जुनी कागदपत्रे चाळताना आजोबांनी आईला लिहिलेली काही पोस्ट कार्डे हाती लागली. पत्राच्या वरती ll श्री राम ll असं लिहून प्रत्येक पत्राची सुरुवात केलेली होती. पत्राची किंमत पंधरा पैसे दिसत आहे. पत्रात सर्वांची खुशाली, सर्वांना आशीर्वाद आणि वेळेवर जेवण्याचा सल्ला दिला आहे. आजोबांचं अक्षर अगदी मोडी वळणाचं होतं. खरंतर हे पत्र काही मोठं साहित्यिक मूल्य असलेलं किंवा काव्यात्मक नाही पण सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीतून अहमदनगर जिल्ह्यात खर्ड्याला दूरवर राहणाऱ्या लेकीची आणि तिच्या लेकरांची काळजी आणि आतड्यातील माया त्या शब्दा शब्दात तुडुंब भरून दिसते.
हृदयातील गूज सांगायला महाकाव्य लिहायची गरज नसते. ते एका वाक्यात एका शब्दात किंवा एका हुंकारातून सुद्धा व्यक्त करता येत असतं. पंचवीस तीस वर्षांपूर्वी पत्रव्यवहार हे संवादाचं एक लोकप्रिय माध्यम होतं टेलिफोन अस्तिवात होता पण घरोघरी नाही. स्वस्तात ख्याली खुशाली कळविण्यासाठी पत्रव्यवहार हाच सुलभ पर्याय होता. आंतरदेशीय पत्र हा लोकप्रिय प्रकार होता.
फक्त नातेवाईकांनाच नव्हे तर मित्र मैत्रिणींनासुद्धा पत्र लिहिली जायची. पत्र लिहिताना जुनी माणसे पत्राचा मायना मसुदा व शेवट याबाबतचे तत्कालीन नियम काटेकोरपणे पाळायचीे. गं.भा. निर्मलाताईंचे चरणी वसंताचा शि.सा.न.वि.वि… वज्रचुडेमंडित काशीबाईंचे चरणी नंदकुमारचा शिरसाष्टांग दंडवत. अशा प्रकारचे मायने सर्रास वापरले जात.
कृ.सा.न.वि.वि. म्हणजे कृतानेक साष्टांग नमस्कार. तसेच शि.सा.न.वि.वि. म्हणजे शिरसाष्टांग नमस्कार. गं.भा.म्हणजे गंगा भागीरथी. हा मायना विधवा स्त्री साठी वापरला जात असे. परंतु तरुण मुलंमुली पत्रात नवनवे प्रयोग करत असत. ज्येष्ठ व्यक्तींची नावे त्यांच्या घरातील मानपानानुसार आणि वयानुसार उतरत्या क्रमाने लिहिण्याची प्रथा होती.
जसे तीर्थस्वरूप आजी आजोबा, मोठे मामा मामी, नंदू मामा, उमेश मामा सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार व लहानांना आशीर्वाद. यात वयानुसार उतरंडीने नमस्कार व आशीर्वाद असे. लव्ह यू, मिस यू असले प्रकार त्यावेळी अस्तित्वात नव्हते. रोज रोज लव्ह यू, मिस यू न लिहिताही हृदयाच्या तळात खोलवर आस्था माया, प्रेम, आपुलकीचे जिवंत झरे झिरपत होते. या झऱ्यातून उसळणारे कल्लोळ पत्ररूपाने एकमेकांजवळ पोहोचवले जायचे.
हे मायेने ओथंबलेले शब्द मनाला सुखद गारवा द्यायचे. हे साधे सुधे शब्द शिणलेल्या मनावर अँटी ऑक्सिडंट, प्रमाणे काम करायचे. सासुरवाशिणीची माहेरचं पत्रं म्हणजे हार्मोन संतुलन काढा होता. पाठीशी असलेल्या भक्कम आशीर्वादाचं ते प्रतीक होतं.
उठसूट कितीही फोन केला तरी कागदावर उमटलेल्या हृदयांतर्गत भावनांची बोललेल्या शब्दाला सर नाही. कधी कसलीही काळजी करू नकोस रामराया पाठीशी आहे, असा सुशांत धीर देणारे शब्द किंवा त्यांची करणी त्यांना भावेल आपण आपला धर्म सोडू नये, असा संयत शब्दात मांडलेले हृदयांवर कोरले जाणारे किती साधे किती अचूक शब्द.
