जागतिक वारसा असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील ‘लोणार सरोवर’

मागच्या आठवड्यात शेगाव दौरा केला. स्वतःची गाडी असण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हवं तसं गोष्टी बघता येतात. शेगाव दौरा आटपून मुंबईला येण्यासाठी निघताना हाताशी थोडा वेळ होता.

मग निसर्गाच्या चमत्कारापासून हाकेच्या अंतरावरून कसं परत येणार? शेवटी त्या चमत्काराचं रूप ‘लोणार सरोवर’ बघून स्तिमीत तर झालोच! पण अशी जगातील एकमेव गोष्ट माझ्या भारतात, किंबहुना महाराष्ट्रात आहे ह्याचा खूप आनंद झाला.

पण त्याची अवस्था व त्याच्या जपणुकीबद्दलची समाजाची, सरकारची मानसिकता बघून हिरमोडही झाला…

बुलढाणा जिल्ह्यातील ‘लोणार सरोवर’ हे जागतिक वारसा National Geo-heritage Monument आहे. लोणार विवर/लोणार सरोवर एका अशनी च्या पृथ्वीवर आदळण्याने तयार झाले आहे. उल्का आणि अशनी मधील सगळ्यात मोठा फरक बघायचा तर लोणारला भेट द्यावीच.

प्रत्येक वर्षी १५,००० टन वजनाच्या उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. पण पृथ्वीच्या वातावरणातच जळून नष्ट होतात.

लोणार विवर

अनेक हजार वर्षात ह्या उल्कांचा अशनी मात्र लोणार सारखा एखादाच होतो. उल्का जेव्हा पृथ्वीवर आदळते तेव्हा त्याला ‘अशनी’ असं म्हणतात. जवळपास ३५,००० ते ५०,००० वर्षापूर्वी असाच एक अंदाजे ६० मीटर जाडीचा आणि १०,००० टन वजनी अशनी लोणार येथे पृथ्वीला धडकला.

ह्या धडकण्याने जवळपास अंदाजे ६ मेगा टन शक्तीचा स्फोट झाला. आपल्याला ज्ञात असलेल्या हिरोशिमा-नागासाकी इथली शक्ती ०.२५ मेगा टन इतकीच होती.

म्हणजे लोणार इथली धडक पूर्ण भूतलावर त्यावेळी जाणवली असेल असा शास्त्रज्ञाचा होरा आहे. इतक्या प्रचंड टक्करीमुळे पृथ्वी सुद्धा आपल्या व्यासात हलली असेल. असं सुद्धा काही शास्त्रज्ञ सांगतात.

इतक्या प्रचंड ऊर्जेमुळे १.८ किलोमीटर व्यासाचं तसेच १३७ मीटर खोलीचं एक विवर तयार झालं. ह्या टक्करी मधून झालेल्या उर्जेमुळे इथलं तापमान अंदाजे १८०० डिग्री (यामध्ये वेगवेगळ्या अभ्यासानुसार काही फरक असू शकतो) सेल्सियस पर्यंत गेलं असेल.

ह्यामुळे पूर्ण अशनी वितळून वायूत रुपांतर झालं असेल असा अंदाज आहे. लोणारचं वैशिष्ट्य इतकंच नाही तर ‘लोणार’ हे बसाल्ट दगड म्हणजेच अग्निजन्य खडकात तयार झालेलं जगातील एकमेव विवर आहे.

आता कोणी विचार करेल कि ह्यात काय विशेष? तर अग्निजन्य खडक हा खडकातील सगळ्यात कठीण असा समाजला जातो. अशा दगडात इतकं खोल विवर तयार होणं हेच एक आश्चर्य आहे.

‘लोणार’अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर. लोणार सरोवरात असलेल्या पाण्याची पी.एच.व्हॅल्यू ११ च्या आसपास आहे (१०.७). समुद्राच्या पाण्याचा खारटपणा हा ९ च्या आसपास असतो.

पण लोणारच्या आसपास कोणताही स्त्रोत नसताना इथल पाणी समुद्रापेक्षा खारट आहे. ह्यामुळे ह्या पाण्यात कोणतेच जलचर पाणी जिवंत राहू शकत नाही.

इथलं पाणी आरोग्याच्या दृष्टीने औषधी आहे. इथे अजून एक वेगळा अविष्कार बघायला मिळतो. इथल्या मातीत खूप लोखंड आहे. येथील दगडात चुंबकीय गुणधर्म आहेत.

शास्त्रज्ञांच्या मते अशनी च्या वितळण्यामुळे ह्या गोष्टी येथील परिसरात आढळून येतात. लोणार च्या परिसरात अनेक औषधी वनस्पती आहेत.

इथल्या विवरामुळे पृथ्वीच्या इतर कोणत्याही भागात न आढळणाऱ्या आणि संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या गोष्टी इकडे आढळून येतात.

लोणार विवर
image captured by NASA satellite

इतक्या वर्षानंतर लोणारमध्ये अजूनही संशोधन चालू आहे. अजूनही सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधू शकलेले नाहीत. इथे असलेली मंदिरे, इथले खडक त्याचे गुणधर्म आणि लोणार सरोवर ह्यावर अजूनही खूप काही शोधायचं बाकी आहे.

पण जीवसृष्टीचं उगम स्थान आणि आपण कुठून आलो?

अशा वैश्विक प्रश्नांची उत्तर आपल्या गर्भात लपवलेलं लोणार आज सरकारी अनास्था, ह्या सरोवराविषयी माहित नसलेली माहिती, अंधश्रद्धेने धावणारे लोक, कचरा टाकणारे, अंतिम कार्य सारखे विधी आणि इकडे येणाऱ्या अनेक प्रकारच्या दूषित पाण्याने इथली जैवविविधता धोक्यात येत आहे.

जिथे नासा अमेरिकेवरून मंगळावर जाण्याआधी वैज्ञानिकांना अभ्यास करण्यासाठी लोणारला पाठवते. त्याच लोणार बद्दल उराशी मराठी अस्मिता बाळगणारे स्वत:ला भारतीय, मराठी म्हणवणारे सगळेच किती अनभिज्ञ आहेत हे बघून खूप वाईट वाटलं.

स्कंध पुराण, पद्म पुराणात उल्लेख असणाऱ्या इतक्या प्रचंड कालावधीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘लोणार’येथील ठेवा डोळ्यात बंदिस्त करताना स्तिमित तर झालोच पण जागतिक वारसा असलेल्या अशा बसाल्ट लेक विवरा समोर उभं राहून निसर्गाच्या ह्या अदाकारीला मी कुर्निसात केला.

अजूनही खूप काही लोणार येथे बघणं बाकी आहे. जेव्हा जमेल, जसं जमेल तेव्हा प्रत्येक भारतीयांनी आपल्या माजघरात असलेल्या लोणारला भेट देऊन निसर्गाचा अविष्कार अनुभवयाला हवाच पण त्याचवेळी त्याच्या संवर्धनासाठी काही करता येत असेल तर त्यासाठी पुढाकारही घ्यायला हवा.

एक अमूल्य ठेवा आपल्या माजघरात आहे, त्याचं संवर्धन हे उद्याच्या पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक असेल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “जागतिक वारसा असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील ‘लोणार सरोवर’”

  1. मला नोकरीच्या निमित्ताने लोणार मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती, सुट्टीच्या दिवशी सरोवराच्या कड्यावरुन सूर्यास्त बघत गप्पा मारायचो… खरंच खूप अद्भुत जागा आहे.
    लेख वाचून मन पुन्हा लोणार सरोवराजवळ गेले. धन्यवाद.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।