शुचिर्भूत हा स्नान अथवा अंघोळी करता हिंदु धर्मशास्त्राने दिलेला शब्द ..
शुचिर्भूत म्हणजे शुद्धता… शास्त्रा प्रमाणे शरीर आणि मन या दोनही गोष्टींची स्वच्छता महत्वाची…
शरीरा करिता अंघोळ किँवा स्नान !!!
शास्त्रात अंघोळीच्या वेळा दिल्या आहेत… अर्थात सामान्यतः कोणी त्या पाळत नाहीत..
स्नान कीती छान शब्द आहे…
अंगावर पाणी घेता घेता अनेक अंघोळीच्या आठवणी नकळत जाग्या झाल्या….
आयुष्यातली पहिली अंघोळ आठवत नसते आणि शेवटची अंघोळ अनुभवण्याच्या पलीकडे आपण गेलेले असतो.
पहिली अंघोळ हौसेने घातलेली असते तर शेवटची उरकलेली असते…
पण या दोन अंघोळीच्या मध्ये अनेक स्नानांच्या आठवणी असतात…
लहान मुलाला अंगाला तेल लावून पायावर घातलेली अंघोळ… आजीच्या पायातुन आणि हातातून मिळणारी मायेची उब आणि नंतर अंगावर पडणारे गरम पाणी….
लहान पणी घरोघरी गिझर नव्हते तेंव्हा बंबाच्या पाण्यात केलेल्या अंघोळी… त्या अंघोळीची एक वेगळीच मजा.. ऊन ऊन पाणी आणि त्या पाण्याला असणारा एक प्रकारचा सरपणा मुळे लागलेला छान जळकट वास…
वाढ दिवसाच्या दिवशी आई, बहीण, लेक अथवा बायकोने तेल लावून घातलेली अंघोळ… त्या अंघोळी मध्ये पण एक वेगळीच मजा असते, तेल लावातना बहिणींनी किंवा लेकीने केलेले कमेंट्स….. नशीबवान असु आणि तेल लावायला लेकी, बहीण, बायको, आई अशा सगळ्या जणी असतील तर मग त्या नंतर ची गरम पाण्याची अंघोळ पुर्ण वेळ अंगावरील तेल काढण्याच्या खटाटोपात संपते…
नरक चतुर्दशी ची अंघोळ पण पहाटेच्या अंधारातील, तेल लावून नंतर सुवासिक उटण्याने केलेली अंघोळ…
दिवाळीचे म्हणजे थंडीचे दिवस… पहाटेच्या प्रसन्न वातावरणात, बाहेर होणाऱ्या फटाक्यांच्या आवाजात होणारी अंघोळ खरेच लाजवाब….
लांबचा प्रवास करून आल्या नंतर केलेली अंघोळ एक वेगळीच energy देऊन जाते…
आजारपणातून उठल्या नंतर दोन तांब्याची का होईना केलेली अंघोळ आजार पण काही क्षण दूर करते…
लहान पणी केस कापून आल्या नंतर घरातील मोठयांनी घरात इकडे तिकडे न जाता बाथरूम मध्ये ढकलून करायला लावलेली अंघोळ…
प्रवासाला निघताना केलेली घाईतली अंघोळ.
सुट्टीच्या दिवशी केलेली मनसोक्त अंघोळ…
स्विमिंग पुल वर तलावात उडी मारण्याच्या पूर्वीची अंघोळ…
जिम मधल्या वर्क आउट नंतर केलेली अंघोळ…
कधी तीर्थ क्षेत्री नदीवर केलेली अंघोळ…
अशा अनेक अंघोळी…
अंघोळीचा आणि भुकेचा काही तरी संबंध आहे… अंघोळी नंतर ताजेतवाने वाटणे आणि भूक लागणे या एकमेकाला पूरक गोष्टी… याला एका अंघोळीचा अपवाद…
स्मशानातून आल्या नंतर केलेली अंघोळ उदासीनता नाही घालवू शकत… कारण शरीरा पेक्षा मन जास्त थकलेलं असते… मनाच्या अंघोळीचे शास्त्र इतके सोपे नक्कीच नाही…
त्या मुळेच तुकोबांनी म्हंटले आहे ना “नाही निर्मळ जीवन तर काय करील साबण”
निर्मळ जीवन हा मोठा आणि गहन विषय आहे, कारण ते स्वच्छ करण्या करिता साबण, उटणे किंवा शाम्पू चा शोध अजून लागायचा आहे त्या मुळे आपण फक्त निर्मळ शरीरा बद्दल बोलू शकतो…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.