दहा ऑक्टोबरला राष्ट्रीय डाक दिवस साजरा केला जातो अनेक संस्था विविध स्तरावर पत्रलेखन स्पर्धा घेऊन आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न करतात पण स्पर्धेसाठी लिहिलेल्या पत्राला मनापासून लिहिलेल्या पत्राची सर नाही.
‘ती’ सतरा वेळा अंगणातील झाल्या घालायची पत्र आलं कि तीचा दिवस आनंदात जायचा. मुलांच्या मनी ऑर्डरसाठी पोस्टात चकरा मारणारे वृद्ध वडील. राखी पौर्णिमेच्या ओवाळणीची मनी ऑर्डर येईल म्हणून अधीर झालेल्या बहिणी, बापाच्या मनी ऑर्डरची वाट पाहणारे शिक्षणाकरिता दूर गावी राहणारे विद्यार्थी, कथा कवितेच्या मानधनाच्या मनी ऑर्डरची वाट पाहणारे कवी आणि लेखक ही सगळी पात्रं आता काळाच्या गेली.
पूर्वी कवी लेखकांचे पत्ते मासिकांमधून त्यांच्या लेखाखाली वगैरे छापले जायचे. चाहतेही आपल्या आवडीच्या लेखकाला भरभरून पत्र लिहित. लेखक कवीही जोमाने, फुरसतीने सर्व पत्रांना लेखी उत्तरं देत. त्या पत्रांना मौल्यवान ऐवजा प्रमाणे जतन केले जाई.
तासाभरात फेसबुकवर शंभर लाईक येण्याच्या काळात हे सगळं हास्यास्पद वाटेल. पण लिखित पत्र अत्यंत मार्मिक असत. अतिशय विचारपूर्वक लिहिलेली असत. त्यात नुसता मस्तच, छानच, सुरेखच, असा “च”कारी कॉमेंट नाही तर जीवनोपयोगी मार्गदर्शन असे. भावनांच्या हळूवार फुंकरीने मनाच्या फुलाला फुलविण्याची ऊर्जात्मक ताकद त्या पत्रांमध्ये होती.
एक, दोन, पाच, दहा, वर्षांनंतर गंतव्य ठिकाणी पोहोचलेल्या पत्रांच्या बातम्या वृत्तपत्रातून छापल्या जायच्या. लोक या बातम्या आश्चर्यानेआवडीने वाचायचे. “तुमची मुलगी आम्हास पसंत आहे गौरी गणपती उरकल्यानंतर बैठकीस बोलवावे.” असे पत्र त्या मुलीच्या बाळाच्या बारशाला पोहोचायचे. असलेही चमत्कार पोस्ट खात्याच्या कृपेने घडत असत.
वहीत किंवा पुस्तकात घालून चोरून दिलेली पत्रं ही ऑथोराईज्ड पत्रांच्या यादीत समाविष्ट करता येणार नाहीत. ही पत्रे (गावठी भाषेत याला चिठ्ठ्या असे संबोधले जात असे.) इच्छुक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी धम्माल करामती केल्या जात. (हा संपूर्ण वेगळ्या विनोदी लेखाचा विषय होऊ शकतो. तो याच लेखात समाविष्ट करून मी माझे मानधन घालविणार नाही. इतपत मी व्यवहारी आहेच.)
खेड्यापाड्यात राहणाऱ्या बहिणी बहिणी, मित्रमैत्रिणी एकमेकांना पत्रे लिहिताना एक शब्दप्रयोग त्याकाळी आआवर्जून करत असत तो असा…
‘जा जा पत्रा मार भरारी, जाऊन सांग माझ्या भावाच्या कानी, खूप सुखी आहे तुझी ताई, अजिबात काळजी करू नकोस भाई’
किंवा
‘जा जा पत्रा मार भरारी जाऊन सांग माझ्या आईच्या कानी…..’
वगैरे वगैरे अशी भावनात्मक गगनभरारी घेत कुशल मंगल पोहोचविणाऱ्या पत्ररूपी पक्षांचे पंख या तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीने पार छाटून टाकले एवढं मात्र खरं.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.