वात, कफ आणि पित्त दोष म्हणजे काय, तो बॅलन्स करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे राखावे?

वात, कफ आणि पित्त दोष म्हणजे काय आणि त्यांचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे, हे जाणून घ्या ह्या लेखात

सहसा आपण कोणत्याही कारणाने आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला त्यावर काही औषधे देतात. औषधे घेतली की आपल्याला बरे वाटते. परंतु तोच आजार काही काळाने आपल्याला पुन्हा होऊ शकतो. असे अनेक वेळा घडते. सर्दी, खोकला, ताप येणे, पोट दुखी असे आजार एकदाच झाले असे होत नाही. पुन्हा पुन्हा असे आजार होऊ शकतात. काय कारण असेल ह्याचे ?

असे वारंवार होणारे आजार मुळापासून बरे न करता वरवरच्या लक्षणांवर औषध दिल्यामुळे पुन्हा पुन्हा उद्भवतात. आज आपण कोणतेही आजार नक्की कशामुळे होतात आणि ते मुळापासून बरे करता येऊ शकतात का हे पाहणार आहोत.

आयुर्वेदात सांगितलेल्या उपायांचा उपयोग करून आपण बरेच आजार मुळापासून बरे करू शकतो. योग्य आहार, चांगली जीवनशैली आणि काही नैसर्गिक औषधे ह्यांचा उपयोग करून आयुर्वेद अनेक आजार चमत्कारीकरीत्या बरे करू शकतो. मात्र त्यासाठी रुग्णाची प्रकृती मुळची कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

आयुर्वेदाचे तज्ञ वैद्य कोणतेही औषधोपचार देण्यापूर्वी रुग्णाचे मन, त्याची प्रकृती आणि त्याच्या शरीरातील दोष जाणून घेतात.

माणसाच्या शरीरात तीन प्रकारचे दोष सांगितले आहेत.
  • वातदोष
  • कफदोष
  • पित्तदोष
आज आपण ह्या तीन दोषांबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपले शरीर पाच तत्त्वांनी बनले आहे. जल, पृथ्वी, अग्नि, आकाश आणि वायू ही ती पाच तत्वे आहेत. आपल्या शरीरात असणारे वात, कफ आणि पित्त हे धातू योग्य प्रमाणात असतील तर आपले शरीर निरोगी आणि सुदृढ असते.

परंतु जर या धातूंचे संतुलन बिघडले तर शरीराचे स्वास्थ्य बिघडते. म्हणूनच ह्यांना दोष म्हंटले गेले आहे. हे दोष तीन असल्यामुळे त्यांना ‘त्रिदोष’ असे म्हटले जाते.

वात, कफ आणि पित्त हे प्रत्येक दोष वरील पाच पैकी दोन तत्त्वांचे बनलेले असतात आणि त्या तत्त्वांच्या कमी अधिक प्रमाणानुसार दोषाचे प्रमाण ठरते. उदाहरणार्थ वात दोष ‘आकाश’ आणि ‘वायू’ या तत्त्वांनी बनलेला आहे. गतिशीलता हे ह्याचे लक्षण आहे त्याचे प्रमाण बिघडले की वातदोष उत्पन्न होतो.

अयोग्य आहार आणि खराब जीवन शैली हे अशा प्रकारचे दोष उत्पन्न होण्याचे प्रमुख कारण आहे. जसे की कफ प्रवृत्तीचे पदार्थ खाण्यात जास्त असतील तर त्या व्यक्तीला कफाचा त्रास होणारच. आपले स्वास्थ्य प्रामुख्याने आपल्या आहारावर अवलंबून असते.

आज आपण त्रिदोषांबद्दल अधिक जाणून घेऊया.

१. वातदोष 

वातदोष वायू आणि आकाश या दोन तत्त्वांनी बनलेला आहे. वातदोष सर्वात महत्त्वपूर्ण मानला गेला आहे कारण शरीराची गतिशीलता त्यावर अवलंबून असते. शरीरात होणारे रक्ताभिसरण हे वातामुळे होते. शरीरातील सर्व पोकळ्यांमध्ये वात असतो.

