मित्रांबरोबर पाडलेल्या चिंचांमधून मोजून चार बुटुक तुझ्यासाठी राखून ठेवायचो. माझ्या घराची वाट तुझ्या घरावरूनच जायची.
रोज संध्याकाळी माझ्या घरी जायच्या वेळेसच, तुझे अप्पा तुला ओसरीवर बसवून पाढे-परवचे म्हणायला लावायचे. तुमच्या फाटकातून आत हात घालून मी हळूच ती चार बुटुक आतल्या कट्ट्यावर ठेवायचो आणि जरा लांब जाऊन उभा राहायचो, पाढे म्हणता म्हणता तू हळूच उठून अंगणात फेऱ्या मारायला सुरु करायचीस आणि बरोबर अप्पांचा डोळा चुकवून मी ठेवलेली चिंच उचलून घ्यायचीस आणि मग मी घरी जायचो ती उशीर केल्याबद्दल आईची बोलणी ऐकायलाच!
एकदा शनिवारच्या सकाळच्या शाळेनंतर मी मित्रांबरोबर जांभळं पडायला गेलो होतो, येताना वाटेत तू दिसलीस, जांभळांसारख्याच रंगाचा परकर पोलकं घालून. माझ्या वाटणीची सगळी जांभळं मी तुझ्या परकरात ओतली आणि काहीच न बोलता, तू परकर सावरत सावरत हळूच पळून गेलीस. आंब्याच्या झाडाकडून उजवीकडे वळताना मात्र मागे वळून बघायला विसरली नाहीस. खरं सांगू? तू काही बोलली जरी असतीस ना तरी ते शब्द त्या नजरेइतके सशक्त नक्कीच नसते.
एकदा तुमच्या आवळ्याच्या झाडाचे आवळे काढले होते आणि तू थोडे आवळे एका पानात गुंडाळून फाटकाच्या बाहेर ठेवलेस, मला बरोबर ते कळलं कारण शाळा सुटायच्या वेळेस मैत्रिणीशी काहीतरी कुजबुजत होतीस आणि माझ्या समोरून जाताना बरोबर “आवळे पानात गुंडाळून ठेवायचे.” असं जोरात म्हटलीस आणि नेहमीसारखी माझ्याशी काहीच न बोलता तिथून धूम ठोकलीस.
इतकी वर्ष झाली, रोज तुझ्या घरावरून जातो, बऱ्याचदा खिशात चिंचा असतात आजही कित्येकदा फाटकातून हळूच आत चार बुटुक ठेवण्यासाठी हात शिवशिवतात पण मी स्वतःला आवर घालतो पण आज इतक्या वर्षांनी तुमच्या अंगणात एक लहान मुलगी दिसली, जांभळांसारख्या रंगाचा फ्रॉक घालून… आणि राहवलं नाही, तिला हाक मारून चिंच हवी का विचारलं आणि तिने लगेच हात पुढे केला.
तिच्या इवल्या हातात चिंच ठेवेपर्यंत दुसरा हात फ्रॉकच्या खिशात गेला आणि तिने मूठभर आवळे माझ्या हातात ठेवले. मी पुढे काही बोलणार इतक्यात छोटी आत पळून गेली, काहीच न बोलता, तुझ्यासारखीच आणि नेमकी त्याच वेळेला तू बाहेर आलीस. मी माझ्या जुन्या जागी जाऊन थांबलो आणि मी थांबलो हे बघून तू छोटीच्या हातातून चिंच घेतलीस. आजही, इतक्या वर्षांनीही तू माझ्याशी न बोलता इतकी बोललीस आणि मी परत उशीर केला म्हणून बोलणी खाल्ली.
लेखन- मुग्धा शेवाळकर
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अवीट…. खूप आवडली👌👌👌