल, रॉकेट लाँचर, मॉर्टरचे गोळे यांचा भडिमार केला. सगळं सगळं वापरलं.
एअर बर्स्ट एक असा बॉम्ब असतो, जो हवेत फुटतो व त्यातुन हजारो छर्रे बाहेर पडतात, ह्या अनपेक्षित हल्ल्याने आपले अनेक सैनिक गंभीर जखमी झाले.
अनेक शुर शिपाई धारातिर्थी पडले. चकमक दिवसभर चालली, रात्र झाली.
भारतीय सैन्यातले फक्त शेवटचे साठ सैनिक शिल्लक होते.
‘मरुत किंवा मारुन काढुत’ ह्या लढाऊ बाण्याने काळ्याकुट्ट मध्यरात्री त्यांनी शत्रुच्या बंकरवर पुन्हा एक चढाई करण्याचे ठरवले,
परिस्थीती अत्यंत विपरीत –
समोर होता, युद्धसज्ज, शस्त्रांची जय्यत तयारी करुन बसलेला, आपल्याला वरचढ असलेला, आपल्या आक्रमणानी चवताळलेला घातक आणि सावध शत्रु.
असा शत्रु आपल्या रक्ताला आसुसलेला असताना, त्याला मारायला जाणं, म्हणजे साक्षात मृत्युची गळाभेट! तरीही ते त्याला बेडरपणे सामोरे गेले.
किती धैर्य असेल त्या निधड्या छातीमध्ये!
जिंकण्याचा निर्धार करुन, मोठमोठ्या दगडाआड लपलेले, कॅप्टन राय आणि कॅप्टन मनोज तीस तीस सैनिकांना घेऊन शत्रुच्या बंकरच्या दिशेने निघाले.
त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार फक्त दोन बंकर होते, मात्र इथेही गफलत झाली, प्रत्यक्षात सहा बंकर होते, म्हणजे अपेक्षेपेक्षा शत्रुची संख्या तिप्पट होती.
घनघोर अंधार होता, अशा वेळी समोरील हालचाली टिपण्यासाठी इल्युमिनेटींग राऊंड फायर करतात, ज्यामुळे तीनचार मिनीटे आकाश दिव्यांनी लख्ख उजळुन निघतं.
पाकिस्तानी सैन्याने एकामागोमाग अनेक राऊंड फायर केले.
कॅप्टन मनोज पांडेनी आपल्या सहकार्यांना मागे ठेवलं आणि स्वतः पुढं आले, त्यांच्याच दिव्यांच्या उजेडात त्यांनी पाकिस्तानी लष्काराची लोकेशन पाहुन घेतली, आणि गोळ्यांचा पाऊस पडु लागताच, क्षणात दगडामागे गेले,
“जय महाकाली, अयो गोरखाSSली!”
अशी आरोळी देत ते पुन्हा बाहेर आले, समोरुन अखंड गोळीबार होत असतानाही त्यांनी मशीनगन चालवणार्या अनेक पाकिस्तानी सैनिकांना अचुक टिपले.
कॅप्टन पांडेंच्या पायाला आणि खांद्याला गोळी लागली. रक्ताची धार सुरु झाली, पण मित्रांनो, ते थांबले नाहीत, पुढच्या बंकर कडे निघाले, हातातला ग्रेनेड फेकुन तो बंकरही त्यांनी उध्वस्त केला.
तिसर्या बंकरमध्ये त्यांना दोन पाकिस्तानी सैनिक गोरखा जवांनावर गोळ्या चालवण्याच्या तयारीत दिसले, तात्काळ त्यांनी आपली ‘खुकरी’ (गोरखा सैनिकाचा वर्तुळाकार चाकु) काढली आणि त्या दोघांना जागेवर कापुन काढले.
देशभक्तीची धुन अशी काही संचारली होती, शरीरातलं सारं रक्त वाहुन गेलं तरीही कॅप्टन मनोज थांबले नाहीत, एकामागे एक बंकर उध्द्वस्त करत ते शत्रुच्या शेवटच्या बंकरपर्यंत पोहचले.
त्यांनी हातात ग्रेनेड घेतला मात्र शत्रुच्या बंदुकीतुन निघालेल्या तीन गोळ्या एकामागोमाग त्यांच्या हेल्मेट मध्ये घुसल्या.
बेशुद्ध अवस्थेत ही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आरोळी दिली, “ना छोडनो!” म्हणजे सोडु नका.
आज आत्ता माझ्या कानात त्यांचे शब्द घुमत आहेत, “ना छोडनो.”
जेव्हा कधी मला कशाची भीती वाटते, निराशा येते, अनेकदा प्रयत्न करुनही अपयश येतं, तेव्हा मला त्यांचे शब्द आठवतात, “ना छोडनो!”
भेकड आयुष्याचं सोनं करणारा हा महामृत्युंजय मंत्र आहे, ,“ना छोडनो.”
त्यांच्या बलिदानाने लढाईला वेगळाचं रंग चढला, गोरखा सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली.
त्या रात्री तळावरील एकही पाकिस्तानी सैनिक जिवंत राहीला नाही.
मला तुम्हाला विचारायचयं, “कॅप्टन मनोज पांडे आणि त्यांच्या सहकार्यांना मृत्युची भीती वाटली नसेल का?”
“क्षणभर नक्कीच वाटली असेल, पण त्यांनी त्यावर विजय मिळवला.”
मग तुम्ही आम्ही आपल्या रोजच्या साध्या, सप्पक अळणी, बेचव जीवनात आव्हानांना का भितो?
व्हॉटसएप ग्रुपमध्ये दहादहा जण म्हणतात, सर, मला भीती वाटते, मला भीती वाटते.
कोणाला जगण्याची भीती, कोणाला मरण्याची भीती.
पुढच्या वेळी जर भीती वाटलीच तर कॅप्टन मनोज पांडेची गोष्ट आठवा.
एकतर मी जिंकुन येईन नाहीतर माझं प्रेत तिरंग्यात गुंडाळुन येईल अशी भीष्मप्रतिज्ञा करणार्या सौरभ कालीयांना आठवा.
मृत्युच्या दाढेत जाऊन, आठ दहा जणांना मारुन शहीद होणार्या कॅप्टन विक्रम बात्राला आठवा.
झालचं तर कसाबला जिवंत पकडण्यासाठी गोळ्या झेलणार्या तुकाराम ओंबळेना आठवा.
मला खात्री आहे, कितीही जटील असला तरी तुम्हाला तुमच्या प्रश्नांना हाताळण्याची हिंमत येईल,
आणि कितीही अवघड असला तरी तुमच्यासमोरच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल, आणि भीती कुठच्या कुठे पळुन जाईल.
भेकडासारखं जगण्यापेक्षा परिस्थितीवर तुटुन पडा, निश्चितपणे विजय तुमचाच आहे, हा संदेश दिला आहे ह्या सर्वांनी!
आपल्या मनावर तो कोरला गेला तरच आपल्या जगण्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल.
धन्यवाद आणि शुभरात्री!
मनाचेTalks च्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.