सांध्यांमध्येदेखील तो असतो. शरीरात असणारी एकूण ऊर्जा आणि उत्साह वातामुळे असते. त्यामुळेच वाताचे संतुलन बिघडले की उत्साह कमी होतो. सांधेदुखी सुरु होते. इतरही आजार होतात. शरीरातील मलमूत्र इत्यादी घाण काढून टाकणे हे देखील वाताचेच काम असते. वाताचे संतुलन बिघडले की ह्या क्रियेवर देखील परिणाम होतो आणि ती व्यक्ती आजारी पडते.

कोरडी त्वचा, अशक्तपणा, चिडचिड आणि लवकर राग येणे ही वात प्रकृतीच्या लोकांची प्रमुख लक्षणे आहेत.

२. पित्तदोष 

पित्त दोष हा अग्नी आणि जल या तत्त्वांनी बनलेला असतो. पित्ताचे काम शरीरात उष्णता निर्माण करण्याचे असते. शरीरातील द्राव आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे काम पित्त करते. सोप्या भाषेत सांगायचे तर आपण जो आहार आणि प्राणवायू शरीरात घेतो त्याचे विघटन करून सर्व अवयवांचे पोषण करण्यासाठी पित्त काम करते.

तसेच भावभावना आणि बुद्धी यांचे संतुलन देखील पित्तामुळे राहते. पित्ताचे संतुलन बिघडले तर शरीराच्या पचनाचे कार्य बिघडते. त्यास ‘ अग्निमांद्य’ असे म्हणतात. पोटदुखी, अपचन होणे, उलटी होणे अशा सारख्या समस्या त्यामुळे उद्भवतात. अंगावर पित्ताचे चट्टे उमटणे हे शरीरात पित्त वाढल्याचे एक लक्षण आहे.

पित्ताचे संतुलन खूपच बिघडले तर शरीराला एक प्रकारची दुर्गंधी येऊ शकते. पित्ताचा सर्वात जास्त प्रभाव पोट आणि मोठ्या आतड्यावर असतो.

खूप गरम होणे, त्वचेवर भुरकट डाग असणे, केस लवकर पांढरे होणे हे पित्त प्रकृतीच्या लोकांचे लक्षण आहे.

३. कफदोष 

कफदोष हा पृथ्वी आणि जल ह्या तत्त्वांनी बनलेला असतो. कफामुळे शरीराच्या सर्व अवयवांचे पोषण होते तसेच इतर दोन दोषांचे नियमन देखील होते. शरीरात कफदोषाचे संतुलन बिघडले तर आपोआपच इतर दोन्ही दोषांचे संतुलन देखील बिघडते.

कफाचे वास्तव्य प्रामुख्याने छाती तसेच घसा, नाक आणि कंठ ह्या ठिकाणी असते. कफ प्रवृत्तीच्या लोकांना घाम येण्याचे प्रमाण कमी असते. त्यांना भूक व तहान लागण्याचे प्रमाण देखील कमी असते. त्यांना फार जास्त प्रमाणात थंडी वाजत नाही किंवा गरमही होत नाही. सर्वसाधारणपणे कफ प्रवृत्तीचे लोक सुदृढ प्रकृतीचे असतात.

तर ही आहे शरीरातील वात पित्त आणि कफ दोष ह्याबद्दलची माहिती आणि त्या त्या प्रवृत्तीच्या लोकांची काही लक्षणे. ह्यावरून आपली प्रकृती कोणत्या प्रवृत्तीची आहे ते ठरवा आणि त्या प्रकारे स्वतःची काळजी घ्या.

ह्या त्रिदोषांचे शरीरातील संतुलन राखण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे आपली प्रवृत्ती ओळखून त्याप्रमाणे आपला आहार ठरवणे. नियमितपणे तसाच आहार घेणे, पथ्ये पाळणे आणि नियमित व्यायाम करून चांगली जीवनशैली ठेवणे. ह्यामुळे ह्या त्रिदोषांचा काहीही त्रास आपल्याला होणार नाही.

आयुर्वेदात योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य निद्रा ही त्रिसूत्री वापरुन त्रिदोषांवर मात करा असे सांगितले आहे. आपण त्याचे पालन जरूर करुया. त्यासाठी हा लेख शेअर करून ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।