ड्युटीवर परतत असलेल्या CRPF जवानांवरील हल्ल्याचे प्रतिउत्तर दिलेच पाहिजे

नंदनवनात पुन्हा भारतीय जवानांच्या रक्ताचा सडा पडला आहे…. सुटी संपवून ड्युटीवर परतत असणाऱ्या CRPF च्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद च्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. ३५० किलो स्फोटकाने भरलेल्या एसयूव्हीने ताफ्यातील एका बसला धडक मारली. स्फोटामुळे दोन बसच्या चिंधड्या उडाल्या. या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जवळपास ४० भारतीय जवान शाहिद झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन दशकातील या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जग हळहळले आहे. भारतीय जवानांचे रक्त सांडल्याने देशाचे रक्त सळसळते आहे. दुःख, चीड, संताप आणि आवेशच्या पोस्ट्चा सोशल मीडियावर महापूर आला आहे.

पाकिस्तानने संभाळलेले दहशतवादी रक्ताची चटक लागलेल्या हिंस्त्र श्वापदासारखे भारतीय जवानांवर एकामागून एक हल्ले चढवत असल्याने जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. त्यामुळे जनमानसाच्या या भावनांची दखल आता भारत सरकारला घ्यावी लागेल. भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतीय सेनेचे वीर जवान आपल्या छातीवर गोळ्या झेलत मातृभूमीचे रक्षण करत आहेत. त्यांनी दहशतवाद्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ दिले नाहीत, आणि यापुढे ही ते होणार नाहीत. कारण सीमेपलीकडून होणाऱ्या आक्रमणाचे निर्दालन करण्याची क्षमता भारतीय लष्कारात आहे. परंतु पाकने भारताविरोधी पुकारलेल्या छुप्प्या युद्धात आणखी किती जिगरबाज जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागणार आहे? किती काळ आपण धडा शिकवण्याची भाषा करत श्रद्धांजलीचे शाब्दिक हार चढवून आश्रू ढाळणार आहोत? यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या लष्करावर हल्ले करून दहशतवादी जवानांचे मनोधर्य खच्ची करण्याचा डाव आखत आहे.. त्यामुळे, आता बस्स झाले..!

कोणताही दहशतवादी हल्ला हा एक सुनियोजित कट असतो. त्यामागे एक मोठी रणनीती असते. पुलावामाच्या हल्ल्यामागेही एक मोठे षडयंत्र आहे. तुमच्या सुरळीत चालेल्या जीवनचक्राला आम्ही कधीही खीळ घालू शकतो, हे दहशतवाद्यांना यातून सुचवायचे आहे. भ्याड हल्ला करून घातपात करायचा आणि समाजात भयगंड पसरवायचा, ही यामागची रणनीती आहे. भारताला स्वतंत्र मिळाल्यापासूनच पाकिस्तानने भारत विरोधात धोरण आवलंबलं. सरळ युद्धात आपला टिकाव लागू शकत नाही हे दोन तीन युद्धात लक्ष्यात आल्यानंतर पाक ने दहशतवादाचा आधार घेत भारतात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला.

आतंकवाद्याना फूस देणे, त्यांचे पालनपोषण करून त्यांना आर्थिक मदत करणे, शस्त्रसाठा पुरवणे सोबतच सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणे. असे प्रकार पाकिस्तानकडून सातत्याने केले जातात आणि आपण फक्त चर्चेची गुऱ्हाळे मांडून शांततेचा राग आवळत आहोत. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधानांनी सुरक्षा समितीची बैठक बोलावून दहशतवादविरोधी कारवाईला आणखी गती देणार असल्याचे सांगितले आहे. हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही, त्यांना धडा शिकवणारच.. दहशतवाद्याना जश्यास तसे उत्तर देऊ.. या नेहमीच्या धमक्याही देण्यात येत आहे. मात्र सोडणार नाही म्हणजे काय? दहशतवादी भारताच्या ताब्यात थोडीच आहे. त्यासाठी पाकमधील दहशतवाद्यांच्या तळावर थेट हल्ले करावे लागतील.

कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शांततेच्या मार्गाने सोडवायची आपली पद्धत आहे. ‘कुत्रं आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं नसतं’, या म्हणीप्रमाणे भारताने कधीच आगळीक केली नाही. परंतु पाणी आता डोक्यावरून जायला लागले आहे. त्यामुळे किमान दगड तरी भिरकावला गेला पाहिजे. सरकार म्हणून काम करणाऱ्या यंत्रणेला सर्वच निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतात.. प्रत्येक निर्णयांच्या दूरगामी परिणामांचा विचार सरकारला करावा लागत असतो.. अंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि जागतिक नियमांचेही संकेत सरकारला पाळावे लागतात. त्यामुळे भावनेच्या भरात एखादा अरेरावीची निर्णय सरकारला घेता येणार नाही, हे मान्य. परंतु दहशतवादी नेहमीच आगळीक करत असतील तर भारतीय सैन्याजवळ असलेला शस्त्रसाठा दिखाव्यासाठी नाही, हेही त्यांना कळायला हवे. २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकला चांगलाच जरब बसला होता. भारत यापुढे पाकिस्थानची आगळीक सहन करणार नाही, असा संदेश यातून दिला गेला. मात्र आता अशा कारवाईचं सातत्य ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

समोरून वार करणाऱ्याची छाती चिरता येते, मात्र पाठीमागून वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. पाकिस्तान भारताशी समोरून कधीच युद्ध करणार नाही.. त्याचे परिणाम त्याने तीन वेळा भोगले आहेत. त्यामुळे अशी चूक तो चौथ्यादा करेल असे वाटत नाही. आणि राहिला प्रश्न अणुयुद्धाचा तर या निव्वळ पोकळ गर्जना आहेत. पाकिस्तानची या धरतीवर शाबूत राहण्याची इच्छा संपल्यावरच ते असा निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे, दहशतवादी कारवाया आणि छुपे युद्ध, याच मार्गाने पाक भारताला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ज्या ज्या वेळी शांततेसाठी पाऊल उचलले, त्या त्या वेळी पाकिस्तानने भारताच्या प्रयत्नांना हरताळ फसला. अटलबिहारींची लाहोर यात्रा असो, की नरेंद्र मोदींची पाकिस्तानची भेट.. पाकला प्रेमाची भाषा समजत नाही, हा अनुभव प्रत्येकवेळी आला आहे. आजवर पाकशी झालेल्या असंख्य चर्चांपैकी एकाही चर्चेची फलनिष्पती समोर आली नाही. मग असल्या वांझोट्या चर्चा करण्याचा काय फायदा ? भारताने चर्चा, तर पाकने मात्र आक्रमणे करत रहायची, याला काय अर्थ आहे. पाकसोबत प्रत्यक्ष युद्ध सुरु नसले तरी दररोज भारतीय जवानांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागत आहे. भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास भारतमातेचे पुत्र कायम तत्पर असतात. पण, हे चालणार तरी किती दिवस?

पाकिस्तान संदर्भात मत मांडताना ‘कुत्र्याचे शेपूट’ या वाक्प्रचाराचा वारंवार वापर केला जातो. कारण एखाद्याचा स्वभाव कितीही प्रयत्न केले तरी बदलत नाही. तुम्ही कितीही चांगले वागा, तो मात्र आपले वागणे बदलायला तयार नसतो, अगदी ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’ या म्हणीप्रमाणे. पाकच्या बाबतीतही सुरवातीपासून असाच अनुभव आलेला आहे. एक दोनदा नाही तर शेकडो वेळा विविध आघाड्यांवर तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तानने ने भारतविरोधी कुरापती थांबविल्या नाहीत. त्यामुळे भारत द्वेषाने वाकडी झालेली पाक ची शेपूट काहीही केलं तरी सरळ होणार नसेल तर ती शेपूट ठेचायलाच हवी..! पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना विनम्र श्रद्धांजली..!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।